जादूटोणा : (यातुविद्या). जादूचे दोन अर्थ : (१) अलौकिक व गूढ शक्तीची वा अशा विविध शक्तींची विशिष्ट पात्रता असलेल्या व्यक्तीने ऐहिक मानवी इष्टांची प्राप्ती वा अनिष्टांचे निवारण करण्याच्या उद्देशाने करावयाची साधना वा आराधना आणि त्या साधनेचे वा आराधनेचे तंत्र वा कर्मकांड. (२) सामान्य जनांना अज्ञात अशा युक्तिप्रयुक्तींनी, हातचलाखीने प्रेक्षकांना भुलवून नकळत विविध प्रकारचे चमत्कारजनक दृश्य करणे. येथे दृश्य म्हणजे डोळे, कान, नाक, त्वचा व जीभ यांना जाणवणारा प्रकार. यात किमयाही येते. पहिल्या अर्थाने जादूटोणा वा यातुविद्या व दुसऱ्या अर्थाने जादूचा खेळ असा शब्दप्रयोग करतात [→ जादूचे खेळ]. जादूटोण्यासच संस्कृतमध्ये ‘यातुविद्या’ म्हणतात. जादू हा शब्द वरील दोन भिन्न अर्थी आधुनिक काळात वापरू लागले आहेत परंतु प्राचीन व मध्ययुगात तसेच प्राकृत सामान्य जनांत दोन्ही अर्थ एकत्रित करून ‘जादू’ हा शब्द वापरलेला आढळतो. कारण सामान्य जनांची जादूवर श्रद्धा बसण्याचे एक महत्त्वाचे कारण वास्तविक दृष्टिने अलौकिक शक्तीचा काहीही संबंध नसलेल्या खऱ्याखुऱ्या युक्त्याप्रयुक्त्याही यातुविद्येत मिसळलेल्या असतात हे होय. उदा., प्रभावी औषधे आणि रासायनिक प्रक्रिया या प्राथमिक मानवी समाजाच्या यातुविद्येच्या कर्मकांडात वा तंत्रात वापरलेल्या आढळतात त्याबरोबरच मंत्र, अलौकिक शक्तींना दिलेली आवाहाने, जादूगाराचे विशिष्ट व्रतपालन यांचा संबंध त्यात दिसतोच. 

‘जादू’ शब्द ‘यातु’ या संस्कृत शब्दातून निघाला. फार्सीतून भारतीय भाषांत ‘जादू’ हा शब्द जसाच्या तसा उचलला. वेदकाळात ‘यातु’ म्हणजे ‘जादू’ हा शब्द उच्च धर्मदृष्ट्या अयोग्य किंवा निषिद्ध मानलेल्या कर्मकांडाचा म्हणजे कृष्णयातूचा दर्शक मानला होता. अथर्ववेदातील जादूच्या कर्मकांडालासुद्धा ‘यातु’ या शब्दाने तेथे दर्शित केलेले नाही. आपापल्या शिष्टमान्य धर्माच्या दृष्टीने अन्य अमान्य धर्मांचा जादू म्हणून निर्देश करून हीनत्व सूचित करण्याची त्या त्या धर्माचार्यांची प्राचीन प्रथा आहे. ‘टोणा’ हा कन्नड भाषेतून आलेला शब्द असून ‘फसविणे’ असा त्याचा अर्थ आहे. त्यावरून कृष्णयातू अथवा जादूचा खेळ या दोहोंनाही ‘जादूटोणा’ हा शब्द लावत होते असे दिसते.

 मुलाच्या रोगनिवारणार्थ वालुकाचित्रापुढील मंत्रविधी, अटलांटिकमधील हॉग बेट.

यातुविद्येला ‘मायावेद’ अशी संज्ञा वैदिक काळी प्रचलित होती, असे शतपथब्राह्मणावरून दिसते. यातुवेत्त्याला ‘मायी’ किंवा ‘मायाविद्’ म्हणत. स्वतः जादूचा खेळ करीत असताना मायाविद् हा जमिनीवर राहून आपण अधांतरी आकाशात संचार करीत आहोत असे दृश्य दाखवितो, असे शारीरकभाष्यात शंकराचार्यांनी म्हटले आहे. अथर्ववेदाला मात्र मायावेद किंवा यातुविद्या असे कोठेही म्हटलेले नाही. ग्रंथरूपात मायावेद असेल, तर तो लुप्त झाला आहे. ऋग्वेदात म्हटले आहे, की मायांच्या योगाने इंद्र बहुरूपे धारण करून जात असतो. मायावेद हा असुरांचा वेद असावा. अथर्ववेदात ‘मायी’ म्हणजे ‘मायावेत्ते’ घातक असतात त्यांची बाधा होऊ नये म्हणून वारंवार प्रार्थना केलेली आढळते. ‘मायी’ हे तेथे (१९·६६) असुरांना दिलेले विशेषण दिसते. पुराणांमध्ये असुरांना ‘मायावी’ किंवा ‘मायी ’ असे विशेषण लावलेले वारंवार आढळते.सैतानाची सही (?) : १६३४ मधील यूर्‌बँ ग्रँदियर या ख्रिस्ती धर्मोपदेशकावर चेटकाच्या खटल्यात पुरावा म्हणून सादर केलेल्या एका दस्तऐवजाच्या आधारे.

यातुविद्या वा जादू ही संस्था व धर्म यांच्यात एकमेकांना अलग करणारी विभाजक सीमारेषा प्रत्यक्षात दाखवणे कठीण आहे. सर्व प्राथमिक अवस्थेतील समाजांमध्ये यातुविद्या आढळते. त्याचप्रमाणे भारत, चीन, ईजिप्त, माया, ॲसिरिया, खाल्डिया, बॅबिलोनिया, इराण, अरबस्तान, ग्रीस, रोम, आधुनिक युगपूर्व यूरोप इ. सर्व प्राचीन संस्कृती व राष्ट्रे यांच्यामध्ये विस्तृत अशी यातुविद्या प्रचलित होती व त्यांच्या धर्मांत ती मिसळली होती. यातुविद्येतील विविध कर्मकांडावर व तत्संबंधी पारलौकिक किंवा अलौकिक शक्तींवर श्रद्धा कमीजास्त प्रमाणात सर्व हलक्या व उच्च धर्मसंस्थांमध्ये प्रचलित असलेली दिसते. उच्च धर्मसंस्थांचे वैशिष्ट्य हे, की त्यांत पारलौकिक दिव्य शक्तीशी धार्मिक मनुष्याचा मानसिक गंभीर संबंध प्रत्यक्ष असतो. उलट यातुविद्येत व्यक्ती अप्रत्यक्षपणे यातुवेत्त्याच्या द्वारेच हितसाधक संबंध साधत असते. यातुवेत्ता किंवा जादूगार हा दिव्यशक्ती व व्यक्ती यांच्यातला मध्यस्थ असतो. हा मध्यस्थ गुंतागुंतीच्या यातुविद्येत प्रवीण असतो. मुळामध्ये प्राथमिक अवस्थेत कर्मकांडात प्रवीण असलेला यातुवेत्ता हाच मांत्रिक, पुरोहित, वैद्य, भविष्यवादी, दैवज्ञ, आदिम जमातींतील ⇨शामान  इ. नात्यांची कर्तव्ये बजावित असतो. यातुविद्येचे उद्दिष्ट हे ऐहिक असते. उदा., रोग, अतिवृष्टी, दुष्काळ इ. आपत्तींचे निवारण, योग्य वेळी पर्जन्यवृष्टी घडविणे, धान्य व पशु यांच्या समृद्धीचे उपाय योजणे, भावी सुस्थितीची व अरिष्टाची चिन्हे ओळखणे, भविष्यकालीन आपत्तींचा वा उत्कर्षाचा पडताळा पाहणे इ. ऐहिक प्रयोजने होत. ही प्रयोजने अलौकिक शक्तींच्या द्वारे यातुवेत्ता साध्य करतो. यातुवेत्त्यांचे दोन प्रकार : एक, गुरूपासून यातुविद्या ग्रहण करून समर्थ बनतो दुसरा, अलौकिक शक्तींनी साधनेवाचून संपन्न असतो. ह्या दुसऱ्या प्रकारात चेटक्या वा चेटकीण (‘विचक्राफ्ट’ करणारा वा करणारी, ‘सॉर्सरर’ ) यांना यूरोपीय मानवशास्त्रज्ञ अंतर्भूत करतात. यांतच भविष्यवादी, शकुनज्ञ [→ शकुनविचार] इत्यादिकांचा समावेश होतो.


जुळ्यातील मृताची बाधा टाळण्यासाठी हयात असलेल्या भावंडाने बाळगावयाची क्षुद्रप्रतिमा, पश्चिम आफ्रिकी जमात.

अलौकिक शक्तींमध्ये पिशाच, राक्षस, पितर, असुर, अप्सरा, गंधर्व, डाकिणी-शाकिणी, हडळ, डेव्हिल, सैतान इ. घातक शक्ती असतात आकाशातील ग्रह हे केव्हा अनुकूल आणि केव्हा प्रतिकूल असतात उच्च धर्मांतील अल्ला, गॉड, परमेश्वर, बुद्ध, ब्रह्म, अर्हत्, अहुर मज्द, येहोवा वा जेहोवा इ. संज्ञा असलेल्या पवित्र, दयामय, दिव्य शक्तीही यातच अंतर्भूत होतात. या पवित्र, दिव्य, दयामय शक्तींचीही धार्मिक व्यक्तींना व धार्मिक समाजांना ऐहिक कल्याणार्थ आवश्यकता असते. ज्या दिव्य शक्तींच्या द्वारे आध्यात्मिक कल्याण, पारलौकिक हित किंवा मोक्ष यांची प्राप्ती उच्च धर्मांत अभिप्रेत असते. त्याच दिव्य शक्तींची ऐहिक कल्याणार्थही आराधना करावी लागते. त्यामुळे ऐहिक कल्याणाची साधना मिसळलेली, आध्यात्मिक कल्याणार्थ केलेली आराधना जगातील उच्च धर्मांतील देवळे, चर्च, मशिदी, पॅगोडा इत्यादींमध्ये सरसहा प्राचीन काळापासून आतापर्यंत होत आहे. म्हणून विसाव्या शतकातील अनेक यातुविद्येच्या संशोधकांत यातुविद्या आणि धर्म यांच्यातील विभाजक सीमारेषांबद्दल वाद उत्पन्न झाला आहे.

कित्येक संशोधक आत्मकल्याणार्थ देवतेची किंवा दिव्य शक्तीची कृपा संपादन करणे वा आत्म्याची उन्नती करूण घेणे, हेच धर्माचे कार्य व ऐहिक बाह्य सुस्थिती साधणे, हेच यातुविद्येचे कार्य असे मानतात आणि त्याबरोबरच असेही म्हणतात, की यातुविद्या ही प्राथमिक समाजात उत्पन्न झाली तेव्हा धर्म नव्हता. धर्म यातुविद्येनंतरची प्रगत अवस्था आहे. यातुविद्या ही वैयक्तिक गरजांवर उभारलेली आहे, तर धर्म हा सामाजिक जीवनाचा नियामक आहे, असेही काही संशोधक म्हणतात. दुसऱ्या काहींच्या मते यातुविद्येतच धर्माची बीजे आहेत. अलौकिक अदृश्य शक्तीचे तत्त्वज्ञान हा यातुविद्येचा पाया आहे व तोच धर्मविद्येचाही पाया आहे. यातुविद्येचेच धर्म हे अधिक उच्च स्वरूप आहे.

  झूलू वशीकरण-प्रकार : इच्छित युवतीच्या झोपडीवर मंत्रभारित शिंग ठेवून तिला वश करू पाहणारा झूलू युवक, दक्षिण आफ्रिका.

प्राथमिक समाजांतील अलौकिक शक्तीची कल्पना फार स्थूल स्वरूपाची आहे. या अलौकिक शक्तीला मानवशास्त्रज्ञ ‘माना’ अशी संज्ञा देतात. सर्व जगातील निरनिराळ्या देशांतील व समाजांतील यातुविद्येचे पहिले गृहीत कृत्य असे, की मनुष्याचे बरेवाईट करणारी शक्ती विश्वातील पदार्थमात्रांत पसरलेली आहे. काहींच्या मते ही एकच शक्ती आहे, तर काहींच्या मते पदार्थापदार्थांत भिन्न व कमीजास्त योग्यतेच्या शक्ती आहेत. या भिन्न भिन्न पदार्थांतील अलौकिक शक्तीचे वा शक्तींचे जादूच्या तंत्रात चालन, संमुखीकरण वा केंद्रीकरण होते. या तंत्राच्या तीन बाजू आहेत : (१) दांडके  वा कांडे, धातू, दगड, वनस्पती, मणी, हाडे, कवट्या, केस, शत्रूच्या अवयवासारखे पदार्थ, मेण, विस्तव, राख, पाणी, विशेषतः  विशिष्ट औषधी द्रव्ये इत्यादी. (२) मंत्रतंत्र. यात द्रव्यांची विशिष्ट पद्धतीने मांडणी वा हलवाहलवी करीत असताना विशिष्ट मंत्राचा वा मंत्रांचा, अक्षर वा मात्रा यांच्यात यत्किंचितही चूक न करता, तार वा मंद्र स्वरात करणे, पुटपुटणे ज्या तऱ्हेच्या अलौकिक शक्तीची साधना करावयाची ती मनामध्ये आणणे वा तिचा नामोच्चार करणे ज्याचे इष्ट किंवा अनिष्ट साधायचे त्याला मनात आणणे किंवा त्याचा नामोच्चार करणे स्वतः यातुवेत्त्याची विशिष्ट प्रकारची शरीरक्रिया चालणे या सर्वांत विशिष्ट क्रम वा पद्धती असावी लागते. या क्रियेला विशिष्ट काळ, स्थळ वा दिशा लागते. उदा., अमावस्येला काळरात्री, स्मशानात काही यातुक्रिया करतात. नुसती मंत्रविरहित क्रियादेखील शक्तियुक्त असते, असे मानले जाते किंवा मंतरलेली कांडी, ⇨ताईत, गंडादोरा, राख, केस, मंत्रयुक्त हस्तस्पर्श, नेत्रक्षेप, आलिंगन इत्यादिकांनादेखील अदृष्ट शक्ती असते. (३) यातुवेत्त्यास यातुक्रिया करण्याकरिता विशिष्ट अधिकार मिळवावा लागतो. त्याकरिता त्याला ‘ताबूं’चे वा निषिद्धांचे स्वरूप लक्षात घेऊन काही व्रतांचे पालन करावे लागते विधिनिषेध पाळावे लागतात. नियमाने स्नान करावयाचे जप नित्य करावयाचा काही प्राण्यांचे दर्शन घ्यावयाचे नाही काही पदार्थ भोजनातून वर्ज्य करावयाचे विशिष्ट काळापर्यंत किंवा कायम लैंगिक संबंध वर्ज्य करावयाचे अथवा ब्रह्मचर्य पाळावयाचे.


यातुक्रियेची दोन स्वरूपे आहेत : साधना व समारंभ. दुष्काळाची भीती वाटू लागली असताना पाऊस पाडण्याकरिता विधिविधाने करणे साथीचे रोग उत्पन्न झाले असताना त्यांचा बंदोबस्त व्हावा म्हणून कर्म कांड करणे युद्धात शत्रूचा पराजय करून विजय मिळविण्याकरिता साधना करणे गृहदाह होऊ नये म्हणून वास्तुशांती करणे बाळंतिणीच्या सुखप्रसूतीकरिता गंडादोरा बांधणे समुद्रामध्ये दूर मासेमारीकरिता प्रयाण करण्याच्या वेळी धोका किंवा निष्फलता टाळण्याकरिता नृत्यादी विधी करणे या त्या साधना होत. तलाव, देऊळ, चर्च, मशीद, धर्मशाळा यांच्या उद्‌घाटनाचा धर्मविधियुक्त मेळावा, देवतांचे वार्षिक उत्सव, उरूस तसेच तीर्थक्षेत्रांच्या यात्रा, हे ते समारंभ होत.

यातुप्रतिमेभोवती फेर धरणारे हैती मांत्रिकसाधनेचे तीन प्रकार आहेत : उत्पादनविधी, संरक्षणविधी आणि निवारणविधी. शेतात प्रथम नांगर घालत असताना करावयाचा विधी, गर्भाधान, विवाह इ. विधी हे उत्पादनविधी होत. युद्धाच्या प्रारंभी व युद्ध चालू असताना करावयाचे विधी हे संरक्षणविधी होत. डोळ्यांचा वगैरे आजार, कुष्ठ, ताप, दमा इ. रोगांच्या निवारणाकरिता किंवा साथीच्या रोगांच्या निवारणाकरिता करावयाचे विधी, हा निवारण विधींचा प्रकार होय. यांशिवाय आणखी एक वर्गवारी आहे. ती म्हणजे शुक्लयातू व कृष्णयातू-कृष्णयातूला वेदामध्ये ‘अभिचार’ किंवा ‘कृत्या’ असे म्हणतात. ख्रिस्ती धर्मात शत्रूवर आपत्ती आणण्याकरिता वा अन्य दुष्ट हेतूने ‘ब्लॅक मॅस’ म्हणजे काळी प्रार्थना चर्चमध्ये होते. या प्रार्थनेत डेव्हिलच्या शक्तीचाही उपयोग व्हावा, असा हेतू असतो. चेटूक करून सवतीस वांझोटी करणे, भानामतीचे प्रयोग, मूठ मारणे इ. घातक प्रकारही कृष्णयातू होत. शुक्लयातू म्हणजे दुसऱ्याचे अहित करण्याचा उद्देश न ठेवता केवळ व्यक्तीच्या, कुटुंबाच्या, वा समुदायाच्या ऐहिक कल्याणाच्या हेतूने केलेली साधना होय. जगातील सर्व मागासलेल्या व सुधारलेल्या समाजांत रूढ असलेले धार्मिक संस्कार व समारंभ हे शुक्लयातूतच अंतर्भूत होतात.

कुटुंबातील किंवा समाजातील भांडणे अथवा अंतर्विरोध मिटविण्याकरिताही शुक्लयातू आहे. शुक्लयातूचे ठराविक उदाहरण म्हणजे पाऊस येण्याकरिता करावयाची जादू होय. अनेक वेळा शुक्लयातू आणि कृष्णयातू या एकमेकींत मिसळलेल्या असतात. यातूमध्ये आणखी आवांतर दोन भेद पडतात: यातू एकाने केली तर दुसऱ्याने त्याच्याविरूद्ध प्रतियातू करावयाची असते. उदा., युद्धात एक पक्ष शत्रूच्या पराभवार्थ यातू करतो. दुसरा शत्रुपक्ष त्याविरुद्ध प्रतिकारार्थ यातू करतो. म्हणून या यातूंचा यातू व प्रतियातू असा उलटासुलटा निर्देश करता येतो.

जगातील प्राचीन राष्ट्रांतील जनतेचा जादूच्या क्रियांवर सार्वत्रिक विश्वास होता. ईजिप्शियन लोकांत धर्म हा केवळ जादूस्वरूपाचाच होता. देव आणि मृत पितर कडक स्वभावाचे असतात म्हणून जीवनातील सर्व क्षेत्रांत व सर्व महत्त्वाच्या प्रसंगी संरक्षणार्थ, रोगनिवारणार्थ किंबहुना सर्व इच्छातृप्त्यर्थ जादूचा  उपयोग ते करीत. जादूगाराला काही विशिष्ट नियम मंत्रसिद्ध्यर्थ पाळावे लागत. मंत्रांचा, विशेषतः वैद्यकात ते उपयोग करत. जादूगाराला त्यांच्या समाजात फार महत्त्वाचे स्थान होते. ॲसिरियन व बॅबिलोनियन राष्ट्रांचे जादूवरील ग्रंथ सविस्तर माहितीकरिता फार उपयुक्त आहेत. बहुत भुताखेतांचा वा राक्षसांचा नामोच्चार करून त्यांच्यापासून माणसांना ते वाचवीत. त्यांच्या जादूत मातीच्या किंवा अन्य प्रकारच्या प्रतिमांचा उपयोग विशेष सांगितला आहे. ग्रीक व रोमन लोकांतही जादूगारांना महत्त्व होते. होमरच्या वेळेपासून जादूच्या क्रियांचे वर्णन करणाऱ्या वाङ्‌मयास प्रारंभ झाला. किमयाशास्त्र व ⇨भविष्यकथन  याला तर ग्रीक व रोमन संस्कृतींत फारच महत्त्व होते. ग्रीक मिथ्यकथांमध्ये अत्यंत सामर्थ्यशाली जादूगारांचे वर्णन आहे. ग्रीक देवळांमधील देवता पुजाऱ्याच्या द्वारे भविष्यकथन वा कौल देत [→ कौल लावणे]. यूरोपमध्ये मध्ययुगात जादू व चेटूक यांवरचा विश्वास फार बोकाळला होता. एकोणिसाव्या शतकापर्यंत यूरोपात चेटकिणीची भीती सामान्य लोकांच्या हृदयाची पकड धरून होती. ग्रीस आणि रोममध्ये शिष्टसंमत देवतापूजनादी धार्मिक विधींच्या व्यतिरिक्त त्यांना शिष्टसंमत नसलेले धार्मिक विधी व देवतापूजन म्हणजे जादू अतएव धर्मविरुद्ध मानले जाई. यूरोपात ख्रिस्ती धर्माच्या प्रसारानंतर जादू हा खऱ्या धर्माविरुद्ध असलेला शुद्ध लोकभ्रम होय, असेही ख्रिस्ती पंडित सांगू लागले तरी चेटूक व चेटकिणीची भीती शतकानुशतके तेथे कायमच राहिली. कुराणात जादूसंबंधी पुष्कळ माहिती आली आहे. तेथे म्हटले आहे, की जादू विशिष्ट देवदूतांनी माणसांना शिकविली. बदनजर, सर्पाचे जहर किंवा अनेक आजार बरे करण्याचे मंत्रतंत्र जाणणारे व अन्य प्रकारचे जादूगार मुसलमान समाजात किंवा राष्ट्रांमध्ये प्राचीन काळापासून आदरास पात्र समजले गेले आहेत.

मेणाची बाहुली : एक कृष्णयातुसाधन. 


हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासून यातुविद्या ही मोठ्या प्रमाणात मिसळलेली दिसते परंतु ऋग्वेदकाळी यातुक्रिया अयोग्य किंवा गर्ह्य मानली होती, म्हणून ‘यातुधान’ म्हणजे जादूगार ही अपमानकारक संज्ञा मानली जात होती. वसिष्ठ ऋषी तक्रार करतो, की माझा ‘यातुधान’ म्हणून अधिक्षेप करतात. ⇨अथर्ववेदामध्ये विशेषतः वर निर्दिष्ट केलेले यातूचे शुक्ल व कृष्ण असे दोन्ही प्रकार विस्ताराने वर्णिले आहेत. मात्र शुक्लयातूच्या प्रकारास ‘यातु’ ही संज्ञा तेथे नाही. अग्नी, इंद्र, वरुण, सविता, विष्णू, रुद्र, सरस्वती इ. देवतांच्या आराधना हे रूप असलेल्या यातुक्रिया अथर्ववेदात आहेत परंतु या उच्च, अनुग्रहकारक, पापनिवारक, उदार, दिव्य शक्तींच्या जाणिवेपूर्वीचे वेदपूर्वकालातील जादूचे कर्मकांडच अथर्ववेदात वरील उच्च, दिव्य शक्तींच्या आराधनेच्या स्वरूपात सांगितलेले असले, तरी यात त्यांचे मूळ प्राथमिक स्वरूप तसे बदललेले नाही. रोगनिवारण, आयुष्यवर्धन, क्रिमिनाशक, विषनाशन, दुःस्वप्ननाशन, वाजीकरण, वशीकरण, केशवर्धन इ. उद्दिष्टांच्या साधनेकरिता मंत्र, औषधी, मणी इत्यादींनी युक्त कर्मकांड तेथे सांगितले आहे. वनस्पती, मणी, औषधी इत्यादिकांत ज्याप्रमाणे अलौकिक शक्ती मानल्या आहेत त्याचप्रमाणे त्या भू, जल, अग्नी, विद्यूत्, सूर्य, गाय, बैल, नक्षत्रे, आकाशातील ग्रह इत्यादिकांतही मानल्या आहेत. किंबहुना असेही म्हणता येते, की भू, जल, अग्नी, विद्युत् इ. अलौकिक शक्तिरूपेच आहेत. अथर्ववेदात राक्षस, पिशाच, गंधर्व, अप्सरा इ. दुष्ट अलौकिक शक्तींचेही दुष्परिणाम टाळण्याचे विधी सांगितले आहेत. ज्वर, क्षयरोग, हृद्रोग, कुष्ठरोग इत्यादिकांनासुद्धा राक्षस, पिशाचांसारखेच व्यक्तिमत्त्व कल्पिले आहे. म्हणून त्यांनी औषधींसह मंत्रांच्या द्वाराने निघून जाण्याचे आव्हान केलेले असते. प्राथमिक वस्तुदेवतावादानंतर उच्च अनेकदेवतावाद व अखेर अद्वैत ब्रह्मवाद अशा तिन्हीही पातळींवरील कल्पना अथर्ववेदात व्यक्त झाल्या आहेत. त्यावरून यातुविद्या ही धर्माची प्राथमिक अवस्था आहे, ही गोष्ट सुचित होते.

मानवी आद्यावस्थेपासून आतापर्यंत यातुविद्येवर श्रद्धा का टिकली ? अगदी अलीकडे विज्ञानयुगात आणि आता आधुनिक विद्याविभूषित वर्गात ही श्रद्धा मंदावत चालली आहे. प्राचीन व मध्ययुगीन राष्ट्रांमध्ये व एकोणिसाव्या शतकापर्यंत या श्रद्धेची पकड का राहिली ? अनिष्ट निवारण, संकटांपासून संरक्षण इ. जीवनोद्दिष्टे प्राप्त कशी होतील, या संबंधीची माणसाची गूढ किंवा स्पष्ट चिंता, हे या श्रद्धेचे उगमस्थान होय. बुद्धिवादाने वैज्ञानिक दृष्टिकोणातून इच्छापूर्तीची निश्चित शक्यता माणसाला एका बाजूने दिसत असली, तरी दुसऱ्या बाजूने त्या बाबतीत निश्चय ढळविणारी व संशयग्रस्त करणारी मानवी परिस्थिती ही आदिकालापासून आतापर्यंत सारखीच कायम आहे. माणसाचा बुद्धिवाद प्राचीन काळात भौतिक सृष्टीच्या ज्ञानाच्या बाबतीत आणि निसर्गावरील ताबा मिळविण्याच्या बाबतीत फार विफल होत होता त्यामुळे त्या वेळी इच्छापूर्तीची काल्पनिक मिथ्या साधने तो अधिक महत्त्वाची मानत होता. बुद्धीवादाने निश्चित केलेल्या वैज्ञानिक साधनांचा वापर करीत असताना, अनपेक्षित आपत्ती टाळता येतच नव्हती आणि ही स्थिती अजून कायमच आहे. वासनेची पकड दृढ आणि कायम राहते. दुसरे असे, की अदृष्ट, अलौकिक शक्तींची कल्पना काही केल्या माणसाचा पिच्छा सोडत नाही. अत्यंत उच्च धर्मांची पकड आजच्या वैज्ञानिक युगातही कायम राहिली आहे, ही गोष्ट याची सूचक आहे. आशावाद हा मनुष्याचा मनाचा स्वभाव आहे तो पार खोल आहे. त्याचे साधन धर्म आहे. तिसरे असे, की मनुष्याचा हा नैसर्गिक दुर्दम्य आशावाद यातूच्या कर्मकांडाने अभिव्यक्त होतो, हे कारण ब्रॉनीस्लाव्ह मालिनॉव्हस्की यांनी सांगितले आहे. याला ते ‘रिच्युअलाइझिंग ऑप्टीमिझम’ या शब्दावलीने व्यक्त करतात. चौथे कारण म्हणजे, यातुविद्येचे एक स्वरूप धार्मिक समारंभ तसेच या समारंभाची आणि धार्मिक संस्कारांची आदरणीयता आणि आनंदकारकता. या समारंभात आणि संस्कारांत मानवी समुदाय भाग घेताना प्रसन्न व आनंदी होतात, त्यामुळे परंपरेवरचा आदर दृढ झालेला असतो. चमत्कारांवरची श्रद्धा ढळत चालली आहे यात शंका नाही परंतु कर्मकांडावरचे प्रेमही कमी होत नाही.

मानवशास्त्रज्ञ ई. बी. टायलर यांनी यातुविद्येची एक निराळी मानसिक उपपत्ती आपल्या महान ग्रंथामध्ये सविस्तरपणे मांडली आहे. ते म्हणतात, की यातुविद्या हे प्राथमिक अवस्थेतील ओबडधोबड आभासी विज्ञान (स्यूडो-सायन्स) आहे. प्राथमिक अवस्थेतील मनुष्य त्या अवस्थेमध्येही विश्वात कार्यकारणभाव आहे, असे मानून विश्वातील घटनांचा अर्थ लावत होता. त्यात त्याला अलौकिक शक्तीची विश्वव्यवस्थेकरिता कल्पना करावी लागली. त्यातूनच यातुविद्येचे आणि नंतर धर्मविद्येचे विश्वरचनाशास्त्र निघाले. हळूहळू या कार्यकारणभावविचाराची अलौकिक शक्तीच्या गृहीत कृत्यावाचूनच उपपत्ती लागू लागली तेव्हापासून अलौकिक शक्तीचे गृहीत कृत्य मागे पडत चालले. हीच उपपत्ती जेम्स जी. फ्रेझर यांनी नंतर सुधारून स्वीकारली आणि यातुविद्येचा धर्म आणि विज्ञान यांच्याशी असलेला संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. यातुविद्या म्हणजे प्राथमिक विज्ञान होय, या टायलर आणि फ्रेझर यांच्या उपपत्तीविरुद्ध एका फ्रेंच मानवशास्त्रज्ञाचा आक्षेप असा, की प्राथमिक अवस्थेतील मनुष्यात बुद्धिवाद किंवा तार्किक विचार करण्याची शक्ती सुप्त असते. ही अवस्था म्हणजे तर्कपूर्व (प्रिलॉजिकल) अवस्था म्हणून म्हणता येते. परंतु तर्कपूर्व अवस्थेतील मानवी गट जगात कोठेही अजून तरी सापडलेला नाही. म्हणून यातुविद्या ही तर्कपूर्व अवस्थेतील मानवी कल्पनानिर्मिती आहे याला उदाहरण सापडत नाही, असे मालिनॉव्हस्की म्हणतात. काही इतरांचे म्हणणे असे, की तर्कपूर्व अवस्था असो नसो, यातुविद्येच्या संस्थेतील माणसे वैज्ञानिक पद्धतीने यातुच्या परिणांमाची केव्हाही तपासणी करीत नाहीत. यातू सफल होवो, अथवा निष्फल होवो, प्रात्यक्षिक प्रयोग व अनुभव यांस अनुसरून खऱ्याखोट्याचा विचार ते करीत नाहीत. म्हणून यातुविद्येला प्राथमिक विज्ञान म्हणणे सुसंगत ठरत नाही.

फ्रेझर यांनी यातुविद्येचे दोन नियम सांगितले: (१) सादृश्याचा नियम व (२) संसर्ग नियम. सादृश्याचा नियम म्हणजे एकमेकांशी सादृश्य असलेल्या वस्तूंमध्ये कार्यकरणभाव असतो, हा होय. उदा., अभिचार म्हणजे शत्रुनाशनाची क्रिया अथवा चेटूक. यामध्ये शत्रूची मेणाची मूर्ती करून त्या मूर्तीच्या पोटात शस्त्र खुपसतात. दुसरा संसर्गाचा नियम म्हणजे एका वस्तूशी दुसरी वस्तू संबद्ध असली किंवा केव्हातरी संबद्ध होत असली, तर त्यांपैकी एकीवर क्रिया केली, तर दुसरीवर तिचा परिणाम होतो. उदा., ज्या व्यक्तीचे अनिष्ट साधावयाचे किंवा इष्ट साधावयाचे त्या व्यक्तीच्या वस्त्र, घर, शेत, वाहन किंवा अन्य वस्तू यांवर जादूची क्रिया करावयाची. फ्रेझर यांच्या मते यातुविद्या, धर्म व विज्ञान या प्रगतीच्या तीन अवस्था आहेत. यातुविद्येमध्ये अलौकिक शक्तीवर ताबा चालवता येतो अशी श्रद्धा असते परंतु ही श्रद्धा अनेक पिढ्यांपर्यंत वारंवार यातुक्रियेचा अनुभव घेत असता प्रगत अवस्था आली की ढळते. अलौकिक शक्ती वश करण्यात अपयश आलेले दिसू लागते. याचे वारंवार प्रत्यंतर येऊ लागते आणि या प्रत्यंतरामुळे अलौकिक, पारलौकिक, दिव्य शक्तींची प्रार्थना करणे, आराधना करणे, पूजा करून समर्पण करणे, यज्ञ, होम या स्वरूपात तदर्थ त्याग करणे, त्या प्रीत्यर्थ मंदिर उभारणे, भक्तीने शरण जाणे इ. स्वरूपांत धर्म अवतरतो. यापुढील वैचारिक प्रगतीची अवस्था म्हणजे विज्ञान होय. अनुभव व प्रयोग यांच्या द्वारे मोजमाप करण्याकरिता गणिताचा वापर करून निर्सगाचे नियम समजू लागतात भौतिक विज्ञान उत्पन्न होते बौद्धिक समीक्षेला धार व सूक्ष्मता येते निर्सगावर वास्तविक ताबा वाढत जातो त्यामुळे यातुविद्येप्रमाणेच धर्म हा लोकभ्रमाचाच प्रकार म्हणून लक्षात येऊ लागतो.

पहा: अतिभौतिक शक्तिवाद आयुर्वेदाचा इतिहास चमत्कार, दैवी धर्म निषिद्वे माना.

संदर्भ:

1. Butler, E. M. Ritual Magic, Cambridge, 1949.

2. Durkheim, Emil Trans. Swain, J. W. The Elementary Forms of Religious Life, New York, 1926.

3. Frazer, J. G. The Golden Bough, 2 Vols., London, 1911.

4. Freud, Sigmund Trans. Totem and Tabu, New York, 1958.

5. Lowie, R. H., Primitive Religion, London, 1925.

6. Malinowski, Bronislaw, Magic, Science and Religion and Other Essays, Glencoe, Ill., 1948

7. Marette, R. R. Threshhold of Religion, London, 1914.

8. Middleton, John, Ed. Magic, Witchcraft and Curing, Garden City, N.Y., 1967.

9. Thomas, K. Religion and The Decline of Magic, 1971.

10. Tylor, E. B. Primitive Culture, 2 Vols., New York, 1920.

११. जोशी, लक्ष्मणशास्त्री, हिंदु धर्माची समीक्षा, वाई, १९४२.

जोशी, लक्ष्मणशास्त्री