सप्तचिरंजीव : अश्वत्थामा, कृपाचार्य, ⇨ परशुराम, बळीराजा, विभीषण, ⇨ व्यास आणि ⇨हनुमान हे सातजण सप्तचिरंजीव म्हणून ओळखले जातात. ह्यांपैकी अश्वत्थामा हा कौरवपांडवांचे गुरू द्रोणाचार्य ह्यांचा एकुलता एक पुत्र. कौरव-पांडवांबरोबर हाही आपल्या वडिलांकडून शस्त्रास्त्रविदया शिकला. भारतीय युद्धात कौरवांच्या सैन्याचे सर्व सेनापती पडल्यानंतर भीम आणि दुर्योधन यांच्यात झालेल्या गदायुद्धात दुर्योधन घायाळ झाला. त्या अवस्थेत त्याने अश्वत्थाम्याला कौरवांचे सेनापतिपद दिले. पांडवांचा वध करण्याची प्रतिज्ञा करून तो पांडवसैन्याशी निकराने लढला पण अखेरीस कौरवांचा पराभव झाला. कृपाचार्य, कृतवर्मा आणि अश्वत्थामा हे तिघे रात्र झाल्यावर एका वृक्षाखाली झोपले. अश्वत्थामा मात्र जागा होता. त्या रात्री एका घुबडाने त्या झाडावर झोपलेल्या कित्येक पक्ष्यांचा एकटयाने फडशा पाडलेला पाहून पांडवांचा नि:पात करण्याची एक भयंकर कल्पना अश्वत्थाम्याच्या डोक्यात आली आणि कृपाचार्य आणि कृतवर्मा ह्या दोघांना बरोबर घेऊन तो पांडवांच्या शिबिरात गेला आणि पांडवसैन्यातील वीरांना, ते झोपलेले असताना ठार केले. ह्या हल्ल्यात द्रौपदीचे सर्व पुत्र मारले गेले. पांडव मात्र वाचले. अश्वत्थाम्याचे पारिपत्य करण्यासाठी अर्जुन त्याच्याशी लढला. अखेरीस आपल्या मस्तकावरचा दिव्यमणी काढून त्याने तो भीमाच्या हाती दिला आणि आपला पराभव मान्य केला तथापि अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या उदरातला गर्भ नाहीसा केल्याशिवाय आपण राहणार नाही असे तो म्हणाल्यामुळे कृष्णाने त्याला शाप दिला, की तीन हजार वर्षे तू ह्या पृथ्वीवर एकाकी आणि मूकपणे भटकत राहशील. चिरंजीवावस्थेत हा रानावनांतून भटकत राहतो अशी समजूत आहे. अश्वत्थाम्याबरोबर त्याच्या कुकर्मात सहभागी असलेले कृपाचार्य हेही चिरंजीव मानले जातात. जमदग्नी ऋषी आणि इक्ष्वाकू राजाची कन्या रेणुका ह्यांचा पुत्र परशुराम हा सप्तचिरंजीवांपैकी एक असल्यामुळे त्याचा निरनिराळ्या काळातील घटनांशी संबंध जोडला जातो. प्राचीन भारतातील थोर प्रजाहितदक्ष बळीराजा हाही चिरंजीव असून, आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात आपल्या प्रजेला भेटण्यासाठी तो पृथ्वीवर येतो अशी एक समजूत आहे. सप्तचिरंजीवांपैकी विभीषण हा लंकाधिपती रावणाचा धाकटा भाऊ परंतु राम-रावण युद्धात त्याने रामाला साहाय्य केले होते. सीताहरणामुळे साऱ्या लंकेचा विनाश होईल, अशी सूचना त्याने रावणाला दिली होती. त्याचप्रमाणे तिला सन्मानाने पाठवावे, असाही सल्ला दिला होता. परंतु रावणाने तो धुडकावून त्याचा अपमान केला होता. रावण वधानंतर रामाने त्याला राज्याभिषेक केला आणि लंकेत तुझे राज्य चिरस्थायी होईल, असा त्याला आशीर्वाद दिला होता. महाभारत कार व्यास ह्यांचे जीवन शंतनूपासून शतानिकापर्यंतच्या कुरूवंशीय राजांच्या आठ पिढयंशी संबंधित असल्याचे दिसते. त्यातून त्यांच्या दीर्घायुष्याचे संकेत मिळतात पण प्राचीन भारतीय साहित्यात त्यांना केवळ दीर्घायुषी नव्हे, तर चिरंजीव म्हटले आहे. हनुमानासही असेच चिरंजीव मानले गेले आहे. तत्संबंधी कथा अशी : राम-रावण युद्धानंतर रामाची सेवा करण्यासाठी हनुमान अयोध्येत राहू लागला. त्याच्या ह्या सेवावृत्तीने संतुष्ट होऊन रामाने त्याला बह्मविदया दिली. तसेच असावर दिला, की जोवर रामकथा अस्तित्वात आहे, तोवर तू अमर राहशील.

कुलकर्णी, अ. र.