लक्ष्मी : ऋग्वेदाच्या परिशिष्ट म्हणून समजल्या जाणाऱ्या श्रीसूक्ताची देवता ‘श्री’ म्हणजेच ‘लक्ष्मी’ होय. कारण श्रीसूक्तानेच लक्ष्मीची उपासना केली जाते. श्री किंवा लक्ष्मी ही संपत्तीची अधिष्ठात्री देवता. ही स्वयंप्रकाशी, हिरण्मयी, अश्व-रथ-गजादी संपत्तीची स्वामिनी, पद्मनिवासिनी आणि पद्ममाला धारण करणारी लक्ष्मी : चोलकालीन ब्राँझ मूर्ती.म्हणून प्रसिद्ध आहे. ही लक्ष्मी दारिद्र्याचा नाश करते. सर्व भूतांवर सत्ता चालविणारी लक्ष्मी मनाच्या इच्छा पूर्ण करते. वाणीच्या सत्याची प्राप्ती करून देते. कर्दम आणि चिक्लीत ही लक्ष्मीच्या पुत्रांची नावे श्रीसूक्तात निर्दिष्ट आहेत.

श्रीसूक्तातील प्रक्षिप्त म्हणून समजल्या जाणाऱ्या मंत्रांत लक्ष्मीचे विष्णुपत्नी, माधवप्रिया, अच्युतवल्लभा असे उल्लेख येतात. तिला महालक्ष्मी असेही म्हटले आहे. ती विष्णुमनोनुकूला असून क्षीरसमुद्राची राजकन्या होय. धन, धान्य, धैर्य, शौर्य, विद्या, कीर्ती, विजय व राज्य अशा अष्टलक्ष्मी रूपांतही ती पूजनीय मानली जाते. सिद्धलक्ष्मी, मोक्षलक्ष्मी, जयलक्ष्मी इ. लक्ष्मीचीच रूपे आहेत. ऋग्वेदातील ज्ञानसूक्तात ‘भद्रैषां लक्ष्मीर्निहताSधि वाचि’ (१०.७१.२) इ. मंत्रांत एक प्रकारे वाग्लक्ष्मीचाच निर्देश केलेला दिसतो. वाणीचे भद्र सौंदर्य हीसुद्धा लक्ष्मीच. भागवत पुराणात विष्णूची शोभा, कांती म्हणजेच लक्ष्मी, असा निर्देश केलेला दिसतो. वाजसनेयिसंहितेतील (३१.२२) पुरुषसूक्ताच्या शेवटच्या मंत्रात मात्र ‘श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यौ’ असा निर्देश आला आहे. त्यावरून ‘पुरुष’ रूपी विष्णूच्या श्री आणि लक्ष्मी या पत्नी होत्या, असा संदर्भ मिळतो. म्हणजेच श्री आणि लक्ष्मी यांच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या येथे निर्वाळा मिळतो. तैत्तिरीय उपनिषदात (१.४) वस्त्र, गोधन, अन्न आणि पेय यांचा श्री म्हणजे लक्ष्मी असा निर्देश केला आहे.

ब्रह्मवैवर्तपुराणाच्या प्रकृतिखंडात आणि गणेशखंडात लक्ष्मीच्या उत्पत्तिसंबंधी आणि रूपांबाबत पुढील माहिती मिळते : सृष्टीच्या प्रारंभी श्रीकृष्णाच्या शरीराच्या डाव्या भागापासून अतिसुंदर स्त्री निर्माण झाली. त्याच्याच इच्छेने ती स्त्री द्विधा झाली. तिच्या डाव्या शरीरभागापासून महालक्ष्मी आणि उजव्या शरीरभागापासून राधिका अशी दोन रूपे तिने स्वीकारली. कृष्णानेही दोन रूपे घेतली. त्याच्या उजव्या भागापासून निर्माण झालेले रूप दोन हात असलेले, तर डाव्या भागापासून निर्माण झालेले शरीर चार हातांचे होते. राधिकेने द्विभुज कृष्णाला वरले, तर त्याच्या चतुर्भुज रूपाला लक्ष्मीने माळ घातली. नंतर कृष्ण लक्ष्मीसह वैकुंठात राहू लागला. वैकुंठातील या लक्ष्मीस महालक्ष्मी अशी संज्ञा होती.

या महालक्ष्मीने योगद्वारा नाना रूपे धारण केली. कृष्णाबरोबर वैकुंठात तिने रमेचे रूप धारण केले. स्वर्गात ती इंद्रैश्वर्यरूपी स्वर्गलक्ष्मी बनली. पाताळात व मर्त्यलोकात राजांच्या ठिकाणी राजलक्ष्मी म्हणून ती वास करू लागली आणि गृहातील गृहिणी म्हणून गृहलक्ष्मी बनली.

ज्या ज्या वेळी विष्णू अवतार घेतो त्या त्या वेळी लक्ष्मीसुद्धा विष्णुची सहचरी होण्यासाठी अवतार घेते. वामनावतारात तिने पद्मेचा अवतार घेतला. परशुरामाच्या अवतारात तिने धरणीचे रूप घेतले. रामावतारात ती सीता बनली आणि कृष्णावतारात ती रुक्मिणीच्या स्वरूपात अवतरली.

इंद्रैश्वर्यरूपी लक्ष्मीबाबत पुढीलप्रमाणे कथा प्रचलित दिसते : दुर्वासाच्या शापाने इंद्र हा लक्ष्मीपासून भ्रष्ट झाला. त्यामुळे स्वर्गलक्ष्मी वैकुंठात येऊन महालक्ष्मीत विलीन झाली. नंतर नारायणाच्या आज्ञेने स्वर्गलक्ष्मीच्या रूपातील लक्ष्मी क्षीरसागराची कन्या म्हणून जन्मास आली. देवदानवांनी क्षीरसागराचे मंथन केले. त्यातून उत्पन्न झालेल्या लक्ष्मीने क्षीरसमुद्रावरील शेषशायी विष्णूला वरमाला अर्पण केली.

इहलोकी संपत्तीची आणि सौंदर्याची स्वामिनी असलेली लक्ष्मी दु:शील आणि अस्वच्छ व्यक्तींचा त्याग करते. जेथे हरिपूजा आणि हरिकिर्तन होत नाही, त्या स्थानाचा ती त्याग करते. कमळ, गज, सुवर्ण आणि बिल्वफळ ही लक्ष्मीच्या नित्य सांनिध्यात असतात.

या लक्ष्मीची पूजा स्त्रि यांनी चैत्र, भाद्रपद व पौष मासांत विशेषतः करावी. दीपावलीतील [⟶ दिवाळी] अमावस्येस लक्ष्मीपूजेचा विशेष विधी पुराणांत उल्लेखिलेला दिसतो. या दिवशी विशेषतः प्रदोषकाली लक्ष्मीची पूजा करावी. (पहा : मराठी विश्वकोश : खंड  ९, चित्रपत्र ५१).

पहा : महालक्ष्मी.

संदर्भ : प्रभुदेसाई, प्र.कृ. आदिशक्तीचे विश्वरूप अर्थात देवीकोश,खंड, पुणे, १९६७-७२.

धर्माधिकारी, त्रि. ना.