राधा : गाहासत्तसई, ब्रह्मवैवर्तादी पुराणे इत्यादींनी कृष्णाची प्रेयसी वा पत्नी म्हणून कल्पिलेली आणि काही वैष्णव संप्रदायांनी आराध्य देवतेचे स्थान दिलेली एक प्रमुख गोपी. सौंदर्य, चातुर्य व उत्कट कृष्णप्रेम या गुणांनी युक्त आणि आदर्श भक्तीचे प्रतीक या स्वरूपात तिचे चित्र रेखाटण्यात आले आहे.

तिच्या जन्माविषयी विविध कथा आढळतात. उदा., ती वृषभानू नावाचा वैश्य आणि त्याची पत्नी कलावती यांची मुलगी होती. वृषभानू नावाच्या राजाला यज्ञासाठी भूमी तयार करीत असताना ती सापडली होती. लक्ष्मीने राधेचा अवतार घेतला. विष्णूने कृष्णावतार घ्यावयाचे ठरविल्यानंतर तीही मनुष्यरूपाने पृथ्वीवर आली. सुदाम्याच्या शापामुळे राधा गोलोकातून पृथ्वीवर आली. रामाने सगुणा नावाच्या दासीला दिलेल्या वरामुळे ती कृष्णावतारात राधा झाली. राधा कृष्णाच्या डाव्या अंगातून निर्माण झाली. कृष्णाचे दोन भाग होऊन एक भागाला कृष्णाचे व दुसऱ्या भागाला राधेचे रूप प्राप्त झाले. तिचा जन्म भाद्रपद शुद्ध अष्टमीला झाला. म्हणून त्या दिवसाला ‘राधाष्टमी’ म्हणतात.

राधा ही ऐतिहासिक व्यक्ती नसावी, असे दिसते. महाभारत, हरिवंश व भागवतपुराण या ग्रंथांतून राधेचा नामनिर्देश नाही. कृष्णाला एक गोपी इतर गोपींहून अधिक प्रिय होती आणि ‘तिने कृष्णाला राधित (प्रसन्न) केले’ असे इतर गोपी म्हणतात, असे वर्णन भागवतात आढळते. या गोपीचाच पुढे राधेच्या (राधा = प्रसन्न करणारी) रूपात विकास झाला असावा, असे काही अभ्यासकांना वाटते. सुमारे पहिल्या वा दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या हाल सातवाहनांच्या गाहासत्तसई या ग्रंथात तिचा प्रथम उल्लेख येतो. या ग्रंथाला सध्याचे स्वरूप सु. आठव्या शतकात प्राप्त झाले, हे विद्वानांचे मत ध्यानात घेता राधेची काल्पनिक निर्मिती पहिल्या ते आठव्या शतकात केव्हा तरी झाली असावी, असे दिसते. दक्षिणेमध्ये इ. स. पाचवे ते नववे शतक या काळात कृष्णभक्त आळवार संतांनी कृष्णलीलेची वर्णने केली आहेत. त्यांनी राधेचे नाव घेतलेले नाही. परंतु ‘नप्पिनै’ नावाच्या एका विशेष गोपीचे वर्णन केले असून तीच उत्तरेतील राधा असण्याची शक्यता आहे. ब्रह्मवैवर्तपुराणाने राधेचे माहात्म्य वाढविले. त्याखेरीज पद्म, नारद, देवीभागवत इ. पुराणांनीही तिची कमीअधिक वर्णने केली आहेत. बाराव्या शतकातील जयदेवाच्या गीतगोविंद या काव्याने राधाकृष्णांचा विरह व त्यांचे मिलन यांचे अत्यंत उत्कट वर्णन केले आणि त्याचा नंतरच्या वाङ्‍मयावर व भक्तिसंप्रदायांवर मोठा प्रभाव पडला. राधा या कल्पित व्यक्तिमत्वाचा कवी, चित्रकार, सांप्रदायिक इत्यादींनी काव्य, भक्ती, प्रेम, शृंगार, स्वैराचार इत्यादींचा आविष्कार करण्यासाठी आपापल्या पद्धतीने उपयोग करून घेतला, असे दिसते.

राधा ही कृष्णाची स्वकीया की परकीया नायिका होती, याविषयी बरेच वादविवाद झालेले दिसतात. ती रापाण, रायाण वा अयनघोष नावाच्या गोपाची पत्नी असल्यामुळे कृष्णाची परकीया नायिका होती, असे एक मत आहे. याउलट, ब्रह्मवैवर्तनपुराणाने तिला कृष्णाची पत्नी मानले आहे. रापाणाशी विवाह झाला तो राधेच्या छायेचा, स्वतः राधेचा नव्हे असेही स्पष्टीकरण करण्यात आले आहे.

रामकृष्ण भांडारकरांच्या मते मूळची आभीर जातीची कुलदेवता असलेली राधा आर्यांनी आभीरांच्या संपर्कात आल्यावर देवता म्हणून स्वीकारली. राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होत, असे काहींचे मत आहे. ईश्वराची मूलप्रकृती, ब्रह्माची शक्ती इ. प्रकारे तिची वर्णने आढळतात. बंगाली तंत्रमार्गातील शक्तिपूजेचा परिणाम म्हणून राधा ही शक्ती मानली गेली. ब्रह्मवैवर्तपुराणाने अनेकदा तिचे वर्णन दुर्गेच्या स्वरूपात केले आहे. राधाकृष्ण या युगलाच्या उपासनेमुळे मोक्ष प्राप्त होतो, असे निंबार्क वगैरेंच्या वैष्णव संप्रदायांनी मानले आहे. भक्त हा कृष्णाची प्रेयसी आहे, असे मानणाऱ्या मधुरा भक्तीच्या प्रकारात राधेला महत्त्वाचे स्थान आहे. मधुरा भक्तीचा पुरस्कार करणारे चैतन्य स्वतःला राधा मानत असत. रूप गोस्वामी वगैरेंनी मधुर रस मानला असून कृष्ण व राधा हे त्याचे आलंबन विभाव मानले आहेत. सहजिया वैष्णव संप्रदायाने राधेला आग्रहपूर्वक परकीय नायिका मानले आहे. राधा-वल्लभ संप्रदायानुसार कृष्ण आणि राधा नित्य एकत्र रहात असूनही विरहाचा अनुभव घेतात. वल्लभ संप्रदायात वल्लभाचार्यांनंतर विठ्ठलनाथांच्या काळात राधेची पूजा सुरू झाली. गोलोकातील नित्य रासक्रीडेत राधाकृष्णन मग्न असतात, असे हा संप्रदाय मानतो. ‘श्रीराधायै स्वाहा’ हा तिच्या उपासनेचा मंत्र आहे, तिच्या पूजेशिवाय कृष्णपूजेचा अधिकार नाही, कृष्णही तिची पूजा करतो इ. मते देवीभागवतात आढळतात. ‘राधाचक्र’ नावाचे तिच्या उपासनेचे एक यंत्रही कल्पिण्यात आले आहे.

पूर्वोक्त ग्रंथांबरोबरच सांप्रदायिक ग्रंथ, नाटक, चित्र, शिल्प, मूर्ती, संगीत, नृत्य, लोकनाट्य, तीर्थ इत्यादींच्या माध्यमातूनही भारतीय संस्कृतीमध्ये राधेच्या विविध रूपांचा आविष्कार झाल्याचे आढळते. (पहा: मराठी विश्वकोश, खंड : ३, पृ. ९६२, आ खंड ४ : चित्रपत्र १७).

संदर्भ : गुप्त, शशिभूषणदास, श्री राधाका क्रम विकास, २ भाग, वाराणसी.

साळुंखे, आ. ह.