नरसिंहसरस्वती : (सु. १३७८–सु. १४५८), दत्तात्रेयाचे अवतार समजले जाणारे सत्पुरुष. वऱ्हाडातील लाडकारंजे या गावी काळे घराण्यात जन्म. जातीने ते वसिष्ठगोत्री वाजसनेयी ब्राह्मण होते. पित्याचे नाव माधव व मातेचे नाव अंबाभवानी. मूळ नाव शालग्रामदेव तथापि नरहरी या नावानेच ते विशेषत्वे ओळखले जात. ⇨ गुरुचरित्र या ग्रंथावरूनच त्यांच्या चरित्राची माहिती मिळते. ⇨ दत्तात्रेयाचे पहिले अवतारी पुरुष श्रीपाद श्रीवल्लभ हे होत. दत्तात्रेयस्वरूप अवधूतांच्या कृपेने श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला. हेच पुढील जन्मी नरसिंहसरस्वती म्हणून जन्मले. यांच्या चरित्राशी अनेक आख्यायिका निगडित आहेत. या दोन्ही अवतारी पुरुषांची चरित्रे गुरुचरित्रात वर्णिलेली आहेत पण हे दत्तात्रेयाचे अवतार आहेत असे त्यात स्पष्टपणे कुठेच म्हटले नाही. गुरुचरित्रात दत्तोपासनेलाही प्राधान्य दिल्याचे आढळत नाही. एवढे मात्र खरे, की नरसिंहसरस्वतींपासून कर्नाटक-महाराष्ट्रात ⇨ दत्त संप्रदायाचा विशेष प्रचार होऊन तो नावारूपास आला.

नरसिंहसरस्वती

वयाच्या आठव्या वर्षी गृहत्याग करून त्यांनी काशीस प्रयाण केले. विश्वेश्वराची उपासना, योगसाधना व ब्रह्मचर्य व्रताचे पालन करीत असता आद्य शंकराचार्यप्रणीत शृंगेरी पीठाच्या परंपरेतील कृष्णसरस्वतीनामक वृद्ध संन्याशाशी त्यांची भेट झाली. त्यांच्याकडूनच त्यांनी संन्यासदीक्षा घेतली. यानंतर नरसिंहसरस्वती या नावाने ते प्रसिद्ध झाले. नरसिंहसरस्वतींनी कोणाकडे अध्ययन केले, याची माहिती मिळत नाही परंतु संन्यासग्रहणानंतर त्यांनी काशी येथे अनेकांना अध्यात्ममार्गाचा उपदेश केला, वर्णाश्रमधर्माची कर्तव्ये समजून सांगितरी आणि धर्माचरणाकडे प्रवृत्त केले. येथेच त्यांनी शिष्यांचा संघही निर्माण केला. नंतर बद्रीकेदाराची यात्रा करून ते सु. तीस वर्षांनी  पुन्हा महाराष्ट्रात आले. प्रथम ते स्वग्रामी गेले आणि नंतर त्र्यंबकेश्वर, नासिक, परळी वैजनाथ, कोल्हापूर, औदुंबर इ. क्षेत्रांना त्यांनी भेटी दिल्या. परळीस ते एक वर्ष एकांतवासात राहिले. नंतर चार महिने ते औदुंबर या क्षेत्री राहिले. नंतर ते कृष्णा-पंचगंगेच्या संगमावर असलेल्या अमरापूर गावी आले. येथे त्यांनी बारा वर्षे वास्तव्य केले, यामुळेच हे गाव ‘नरसोबाची वाडी’ म्हणून प्रसिद्ध झाले. यानंतर त्यांनी भीमा-अमरणा यांच्या संगमावर असलेल्या गाणगापूर येथे सु. चोवीस वर्षे वास्तव्य केले. येथे त्यांनी अनेक चमत्कार केल्याचे सांगतात. शेवटी श्रीशैलम्‌जवळ पाताळगंगेच्या प्रवाहात त्यांनी जलसमाधी घेतली.

महाराष्ट्रातील वास्तव्यात नरसिंहसरस्वतींनी अनेकांना अध्यात्माचा उपदेश केला, पीडित लोकांची दुःखे दूर केली व पर्यायाने स्वधर्माचा पुरस्कार केला. त्यांच्या काळात मुसलमानी आक्रमणामुळे प्रजा गांजली होती. अशा वेळी समाजात मनोधैर्य निर्माण करण्याचे, दुःख-दैन्य दूर करण्याचे महान कार्य त्यांनी केले म्हणून ते अवतारी पुरुष मानले गेले. त्यांच्या शिष्यांपैकी माधवसरस्वती, सायंदेव, नंदी कवीश्वर, नरहरी कवीश्वर, सिद्धसरस्वती, बीदरचा यवनराजा दुसरा अलाउद्दीन हे शिष्य प्रसिद्ध आहेत. नरसिंहसरस्वतींच्या वास्तव्याने पुनीत झालेली औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इ. ठिकाणे दत्तक्षेत्रे म्हणून प्रसिद्धीस आली. संकटात सापडलेल्यांना, व्याधिग्रस्तांना, दुःखितांना शांतीचा, अध्यात्माचा मार्ग दाखविणाऱ्या दत्त संप्रदायात नरसिंहसरस्वतींचे स्थान अनन्यसाधारण आहे.

संदर्भ : 1. Joshi, H. S. Origin and Development of Dattatreya Worship in India, Baroda, 1965.

            २. ढेरे, रा. चिं. दत्त संप्रदायाचा इतिहास, पुणे, १९६४.

भिडे, वि. वि.