यज्ञसंस्था : भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील अत्यंत प्रभावशाली अशी एक वेदकालीन धार्मिक संस्था. स्वर्ग, पुत्र, पशू, आरोग्य, ऐश्वर्य, पापनाश इ. इष्ट फलांच्या प्राप्तीसाठी अग्नी, इंद्र इ. देवतांना उद्देशून अग्नीमध्ये समंत्रक आहुती अर्पण करण्याचे धार्मिक कर्मकांड, हे स्थूलमानाने यज्ञाचे स्वरूप होय. यज्ञ हा शब्द यज्‌ (यज्ञ करणे) या संस्कृत धातूपासून बनला असून त्याच धातूपासून बनलेले यजन, याग व इष्टी हे शब्दही यज्ञ या अर्थाने वापरले जातात. तसेच, क्रतू, वितान, मेध, विदथ, मख, सव, सवन, होम, होत्र, आहव, अध्वर इ. शब्दही कमीअधिक फरकाने त्याच अर्थाने वापरले जातात. प्रस्तुत नोंदीत प्रामुख्याने वैदिक यज्ञसंस्थेचे विवेचन असून जगात अन्यत्र आढळणाऱ्या यज्ञाशी समान अशा संकल्पना, यज्ञसंस्थेच्या निर्मितीचे स्पष्टीकरण करणाऱ्या विविध उपपत्ती इत्यादींचे तपशीलवार विवेचन विश्वकोशातील ⇨बळी या नोंदीमध्ये करण्यात आले आहे.  

यज्ञसंस्थेची निर्मिती : जगातील पहिला यज्ञ देवांनी केला होता आणि तोच आद्य धर्म होय, असे ऋग्वेदाच्या पुरुषसूक्तात म्हटले आहे. यज्ञसंस्थेची निर्मिती ईश्वरी वा दैवी   आहे, असे परंपरागत मत जगातील विविध समाजांतून आढळते. आधुनिक काळात याविषयी विविध उपपत्ती ई. बी. टायलर, ई. ए. वेस्टरमार्क, हेन्‍री ह्यूबर्ट, मार्सेल मॉस इ. अभ्यासकांनी मांडल्या आहेत. देवतेला अनुकूल करून घेण्यासाठी आहुती देणे, देवतांच्या गरजा मानवांसारख्या असतात असे मानून वस्तू अर्पण करणे, देवतेने परतफेड करावी म्हणून वस्तू वाहणे, पीडादायक देवतेला दूर ठेवण्याच्या हेतूने तिच्यासाठी बळी देणे, जे देवतेकडून मिळाले आहे ते तिलाच परत करणे इ. स्पष्टीकरणे देऊन या अभ्यासकांनी यज्ञसंस्थेचे स्वरूप व तिच्यामागचा हेतू विशद केला आहे. यज्ञसंकल्पनेची निर्मिती विल्यम रॉबर्टसन स्मिथ यांच्या मते देवकप्रथेतून, हर्बर्ट स्पेन्सर यांच्या मते पितृपूजेतून, एलिअडच्या मते नूतनीकरणाच्या विधीतून, फ्रेझरच्या मते क्षीण राजाला मारून नवीन राजा आणण्याच्या यात्वात्मक विधीतून आणि फ्रॉइडच्या मते ईडिपस गंडातून झाली आहे.

यज्ञ, पूजा व यातुविधी : देवतेसाठी अग्नीमध्ये आहुती अर्पण करणे या स्वरूपाचा वैदिकांचा यज्ञ आणि देवतेसाठी पत्रपुष्पादी अर्पण करणे या स्वरूपाची अवैदिकांची ⇨पूजा या भिन्नभिन्न उपासनापद्धती होत. वैदिकांनी ‘पूजा’ हा शब्द आणि पूजाकर्म सूत्रकाळामध्ये अवैदिकांकडून स्वीकारले आणि त्यानंतर यज्ञसंस्था निष्प्रभ होऊन पूजाकर्माचा प्रभाव वाढत गेला, असे संशोधकांचे मत आहे. यज्ञ म्हणजे यातुविधी, असे अनेक विद्वानांनी मानले आहे. [⟶ जादूटोणा]. उदा., स. रा. गाडगीळ यांच्या मते यज्ञ हा प्राथमिक मानवाचा अन्ननिर्मितीच्या कर्मामधील यातुविधी होय. हे मत स्पष्ट करताना त्यांनी यज्ञाच्या स्वरूपाविषयी पुढीलप्रमाणे विवेचन केले आहे : विश्वाची निर्मिती यज्ञातून झाली आहे विश्वाचे नियमन परमेश्वरी इच्छेने होत नसून यज्ञातून निर्माण होणाऱ्या यात्वात्मक शक्तीने होते यज्ञाचे नियम हेच विश्वचक्र नियमित करणारे सनातन ऋत होय विशिष्ट मंत्र आणि यथासांग कर्म यांच्या तंत्रशुद्ध प्रयोगाने निसर्गातील शक्तीवर प्रभुत्व स्थापन करता येते देवांविरुद्धचे कर्म हे पाप नसून यज्ञीय कर्मातील दोष हे पाप होय यज्ञ निर्दोष असेल तर फळ देणे देवांना भाग पडते यज्ञ देवांसाठी नसून देव यज्ञासाठी आहेत इत्यादी. याउलट तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मते यज्ञात देवतांना शरण जाण्याची भावनाही असल्यामुळे यज्ञ हा केवळ यातुक्रिया ठरत नाही, तर यातू व धार्मिक आराधना यांचे संमिश्र स्वरूप ठरतो. 

यजमान व यज्ञफल : एखाद्या पुरुषास स्वर्ग, पुत्र, ऐश्वर्य, आरोग्य, दीर्घायुष्य, विजय, प्रतिष्ठा, अन्न, संरक्षण, पापनिवारण इ. प्रकारचे फल प्राप्त व्हावे, अशी इच्छा असते. यज्ञ हे या फलप्राप्तीचे साधन आहे, असे मानून तो विधिपूर्वक यज्ञाचे अनुष्ठान करतो. अशा पुरुषास यजमान म्हणतात. देवांनीही यज्ञ केल्याची वर्णने आढळतात. मानवांमध्ये त्रैवर्णिकांनाच यज्ञाचा अधिकार होता. शूद्रांना तो नव्हता. शूद्रांना यज्ञाचा अधिकार नाही, असे शबरस्वामींनी जैमिनीसूत्रांच्या आधारे दाखवून दिले आहे. के. ल. दप्तरींनी मात्र शबरस्वामींनी चुकीचा अर्थ लावल्याचे म्हटले आहे. जैमिनीच्या सूत्रांत यज्ञाचा अधिकार शूद्रादी सर्व मानवांना आहे असे बादरिनामक आचार्याचे मत सांगितले आहे. यज्ञाचा खर्च करण्याची जबाबदारी यजमानाची असते आणि यज्ञाचे फलही त्यालाच मिळते. त्याची पत्नी ही त्याची सहधर्मचारिणी असल्यामुळे यज्ञाच्या अनुष्ठानात सामील होते आणि स्वाभाविकच तिलाही यज्ञाचे फल मिळते. यज्ञ विधिपूर्वक निर्दोष पार पडला असता त्याच्यापासून अपूर्व नावाची शक्ती निर्माण होते आणि तिच्यामुळे यजमानाला त्या यज्ञाचे फल प्राप्त होते, अशी श्रद्धा असते.

 

प्रारंभीचे विधी : यजमान पत्नीसह प्रथम यज्ञ करण्याचा संकल्प करतो. परंतु तो स्वतः एकटा यज्ञाचे अनुष्ठान पूर्ण करू शकत नाही. म्हणून तो विशिष्ट पद्धतीने ऋत्विजांची म्हणजे यज्ञीय ⇨पुरोहितांची निवड करतो. यजमानाला विशिष्ट फळ मिळावे म्हणून हे ऋत्विज यज्ञीय कर्मकांड पार पाडतात आणि त्याबद्दल त्यांना यजमानाकडून यज्ञाच्या अखेरीस दक्षिणा मिळते. यज्ञासाठी निवडलेल्या भूमीला विहार असे म्हणतात. तेथे विशिष्ट पद्धतीने यज्ञमंडप उभारलेला असतो. दर्शपूर्णमास इष्टी, सोमयाग इत्यादींसाठी निवडलेल्या विहाराचे क्षेत्र वेगवेगळे असते. त्यानुसार यज्ञमंडपाचे स्वरूपही बदलते. अग्नीमध्ये आहुती देण्यासाठी आणलेली हविर्द्रव्ये यज्ञमंडपामध्ये विशिष्ट आकाराच्या ज्या जागेवर ठेवली जातात, त्या जागेस वेदी असे म्हणतात. वेदीची सीमा दर्शविण्यासाठी तिच्या कडेने सर्व बाजूंनी विटा रचून किंचित उंचवटा केलेला असतो. ही वेदी दर्भाने आच्छादिलेली असते. आहुतीचा स्वीकार करण्यासाठी देवता या दर्भाच्या आसनावर येऊन बसतात, असे मानले जाते. वेदी तयार करताना निघालेल्या कचरा वगैरेंचा ढीग म्हणजे उत्कर होय. यजमान, त्याची पत्नी व ऋत्विज यज्ञमंडपात प्रवेश करतात. यज्ञासाठी आवश्यक असलेले अग्नी यज्ञमंडपात आणले जातात. ऋत्विजांची मधुपर्काने पूजा केली जाते. त्यानंतर यजमानाला विधिपूर्वक यज्ञाची ⇨दीक्षा दिली जाते. दीक्षेमुळे यजमान लौकिक स्थितीतून बाहेर पडून यज्ञ करण्यास पात्र बनतो. त्यानंतर ज्या त्या यज्ञाच्या स्वरूपानुसार यज्ञकर्माचे अनुष्ठान सुरू होते.


 ऋत्विज : यजमानासाठी यज्ञाचे पौरोहित्य करणाऱ्या ब्राह्मणास ऋत्विज म्हणतात. होता, अध्वर्यू, उद्‌गाता व ब्रह्मा हे अनुक्रमे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद या वेदांचे ऋत्विज होत. ब्रह्मा हा प्रमुख ऋत्विज असल्यामुळे त्याला चारही वेदांचे ज्ञान अपेक्षित असते. मैत्रावरुण, अच्छावाक व ग्रावस्तुत्‌ हे होत्याचे साहाय्यक ऋत्विज होत. प्रतिप्रस्थाता, नेष्टा व उन्नेता हे अध्वर्यूचे प्रस्तोता, प्रतिहर्ता व सुब्रह्मण्य हे उद्‌गात्याचे आणि ब्राह्मणाच्छंसी, आग्नीध्र व पोता हे ब्रह्माचे साहाय्यक होत. अग्निहोत्रात ऋत्विज नसतो. यजमानानेच अग्निहोत्र करायचे. परंतु क्षत्रिय व वैश्य यांना अग्निहोत्र करण्यास एक ऋत्विज किंवा पुरोहित आवश्यक असतो. दर्शपूर्णमासेष्टीत चार, चातुर्मास्ययागात पाच, पशुयागात सहा आणि सोमयागात सोळा ऋत्विज लागतात. काहींनी सदस्य नावाचा सतरावा ऋत्विज सांगितला असून त्याला तीन साहाय्यकांचीही व्यवस्था केली आहे. चार प्रमुख ऋत्विजांपैकी होत्याचे काम म्हणजे ऋचा म्हणून देवतांना आवाहन करणे, उद्‌गात्याचे काम म्हणजे सामगायन करून देवतांची स्तुती करणे आणि ब्रह्माचे काम सर्व ऋत्विजांच्या कामावर नजर ठेवून अनुष्ठानात काही चूक राहणार नाही हे पाहणे असे असते. यज्ञातील बहुतेक क्रियांची व विशेषत: आहुती टाकण्याची जबाबदारी अध्वर्यूवर असते. ब्रह्मा व यजमान यांच्या परवानगीने तो सर्व ऋत्विजांना प्रैष (आदेश) देत असतो.

अग्नी : यज्ञ दोन प्रकारचे. श्रौत व गृह्य. श्रौत यज्ञाला तीन अग्नी आवश्यक, तर गृह्य यज्ञास एक अग्नी पुरेसा. यज्ञामध्ये अग्नीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. अग्न्या धान केल्याखेरीज यजमानाला कोणताही यज्ञ करता येत नाही. अग्न्यधान म्हणजे अग्नींची विधिपूर्वक स्थापना करण्याचे विशिष्ट कर्मकांड होय. अग्नी तयार करण्यासाठी अग्निमंथन केले जाई. शमी वा पिंपळ यांच्या लाकडापासून अरणी तयार करतात. खालची व वरची अशा दोन फळ्या तयार करून त्यांना मधोमध खाचा पाडतात. वरच्या फळीस उत्तरारणी व खालच्या फळीस अधरारणी म्हणतात. वरच्या फळीच्या खाचेखाली घुसळण्याचा दांडू दाबून धरून खालच्या फळीच्या खाचीत दाबायचा व दोरीने घुसळावयाचा या घर्षणाने अग्नी निर्माण होतो. या घुसळण करण्याच्या दांडूस मंथा म्हणतात. हा अग्नी प्रज्वलित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पळस वगैरे यज्ञवृक्षांच्या बारीक फांद्यांच्या तुकड्यांना समिधा म्हणत. विविध अग्नींच्या स्थापनेसाठी यज्ञमंडपातील विशिष्ट ठिकाणी अग्निकुंडांची निर्मिती केली जाई. [⟶ अग्नि अग्निपूजा].

श्रौत यज्ञात गार्हपत्य, आहवनीय व दक्षिण (अन्वाहार्यपचन) असे तीन प्रमुख अग्नी असतात. यांखेरीज सभ्य व आवसथ्य असेही दोन अग्नी असतात. प्रथम गार्हपत्य नावाचा अग्नी तयार केला जातो. याचे नित्य संरक्षण करावे लागते. आहवनीय व दक्षिण हे दोन्ही अग्नी याच्यामधून घेतले जातात. समिधा, आज्य, दूध, दही वगैरे हविर्द्रव्यांची आहुती ज्याच्यात दिली जाते, तो आहवनीय होय. यज्ञामध्ये दक्षिण अग्नीवर फारशी कर्मे केली जात नाहीत. परंतु सर्व पितृकर्मे मात्र या अग्नीवरच केली जातात. [⟶ देवयान पितृपूजा].

देवता, मंत्र व द्रव्यत्याग : यज्ञामध्ये अग्नी, इंद्र, वरुण, मित्र, अर्यमा, सविता इ. देवतांना उद्देशून हविर्द्रव्यांचा मंत्रपूर्वक त्याग केला जातो. म्हणूनच द्रव्य, देवता व द्रव्यत्याग हे यज्ञाचे तीन प्रमुख घटक होत. यज्ञातील सर्व कर्मे समंत्रकच [⟶ मंत्र] करावयाची असतात. मंत्राचा उच्चार शुद्ध असेल, तरच यज्ञाचे फल मिळू शकते. ऋक्‌, यजू, साम व निगद (प्रैष) असे मंत्रांचे चार प्रकार असतात. अध्वर्यू हा होता वगैरे ऋत्विजांना आदेश देण्यासाठी जे वाक्य वापरतो, त्यास प्रैष असे म्हणतात. अध्वर्यूने होत्याला प्रैष दिला म्हणजे होता देवतेला अनुकूल करून घेण्यासाठी ‘पुरोनुवाक्या’ वा ‘अनुवाक्या’ नावाचा मंत्र म्हणतो. त्यानंतर ‘याज्या’ नावाचा मंत्र म्हणतो. त्याने याज्येच्या शेवटी ‘वौ ३ षट्’ असा वषटकार उच्चारला, का अध्वर्यू उभ्याने देवतेसाठी अग्नीत आहुती अर्पण करतो. त्याच वेळी यजमान देवतेला उद्देशून (‘न मम’) ‘हे माझे नाही’ असे म्हणून हविर्द्रव्यावरील आपले स्वत्व सोडतो. स्वत्व सोडून देण्याच्या या क्रियेला त्याग असे म्हटले जाते. म्हणूनच याग म्हणजे देवतेला उद्देशून केलेला द्रव्यत्याग, अशी व्याख्या करण्यात आली आहे. देवतेसाठी ज्याचा त्याग केला जात आहे, त्या द्रव्याचा अग्नीमध्ये प्रत्यक्ष प्रक्षेप (टाकणे) म्हणजे होम होय. यजमान वा ऋत्विज ‘जुहुयात्‌’, ‘जुहाति’ या वेदशब्दानुसारे जो त्याग करतात त्यास ‘होम’ म्हणतात. ‘यजेत’ इत्यादी ‘यज्‌’ धातूचा प्रयोग विधिवाक्यात असेल तर त्या वाक्याप्रमाणे त्याग केल्यास त्या त्यागास ‘याग’ म्हणतात.

हविर्द्रव्ये : यज्ञांमध्ये विविध प्रकारच्या द्रव्यांची आहुती दिली जाते. अग्नीमध्ये द्रव्य अर्पण करणे म्हणजे आहुती देणे होय. सातूच्या वा तांदळाच्या वाटलेल्या पिठात कढत पाणी घालून तयार केलेला गोळा खापराच्या तुकड्यावर ठेवून भाजला असता ‘पुरोडाश’ नावाचे हविर्द्रव्य बनते. तांदूळ, सातू वगैरे शिजवून तयार केलेला भात म्हणजे ‘चरू’ होय. ‘आज्य’ म्हणजे तूप होय. पशुयागामध्ये पशू मारून त्याच्या अवयवांची आहुती दिली जाते. हा पशू बांधण्यासाठी रोवलेल्या खांबाला ‘यूप’ असे म्हणतात. यज्ञातील ही हिंसा तत्त्वतः हिंसा नसून अहिंसाच होय, असे मनु इ. स्मृतिकार (मनुस्मृति ५.३९) मानतात. विशिष्ट पद्धतीने विधिपूर्वक सोमवल्ली कुटून काढलेला रस हेही एक महत्त्वाचे हविर्द्रव्य होय. कोणत्या वनस्पतीला सोमवल्ली म्हटले जात होते, याचे निश्चित ज्ञान सध्या उपलब्ध नाही. अध्वर्यू चमस नावाच्या पात्रातून सोमरसाची आहुती देतो. ऋत्विजांना हुतशेषभक्षणाचा म्हणजेच आहुती देऊन उरलेल्या द्रव्याच्या भक्षणाचा अधिकार असतो. ही हविर्द्रव्ये देवतांना पोहोचविण्याचे काम अग्नी करीत असल्यामुळे अग्नीला हुतवह म्हणतात. अग्नी देवतांना यज्ञभूमीत बोलावून आणतो. त्याच्या द्वारा देवता आहुतीचा स्वीकार करण्यासाठी अग्निकुंडाच्या जवळ उपस्थित होतात म्हणून अग्नीस देवदूत म्हणतात. अग्निद्वारा देवता उपस्थित होतात अशी यजमानाची श्रद्धा असते.


यज्ञीय उपकरणे

यज्ञीय उपकरणे : यज्ञांमध्ये विविध प्रकारची उपकरणे वापरली जात. त्यांपैकी बहुतांश उपकरणे लाकडाची बनविली जात. स्रुव, अग्निहोत्र-हवणी, जुहू, उपभृत्‌, ध्रुवा इ. नावाची पात्रे लाकडाची असतात. रशना, शुल्ब, निदान इ. नावाच्या दोऱ्या, पुरोडाश भाजण्यासाठी ‘कपाल’ म्हटली जाणारी मातीची भाजलेली खापरे, शूर्प (सूप), वेदी मोजण्यासाठी शम्या नावाचा दांडा, कृष्णाजिन, यज्ञाच्या रक्षणासाठी स्फ्य नावाचे तलवारीसारखे लाकडी आयुध, यज्ञीय पशू बांधण्यासाठी यूप (खांब), पशूचे अवयव कापण्यासाठी स्वधिती नावाची सुरी, यजमानाला अंग खाजविण्यासाठी लागणारे हरणाचे शिंग, यजमानाने दीक्षा घेतल्यावर डोक्याला बांधावयाचे उष्णीष (पागोटे), धर्म नावाचे हविर्द्रव्य तयार करण्यासाठी लागणारे महावीर नावाचे पात्र, शफा नावाचा चिमटा, गवताची मुळे तोडण्यासाठी लागणारे पर्शू नावाचे शस्त्र, अग्नीला वारा घालण्यासाठी लागणारे धवित्र नावाचे पंखे, सोम कुटण्यासाठी लागणारा अधिषवणफलक, देवतांसाठी सोमरस ठेवण्याची ‘ग्रह’पात्रे, ऋत्विजांना सोमरस पिण्यासाठी लागणारे चमस नावाचे प्याले, सोम ठेवण्यासाठी वापरली जाणारी ‘राजासंदी’ नावाची घडवंची इ. प्रकारची उपकरणे यज्ञामध्ये आवश्यक असत. पुणे येथील वैदिक संशोधन मंडळात अशा उपकरणांचे संच पहावयास मिळतात.

यज्ञाचे प्रकार : विशिष्ट फलाच्या इच्छेने देवतेसाठी अग्नीमध्ये समंत्रक आहुती अर्पण करण्यासारख्या काही गोष्टी सर्वच यज्ञांना समान असल्या तरी कोणत्या फळाची इच्छा आहे, कोणत्या द्रव्याची आहुती दिली जाते, यजमान कोणत्या शाखेचा आहे इ. कारणांवरून यज्ञांच्या अनुष्ठानात फरक पडतो. त्यामुळे यज्ञांचे अनेक प्रकार करण्यात आले आहेत.


श्रुतींनी (वेदांनी) सांगितलेले ते श्रौत व स्मृतींनी सांगितलेले ते स्मार्त, असे यज्ञाचे दोन प्रकार मानण्यात आले आहेत. परंपरागत दृष्टीने यज्ञसंस्था ही मूलतः श्रौत असल्यामुळे श्रौत यज्ञ हेच मूळचे यज्ञ होत. देवतेला द्रव्य अर्पण करणे हे यज्ञाचे लक्षण असल्यामुळेच स्मार्त यज्ञांना यज्ञ हे नाव प्राप्त झाले आहे. ऐतिहासिक दृष्टीने पाहिले तर तथाकथित स्मार्त यज्ञ हे प्रथम सुरू झाले असावेत कारण ते एका अग्नीच्या योगाने चालतात तीन अग्नींच्या योगाने चालणारे श्रौत यज्ञ नंतर सुरू झाले असे म्हणावे लागते. यज्ञ या कर्मकांडाचा विकास प्रथम एका अग्नीच्या उपासनेपासून तीन अग्नींच्या उपासनेपर्यंत झाला, असे मानावे लागते. श्रौत यज्ञांचे इष्टी, पशुयाग व सोमयाग असे तीन प्रकार आहेत. इष्टीमध्ये पुरोडाश, आज्य इ. हविर्द्रव्ये असतात. पशुयागात इष्टीतील द्रव्ये अधिक पशू आणि सोमयागात इष्टी व पशुयागातील द्रव्ये, अधिक सोमरस अशी हविर्द्रव्ये असतात. प्रकृत व विकृती असे यज्ञांचे आणखी दोन प्रकार आहेत. एखादा यज्ञ कसा करावा, हे समजण्यासाठी शास्त्राने जेव्हा त्याच्या सर्व अंगांचे वर्णन केलेले असते, तेव्हा त्या यज्ञाला प्रकृतियाग म्हणतात. जेव्हा एखाद्या यज्ञाविषयी माहिती देताना प्रकृतियागाच्या वर्णनात न आलेली अशी नवीन व विशेष माहिती सांगितलेली असते आणि बाकीची माहिती प्रकृतियागापासून अतिदेशाने मिळते, तेव्हा त्या यज्ञाला ‘विकृतियाग’ म्हणतात उदा., ⇨दर्शपूर्णमास ही इष्टींची, निरूढपशुबंध ही पशुयागांची, तर अग्निष्टोम ही सोमयागांची [⟶ सोमयाग] प्रकृती होय. यज्ञांचे नित्य, नमित्तिक व काम्य असेही तीन प्रकार आहेत उदा., ⇨अग्निहोत्र हा नित्य, नवीन धान्य तयार झाल्याच्या निमित्ताने केला जाणारा आग्रयणेष्टी हा नैमित्तिक, तर पुत्र प्राप्त व्हावा या इच्छेने केला जाणारा पुत्रकामेष्टी हा काम्य यज्ञ होय. आणखी एका पद्धतीनुसार पाकयज्ञसंस्था, हविर्यज्ञसंस्था व सोमयज्ञसंस्था असे यज्ञांचे तीन प्रकार असून त्या यज्ञसंस्थांमध्ये प्रत्येकी सात प्रकार आहेत. या तीन यज्ञसंस्थांपैकी पाकयज्ञसंस्था ही स्मार्त, तर इतर दोन संस्था या श्रौत आहेत. प्रत्येकीचे सात प्रकार पुढीलप्रमाणे : पाकयज्ञसंस्था –(१) औपासनहोम, (२) वैश्वदेव, (३) पार्वण, (४) अष्टका, (५) मासिक श्राद्ध, (६) सर्पबली, (७) ईशानबली. हविर्यज्ञसंस्था –(१) अग्न्याधेय, (२) अग्निहोत्र, (३) दर्शपूर्णमास, (४) आग्रयण, (५) ⇨चातुर्मास्य, (६) निरूढपशुवबंध, (७) सौत्रामणी. सोमयज्ञसंस्था –(१) अग्निष्टोम, (२) अत्यग्निष्टोम, (३) उकथ्य, (४) षोडशी, (५) वाजपेय, (६) अतिरात्र, (७) अप्तोर्याम. आतापर्यंतच्या वर्गीकरणात न बसणारे असेही काही यज्ञ आहेत. त्यांना ‘विकृति’ म्हणतात. उदा., ⇨राजसूय, ⇨अश्वमेध इ. मोठ्या यज्ञांतून अनेक इष्टी, पशुयाग व सोमयाग यांचा अंतर्भाव असतो. हे विकृतियाग होत. यांखेरीज ‘सव’ म्हटले जाणारे गोसव, पृथ्वीसव इ. यज्ञ असतात विश्वजित यज्ञासारखे आणखी काही महत्त्वपूर्ण यज्ञ असतात. गृहस्थाने नित्य, दररोज करावयाचे ⇨ पंचमहायज्ञ आहेत. हे शतपथ ब्राह्मण वगैरे ग्रंथांतून निर्दिष्ट असले तरी स्मार्त मानले जातात. श्रौत यज्ञांप्रमाणे या यज्ञांसाठी यजमानाला ऋत्विजांची मदत लागत नाही. तसेच हे यज्ञ फलाशेने नव्हे, तर कर्तव्यभावनेने केले जातात. येथे विशिष्ट अशा कर्तव्यांना दिलेले ‘महा’ हे विशेषण त्या कर्तव्यांची स्तुती करण्यासाठी वापरण्यात आले आहे.

यज्ञ आणि वेदादी वाङ्‌मय : यज्ञसंस्थेचे स्वरूप नीट समजण्यासाठी वैदिक वाङ्‌मयाचे सूक्ष्म अध्ययन आवश्यक आहे. याउलट, वैदिक वाङ्‌मयाचे नीट आकलन होण्यासाठी यज्ञसंस्थेचे सखोल अध्ययन आवश्यक आहे. अशा रीतीने यज्ञसंस्था व वैदिक वाङ्‌मय यांचा परस्परावलंबी संबंध आहे. पाश्चात्य अभ्यासकांनी प्रारंभीच्या काळात वैदिक वाङ्‌मयाचा अभ्यास करताना भाषाशास्त्र, व्याकरण इ. पैलूंवर भर देऊन यज्ञसंस्थेची उपेक्षा केली, ही त्यांच्या अभ्यासातील मोठी उणीव मानली जाते.

चार वेद, ब्राह्मणग्रंथ व आरण्यके या सर्वांचा यज्ञ हाच प्रतिपाद्य विषय आहे. असे यज्ञाचे पुरस्कर्ते आग्रहपूर्वक सांगत असतात. यज्ञसंस्थेचा इतिहास व वेदांचे संहितीकरण यांचा निकट संबंध आहे, असे ज्ञानकोशकारांनी म्हटले आहे. मंत्रांची निर्मिती यज्ञासाठी झाली असे धार्मिक परंपरेत मानले जाते तसे असो वा नसो, मंत्रांचे संहितीकरण मात्र यज्ञासाठीच झाले, असे मत त्यांनी मांडले आहे. सहा वेदांगांमध्ये ‘कल्प’ या कर्मकांडविषयक वेदांगाचा अंतर्भाव असून या विषयावर ⇨कल्पसूत्र नावाचे ग्रंथ आहेत श्रौतसूत्रे, गृह्यसूत्रे व कल्पसूत्रे मिळून कल्पसूत्रे होत. यज्ञसंस्थेची सुसंगत व विस्तृत माहिती देण्याचे कार्य हे ग्रंथ करतात. ती ब्राह्मणग्रंथांवर आधारलेली आहेत. काही श्रौतसूत्रांना यज्ञातील वेदी, अग्निकुंड वगैरेंच्या मोजमापांची माहिती देणारी शुल्बसूत्रे जोडलेली असतात. ब्राह्मणग्रंथांतील यज्ञविषयक माहितीमध्ये एकवाक्यता आणण्यासाठी ⇨पूर्वमीमांसा हे शास्त्र निर्माण झाले. वेदांचा व धर्मशास्त्राचा वाक्यार्थ करण्याचे नियम पूर्वमीमांसेत सांगितले आहेत. यज्ञप्रसंगी कथन करण्यासाठी म्हणून पुराणातील आख्यानांची निर्मिती झाली, असे अभ्यासक मानतात. अश्वमेधप्रसंगी पारिप्लवाख्यान (पुन:पुन्हा सांगावयाच्या कथा) सांगण्याचा विधी शतपथ ब्राह्मणात वर्णिलेला आहे. अश्वमेधासारख्या महोत्सवाच्या प्रसंगी महाकाव्याची सामग्री जुळवली जात असे, असे अभ्यासक सांगतात.

यज्ञाचा इतिहास : स्पष्ट पुरावे नसले तरी यज्ञाची मूळ कल्पना इंडो-यूरोपियन काळाइतकी जुनी असावी, असे पां. वा. काणे यांनी म्हटले आहे. इंडो-इराणी काळात यज्ञसंस्था बरीच विकसित होती, हे मात्र स्पष्ट आहे. वैदिकांचा अग्निष्टोम व पारशांचा होम यात बरेच साम्य आहे. अथर्वन्‌, आहुती, यज्ञ, सोम इ. अनेक शब्द किंचित फेरफारासह दोन्हीकडे आढळतात. ऋग्वेदाच्या काळात यज्ञसंस्था पूर्ण विकसित झाली नसली तरी तीन अग्नी, तीन सवने आणि बहुधा १६ ऋत्विज ऋग्वेदाच्या ऋषींना ज्ञात होते, असे दिसते. ज्ञानकोशकारांच्या मते यज्ञसंस्थेची पूर्ण वाढ झाल्यानंतर वेदसंहितांची अंतिम आवृत्ती तयार झाली. ब्राह्मणग्रंथांच्या काळात या संस्थेचा प्रभाव सर्वोच्च होता आणि उपनिषदांच्या काळापासून तो क्षीण होऊ लागला. ऐतिहासिक काळात अनेक राजांनी विविध यज्ञ केल्याचे कोरीव लेख आढळत असले, तरी सर्वसामान्य समाजावरचा यज्ञांचा प्रभाव खूपच कमी झाला होता. आधुनिक काळात क्वचित यज्ञ होतात. यज्ञांचे चित्रपट वगैरे घेऊन आधुनिक साधनांद्वारे यज्ञसंस्थेचा इतिहास जपण्याचे प्रयत्न चालू आहेत.

व्यवसायांना चालना : विविध यज्ञांतून वेगवेगळ्या व्यवसायांशी संबद्ध असलेली कामे करावी लागत आणि त्यामुळे अनेक व्यवसायांच्या व शास्त्रांच्या विकासाला चालना मिळाली. अग्निचयनापूर्वी जमीन नांगरावी लागत असल्यामुळे कृषिकर्माशी संबंध येई. चातुर्मास्य यागात यजमानाला विशिष्ट पद्धतीने केशकर्तन करावे लागत असे. शमिता म्हटला जाणारा माणूस पशूला बुकलून मारण्याचे व त्याचे अवयव कापण्याचे काम करीत असे. सोत्रामणी नावाच्या यज्ञात आहुती देण्यासाठी सुरा तयार केली जात असे. आहुतीसाठी पुरोडाश, चरू वगैरे द्रव्येही तयार करावी लागत. घडवंचा, मुसळ वगैरेंमुळे सुतारकामाशी नांगराचा फाळ, सुरी वगैरेंमुळे लोहारकामाशी वस्त्रांमुळे कोष्टीकामाशी विटा वगैरेंमुळे कुंभारकाम व गवंडीकाम याच्याशी तर हरणाच्या कातड्याचे जोडे वगैरेंमुळे चर्मकाराच्या कामाशी संबंध येत असे. याखेरीज सोम कुटणे, शिवणकाम, पशुपालन, दळण-कांडण, दोऱ्या वळणे, गवत कापणे, लाकडे तोडणे, खड्डे करणे इ. प्रकारची अनेक कामे यज्ञांमध्ये करावी लागत.

मनोरंजन : बहुतेक सर्व इंद्रिये रिझविण्याची साधने यज्ञसंस्थेत होती, असे ज्ञानकोशकारांनी म्हटले आहे. त्यामुळे सामान्य लोकांनाही यज्ञाचे आकर्षण वाटू शकत होते. सोमयागासारख्या मोठ्या यज्ञांत सामगायन आवश्यक असते. सामगायक म्हणजे उद्‌गाता. त्याच्या गाण्याचे आकर्षण सामान्य लोकांना विशेष असे. अश्वमेधात पारिप्लवाख्याने असत. महाव्रतात डोक्यावर पाण्याच्या घागरी घेतलेल्या दासींचे नृत्य असे. वायपेय यज्ञात १७ रथांची शर्यत असे आणि त्यावेळी १७ चौघडे वाजवले जात. वेगवेगळ्या यज्ञांतून इतरही वाद्ये वाजवली जात. वाजपेय यज्ञात विशिष्ट रथचक्रावर बसलेल्या ब्रह्‌म्याला गरगर फिरविले जाई. अग्निष्टोम यज्ञामध्ये सोम कुटण्याचे काम चालू असताना ग्रावस्तुत नावाचा ऋत्विज पागोट्याने आपले डोळे बांधून घेई. महाव्रतामध्ये ब्राह्मण व शूद्र यांनी ओले कातडे आपापल्या बाजूला ओढण्याचा विधी असे.

यज्ञसंस्थेचा प्रभाव व माहात्म्य : वैदिक यज्ञसंस्था प्राचीन भारतातील मानवी जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करीत असल्यामुळे भारताचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास समजून घेण्यासाठी तिचा अभ्यास अपरिहार्य ठरतो. विस्तार, वैविध्य इ. दृष्टींनी पाहता तिच्या तोडीचे धार्मिक कर्मकांड जगात अन्यत्र कोठेही आढळत नाही, यावरून या संस्थेची व्यापकता स्पष्ट होते. विश्वाच्या निर्मितीपासून नियमनापर्यंतच्या सर्व घटना यज्ञामुळे घडतात असे मानण्यात आले होते. पद्धतशीर यज्ञामुळे देवांचा विजय तर यज्ञांच्या अभावी किंवा अयोग्य पद्धतीच्या यज्ञामुळे असुरांचा पराभव झाला, अशा प्रकारच्या कथा निर्माण करण्यात आल्या होत्या. यज्ञ म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी कामधेनू, उत्तम रीतीने तारून नेणारी ‘सुतर्मा’ नाव, इष्ट प्राप्तीचा हमखास उपाय इ. प्रकारे यज्ञाची वर्णने करण्यात आली आहेत. अशा रीतीने यज्ञसंस्थेच्या पुरस्कर्त्यांनी अनेक युक्त्या करून तिच्या माहात्म्याचा जाणीवपूर्वक प्रचार केला, असे दिसते.

यज्ञ हा सर्व व्यवहारांचा समुच्चय असल्यामुळे त्यातूनच बराचसा व्यवहारधर्मही निघाला असणे शक्य आहे लहान लहान टोळ्यांसारख्या वैदिक राष्ट्रांना जोडणाऱ्या संस्थेची उणीव यज्ञांनी भरून काढली यज्ञासाठी अनेक राजे जमत आणि त्यांच्यात अग्रपूजेवरून बखेडे होत असल्यामुळे त्यांचा निवाडा करण्यासाठी सर्व राष्ट्रीय धर्मशास्त्र यज्ञांमधून निर्माण झाले यज्ञ ही सांघिक संपत्तीचा उपभोग घेण्याची संस्था असल्यामुळे काही सांघिक कल्पना व धर्म या संस्थेतून जन्मास आले यज्ञामुळे नवीन वसाहती स्थापन झाल्या वैश्यांचा माल खपून व्यापारास चालना मिळाली लोकांच्या गोत्रप्रवरांची यादी करण्याचे आणि पैतृक परंपरेशी संबंध राखण्याचे कार्य यज्ञांनी केले यज्ञांचा उपयोग ब्राह्मणांचे महत्त्व वाढविण्याकडे झाला असला, तरी यज्ञांमुळे एकूण समाजाचाच विकास झाला आणि ज्ञानविषयक व समाजघटनाविषयक फायदे झाले इ. विधानांतून मराठी ज्ञानकोशकार श्री. व्यं. केतकरांनी यज्ञसंस्थेच्या ऐतिहासिक कार्याचे विवेचन केले आहे.

यज्ञांद्वारे विविध विद्या व कला यांना उत्तेजन मिळाले. उदा., महाव्रत यज्ञामध्ये नृत्य करण्याकरिता नटनटींना बोलावले जात असे. नाट्यमंडपाचे तंत्र हे यज्ञमंडपाच्या तंत्रातून विकसित झाले किंबहुना, यज्ञसंस्थेतील अनेक क्रियांचा नाट्यसंस्थेच्या उगमाशी संबंध पोहोचतो, असे विद्वानांचे मत आहे. अश्वमेधामध्ये आवश्यक असलेले सर्व पशुपक्षी मिळत नसल्यामुळे त्यांची चित्रे काढली जात आणि त्यामुळे चित्रकलेलाही उत्तेजन मिळाले. यज्ञसंस्थेतूनच देवालयसंस्था विकसित झाली, असेही एक मत आढळते. सोमयागात प्राण्यांच्या ऐवजी मोबदला म्हणून दक्षिणा देत आहे, असे म्हटले जाते. यावरून भागवत धर्मातील आत्मार्पणाचे मूळ यज्ञसंस्थेत आहे, असे अनुमान तर्कतीर्थ लक्ष्म णशास्त्री जोशी यांनी मांडले आहे. एकंदरीत, यज्ञकल्पनेचा समाजजीवनावर एवढा प्रभाव होता, की यज्ञाहून वेगळे असे सिद्धांत पुढे आणताना त्यांना ‘ज्ञानयज्ञ’ वगैरेप्रमाणे यज्ञ ही संज्ञा देणे भाग पडत होते. अवैदिक व यज्ञविरोधी असलेल्या जैन धर्मानेही इसवी सनाच्या आठव्या-नवव्या शतकांपासून पशुहत्या वगळून विशिष्ट स्वरूपातील यज्ञसंस्कृतीचा स्वीकार केला यावरूनही यज्ञसंस्थेचा प्रभाव स्पष्ट होतो. [⟶ कला–२ भारतीय कला].

कलांप्रमाणेच काही शास्त्रांच्या अध्ययनालाही यज्ञांमुळे चालना मिळाली. याज्ञिक कर्मकांडाच्या अनुष्ठानामध्ये कालगणनेला महत्त्व असल्यामुळे ज्योतिषशास्त्राचा विकास झाला किंबहुना शिक्षा, कल्प, निरुक्त, व्याकरण, छंद व ज्योतिष या सर्व वेदांगांच्या अध्ययनाला चालना मिळाली. यज्ञांच्या वेदी, कुंड वगैरेंची रचना करताना भूमितीची गरज असल्यामुळे वैदिक भूमितीला उत्तेजन मिळाले. त्यासाठी शुल्बसूत्रां ची निर्मिती झाली. पशुंचे अवयव कापून त्यांची आहुती दिली जात असल्यामुळे प्राणिशास्त्राचे व शरीरशास्त्राचे ज्ञान वृद्धिंगत झाले. [⟶ वेद व वेदांगे].

यज्ञ व पुराणकथा : ऋग्वेदाच्या पुरुषसूक्तात आद्ययज्ञाची व त्या यज्ञापासून झालेल्या विश्वनिर्मितीची भव्य पुराणकथा आली आहे. यज्ञपुरुषाच्या स्वरूपात यज्ञाचे दैवतीकरण करणाऱ्या अनेक पुराणकथा आढळतात. ⇨ब्रह्मदेवाचा मानसपुत्र रुची आणि स्वायंभुव मनूची कन्या आकूती यांना यज्ञ व दक्षिणा हे जुळे झाले, दक्षिणा ही यज्ञाची पत्नी होय, दक्षाच्या यज्ञात शिवाचा अपमान झाल्यावर वीरभद्राने यज्ञाची हत्या केली आणि मग ब्रह्मदेवाने यज्ञाला मृगशिरस्‌ या नक्षत्राचे स्वरूप दिले इ. कथा आढळतात. यज्ञ म्हणजे विष्णू असे समीकरण तर वारंवार आढळते. यज्ञाविषयीच्या अनेक आख्यायिका ब्राह्मणग्रंथांतून आढळतात. यज्ञ देवाला सोडून गेल्याच्या काही कथा आढळतात. सीता, द्रौपदी, धृष्टद्युम्न इत्यादींचे जन्म यज्ञातून झाल्याच्या कथा आढळतात. [⟶ पुराणकथा].

यज्ञसंस्थेला झालेला विरोध : एकेकाळी समाजजीवनावर कमालीचा प्रभाव असलेली यज्ञसंस्था क्रमश: निष्प्रभ आणि आधुनिक काळात तर जवळजवळ नामशेष झाली आहे. अजूनही क्वचित प्रसंगी यज्ञ केले जात असले, तरी यज्ञसंस्था इतिहासजमा झाली आहे असेच म्हटले पाहिजे. स्वरूपांतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही कारणांनी ही संस्था क्षीण झाली. यज्ञाचे स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे व खर्चिक असल्यामुळे यज्ञकर्म हे सर्वसामान्य लोकांच्या कुवतीपलीकडचे होते. त्यामुळे पूजाकर्मासारख्या साध्या-सोप्या व सर्वसुलभ उपासनामार्गांच्या स्पर्धेत यज्ञसंस्था टिकाव धरू शकली नाही.

चार्वाक, जैन व बौद्ध या अवैदिकांनी तर यज्ञीय हिंसा वगैरे कारणांनी यज्ञसंस्थेवर कठोर हल्ले चढविलेच पण अगदी ऋग्वेदातही यज्ञ न करणाऱ्या वा यज्ञाला विरोध करणाऱ्या लोकांचे उल्लेख आढळतात. यज्ञाचे फल आतिथ्य वगैरेसारख्या सोप्या उपायांनीही मिळते, असे सांगून अथर्ववेदानेही यज्ञांचा प्रभाव कमी केला. अश्वमेधासारख्या यज्ञांचे प्रत्यक्ष अनुष्ठान करण्याऐवजी मानसिक उपासनेच्या रूपाने हे यज्ञ केले, तरी अनुष्ठानाइतकेच फल मिळते, असे काही ब्राह्मण व आरण्यक ग्रंथांनी म्हटले आणि अशा रीतीने याज्ञिकांनीच यज्ञसंस्थेचा महिमा कमी केला, असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात. यज्ञाचे फल मोक्षाप्रमाणे शाश्वत नसल्यामुळे उपनिषदांनी यज्ञविरोधी भूमिका घेतली. मुंडकोपनिषदाने (१·२·७–१३) यज्ञरूपी नावा अदृढ असल्याची टीका केली. अयाज्ञिकांना दोन्ही लोक नाहीत, असे म्हणून गीतेने एकीकडे यज्ञाची स्तुती केली, तर दुसरीकडे द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानमय यज्ञ श्रेष्ठ असल्याचे मत मांडले. पुराणांनीही यज्ञांना प्रत्यक्ष विरोध न करता पूजादी पर्यांयांचे माहात्म्य सांगून यज्ञांना निष्प्रभ केले. विविध भक्तिसंप्रदायांनी विष्णू वगैरे देवतांच्या भक्तीचे माहात्म्य वाढविल्यामुळेही यज्ञसंस्था क्षीण झाली. यज्ञसंस्था उच्चवर्णियांच्या वर्गहिताचे रक्षण करीत असल्यामुळे सर्वसामान्य लोकांनी तिला विरोध केला, असे काही अभ्यासकांचे मत आहे. यज्ञासाठी लोकांना वेठबिगारी करावयास लावली जाई असे काही अभ्यासक म्हणतात. संस्कृतीच्या उच्चस्तरावर आल्यावर यज्ञकर्मी समाजांनी यज्ञ टाकले किंवा त्यांना दुय्यम स्थान दिले कारण यज्ञसंस्था ही मागासलेल्या समाजाची धर्मसंस्था होय, असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी म्हटले आहे.

संदर्भ: 1. Kane, P. V. History of Dharmashastra, Vol. II, Part II, Pune, 1974.

    २. अग्निहोत्री, प्रभुदत्त, श्रौतपदार्थनिर्वचन, बनारस, १९१९.

    ३. काशीकर, चिं. ग. श्रौतकोश, २ खंड, पुणे, १९५८, १९७०.

    ४. काशीकर, चिं. ग. श्रौत धर्माची स्वरूपचिकित्सा, पुणे, १९७७.

    ५. केतकर, श्रीधर व्यंकटेश, महाराष्ट्रीय ज्ञानकोश, प्रस्तावना खंड, विभाग दुसरा-वेदविद्या, पुणे, १९२१.

    ६. केवलानंद सरस्वती, संपा. मीमांसाकोश, ७ खंड, वाई, १९५२-६६.

    ७. गाडगीळ, स. रा. वैदिक यज्ञ, मध्ययुगीन तंत्रसाधना आणि ज्ञानेश्वरप्रणीत भक्तियोग, पुणे, १९७९.

    ८. जोशी, लक्ष्मणशास्त्री, वैदिक संस्कृतीचा विकास, वाई, १९७२.

    ९. थिटे, गणेश, यज्ञ : आशय आणि आविष्कार, पुणे, १९७९.

  १०. वाजपेय अनुष्ठान समिती, वैदिक यज्ञसंस्था आणि वाजपेय यज्ञ, पुणे, १९५५.

  ११. स्वामी प्रेमानंद तीर्थ, (बंगाली) हिं. अनु. मुट्टू ओंकारनाथ, यज्ञतत्त्व (हवनविधिसहित), वाराणसी, १९७८.

साळुंखे, आ. ह.