दादू पंथ : उत्तर भारतातील एक धर्मपंथ. हा कबीर पंथाचाच उपपंथ असल्याचे मानतात. वैष्णव संप्रदायातील हा एक सुधारणावादी पंथ असून त्याचे रामानंदी संप्रदायाशी पुष्कळ साम्य आढळते. या पंथाचा प्रवर्तक दादूदयाल (सु. १५४४–१६०३) हा होय. त्याने राजस्थानात सांभर येथे १५७३ मध्ये या पंथाची स्थापना केली, असे परशुराम चतुर्वेदी यांचे मत आहे. दादूला वयाच्या अकराव्या–बाराव्या वर्षी एका वृद्ध साधूने उपदेश दिला. या साधूचा उल्लेख ‘बुड्‌ढण’ असा केला जातो. कबीर⟶ कमाल ⟶ जमाल ⟶ विमल ⟶ बुड्‌ढण अशी दादूची गुरूपरंपरा आहे. दादू पंथ निर्गुणोपासक पंथ आहे. त्याला ब्रह्म संप्रदाय, परब्रह्म संप्रदाय किंवा सहज मार्ग अशीही नावे आहेत.

हा वैष्णव संप्रदाय असला, तरी यात निर्गुण ब्रह्माच्या उपासनेचा मार्ग सांगितला आहे. यात जपाला प्राधान्य आहे. या पंथाच्या अनुयायांत हिंदूंप्रमाणेच मुसलमानही आहेत. १५८३ मध्ये अकबराची व दादूची भेट झाली आणि त्यांच्यात अध्यात्मविषयावर चर्चा झाली. दादूने ज्या तत्वांचे प्रतिपादन केले, ती तत्वे शिष्यांनी न पाळल्यामुळे, या पंथात अनेक उपपंथ निर्माण झाले. दादूने मंदिरांविरुद्ध विचार मांडले, तर शिष्यांनी दादूचीच मंदिरे उभारली त्याने वर्णधर्मावर टीका केली, तर पुढे केवळ द्विजांनीच वाणी (बानी)वाचावी असा संकेत रूढ झाला. या पंथात मुख्य भेद दोन आहेत : (१) विस्तरधारी किंवा गृहस्थ व (२) साधू. गृहस्थात उत्तरगढी, खालसा व खाकी असे तीन भेद आहेत, तर साधूत नागा व विरक्त असे दोन भेद आहेत. नागा साधू शस्त्रधारी असतात.

तत्त्वज्ञान व साहित्य : या पंथाने रामाला श्रेष्ठ मानले आहे पण हा दाशरथी राम नसून परब्रह्म आहे. परब्रह्माची उपासना ‘सत्‌राम’ या जपाने होते. हा योगमार्गही नाही व भक्तिमार्गही नाही, म्हणून यास सहज मार्ग म्हणतात. व्रते, मूर्तिपूजा, तीर्थयात्रा, जातिभेद इ. गोष्टींना या पंथाने विरोध केला. जाती, धर्म, देवता यासंबंधी या पंथाने आग्रह न धरल्यामुळे व सोपा उपासनामार्ग सांगितल्यामुळे या पंथाचा बराच प्रसार झाला. मुक्तीवर पंथाचा विश्वास नाही. प्रेम आणि सेवा यांवरच या पंथाने जोर दिला. सहज, समर्पण, स्मरण व सेवा या तत्त्वांवर या पंथाची उभारणी झाली.

या पंथाचे साहित्य विपुल आहे. दादू पंथात जितके कवी झाले, तितके इतर कोणत्याही निर्गुण संप्रदायात झाले नाहीत. स्वतः दादूने वीस हजार पदे लिहिली. त्याची पदे वाणी या नावाने संगृहीत आहेत. दादूच्या १५२ शिष्यांपैकी ५२ शिष्यांना ‘दादूद्वार’ म्हणतात. दादूचा मुलगा गरीबदास (सु. १५६६–सु. १६३६) याने पंथाचा प्रचार केला [⟶ गरीबदास-२]. त्याची रचनाही उपलब्ध आहे. याशिवाय सुंदरदास, रज्जब इ. साधू या पंथात होऊन गेले. सुंदरदासाने ४२ ग्रंथ व रज्जाबने ५,३५२ पद्यरचना केल्याचे सांगतात. १८४८ मध्ये या पंथाच्या निश्चलदास नावाच्या साधूने विचारसागर या नावाचा ग्रंथ लिहिला. त्यामुळे या पंथास उजळा मिळाला. या पंथाचे अनुयायी उ. भारतात पुष्कळ आहेत. त्यांच्या स्वतंत्र पाठशाळा असतात.

संदर्भ : बडथ्‌वाल, पीतांबरदत्त, हिंदी काव्य में निर्गुणसंप्रदाय , लखनौ, १९३६.

भिडे, वि. वि.