जमदग्नि : भृगुकुलातील एक गोत्रप्रवर्तक ऋषी आणि प्रवर. जमदग्नीपासून वत्स आणि बिद नावाचे दोन गोत्रगण उत्पन्न झाले. ह्या दोन्ही गणांतील गोत्रांचे प्रवर मतभेदाने पाच किंवा तीन आहेत. परशुराम भार्गवाचा जमदग्नी हा पिता. ऋचीक और्व नावाचा ऋषी आणि कान्यकुब्ज देशाच्या गाधी राजाची कन्या सत्यवती यांचा तो ज्येष्ठ पुत्र. विश्वामित्राचा भाचा. प्रसेनजिताची कन्या रेणुका ही त्याची पत्नी. तो एक सूक्तद्रष्टा ऋषी असून ऋग्वेदातील काही सूक्तांचे (३·६२ ८·१०१ ९·६२, ६५) प्रणयन त्याने केले आहे. ऋग्वेदातील १०·१६७ ह्या सूक्ताचे विश्वामित्रासमवेत त्याने प्रणयन केले आहे. ७·९६·३ व ९·९७·५१ ह्या ऋग्वेद  ऋचांमध्ये जमदग्नीचा आणि ३·५३·१५, १६ ह्या ऋचांमध्ये त्याच्या परिवाराचा निर्देश आहे. ऋग्वेदात एक वयोवृद्ध व ज्ञानी महर्षी म्हणून त्याचे दर्शन घडते. तैत्तिरीय संहितेत (३·१·७·३ ५·४·११·३) वसिष्ठास विरोध करणारा विश्वामित्राच्या पक्षाचा एक ऋषी म्हणून त्याचा उल्लेख येतो. ऐतरेय बाह्मणात (७·१६) मात्र हरिश्चंद्राच्या राजसूय यज्ञात विश्वामित्र, वसिष्ठ आणि जमदग्नी हे अनुक्रमे ‘होतृ’, ‘ब्रह्मन्’आणि ‘अध्वर्यु’ असल्याचा उल्लेख आढळतो. अथर्ववेदातही ( ४·२९·३ ५·२८·७ ६·१३७·१ १८·३·१५, १६) जमदग्नीचा अनेक वेळा निर्देश आला आहे. अथर्ववेदात (२·३२·३० ६·१३०·१) इतर ऋषींसमवेतही  त्याचे उल्लेख येतात. तैत्तिरीय संहितेत (३·३·५·२) एक महान तपस्वी म्हणून त्याचा उल्लेख आला आहे. अक्षरब्रह्माचा तो उपदेश करीत असे, असा त्याचा उल्लेख तैत्तिरीय आरण्यकात (१·९) आढळतो.

सर्व पौराणिक साहित्यात त्याला ऋचीक व सत्यवती यांचा पुत्र म्हटले आहे. तो अत्यंत कोपिष्ट स्वभावाचा होता. प्रत्यक्ष सूर्याचेही त्याने दमन केल्याची तसेच आपली भार्या रेणुका ही क्रीडारत चित्रांगद गंधर्वाच्या ऐश्वर्याने मोहित झाल्यामुळे तिचा आपला पुत्र परशुराम याच्या हाताने वध करविल्याची कथा पुराणात आढळते. रेणुकेचा वध करण्याची त्याची आज्ञा परशुरामाशिवाय त्याच्या इतर चार पुत्रांनी ऐकली नाही, म्हणून जमदग्नीने त्यांचाही वध केला. महाभारतात (अनु. १६५·४४) त्याला उत्तर दिशेचा स्वामी म्हटले आहे. अर्जुनाच्या जन्मोत्सवप्रसंगी तो उपस्थित असल्याचा (आ. ११४·४१) तसेच त्याने वृषादर्भीला ‘प्रतिग्रहा’चे दोष सांगितल्याचा (अनु. ९३·४४) उल्लेखही महाभारतात येतो. वैवस्वतमन्वंतरातील सप्तर्षींपैकी जमदग्नी हा एक ऋषी असल्याचे मत्स्य  (९), ब्रह्म  (५) आणि मार्कंडेय  (७९) पुराणांत म्हटले आहे. हिंदू धर्मातील श्राद्धविधीचा आरंभ त्यानेच केला असे मानतात. पद्मपुराणात (३·२४१) त्याने गंगातीरी एक हजार वर्षे तप करून एक ईश्वरांशभूत पुत्र व कामधेनू हे वर इंद्राकडून मिळविल्याचा उल्लेख आढळतो. त्याचा ईश्वरांशभूत पुत्र म्हणजेच परशुराम होय.

स्वतःच्या कोपिष्ट स्वभावामुळे भार्या व पुत्रवधाचे पातक आपल्या हातून घडले याचा जमदग्नीस पुढे पश्चात्ताप होऊन त्याने आपला कोपिष्ट स्वभाव सोडला आणि तो शांत झाला, अशी कथा जैमिनी अश्वमेधात (६८) आली आहे. जमदग्नीचा पुरातन शत्रू हैह्य राजा कार्तवीर्य अर्जुन होता. त्याने जबरदस्तीने जमदग्नीची कामधेनू पळविली. याचा सूड म्हणून परशुरामाने कार्तवीर्याचा वध केला. या वधाचा सूड म्हणून कार्तवीर्यपुत्रांनी परशुराम तीर्थयात्रेस गेल्याची संधी साधून जमदग्नीचा शिरच्छेद केला, असे महाभारतात (वन. ११७) म्हटले आहे. वाल्मीकि रामायणात (बाल. ७५) तसेच पद्मपुराणात (उ. २६९·३६, ३७) जमदग्नीचा वध स्वतः कार्तवीर्य अर्जुनाने केल्याचे म्हटले आहे.

सुर्वे, भा. ग.