दिगंबरांच्या तीर्थंकरमूर्ती : (१) पहिले तीर्थंकर : ऋषभनाथ (आदिनाथ), (२) आठवे तीर्थंकर : चंद्रप्रभ, (३) तेविसावे तीर्थंकर : पार्श्वनाथ, (४) चोविसावे तिर्थंकर : महावीर (वर्धमान).तीर्थंकर : जैन व बौद्ध या दोन्ही धर्मांमध्ये अनेक धर्मसंस्थापक प्रेषित किंवा द्रष्टे मानले आहेत. अशा युगपुरुषांना तीर्थंकर अशी संज्ञा जैन धर्मात आहे. ‘तीर्थंकर’ म्हणजे तीर्थ उत्पन्न करणारा. तीर्थ या शब्दाचे पुढे दिल्याप्रमाणे अनेक अर्थ जैन ग्रंथात आढळतात : (१) धर्म, (२) संसारसागराच्या पैलतीरावरील मोक्षमंदिराकडे नेणारा पाण्याचा उतार व बंदर, (३) जैन साधू, साध्वी, श्रावक, श्राविका यांचा संघ, (४) जैनांचे १२ अंगग्रंथ इत्यादी. या अर्थांवरून तीर्थंकर म्हणजे धर्माध्यक्ष, जैन संघप्रमुख, मोक्षमार्ग दाखविणारा असे या संज्ञेचे अर्थ होतात. तीर्थंकरालाच ‘जिन’ म्हणजे इंद्रिये जिंकणारा, ‘अर्हत्’, सर्वज्ञ, वीतराग, केवली म्हणजे केवलज्ञानी अशी नावे दिलेली आहेत. जिन शब्दावरूनच या धर्माच्या अनुयायांना ‘जैन’ असे नाव पडले. केवल ज्ञानप्राप्तीनंतर तीर्थंकर धर्मोपदेश करीत विहार करतात. तीर्थंकर हे केवली असतातच परंतु सर्व केवली तीर्थंकर होत नाहीत.

तीर्थंकरांचे अद्‌भुत वर्णन : अनेक देवदेवता आणि यक्षयक्षिणींना तीर्थंकरांचे सेवक, शरीररक्षक किंवा परिचारक मानले आहे. त्यांच्या भोवती बारा सभा असून त्यांमध्ये गणधर, मुनी, कल्पवासी देवी, आर्यिका, स्त्रिया, भवनवासी देवी, ज्योतिषवासी देवी, इंद्रासह कल्पवासी देव, इंद्रासह भवनवासी देव, इंद्रासह व्यंतरवासी नावाचे देव, मनुष्य इ. असतात.

तीर्थंकरांच्या मुखाभोवती सूर्यापेक्षा सहस्रपट तेज असते. त्यांची सावली पडत नाही. त्यांचे पाय सुवर्णकमळावर पडतात. एक कोटी देव त्यांच्या भोवती नांदतात. तीर्थंकराचा जीव त्याच्या आईच्या गर्भामध्ये अवतरल्यावर तिला चौदा महास्वप्ने दिसतात. त्यांत बैल, सिंह, पुष्पमाला, लक्ष्मी, ऐरावत, पूर्ण चंद्रमा, उगवता सूर्य, दोन सुवर्णकलश इ. चौदा गोष्टींचा अंतर्भाव असतो. तीर्थंकर जन्मास येण्यापूर्वी त्या नगरीवर कुबेर सहा महिने रत्नांचा पाऊस पाडतो. तीर्थंकर जन्माला आल्याबरोबर स्वर्गातील इंद्र सपरिवार खाली उतरतो व बालतीर्थंकराला घेऊन मेरू पर्वतावर जातो. तेथे त्या बालतीर्थंकरावर सर्व देव अभिषेक करून परत त्याला मातेपाशी आणून ठेवतात. तीर्थंकराच्या जीवनामध्ये एकंदर पाच वेळा वैभवपूर्ण उत्सव होतात. त्यांना ‘पंचकल्याणक’ अशी संज्ञा आहे. त्याची नावे पुढीलप्रमाणे : (१) गर्भकल्याणक अथवा च्यवनकल्याणक, (२) जन्मकल्याणक, (३) दीक्षाकल्याणक, (४) केवलज्ञानकल्याणक व (५) निर्वाणकल्याणक.

तीर्थंकर हे केवलज्ञान प्राप्त झाल्यावर जेव्हा एखाद्या ठिकाणी धर्मोपदेश करण्यास येतात, त्यावेळी त्या ठिकाणी देव येऊन समवसरणाची म्हणजे प्रवचन–सभागृहाची रचना करतात. या सभागृहाभोवती तीन तट (गढ) असतात. चारही बाजूंस चार दरवाजे व मुख्य प्रवेशद्वारापुढे भव्य मानस्तंभ उभारलेला असतो. देव, देवी, साधू, साध्वी, राजे इत्यादींच्या बारा प्रकारच्या परिषदा मानल्या आहेत. तीर्थंकर अशोक वृक्षाखाली सिंहासनावर बसून दिव्यध्वनीने उपदेश करतात, त्यावेळी त्यांचे मुख चारही दिशांना दिसते. देव पुष्पवृष्टी करतात, सुगंधशीतल वारे वाहतात, सर्व झाडांना एकदम फुले येतात, सर्व प्रदेश स्वच्छ व सुगंधित होतो. समवसरणातील प्राणी आपले नैसर्गिक वैर विसरतात.

तीर्थंकरांचा काल : कालचक्राचे दोन भाग जैन शास्त्रांनी मानले आहेत. वरून खाली येणारा अर्धा भाग अवसर्पिणी व खालून वर जाणारा भाग उत्सर्पिणी. या दोहोंचे प्रत्येकी सहा विभाग असतात. अवसर्पिणीत आयुष्य, शक्ती, उंची इ. गुणांचा ऱ्हास होतो. हा ऱ्हास पुढील सहा विभागांनी (आरांनी) क्रमशः होतो : (१) सुषमा–सुषमा (परमसुख), (२) सुषमा, (३) सुषमा–दुःषमा, (४) दुःषमा–सुषमा, (५) दुःषमा (दुःख) आणि (६) दुःषमा–दुःषमा (अतिशय दुःख). उत्सर्पिणीत हाच क्रम उलटा होऊन परमसुखाप्रत जातो अवसर्पिणीच्या चौथ्या विभागांत ६३ शलाकापुरुष जन्म घेतात. ह्या ६३ शलाकापुरुषांत २४ तीर्थंकरांचा अंतर्भाव होतो. चालू अवसर्पिणीत जे २४ तीर्थंकर झाले त्यांची नावे व दिगंबर–श्वेतांबर पंथांप्रमाणे असलेली सांप्रदायिक माहिती पुढील पानावरील कोष्टकात दिली आहे.

एका तीर्थंकराचा काळ जाऊन दुसऱ्याचा येईपर्यंत काही काळ लोटतो. सर्व तीर्थंकरांचा जन्म पूर्व भारताच्या नगरांमधील क्षत्रिय कुलांत आणि राजवंशांत झालेला आहे. पुढील कोष्टकातील तीर्थंकर क्र. ७ व २३ उग्रवंशीय होते. क्र. १५, १६, १७ कुरुवंशात जन्मले. महावीर हे ज्ञातृ (ज्ञात, नात) कुलात व बाकीचे सर्व क्षत्रिय कुलांत जन्मले. या २४ तीर्थंकरांपैकी ऋषभ, नेमी, पार्श्व व महावीर ह्या चार ऐतिहासिक व्यक्ती होत्या असे सिद्ध झाले आहे. क्र. १९ मल्ली ही स्त्री होती असे श्वेतांबर मानतात. दिगंबरांच्या मते स्त्रियांना मुक्ती मिळत नाही, म्हणून मल्ली हा पुरुष होता असे मानले पाहिजे. भविष्यकाळी होणाऱ्या २४ तीर्थंकरांची नावे आणि त्यांचा सर्व तपशीलही जैन ग्रंथांत मिळतो.


श्वेतांबरांच्या तीर्थकरमूर्ती : (१) पहिले तीर्थकर : ऋषभनाथ (आदिनाथ), (२) आठवे तीर्थकर : चंद्रप्रभ, (३) तेविसावे तीर्थकर : पार्श्वनाथ, (४) चोविसावे तीर्थकर : महावीर (वर्धमान).

तीर्थंकरांच्या मूर्ती : सायप्रस बेटात अलाशिया येथील उत्खननात आदिनाथाची पंचधातूची मूर्ती सापडली असून तिचा काल इ. स. पू. १२५० आहे. तीर्थंकरांच्या मूर्ती भारतामध्ये अनेक ठिकाणी सापडतात. श्वेतांबरांच्या मूर्ती सवस्त्र आणि सालंकार असतात, तर दिगंबर पंथाच्या मूर्ती विवस्त्र व निरलंकार असतात. मूर्तींच्या खालील बैठकीवर त्या त्या तीर्थंकराचे लंच्छन (चिन्ह) कोरलेले असते. काहींच्याछातीवर श्रीवत्स आहे. काही मूर्ती सिंहासन व प्रभावळ यांसह आहेत. काही मूर्ती पद्मासन घातलेल्या व काही कायोत्सर्ग अवस्थेतील आहेत. अबूच्या पहाडावरील आदिनाथ मंदिरात आदिनाथाची सु. ४,०३१ किग्रॅ. (१०८ मण) वजनाची पद्मासनातील पंचधातूची मूर्ती सु. २·५ मी. उंच आहे. पाटण्याजवळ राजगृह येथील ऋषभनाथ व नेमिनाथ यांच्या मूर्ती आणि बांकुराजवळ देऊळभिडा येथील पार्श्वनाथाची मूर्ती ह्या विशेष प्रेक्षणीय आहेत.

 

संदर्भ : Stevenson, Sinclair, The Heart of Jainism, Oxford, 1915.

पाटील, भ. दे.