भूतपिशाच : लोकांच्या समजुतीनुसार भूत ही पितर, गंधर्व वगैरेंसारखी एक मानवेतर योनी आहे. मृत्यूनंतर प्राण्याला आणि विशेषतःमानवाला कोणती गती मिळते, याविषयी वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मते व कल्पना असून भूतयोनीची प्राप्ती ही त्या विविध गतींपैकी एक हीन अशी गती मानली जाते. लौकिक सृष्टीतील प्राण्यांहून भिन्न असलेल्या अतिमानवी व अलौकिक अशा काही शक्ती या विश्वात आहेत, असे बहुतांश लोकांना वाटत आले आहे. ईश्वर, विविध देवता, देवदूत, राक्षस, असुर, सैतान, यक्ष, गंधर्व, किन्नर इत्यादींचा तसेच यांखेरीज अनेक प्रकारच्या चित्शक्तींचा त्यांमध्ये अंतर्भाव होतो. पितर, भूतपिशाच इत्यादींचाही अशा प्रकारच्या अलौकिक शक्तीमध्ये अंतर्भाव होतो. या शक्तींचे दोन प्रकार मानता येतात. यांपैकी काही शक्ती या प्रारंभापासून अखेरपर्यंत मानवाहून भिन्न व स्वतंत्र अस्तित्व असलेल्या असतात तर पितर, भूतपिशाच इ. शक्ती म्हणजे मृत मानवांना मिळालेल्या विशिष्ट गती असतात. अर्थात तात्विक दृष्ट्या अशी विभागणी सहजगत्या करता आली, तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र अशी काटेकोर विभागणी आढळतेच असे नाही.

विशिष्ट माणसांच्या मृत्यूनंतर त्यांचा आत्मा भूतयोनीत प्रवेश करतो आणि इतरांना दृश्य वा अदृश्य स्वरूपात विविध मार्गांनी त्याचे अस्तित्व जाणवत राहते, अशी समजूत आहे. माणसाचे शरीर व आत्मा यांना अलग अस्तित्व असू शकते आणि मृत्यूमुळे त्याचे शरीर नष्ट झाले, तरी आत्मा नष्ट होत नाही, या दोन श्रद्धांवर भूतयोनीची ही संकल्पना आधारलेली आहे. फार प्राचीन काळापासून आणि जगातील सर्व समाजांतून या संकल्पनेचा आढळ होतो तसेच भुतांविषयीच्या असंख्य दंतकथा जगभर आढळतात. अलीकडे मानसशास्त्र वगैरे विज्ञानशाखांमध्ये या विषयावर संशोधन चालू आहे. अर्थात विज्ञानाच्या आधारे भूतयोनीचे अस्तित्व सिद्ध झालेले नसले, तरी अजूनही असंख्य लोक तिचे अस्तित्व व प्रभाव यांच्यावर विश्वास ठेवतात. अनेकदा मनोविकृती, अज्ञान, भीती इ. कारणांनी होणारे आभास हेच या विश्वासाला जन्म देतात, असे दिसते. क्वचित प्रसंगी भूत व पिशाच या दोन भिन्न योनी असल्यासारखी वर्णने आढळत असली, तरी स्थूलमानाने भुतांनाच पिशाच म्हटले जाते.विशेषतः, मांसभक्षक भुतांना पिशाच म्हटले जाते, असे त्या शब्दाच्या व्युत्पत्तीवरून दिसते.

ब्रह्मदेवाने पिशाचांची निर्मिती केली, ते पुलह नावाच्या ऋषीपासून जन्मले, अंधारापासून जन्मले, क्रोधा वा दक्षकन्या पिशाचा ही त्यांची आई आहे इ. कथा भारतीय पुराणांतून आढळतात. वासना अतृप्त असताना, अकाली, बाळंतपणात, रजस्वला असताना, अपघात तसेच विश्वासघात, आत्महत्या इ. कारणांनी मृत्यू आल्यास व्यक्ती भूत बनते, अशी लोकांची समजूत असते.

भुतांच्या स्वरूपाविषयी विविध प्रकारच्या कल्पना आढळतात.उदा., भुते ही स्वतः छायात्मक असल्यामुळे त्यांची सावली वा प्रतिबिंब पडत नाही. भूत ज्या व्यक्तीचे असते त्या व्यक्तीसारखेच दिसते, त्याचे पाय उलटे असतात, काही भुते कुरूप व भयंकर असतात, काहींना शिर नसते व छातीला डोळे असतात. इत्यादी.


वेगवेगळ्या कारणांनी भुतांचे वेगवेगळे प्रकार मानण्यात आले आहेत. लोकांना मदत करणाऱ्या सत्प्रवृत्त भुतांचीही कल्पना करण्यात आली असली, तरी सामान्यतःभुते ही भयंकर व अपायकारकच मानली जातात. ⇨ वेताळ व म्हसोबा यांना भुतांचे राजे मानले जाते. खून झालेल्या ब्राह्मणाच्या भुताला ब्रह्मराक्षस, तर धनलोभी ब्राह्मणाच्या भुताला ब्रह्मसमंध म्हणतात. विधियुक्त अंत्यसंस्कार न झालेल्याच्या भुताला समंध, तर पाण्यात बुडून मरणाऱ्याच्या भुताला गिऱ्हा म्हणतात. बाळंतीण झाल्यानंतर दहा दिवसांच्या आत मरणाऱ्या स्त्रीच्या भुताला हडळ, तर भूतभविष्यकालीन घटना सांगणाऱ्या भुताला कर्णपिशाच म्हणतात. मुंजा (अविवाहित असताना मृत्यू आल्यास), झोटिंग, खविस इत्यादींसारखे भुतांचे इतरही अनेक प्रकार मानले जातात.

माणसांप्रमाणेच इतर मृत प्राण्यांचीही भुते बनत असल्याच्या श्रद्धा अनेक लोकांत आढळतात. अनाममधील कोळ्यांच्या समजुतीनुसार मृत देवमाशाचे भूत माणसांना पछाडते. सेमिंडे इंडियन लोक खडखड्या नागाला (रॅटल स्नेक) मारत नाहीत कारण मारल्यास त्याचे भूत आपल्या बांधवांना सूड उगविण्यास प्रवृत्त करील, असे त्यांना वाटते. शिकारीला निघण्याआधी पूर्वी मारलेल्या प्राण्यांच्या आत्म्याला संतुष्ट करण्याची प्रथा अनेक आदिम लोकांमध्ये आहे. आपण प्राण्याला मारत असताना दुसरेच कोणी तरी मारत आहे असे भासवणे, मारलेल्या प्राण्यांच्या भुतांची भीती वाटून त्यांच्या हाडांची वगैरे अवहेलना न करणे इ. प्रकार त्यांच्यात आढळतात.

स्मशान, ओसाड घरे, पडक्या विहिरी, पिंपळ, तिवाठा इ. ठिकाणी भुतांचे वास्तव्य असल्याचे मानले जाते. प्रत्येक भुताचा प्रदेश ठरलेला असून त्याला त्या प्रदेशाबाहेर जाता येत नाही वा ते गेल्यास इतर भुते त्याच्यावर रागावतात इ. समजुती आहेत. अमावास्या, पौर्णिमा इ. काळात त्यांचा प्रभाव विशेष असतो. भूत लागणे, भूत अंगात येणे, त्याने पछाडणे वा झपाटणे यांसारख्या शब्दांनी भुतांचा माणसांवरील प्रभाव दाखविला जातो. भूत अंगात आलेली व्यक्ती विचित्र चाळे करते व विक्षिप्तपणे बडबडते.

भुतांच्या भल्याबुऱ्या प्रभावाविषयी लोकांच्या विविध कल्पना असतात. त्यांचा दुष्प्रभाव दूर व्हावा म्हणून विविध प्रकारचे कर्मकांड, मंत्रतंत्र, जादूटोणा, विधिनिषेध इ. निर्माण झाले आहेत. व्यक्तीच्या अंगातील भूत काढण्यासाठी तसेच मृताने भूत होऊ नये वगैरे हेतूंनी अनेक विधी केले जातात. समाजातील अनेक चालीरीतींचा उगमही भुतांच्या अस्तित्वावरील विश्वासापासून झाल्याचे दिसते.

भुतांना कोणतेही रूप घेता येते, जांभई देताना तोंडावर हात ठेवला नाही, तर ती तोंडात शिरतात, त्यांना पाहिले तरी मृत्यू येतो, एखाद्या व्यक्तीच्या पतीचे वा पत्नीचे रूप घेऊन ती फसवितात इ. समजुती आढळतात. भुतांमुळे विविध प्रकारचे रोग होतात, अशी समजूत तर जगातील विविध समाजांतून आढळते. मेलानीशियामध्ये जमातप्रमुख सामर्थ्यशाली भुतांबरोबर संपर्क साधू शकतो आणि त्याद्वारे पाऊस, आरोग्य, युद्धातील विजय इ. गोष्टी प्राप्त करून घेऊ शकतो, या विश्वासावर लोक त्याच्या सत्तेला मान्यता देतात. या विश्वासाला तडा गेला, की त्याची सत्ता डळमळीत होते. भुते एखाद्याच्या शरीरातून त्याच्या जीवाला खेचून नेऊ शकतात, अशी एक समजूत आहे. बँक्स बेटातील लोक विशिष्ट दगडात भुते राहतात अशा समजुतीने त्या दगडांना ‘भक्षक भुते’ असे म्हणतात. त्यांच्यावर ज्याची सावली पडेल त्याचा जीव भूत ओढून नेते, या श्रद्धेने चोरांपासून घराचे रक्षण करण्यासाठी असे दगड ठेवले जातात. मृत व्यक्तीच्या भुताने झपाटू नये म्हणून बिछान्याभोवती काटेरी झुडपे ठेवण्याची पद्धत ब्रिटिश कोलंवियात आढळते. विधुर आपल्याबरोबर आला, तर त्याच्या पत्नीच्या भुताला मासे भितील या समजुतीने विघुरावर बहिष्कार टाकण्याची पद्धत ब्रिटिश न्यू गिनीमध्ये आढळते. खून करणाऱ्या वा युद्धात शत्रूचा वध करणाऱ्या माणसाला मृताचे भूत पछाडेल, या समजुतीने त्याच्यावर विविध निषिद्धे लादण्याची प्रथा अनेक ठिकाणी आढळते. भुते लोखडाला भितात, या समजुतीने संरक्षणासाठी लोखंडाच्या विविध वस्तू वापरण्याची पद्धत जगात अनेक ठिकाणी आढळते. मृताचे नाव असलेली व्यक्ती भुताच्या प्रभावामुळे मरण पावेल या भीतीपोटी मृतासारखे नाव असल्यास ते टाकून देण्याची पद्धत ऑस्ट्रेलियातील काही आदिवासी जमातींत आहे. रोमन लोक घरातील प्रत्येक माणसाची एक लोकरी प्रतिमा दारावर टांगत असत व भुते जिवंत माणसाऐवजी त्या प्रतिमेला नेतील, असे मानत असत. ऑस्ट्रेलियातील काही जमाती दरवर्षी मृतांच्या भुतांना आपल्या प्रदेशातून हाकलण्याचा विधी करतात. प्रेत घरात असेपर्यंत कोणतेही हत्यार वापरावयाचे नाही, कारण मृताच्या भुताला इजा झाली तर ते आपल्याला ठार करील, अशी समजूत अनेक लोकांत आहे. भुताचा त्रास होऊ नये म्हणून मृताच्या नातेवाईकांवरही अनेक निषिद्धे लादली जातात.

अँसिरियन व बॅबिलोनिअन लोकांत भुतांविषयीच्या अनेक कल्पना होत्या. लोक भुताला ‘एडिम्मु’ म्हणत असत. प्रेत पुरले गेले नसेल, थडग्यातून हाडे हलविली गेली असतील वा वंशजांनी विधीपूर्वक अन्नपाणी दिले नसेल, तर मृत व्यक्तीचे भूत अस्वस्थ बनते, असे ते लोक मानत असत. ईजिप्ती लोक मृताच्या भुताला ‘खु’ म्हणत. उपासमारी, हल्ला वगैरेंनी मरण पावलेले वा ज्यांचे थडगे उखडलेले आहे असे लोक भुते बनतात आणि ही भुते अस्वस्थ, भटकी, भुकेलेली, इतर चित्शक्तींनी बहिष्कृत केलेली वगैरे असतात. असे मानले जाई. ही भुते स्वप्नात जाऊन त्रास देतात, रोग निर्माण करतात, स्त्रियांना पळवतात, जादूगार आपल्या दुष्ट हेतूंसाठी त्याचा उपयोग करतात. इ. समजुती होत्या. ख्रिस्ती धर्माच्या प्रसारानंतरही केल्टिक लोकांच्या मनात भुताची भीती होतीच. जपानमध्ये असंख्य प्रकारच्या भुतांचे अस्तित्व मानले जाई. त्यांना एक वा तीन डोळे, लांब जीभ, सापासारखी लांब मान वगैरे असल्याच्या समजुती होत्या. मृत माणसाचे जसे भूत बनते, तशीच जिवंतपणी त्याच्या अवतीभोवती असलेल्या सर्व प्राण्यांची व वस्तूंचीही भुते बनून त्याच्याबरोबर राहतात, अशी एक आगळी समजूत जपानी लोकांत होती. बौद्ध धर्माचा सर्वसामान्य लोकांपर्यत प्रसार झाल्यानंतर बौध्द लोकांतही भुतांवरील विश्वास आढळू लागला. जैन धर्मातही हा विश्वास आढळतो.


भारतात व्यक्तीच्या अंगातून भूत काढण्यासाठी मांत्रिक लोक अनेक उपाय करतात. ज्याला भूत लागले आहे, त्याला झोडपून काढण्यासारखे अघोरी उपायही त्यात असतात. कारण तो मार भुताला बसतो. व त्यामुळे ते त्या व्यक्तीला सोडून जाते, अशी समजूत आहे. दत्त वगैरे देवतांच्या तीर्थयात्रा, ग्रामदेवतांची आराधना, जप, उपवास इ. इतर धार्मिक मार्गांचाही भुते निघून जावीत म्हणून अवलंब केला जातो. भुतांना संतुष्ट करण्यासाठी विविध प्राण्यांचे व वस्तूंचे बळी अर्पण केले जातात.

भुते ही शंकराचे सैनिक आहेत, या श्रद्धेमुळे शंकराला भूतनाथ, भूतेश्वर इ. नावे देण्यात आली आहेत. वज्रसत्व या बौद्ध तांत्रिक देवतेलाही भूतनाथ म्हणतात. दुर्गेला भूतनायिका, भूतमाता इ. म्हटले जाते. औषधिविद्येच्या अष्टशाखांपैकी भुतविद्या ही एक शाखा असून तिच्यात भुतामुळे होणाऱ्या रोगांची चर्चा आढळते. तामसी लोक भूतगणांची पूजा करतात, असे गीतेत म्हटले आहे.

भारतात आश्विन पौर्णिमेला भुतांची पूजा केली जाते, म्हणून तिला भूतपैर्णिमा म्हणतात कार्तिक कृष्ण चतुर्दशी यमाची असल्यामुळे तिला भूतचतुर्दशी म्हणतात इ. उल्लेख आढळतात. पिशाचबाधा दूर व्हावी म्हणून चैत्र वद्य चतुर्दशीला पिशाचांसाठी बळी देण्याचे एक व्रत केले जाते, म्हणून या तिथीला पिशाचचतुर्दशी म्हणतात. काही ठिकाणी वैशाख कृष्ण प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत वा ज्येष्ठ महिन्यात भूतमातामहोत्सव साजरा केला जातो त्यामुळे वर्षभर भूतबाधा होत नाही, असे मानले जाते. एखाद्या व्यक्तीला भुताने पछाडले असल्यास त्या भुताला शांत करून त्याचा उद्धार करण्यासाठी त्याला कथा व गीते ऐकवण्याचा भूतराँसा नावाचा विधी गढवाल भागात केला जातो. भूतबाधा दूर व्हावी म्हणून भारताच्या अनेक भागांतून भूतनृत्ये केली जातात. पूजा वगैरेंच्या ठिकाणची भुते दूर जावीत वा नष्ट व्हावीत म्हणून भूतोद्वासन नावाचा एक विधी केला जातो. भूतबाधा दूर करण्यासाठी एका खापरावर विशिष्ट कोष्टके काढून व ऱ्हीं हे बीजाक्षर लिहून तयार केलेल्या भूतत्रासनयंत्राचा उपयोग केला जातो. काशीमध्ये पिशाचमोचन नावाचे एक तीर्थ आहे. तेथे मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला स्नानदानादींनी युक्त असे पिशाचमोचन नावाचे व्रत केले असता मृत्यूनंतर पिशाच व्हावे लागत नाही व पितर पिशाचयोनीतून मुक्त होतात, अशी समजूत आहे.

पहा : अतिभौतिक शक्तिवाद अलौकिक सृष्टि जडप्राणवाद.

संदर्भ :Frazer, J. G. The Golden Bough, London, 1963.

साळुंखे, आ.ह.