महावीर वर्धमान

महावीर वर्धमान : (इ.स.पू. ५९९–५२७). जैन धर्मातील चोवीस तीर्थंकरांपैकी अखेरचे तीर्थंकर. महावीरांच्या आधी जैन धर्माचे २३ तीर्थंकर  होऊन गेले, असे जैन धर्माचे अनुयायी मानतात आणि त्यामुळे महावीर हे जैन धर्माचे संस्थापक ठरत नाहीत परंतु जैन धर्माला प्रभावशाली बनविण्याचे फार मोठे श्रेय महावीरांकडे जात असल्यामुळे जगातील प्रमुख धर्मसंस्थापकांच्या मालिकेतील गौतम बुद्ध वगैरेंच्या बरोबरीने त्यांचे नाव घेतले जाते.

इ. स. पू. सहावे शतक हे सांस्कृतिक दृष्ट्या उलथापालथीचे शतक होते. या शतकात मगध देशातील (सध्याच्या द. बिहारमधील) वैशाली नगरीचे उपनगर असलेल्या कुंडग्रामात वा कौंडिण्यपुरात महावीरांचा जन्म झाला. त्यांचे वडील सिद्धार्थ हे या उपनगराचे प्रमुख होते. त्यांची आई त्रिशला ही वैशालीच्या लिच्छविवंशीय राजाची मुलगी होती. विदेहदिन्ना व प्रियकारिणी या नावांनी ही ती ओळखली जात असे. महावीर गर्भावस्थेत असताना त्यांना देवानंदा नावाच्या ब्राह्मणीच्या उदरातून त्रिशला या क्षत्रिय राणीच्या उदरात आणण्यात आले होते, अशी एक पुराणकथा आहे. महावीरांची प्रवृत्ती लहानपणापासूनच चिंतनशील व वैराग्यशील होती. परंतु तुम्ही हयात असेपर्यंत गृहत्याग करणार नाही, असे वचन त्यांनी आईवडिलांना दिले होते. आईवडिलांच्या मृत्यूनंतरही नंदिवर्धन या थोरल्या भावाच्या विनंतीवरून ते काही काळ घरी थांबले आणि वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. ⇨ दिगंबर पंथातील अनुयायांच्या मते ते आयुष्यभर अविवाहित होते, तर ⇨ श्वेतांबर पंथातील अनुयायांच्या मते ते विवाहित होते यशोदा असे त्यांच्या पत्नीचे नाव होते आणि त्यांना अनुजा नावाची मुलगी होती.

आईवडिलांनी वर्धमान असे त्यांचे नाव ठेवले होते परंतु ते ‘महावीर’ या नावानेच विख्यात झाले. आपण ज्याचा आधार घेतला आहे, त्या वटवृक्षाला वेढून टाकणाऱ्या सर्पाला ठार मारण्याऐवजी त्याच्या ठिकाणचे हिंसकत्व नष्ट केल्यामुळे त्यांना ‘महावीर’ हे नाव मिळाले, अशी कथा आढळते. त्यांना ‘वीर’, ‘अर्हत्’, ‘सन्मति’ व ‘वैशालिक’ अशीही नावे देण्यात आली होती. ते ‘ज्ञातृ’ नावाच्या गणात जन्माला आल्यामुळे त्यांना ‘ज्ञातृपुत्र’ वा ‘नातपुत्त’ असेही म्हटले जात असे. आजही वैशालीच्या आसपास राहणारे जथरिया नावाच्या जातीतील लोक स्वतःला ज्ञातृवंशाचे समजतात आणि महावीरांना आपले पूर्वज मानून त्यांची जयंती साजरी करतात. महावीर वस्त्रे वापरीत नसल्यामुळे त्यांना ‘निग्गंठ (निर्ग्रन्थ = वस्त्ररहित) नातपुत्त’ असेही म्हटले जाई. त्यांनी विकार जिंकल्यामुळे त्यांना ‘जिंकणारा’ या अर्थाचे ‘जिन’ हे नाव मिळाले आणि या नावावरूनच ‘जैन’ ही प्रसिद्ध संज्ञा रूढ झाली. त्यांना केवलज्ञान प्राप्त झाल्यामुळे ‘केवलिन्’ असेही म्हटले जाई.

तत्कालीन राजपुत्रांना मिळणारे सर्व प्रकारचे शिक्षण महावीरांनाही मिळाले होते परंतु त्यांचे मन गृहस्थधर्मामध्ये रमले नाही आणि त्यांनी गृहत्याग केला. नंतरची १२ वर्षे त्यांनी खडतर तप केले. प्रारंभीच्या एका वर्षानंतर त्यांनी वस्त्राचाही त्याग केला. दंश करणाऱ्या कीटकांचीही त्यांनी हत्या केली नाही. अज्ञानी लोकांनी या काळात त्यांचा खूप छळ केला पण त्यांनी तो शांतपणे सोसला. अखेरीस वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले. त्यानंतर मृत्यूपर्यंत म्हणजेच पुढची तीस वर्षे ते धर्मोपदेश करीत राहिले.


जैन धर्माचे २३ वे तीर्थंकर पार्श्वनाथ हे महावीरांच्या आधी २५० वर्षे होऊन गेले होते. स्वतः महावीरांचे आईवडील पार्श्वनाथांचे अनुयायी होते. त्यामुळे पार्श्वनाथांचे धर्मविचार महावीरांना वारसारूपानेच मिळाले होते. महावीरांनी पार्श्वनाथांच्या विचारात कोणती भर घातली वा कोणते बदल केले, हे पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही परंतु त्यांनी जैन धर्माचे व श्रमणसंघाचे पुनरुज्जीवन केले आणि त्यामुळेच त्यांच्याविषयी धर्मसंस्थापकांइतका पूज्यभाव लोकांच्या मनात निर्माण झाला. पार्श्वनाथांनी सत्य, अस्तेय, अहिंसा व अपरिग्रह या चार तत्त्वांवर आपला धर्म उभारला होता. म्हणून तो चातुर्याम धर्म होता. महावीरांनी त्यात ब्रह्मचर्याची भर घालून त्याचे पंचयाम धर्मात रूपांतर केले. जुनी परंपरा खंडित करण्याऐवजी नव्या तत्त्वांशी तिचा मेळ घालण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते, हे या घटनेतून सूचित होते.

ज्ञानप्राप्तीनंतर लोककल्याणाच्या तळमळीने ते सर्वत्र हिंडले. अहिंसेच्या तत्त्वावर ते भर देत असत. वैदिक यज्ञयागातील हिंसा कालबाह्य झाली, याचे एक प्रमुख कारण म्हणजे महावीर व गौतम बुद्ध यांनी हिंसेला केलेला विरोध होय. त्यांनी स्याद्वादाचा वा अनेकान्तवादाचा हिरिरीने पुरस्कार केल्यामुळे वैचारिक क्षेत्रातही दुराग्रहाचे वातावरण वाटण्याऐवजी समंजसपणाचे वातावरण वाढले. त्यांनी जातिव्यवस्थेवर हल्ला चढविला आणि सर्व जातिजमातींच्या लोकांना शिष्य म्हणून स्वीकारले. एवढेच नव्हे, तर स्त्रियांनाही संन्यासाचा अधिकार असल्याचे मान्य केले.

सर्वसामान्य माणसांना आपला उपदेश समजावा अशी भावना असल्यामुळे त्यांनी संस्कृत भाषेऐवजी अर्धमागधी या प्राकृत भाषेचा वापर केला [⟶ अर्धमागधी भाषा अर्धमागधी साहित्य]. त्यांचे विचार गणधर म्हटल्या जाणाऱ्या त्यांच्या प्रमुख शिष्यांनी ग्रंथरूपाने संकलित केले होते. प्रारंभीच्या काळी ते मौखिक परंपरेने टिकवले होते परंतु नंतर ते लुप्त झाले. महावीरांनंतर सु. एक हजार वर्षांनी (इ.स. सु. ४५४ मध्ये ) या ग्रंथांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. तत्त्वज्ञानातील क्लिष्ट कल्पना स्पष्ट करण्यासाठी महावीर दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे देत असत. त्यांना गणित, भूमिती व ग्रहताऱ्यांच्या हालचालींविषयीच्या ज्योतिष या शास्त्रातही रस होता आणि या विषयांवर त्यांनी आपले विचारही मांडले होते.

महावीरांचे चरित्र म्हणजे साधुचरित्राचा प्रथम आदर्श, असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी म्हटले आहे. तितिक्षा, क्षमा, अहिंसा, समता, त्याग इ. गुणांची परमावधी महावीरांच्या ठिकाणी झाली होती, असे ते म्हणतात. स्वाभाविकच, भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील मोजक्या महापुरुषांमध्ये महावीरांचा अंतर्भाव होतो.

चैत्र शुद्ध त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते. काही जैन लोक भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला ⇨ पर्युषण पर्वात महावीर जयंती साजरी करतात. आश्विन वद्य अमावस्येच्या मध्यरात्री महावीरांना राजगृहाजवळील पावा वा पावापुरी येथे निर्वाण प्राप्त झाले. हा दिवस जैन लोक दिवाळी म्हणून साजरा करतात. त्यांच्या निर्वाणानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून वीर संवताला सुरुवात झाली.

पहा : जैन दर्शन जैन धर्म जैन संघ जैन साहित्य जैनांचे धर्मपंथ तीर्थंकर.

संदर्भ: 1. Chand, Amar, Mahavira, Varanasi, 1953.

           2. Law, B. C. Mahavira : His Life  and Teachings,  London, 1937.

           3. Muni Ratnaprabhavijaya, Sramana Bhagvan Mahavira, 8 Vols.. Ahmedabad, 1947.           ४. जैन, जगदीशचंद्र, महावीर वर्धमान (२ री आवृ.) अलाहाबाद, १९४५.

           ५. सूरी, विजयेंद्र, तीर्थंकर महावीर, २ भाग, मुंबई, १९६०, १९६२.

साळुंखे, आ. ह.