अक्षय्य तृतीया : वैशाख शुद्ध तृतीया या शुभदिनास ‘अक्षय्य तृतीया’ म्हणतात. साडेतीन सुमुहूर्तांपैकी तो एक सुमुहूर्त असून अत्यंत मंगल दिवस मानला जातो. कृत अथवा त्रेता या युगांची सुरुवातही ह्याच दिवशी झाल्याचे मानतात. परशुरामजयंतीही याच दिवशी येते.

या दिवशी विष्णू, शिव व पितर यांच्या प्रीत्यर्थ तृषाशमनासाठी पाण्याचा कलश ब्राह्मणाला देण्याचा व श्राद्ध करण्याचा विधी आहे. वसंत ऋतूतील कडक उन्हाळा व सृष्टिसौंदर्य यांमुळे उदकुंभदानाला धर्मरूपता व या दिवसाला सणाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. या मुहूर्तावर शेतकरी पेरणी करतात. या कालास अनुरूप नृत्य–गायनादी विधी वसंतोत्सव करण्याची वहिवाट आहे. कोणतेही मंगलकृत्य अगर व्रत आचरण्यास हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो.

करंदीकर, ना. स.