जिनविजयजी मुनि : (२७जानेवारी १८८८–  ). प्रख्यात श्वेतांबर-जैन यती व संस्कृत-प्राकृतचे गाढे विद्वान. राजस्थानमधील रूपाहेली येथे परमार घराण्यात जन्‍म. मूळ नाव किसनसिंह. मातापिता राजकुमारी आणि वृद्धिसिंह. लहानपणीच त्यांचे मातापिता निवर्तले. देवीहंस नावाच्या जैन यतीच्या दीर्घ सहवासामुळे त्यांनी पुढे श्वेतांबर पंथाची दीक्षा घेतली आणि ते जैन यती बनले. अहमदाबादच्या राष्ट्रीय शिक्षण विद्यापीठात महात्माजींनी त्यांची आचार्य म्हणून नियुक्ती केली. तेथे ते आठ वर्षे होते. यामुळे आचार्य जिनविजयजी मुनी ह्या नावाने ते प्रसिद्धीस आले. नंतर त्यांनी स्वतःस अध्ययन-अध्यापनकार्यास वाहून घेतले. अनेक भारतीय तसेच यूरोपीय भाषा व लिपीही त्यांनी आत्मसात केल्या. विविध धर्ममतांचा त्यांनी चिकित्सक अभ्यास करून अनेक लेख लिहिले आणि अनेक दुर्मिळ ग्रंथांचे संशोधन-संपादन करून ते प्रसिद्धही केले. १९१९ मध्ये पुणे येथे भरलेल्या ‘ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्स’च्या अधिवेशनात त्यांनी हरिभद्रसूरीच्या कालनिर्णयासंबंधी हरिभद्राचार्यस्य समयनिर्णय:  हा अभ्यासपूर्ण संस्कृत निबंध वाचला. हरिभद्रसूरीचा हा कालनिर्णय डॉ. हर्मान याकोबी (१८५०–१९३७) सारख्या प्रख्यात पंडितानेही मान्य केला. जर्मनीतील अनेक थोर प्राच्यविद्या पंडितांच्या संशोधनपद्धतीने आणि विद्वत्तेने प्रभावित होऊन ते अभ्यासासाठी १९२८ मध्ये जर्मनीत गेले. भारतात परतल्यावर गांधीजींनी सुरू केलेल्या स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी भाग घेतला व त्यासाठी सहा महिने कारावासही भोगला. जर्मनीला जाण्यापूर्वी त्यांनी गुजरात विद्यापीठाने सुरू केलेल्या ‘गुजरात पुरातत्त्व मंदिर’ ह्या संस्थेच्या संचालकपदी काम केले. १९२१ मध्ये शांतिनिकेतनात ‘सिंधी जैन ज्ञानपीठा’ची स्थापना झाली आणि ह्या संस्थेतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘सिंधी जैन ग्रंथमाले’चे प्रमुख संपादक आणि संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली. सध्या मुंबई येथील ‘भारतीय विद्याभवन’चे ते अधिष्ठाता संचालक आहेत. सिंधी जैन ग्रंथमाला नंतर भारतीय विद्याभवनाकडे आली असून तिचे संपादक जिनविजयजीच आहेत. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्राचीन ग्रंथ संपादून मालेतर्फे प्रकाशित केले आहेत. ग्रंथमालेस स्थैर्य प्राप्त करून देण्यात त्यांचा वाटा महत्त्वाचा आहे.

 जिनविजयजी मुनि

जिनविजयजींनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांचे लेखन-संपादन केले असून त्यांचे सर्वच लेखन विद्वन्मान्य आहे. प्राचीन इतिहास, संस्कृती, धर्मशास्त्र, साहित्य इ. विषयांचा त्यांचा व्यासंग सखोल व साक्षेपी आहे. संशोधनपर व पुढील संशोधनास उपयुक्त असे शेकडो लेख त्यांनी विविध विषयांवर लिहिलेले आहेत. गुजरातच्या इतिहासाची साधने, प्राचीन हस्तलिखित व प्रकाशित ग्रंथांच्या सूची इ. प्रकारची साधनसामग्रीही त्यांनी संशोधकांस उपलब्ध करून दिली आहे. त्यांचे काही महत्त्वाचे ग्रंथ असे : जैन तत्त्वसार, विज्ञप्ति त्रिवेणी, प्रबंध चिंतामणी (१९३३), प्रबंधकोश (१९३५), प्राचीन जैन लेखसंग्रह (२ भाग), गुजरातना इतिहासनो साधनसंग्रह ( २ भाग), उक्तिरत्‍नाकर, राजस्थान पुरातत्त्व मंदिरके हस्तलिखित ग्रंथोंकी सूची  (१९५६), राजस्थान प्राच्यविद्या प्रतिष्ठान जोधपूरके संस्कृत-प्राकृत ग्रंथोंका सूचिपत्र  (२ भाग, १९६३–६४) इत्यादी.

       ‘जर्मन ओरिएंटल सोसायटी ’, जर्मनी ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर’, पुणे ‘गुजरात साहित्य सभा’, अहमदाबाद ‘विश्वेश्वरानंद वैदिक शोध प्रतिष्ठान’, होशियारपूर इ. मान्यवर संस्थांचे ते सन्मान्य सभासद आहेत. तसेच जोधपूर येथील ‘राजस्थान ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट’चे ते सन्मान्य संचालकही आहेत. ‘गुजरात पुरातत्त्व मंदिर ग्रंथावली ’, ‘भारतीय विद्या ग्रंथावली’, ‘ जैन साहित्य-संशोधक ग्रंथावली’, ‘राजस्थान पुरातन ग्रंथमाला’ इत्यादींचे ते प्रमुख संपादक आहेत. १९६१ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ देऊन तसेच राजस्थान साहित्य अकादेमीने १९६४ मध्ये ‘मनीषी ’ पदवी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.

पाटील, भ. दे.