प्राचीन ईजिप्तमधील देवप्रतिमांकित ताईत

ताईत : स्वतःच्या संरक्षणार्थ वापरावयाची प्रतीकात्मक वस्तु. हा शब्द ‘ताई’ व ‘एतु’ या दोन कानडी शब्दांपासून बनलेला आहे असे समजतात. दगड, धातु, लाकुड इ. पदार्थांचे ताईत करून बांधण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. भुताखेतांपासून किंवा अदृश्य शक्तीपासून आपले रक्षण व्हावे हा त्यामागील हेतू आहे. हे ताईत तयार करताना मंत्राचाही उपयोग करतात. मंतरलेले ताईत गळ्यात किंवा दंडावर बांधतात. ताईताचा संबंध यातुधर्माशी आहे. पुराणवस्तुसंशोधनामध्ये पुष्कळ प्रकारचे ताईत आढळून आले आहेत. ताईत वापरण्याची पद्धत अतिप्राचीन असावी. यहुदी, ग्रीक, रोमन इ. लोकांतही ही पद्धत होती.

ताईत या अर्थाने अथर्ववेदात ‘मणि’ हा शब्द वापरलेला आहे. खादिरमणी (खैर वृक्षापासून केलेला), पर्णमणी (पळस वृक्षापासून केलेला), केशमणी, हिरण्यमणी अशी नावे या वेदात आढळतात. हे मणी त्या त्या पदार्थापासून कसे तयार करावे, याचा उल्लेख अथर्ववेदाच्या कौशिकसूत्रात आढळतो. ज्या पदार्थाचा मणी करावयाचा असेल तो पदार्थ जाळून त्याच्या भस्माभोवती लाख गुंडाळायची व ती गोळीसारखी करून एका सोन्याच्या डबीत ठेवायची म्हणजे मणी तयार होतो. यावेळी अथर्ववेदातील मंत्र म्हणायचे असतात. नंतर हा मणी गळ्यात किंवा दंडावर बांधतात.

कोलंबियातील (द. अमेरिका) मंत्रभारित तांब्याचा ताईत.

ताईत हे शंख, शिंपले, मोती, शिंग, दात, नख इ. पदार्थांचेही करतात. कित्येक वेळा एखाद्या प्राण्याचा अवशेष ताईत म्हणून बांधतात. त्यामुळे त्या प्राण्याचे गुण ताईत बाळगणाऱ्या व्यक्तीत येतात, असे समजतात. युद्धात जय मिळावा, सभा जिंकावी, रोग बरा व्हावा, धन मिळावे इ. अनेक गोष्टीसाठी ताईतांचा उपयोग करतात. परंतु भुताखेतांपासून व देवतांच्या कोपापासून रक्षण होण्यासाठी किंवा दृष्ट लागू नये वा वाईट नजर पडू नये, यासाठीच ताईताचा मुख्यतः उपयोग करतात. ताईताचा उपयोग मंत्रतंत्रांमध्ये अधिक असतो. इष्ट मंत्र भूर्जपत्रावर लिहून ते पत्र एका पेटिकेत ठेवून तो ताईत गळ्यात बांधण्यास देतात. कुराणातील वचने कागदावर लिहून तो कागद एका चांदीच्या पेटिकेत ठेवून ती गळ्यात बांधण्याची चाल मुसलमानांत आहे. अरबी भाषेत ताईताला तावीझ म्हणतात. ईजिप्तमधील प्राचीन समाजात ताईत बांधण्याची प्रथा होती. तेथील थडग्यांवर व शवपेटिकांवर अशा प्रकारच्या ताईतांची चित्रे आढळून येतात. ख्रिस्ती लोकांतही ताईताला महत्त्वाचे स्थान आहे. सशाचा पाय, घोड्याची टाप इ. वस्तू त्यांच्यात ताईत म्हणून बांधले जात. अमेरिकेतील मोकोन्ही या आदिवासी लोकांत हरणाचे खूर दंडावर किंवा हातावर बांधण्याची पद्धत आढळून येते. जगातील अनेक जातिजमातींमध्ये ताईत बांधण्याची पद्धत वेगवेगळ्या स्वरूपांत आढळून येते.

भारतीय ताइतांचे प्रकार

गंडे-दोरे हा ताइताचाच एक प्रकार आहे. गंडे-दोरे हे विशिष्ट मुहुर्तावर तयार करतात. गंडे तयार करण्यासाठी निरनिराळ्या रंगाचे दोरे सांगितले आहेत. या दोऱ्यांना गाठी मारून गंडा तयार करतात. काशीतील काळभैरवाचे काळे गंडे प्रसिद्ध आहेत. मंतरलेल्या गंड्यात मोठी शक्ती असते, असे समजतात.

भिडे, वि. वि.