नाथमुनि : (नवव्या शतकाचा उत्तरार्ध). वैष्णव पंथाचे द. भारतातील एक आचार्य. द. अर्काट जिल्ह्यातील मन्नारगुडी येथे जन्म. ऐन तारुण्यातच नाथमुनींनी अष्टांगयोगावर प्रभुत्व मिळविले होते. त्यामुळे ‘योगींद्र’ ह्या नावानेही ते ओळखले जात. न्यायतत्त्व, पुरुषविनिर्णय आणि योगरहस्य असे तीन संस्कृत ग्रंथ त्यांनी लिहिले. त्यांतील पुरुषविनिर्णय हा एकच ग्रंथ आज उपलब्ध असून त्यात परमेश्वराच्या स्वरूपासंबंधीचे विचार मांडले आहेत. न्यायतत्त्वात विशिष्टाद्वैत मताचे प्रतिपादन होते आणि योगरहस्य हा अष्टांगयोगमार्गाचे विवेचन करण्यासाठी लिहिला गेला, असे दिसते. ह्या अनुपलब्ध ग्रंथांतील अवतरणे मात्र काही ग्रंथांतून आढळतात. रामानुजाचार्यांच्या श्रीभाष्यातही ती आहेत. अशा अवतरणांतूनही त्यांच्या विद्वत्तेचा व प्रगाढ व्यासंगाचा प्रत्यय येतो. रामानुजांच्या विशिष्टाद्वैतमताचा पाया त्यांनीच घातला, असे न्यायतत्त्वातील अवतरणांवरून दिसते.

द. भारतातील आळवारांनी तमिळ भाषेत रचिलेल्या सु. चार हजार पद्यांचे नाथमुनींनी केलेले संकलन हे त्यांचे एक विशेष महत्त्वाचे कार्य होय. दिव्य-प्रबंधम् किंवा अरुळिच्‍चॅयल किंवा नालायिर-दिव्य-प्रबंधम् (चार हजार दिव्य पदे) ह्या नावांनी हे संकलन ओळखले जाते [→आळवार]. नाथमुनींचे हे संकलन वैष्णवांत वेदांप्रमाणे पूज्य मानले जाते.

कुलकर्णी, अ. र.