मंत्र : तथाकथित गूढ व प्रभावी जादूसारख्या शक्तीने युक्त असलेले ध्वनी, अक्षरे इत्यादींना अथवा त्यांच्या समूहाला मंत्र असे म्हटले जाते. मंत्रामध्ये इष्टसाधक व अनिष्टनिवारक सामर्थ्य असल्याचे मानले जाते. जगातील सर्व मानवसमूह फार प्राचीन काळापासूनच मंत्रांचा प्रयोग करीत आले आहेत. मंत्र हा शब्द ‘मन्’ (विचार करणे) या संस्कृत धातूपासून बनला आहे. ‘मंत्र’ हा शब्द इतरकाही अर्थांनीही वापरला जातो. त्याचा एक अर्थ वैदिक प्रार्थना असा असून ऋङ्‍मंत्र, यजुर्मत्र व साममंत्र असे त्याचे तीन प्रकार मानले जातात. वैदिक वाङ्मयातील ब्राह्मणग्रंथ वगळून राहिलेल्या वैदिक संहिता मंत्र होत पूर्वमीमांसेत यज्ञीय देवता, पदार्थ व द्रव्य यांचा निर्देश असलेले वेदाचे वाक्य मंत्र होय. मंत्र हा शब्द ‘गुप्त सल्लामसलत’ या लौकिक अर्थानेही संस्कृत भाषेत राजनीतीत वापरला जातो.

विधियुक्त मंत्रप्रयोगाने ऐहिक व पारलौकिक अशी विविध उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. संकटनाश, रोगनिवारण, वशीकरण, विषनाश, युद्धातील विजय, अपत्यप्राप्ती, दीर्घायुष्याचा लाभ, दुष्काळनिवारण इ. हेतूंनी वेदांतील वा अथर्ववेदातील मंत्रांचा प्रयोग केला जात होता व अजूनही केला जातो. साप, विंचू वगैरेंचे विष उतरावे म्हणून मंत्रप्रयोग करण्याची प्रथा अजूनही अनेक लोकांमध्ये आहे. भूतपिशाचांची बाधा दूर व्हावी, शत्रूवर सोडलेले शस्त्र किंवा अस्त्र अधिक प्रभावी बनावे, आपल्या शत्रूने आपल्या विरूद्ध वापरलेले मंत्र, कर्मकांड वगैरे निष्प्रभ व्हावे इ. हेतूही मंत्रप्रयोगात आढळतात. शत्रुपक्षाकडील व्यक्तींना अपत्य होऊ नये म्हणून त्यांच्याकडील स्त्री-पुरूषांच्या मैथुनप्रसंगी दुष्ट मंत्रांचा प्रयोग केला जात असल्याचा निर्देश जे.जी. फ्रेझर यांना केला आहे. ही विविध उद्दिष्टे प्रत्यक्ष मंत्रांच्याच प्रभावाने साध्य होतात अथवा मंत्रांच्या प्रभावामुळे अनुकूल झालेल्या देवता वगैरेंसारख्या अतिमानवी शक्तींमुळे साध्य होतात, अशी समजूत आहे.

मांत्रिक, पुरोहीत, याज्ञिक, वैद्य, जादूगार, साधक इ. प्रकारच्या व्यक्ती मंत्रप्रयोग करतात. मंत्रप्रयोग करण्याचा अधिकार सर्वांना असत नाही. हिंदू धर्मशास्त्रात स्त्रिया, शूद्र वगैरेंना वैदिक मंत्राचा अधिकार आहे. विशिष्ट सामर्थ्य, पात्रता, शुचिता, ज्ञान इत्यादींमुळे विशिष्ट व्यक्तींनाच हा अधिकार प्राप्त होतो. मंत्र गुरूकडून घेतला तरच उपयुक्त ठरतो. दीक्षेच्या वेळी गुरूकडून शिष्याला गुप्तपणे मंत्र दिला जातो. मंत्र दुसऱ्यास ऐकू जाणार नाही अशा रीतीने दिला-घेतला जातो. जपमंत्र दुसऱ्यात ऐकू जाणार नाही, अशा रीतीने जपायचा असतो. कर्मकांडातील व भजनातील मंत्र मोठ्याने म्हणायचे असतात. स्वप्न, दृष्टान्त, कुलपरंपरा वगैरे मार्गांनी मंत्र प्राप्त होत असल्याची उदाहरणेही आढळतात.

मंत्रांचे विविध प्रकार मानण्यात आले आहेत. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी मंत्र हे त्यांचे एक वर्गीकरण होय. अं, ऱ्हां, ऱ्हीं इत्यादी एकाक्षरी शब्दांना बीजमंत्र म्हणजेच बीजरूप मंत्र मानले जाते. बीजमंत्रातील एका अक्षरात संपूर्ण मंत्र घनीभूत झाल्याचे मानले जाते आणि अशा अक्षरात बीजाक्षर म्हटले जाते. बीजाक्षरे लिहिण्यासाठी सिद्ध नावाची एक स्वतंत्र लिपी निर्माण करण्यात आली होती. मंत्रांचे बीजमंत्र, मूलमंत्र व मालामंत्र असे तीन प्रकार मानतात. प्रत्येक देवतेचे बीजमंत्र वेगवेगळे होत. दहा अक्षर संख्येपर्यंतच्या मंत्र्यांना मूलमंत्र आणि ज्या मंत्रांचा जप मालेच्या साहाय्याने करतात, त्यांना मालामंत्र म्हणतात. वेगवेगळ्या देवतांना अनुकूल करून घेण्यासाठी तसेच वेगवेगळी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वेगवेगळे मंत्र असतात. महामंत्रांची संख्या सात कोटी असल्याचे सांगितले जाते. काही मंत्र असे असतात, की ते सिद्ध करून घेतल्याशिवाय त्यांचे फळ मिळत नाही. स्वतः सिद्ध अशा मंत्रांना मात्र अशा सिद्धिविधीची गरज नसते. काही मंत्रांना देवतांनी वा ऋषींनी शाप दिलेले असतात व त्या शापातून मुक्त केल्यावरच त्यांचे फळ मिळू शकते, अशी समजूत आहे. काही मंत्र मलिन, क्रूर, अमंगल वा घातक, तर काही शुद्ध, सौम्य, मंगल व साहाय्यक असल्याचे मानले जाते. काही मंत्र अर्थपूर्ण असतात. परंतु काही मंत्र मात्र निरर्थक वाटतात निदान त्यांचाअर्थ अनाकलनीय असल्याचे तरी जाणवते. त्यामुळेच अनेकदा मंत्राच्या अर्थापेक्षा त्याच्या बिनचूक उच्चारालाच अधिक महत्त्व दिले जाते. चुकीच्या उच्चारामुळे मंत्र केवळ निष्फळच होतो असे नव्हे, तर तो घातकही ठरू शकतो, असे मानले जाते आणि अशा अर्थाच्या कथाही सांगितल्या जातात. मंत्र सफल केव्हा होतो व निष्फल केव्हा होतो, याविषयीचे विधी, नियम वा विधिनिषेध आढळतात.

मंत्रांचे स्वरूप व प्रभाव यांचे विवेचन करणारे एक स्वतंत्र ‘मंत्रशास्त्र’ वा ‘मंत्रविद्या’ निर्माण झालेली आहे. मंत्रांमुळे विशिष्ट पदार्थांमध्ये अलौकिक सामर्थ्य निर्माण होते, अशी समजूत आहे. ⇨ताईत हे अशा पदार्थाचेच उदाहरण होय. बॅबिलन वगैरेंसारख्या ठिकाणी झालेल्या उत्खननांत मंत्र कोरलेले ताईत सापडले आहेत. विविध प्रकारची कर्मकांड मंत्रांमुळेच प्रभावी बनतात. भारतातील यज्ञ वगैरेमध्ये मंत्रांचा अशा प्रकारचा विनियोग आढळतो. भारतातील तंत्रमार्गामध्ये तर मंत्र हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून यंत्रनामक आकृतींना प्रभावी बनविण्याचे कार्य मंत्राद्वारेच केले जाते. [⟶ तंत्रमार्ग व तांत्रिक धर्म]. मंत्राद्वारे पवित्र बनविलेल्या वस्तू ह्या मंत्रपूत वस्तू होत. मंत्रांनी पवित्र बनविलेल्या पाण्याला मंत्रोदक म्हणतात. मंत्राचा प्रभाव निर्माण करण्यासाठी त्याचा विशिष्ट पद्धतीने ⇨जप केला जातो. शैव, वैष्णव, गाणपत्यादी संप्रदायांचे तसेच बौद्ध, जैन, इस्लाम, ख्रिस्ती, ज्यू, शीख इ. धर्मांचे विशिष्ट असे पवित्र मंत्र आहेत. त्रैवर्णिकांमध्ये ⇨गायत्री मंत्र उपनयनानंतर संध्यावंदनात नित्य जपावयाचा असतो. हा सवितृदेवतेचा मंत्र होय. ⇨ ओम् (ॐ) वा प्रणव हा हिंदू, बौद्ध व जैन यांचा अत्यंत पवित्र मंत्र होय. ‘ओम्’ काराचा उच्चार अत्यंत मांगल्यकारक असल्याचे धर्मशास्त्रात म्हटले आहे.

संदर्भ : 1. Sivananda, Swami, Japa Yoga : A Comprehensive Treatise on Mantrasastra Rishikesh, 1952.

           २. श्रीयोगेश्वरानंदतीर्थ, मंत्रशास्त्र, १९५७.

साळुंखे, आ. इ.