जैनांचे धर्मपंथ : पार्श्वनाथांच्या परंपरेत महावीर वाढले. नंतर त्यांनी मध्यम त्यागमार्ग सोडून उत्कट त्यागमार्गाचा अंगीकार केला. सुरुवातीला विरोध किंवा उदासीनता धारण करणारे पार्श्वपरंपरेतील साधू व श्रावक महावीरांच्या मार्गात सामील झाले. त्यांनी पाच महाव्रतांचा व अचेलकत्वाचाही (नग्नव्रत) अंगीकार केला. महावीराने सचेल व अचेल या दोन्ही प्रकारच्या साधूंना मान्यता दिलेली होती. उत्कटमार्ग व मध्यममार्ग यांच्यामध्ये महावीरांनी प्रभावी व्यक्तिमत्त्वाने समन्वय करण्याचा प्रयत्न केला पण नंतर तो भेद वाढत गेला. त्या वेळी दिगंबर, श्वेतांबर हे शब्द वापरात नसले, तरी नग्न अचेलक, जिनकल्प, पाणिपात्र इ. उत्कटमार्गवाचक शब्द  व सचेलक, स्थविरकल्प, प्रतिग्रहधारी इ. मध्यममार्गवाचक शब्द अस्तित्वात होते.

या दोन गटांमध्ये आचारविषयक काही भेद असले, तरी तत्त्वज्ञान, ज्ञानमीमांसा इ. त्याचप्रमाणे मूलभूत बारा अंगग्रंथांचे प्रामाण्य मान्य करण्यात काही भेद नव्हता. ही स्थिती महावीरांनंतर सु. १५० वर्षे (इ. स. पू. ३४० पर्यंत) राहिली. दरम्यानच्या काळात रचल्या गेलेल्या काही अंगबाह्य ग्रंथांबद्दल काहींनी नापंसती दाखविण्यास सुरुवात केली. कालांतराने आचारविषयक मतभेद वाढीस लागले. तसेच आचारभेदाचे समर्थन अंगग्रंथांच्या आधाराने व नवीन अंगबाह्य ग्रंथांच्या आधाराने दोन्ही पक्ष करू लागले. म्हणून पाटलिपुत्र येथे परिषद भरविण्यात येऊन (इ. स.पू. सु. ३००) अंगग्रंथ संकलित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा रीतीने आचारभेदाची परिणती श्रुतभेदांत झाली. अंगग्रंथ बहुतांश लुप्त झालेले आहेत व राहिलेला भाग कृत्रिम आहे, असे वाटणाऱ्या पक्षाने (दिगंबर) श्रुताबद्दल बेफिकीरी दाखविण्यास सुरुवात केली. तेव्हा दुसऱ्या पक्षाने (श्वेतांबर) मथुरा येथे एक परिषद भरवून (इ. स. सु. ३१३) उपलब्ध अंगश्रुत व अंगबाह्यश्रुत व्यवस्थित केले. दुसऱ्या गटाच्या (श्वेतांबर) मताने नवीन ग्रंथरचना झालेली असली, तरी गणधरकृत जे ग्रंथ परंपरेने आलेले होते, त्यांत फारसा बदल झालेला नव्हता. श्वेतांबर (सचेल) पंथाचे हे ग्रंथ सचेलकत्व व अचेलकत्व या दोन्ही आचारांना मोक्षसाधक मानते तसेच अचेलकत्व हा श्रेष्ठतर धर्म मानते. उलट दिगंबर (अचेल) पंथाचे ग्रंथ सचेलकत्वाला मोक्षप्रतिबंधक मानते. सचेल दलाने नंतर वलभी येथे भरविलेल्या परिषदेमध्ये (इ. स. सु. ४५४) देवर्धिगणी क्षमाश्रमण यांच्या अध्यक्षतेखाली श्रुतग्रंथ लेखनिविष्ट केले. तेच श्वेतांबर पंथात ‘आगम’ मानले जातात.

चंद्रगुप्त मौर्याच्या कारकीर्दीत (इ. स. पू. ३२२–२९८) मगध देशामध्ये बारा वर्षांचा दुष्काळ पडला. त्या वेळी आठवे गणधर आचार्य भद्रबाहू आपल्या १२,००० शिष्यांसह दक्षिणेकडे कर्नाटकात गेले. परंतु आचार्य स्थूलभद्र आपल्या अनुयायांसह मगध देशातच राहिले. त्यांनी पाटलिपुत्र येथे एक परिषद भरवून (इ. स. पू. सु. ३००) लुप्त होऊ लागलेल्या अकरा अंगग्रंथांची जुळवाजुळव केली. बारावे अंग ‘दृष्टिवाद’ लुप्त झाले होते. दुष्काळ संपल्यानंतर जेव्हा भद्रबाहू परत आले, तेव्हा त्यांच्याकडून या अकरा अंगग्रंथांना मान्यता मिळाली नाही. अशा रीतीने दिगंबर-श्वेतांबर या मुख्य पंथभेदांचे पाया घातला गेला. ते दोन्ही संप्रदाय अखेरीस एकमेकांना पाखंडी म्हणून हिणवू लागले.

श्वेतांबरांच्या मते श्वेतांबर व दिगंबर या दोन मुख्य पंथांशिवाय आठ पंथ जैन धर्मात उत्पन्न झाले. ते आठ ‘निन्हव’ म्हणून प्रसिद्ध आहेत. दिगंबर जैन मात्र या पंथांसंबंधी काहीच सांगत नाहीत. हे आठ पंथ वा ‘निन्हव’ असे : (१) बहुरतवाद : हा पंथ महावीरकन्या प्रियदर्शना हिचा पती जमाली याने स्थापन केला. त्याच्या मते एक क्रिया पूर्ण होण्यास अनेक समयाचा काळ लागतो. (२) जीवप्रदेशकवाद : संस्थापक तिष्यगुप्त. याचे म्हणणे, जीवाच्या अंतिम प्रदेशालाच जीव म्हणता येईल. (३) अव्यक्तवाद : याचा प्रवर्तक आषाढ (इ. स. पू. २५१). तो म्हणतो, की वस्तूचे स्वरूप व्यक्त नसते. ४) समुच्छेदवाद किंवा क्षणिकवाद : याचा प्रतिपादक अश्वमित्र (इ. स. पू. २४७) म्हणतो, की सर्व वस्तू क्षणिक आहेत. (५) द्विक्रियावाद : याचा प्रवर्तक गंग असून त्याचे मत असे, की एका वेळेला दोन क्रियांचा अनुभव येणे शक्य आहे. (६) त्रैराशिकवाद किंवा नोजीववाद : याचा प्रवर्तक रोहगुप्त (इ. स. १८) म्हणतो, की जीव, अजीव व जीवाजीव असे पदार्थांचे तीन विभाग होतात. (७) अबद्धवाद : याचा प्रवर्तक गोष्ठामाहिल (इसवी सनाचा आरंभ). याच्या मते कर्माचा जीवाला स्पर्श होतो बंध होत नाही. (८) बोटिकवाद : (इ. स. २२०) म्हणजे दिगंबर संप्रदायच होय, असे श्वेतांबर म्हणतात.

दिगंबर-श्वेतांबर मतभेद : (१) अचेलकत्व हे मुक्तीचे आवश्यक अंग आहे, वस्त्रधारी साधूला केव्हाही मुक्ती मिळणार नाही, असे दिगंबर पंथाचे मत. उलट श्वेतांबर पंथाचे मत असे, की नग्नत्व श्रेष्ठ साधूचे लक्षण असले, तरी वस्त्र धारण केल्याने मुक्तीच्या मार्गात अडथळा येत नाही.

(२) स्त्रीजन्मात मुक्ती नाही, असे दिगंबरांचे मत. स्त्रियांच्या अंतःकरणांत चिंता आणि माया (कपट) असते म्हणून त्यांना मुक्ती नाही. स्त्रियांना तप करता येईल, सद्‌गती मिळविता येईल पण मुक्ती मिळविता येणार नाही. त्यासाठी त्यांना पुरुषजन्म मिळवावा लागेल. उलट श्वेतांबरांचे मत असे, की स्त्रियांनाही तप करून कर्मनाश करता येतो आणि मुक्ती मिळविता येते. चोवीस तीर्थंकरांपैकी एकोणिसावे तीर्थंकर ‘मल्ली’ ही स्त्री होती, असे श्वेतांबर मानतात.

(३) केवलीला (केवलज्ञानी साधूला) आहाराची जरूरी नाही असे दिगंबर मानतात पण श्वेतांबर म्हणतात, की केवली आहार घेतात.

(४) पाणी पिताना व आहार घेताना पात्राचा उपयोग न करता हातातूनच अन्नपाणी सेवन करणे, हे दिगंबर साधूंचे वैशिष्ट्य आहे. श्वेतांबर साधू भिक्षा घेण्यासाठी व अन्न सेवन करण्यासाठी पात्राचा उपयोग करतात. दिगंबर साधू उभे राहून आहार घेतात, तर श्वेतांबर साधू भिक्षान्न आपल्या वसतिस्थानात आणून अन्न सेवन करतात.

(५) अकरा अंगग्रंथ व दसवेयालिय, उत्तरज्झयण  इ. अंगबाह्य ग्रंथांना श्वेतांबर जैनागम समजतात पण ते दिगंबरांना आगम म्हणून प्रमाण नाहीत. मूळ अंगग्रंथांचा लोप झालेला आहे, असे ते समजतात.

(६) उमास्वातीचे तत्त्वार्थधिगमसूत्र  दोन्ही संप्रदायांना मान्य आहे परंतु काही पाठभेद आहेत. तत्त्वार्थाधिगमसूत्रावर उमास्वातीचे जे भाष्य आहे, ते श्वेतांबरांना मान्य आहे परंतु दिगंबरांना ते मान्य नाही. तत्त्वार्थाधिगमसूत्रामध्ये जे अनेक सांप्रदायिक पाठभेद आहेत, त्यांपैकी काही खालील विषयांसंबंधी आहेत : (अ) दिगंबर सोळा स्वर्ग मानतात तर श्वेतांबर बाराच स्वर्ग मानतात.


(आ) दिगंबर पृथ्वी, आप, तेज, वायू व वनस्पती या पाच जीवांना स्थावरजीव मानतात तर श्वेतांबर  पृथ्वी, आप व वनस्पती हे तीनच स्थावर मानतात.

(इ) दिगंबर ‘काल’ हे स्वतंत्र द्रव्य मानतात तर श्वेतांबरांपैकी फक्त काहीच आचार्य कालाला स्वतंत्र द्रव्य मानतात.

(ई) पाच अनुव्रतांच्या नावांमध्ये व क्रमामध्ये दोन्ही संप्रदायांत मतभेद नाही परंतु तीन गुणव्रते व चार शिक्षाव्रते यांच्या नावांमध्ये व क्रमामध्ये त्यांच्यात मतभेद आहेत.

(उ) ‘प्रथमानुयोग’ या आगमप्रकारात गौतम गणधर हे दिगंबरांना मूलस्थानी आहेत तर श्वेतांबरांना सुधर्मस्वामी मूलस्थानी आहेत.

(ऊ) महावीर तीर्थंकरांचा गर्भ प्रथम देवानंदा या ब्राह्मणीच्या उदरी राहिला परंतु हरिणेगमेसी देवाने त्रिशला राणीच्या ठिकाणी तो गर्भ नंतर स्थापन केला तसेच महावीरांचा विवाह झाला होता, असे श्वेतांबर मानतात परंतु या गोष्टी दिगंबरांना मान्य नाहीत.

(ए) चोवीस तीर्थंकरांची चिन्हे यक्ष, यक्षिणी, त्यांची वाहने इत्यादींबद्दल दिगंबर-श्वेतांबरांत मतभेद आहेत. दिगंबरांच्या तीर्थंकरमूर्ती नग्नस्वरूपात असतात तर श्वेतांबरांच्या वस्त्रधारी असतात.

(ऐ) पर्युषण पर्व (किंवा पज्जुसणा) दोन्ही संप्रदाय पाळतात परंतु त्याचा काळ आणि पद्धत यांबाबतीत फरक आहे. भाद्रपद शुक्ल पंचमी ते चतुर्दशी हा पर्युषणाचा दशलक्षण काळ दिगंबर पाळतात तर श्वेतांबर तो काळ श्रावण वद्य द्वादशी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी असा आठ दिवसांचा पाळतात. [→ दिगंबर पंथ श्वेतांबर पंथ].

यापनीय संप्रदाय : यापनीय संप्रदायातील साधू नग्न राहत, अन्नासाठी भिक्षापात्र वापरीत नसत (ते पाणिपात्र किंवा हस्तभोजी होते), मोरपिसांचे मोर्चेले वापरीत व नग्नमूर्तीची पूजा करीत. या बाबतीत त्यांचे दिगंबरांशी साम्य होते. परंतु ते स्त्रीमुक्ती मान्य करीत, केवली आहार घेतात असे मानीत आवस्सय, छेदसूत्रे, दसवेयालिय  इ. श्वेतांबरमान्य ग्रंथांचे पठन करीत. या दृष्टीने ते श्वेतांबरांना जवळचे होते. एकंदरीत त्यांचे बाह्य आचरण दिगंबरांसारखे असल्याने ते दिगंबरांमध्ये मिसळून गेले असावेत.

कालांतराने दिगंबर व श्वेतांबर या दोन्ही संप्रदायांत अनेक पंथोपपंथ निर्माण झाले. त्यांपैकी काही महत्त्वाचे उपपंथ पुढीलप्रमाणे आहेत :

दिगंबरांतील प्रमुख उपपंथ : (१) वीसपंथी : हे भट्टारकांना गुरू मानतात फळाफुलांनी तीर्थंकरांची पूजा करतात आरती, प्रसाद करतात. यांची मारवाड, गुजरात इ. ठिकाणी विशेष वसती आहे. (२) तेरापंथी : अक्षता, लवंगा , चंदन इत्यादींनी तीर्थंकरांची पूजा करतात पण आरती, प्रसाद करीत नाहीत व भट्टारकांना धर्मगुरू मानीत नाहीत. मारवाड, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश इ. ठिकाणी त्यांची वसती आहे. (३) तारणपंथी : हे मूर्तीची पूजा करीत नाहीत तर आगमग्रंथांची पूजा करतात. जातिभेद मानीत नाहीत. मध्यप्रदेश, खानदेश इ. ठिकाणी त्यांची वसती आहे.

श्वेतांबरांतील प्रमुख उपपंथ : (१) पुजेरा किंवा मूर्तिपूजक किंवा मंदिरमार्गी : या उपपंथातील लोक मूर्तींची पूजा करतात. साधू शुभ्रवस्त्रे वापरतात. साधूंना पिवळीही वस्त्रे वापरण्यास हरकत नाही. (२) स्थानकवासी किंवा धुंडिया किंवा साधुमार्गी : या उपपंथाला मूर्तीपूजा मान्य नाही. साधू शुभ्रवस्त्रे वापरतात. स्थानकवासी साधू मंदिरात न राहता स्थानकात (उपाश्रयात) राहतात. हा उपपंथ पंधराव्या शतकात उत्पन्न झाला. यांच्यात फक्त ३२ आगमच प्रमाण मानतात. (३) तेरापंथी : पाच महाव्रते, पाच समिती आणि तीन गुप्ती अशा तेरा गोष्टींना हे लोक महत्त्व देत असल्यामुळे ते तेरापंथी म्हटले जाऊ लागले. तेरापंथी साधू कडक तप आचरतात.

संदर्भ :

1. Stevenson, Sinclair, The Heart of Jainism, Oxford, 1915.

२. प्रेमी, नाथूराम, जैन साहित्य और इतिहास, मुंबई, १९५६.

पाटील, भ. दे.