अंग्रो-मइन्यु व अहुर मज्द

अंग्रो-मइन्यु: जरथुश्त्री (पारशी) धर्मग्रंथात वर्णन केलेल्या पाशवी प्रवृत्तीचे मूर्तस्वरूप म्हणजे अंग्रो-मइन्यु होय. पेहलवी भाषेत त्यास ‘अहरिमन’ अशी संज्ञा आहे. जरथुश्त्रप्रणीत गाथेत  अंग्रो- मइन्यूचा उल्लेख आढळत नाही तथापि अन्य अवेस्ता  प्रकरणांत हे नाव येते.

स्पँता-मइन्यु (अहुर मज्द) ह्या दैवी प्रवृत्तीचा त्यास शत्रू मानले आहे. तो साक्षात मृत्युस्वरूपी असून जीवसृष्टीत निर्माण होणारे रोग व तदनुषंगिक घाण, सडणे कुजणे इ. प्रक्रिया घडवून आणतो. उत्तर देशा हे त्याचे निवासस्थान होय.

परमात्मभक्तीची व सद्धर्माचरणाची उदात्त शिकवण देण्याच्या व्रतापासून जरथुश्त्रास (इ.स.पू. ६ वे-७ वे शतक) परावृत्त करण्याचे त्याने प्रयत्न केले, पण ते सफल झाले नाहीत, असा उल्लेख अवेस्ता साहित्यात आढळतो. सैतानाशी त्याचे बरेच साम्य आहे.

पहा : अहुर मज्द जरथुश्त्र, पारशी धर्म.

तारापोर, जे. सी. (इं) सोनटक्के, ना. श्री. (म.)