दशहरा :ज्येष्ठ शुद्ध दशमीला प्रसिद्ध तीर्थांच्या ठिकाणी करावयाचा एक उत्सव. या दिवशी भगीरथाने गंगा भूलोकावर आणली. कृष्णा, नर्मदा, गोदावरी या नद्यांनाही ‘गंगा’म्हणतात. त्यामुळे हरद्वार, प्रयाग इ. क्षेत्रांप्रमाणे वाई,नासिक येथेही हा गंगोत्सव साजरा करतात. या दिवशी गंगास्नान केल्याने कठोर भाषण, असत्य भाषण, चहाडी, वृथा वल्गना, क्रूरकर्म, हिंसा, अनीतिकरण विषयोपभोग, परापहार, अनिष्ट चिंतन व दुराग्रह ह्या दहा पापांचा नाश होतो, म्हणून या दिवसास ‘दशहरा’तिथी म्हणतात. या दिवशी करावयाच्या व्रतात गंगेची प्रतिमा करून तिची पूजा, दहा ब्राह्मणांना दाने व दहा सुवासिनींना भोजन घालतात. दहा दिवे गंगाप्रवाहात सोडतात. कित्येक ठिकाणी हे व्रत ज्येष्ठ प्रतिपदेपासून दहा दिवस करतात. हे व्रत विशेषतः स्त्रियांना सांगितले आहे.  

करंदीकर, ना. स.