रामतीर्थ : (२२ ऑक्टोबर १८७३ – १७ ऑक्टोबर १९०६). प्रख्यात तत्त्वचिंतक. विद्यमान पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या गुजराणवाला जिल्ह्यातील मुरलीवाला या खेडेगावी जन्म. पूर्वाश्रमीचे नाव स्वामी रामतीर्थतीर्थराम. संन्यास स्वीकारल्यानंतरचे नाव रामतीर्थ. वडिलांचे नाव हिरानंद गोस्वामी. आई लहानपणीच निवर्तली. तुलसीदासांचे वंशज म्हणून या घराण्याची ख्याती होती. लहानपण हलाखीत गेले. ते दहा वर्षांचे असतानाच त्यांचा विवाह झाला होता. गुजराणवाला हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण (१८८८) लाहोरच्या फोरमन कॉलेजमधून गणित विषयात एम्. ए. (१८९५), प्रथम श्रेणीत पहिला क्रमांक आणि त्याच कॉलेजात गणिताचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली (१८९६). लाहोरला ते धर्मसभेच्या शिक्षणमंडळाचे प्रथम सभासद व नंतर चिटणीसही होते.

गुजराणवाला येथे शिकत असतानाच वडिलांचे मित्र आणि रामकृष्ण परमहंसांचे शिष्य धन्नाराम भगत यांचे सान्निध्य त्यांना लाभले. पुढे तेच त्यांचे गुरू झाले. रामतीर्थ कृष्णभक्त होते. त्यांना प्रत्यक्ष श्रीकृष्णाने दर्शन दिले होते असे म्हणतात. द्वारकामठाचे शंकराचार्य श्री राजराजेश्वरतीर्थ यांच्यासह ते काश्मीरला गेले असता त्यांना सत्संग घडून ब्रह्मसूत्रे, उपनिषदे यांच्यावरील भाष्ये ऐकावयास मिळाली. याचवेळी स्वामी विवेकानंदांची भाषणे त्यांनी ऐकली व त्यांचा अभ्यास केला. सहाजिकच आंतरिक आध्यात्मिक ज्ञानार्जनाची ओढ लागून नोकरीत त्यांना स्वारस्य वाटेना. याचाच परिणाम म्हणून ते सर्वसंगपरित्याग करून हिमालयात गेले आणि वयाच्या २८ व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला. त्यानंतर त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांची यात्रा केली. भारतधर्म महामंडळाच्या अध्यक्षपदावरून त्यांनी वैदिक धर्माचा पुरस्कार केला. अनासक्ती, समाधानी वृत्ती आणि साधी राहणी यांचे सदैव पालन करून केवळ आत्मसाक्षात्काराचा विचार न करता त्यांनी आपल्या देशाचेही भले व्हावे, म्हणून प्रयत्न केले. त्यांचा वेदान्त केवळ शाब्दिक नसून तो त्यांनी आचरणात आणला होता. म्हणूनच श्रेष्ठ सुधारकांत त्यांची गणना होते. भौतिक शास्त्रांच्या आधारेच वेदान्ताचे सिद्धांत मांडून ते आधुनिक काळातही खरे ठरतात, हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले.

टोकिओला भरलेल्या आंतरराष्ट्रीय धर्मपरिषदेला टेहरीच्या महाराजांच्या आग्रहावरून ते हजर राहिले (ऑगस्ट १९०२). परंतु ती परिषद ही एक अफवा होती असे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी जपानमध्ये वेदान्तावर व्याख्याने दिली व ती पांडित्य आणि उत्तम कवित्व यांमुळे लोकप्रियही ठरली. नंतर अमेरिकेतही स्वामी विवेकानंदाप्रमाणेच त्यांचे स्वागत झाले. हा दौरा आटपून ते मायदेशी परतले. भारतात आल्यावर अनेकजण त्यांचे शिष्य झाले. त्यांपैकी नारायणस्वामी, टेहरीचे महाराज, मदन मोहन मालवीय, स्वामी शिवानंद, डॉ. महंमद इकबाल हे प्रमुख होत.

रामतीर्थांनी पूर्वायुष्यात अनेक ग्रंथ लिहिले होते. परंतु अचानक नैराश्याच्या भरात त्यांनी आपली ग्रंथसंपदा गंगार्पण केली. त्यामुळे परदेशांत व भारतात दिलेल्या व्याख्यानाखेरीज त्यांचे स्वतंत्र वाङ्‍मय फारसे उपलब्ध नाही. उर्दू, फार्सी आणि इंग्रजी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. उत्तम कवित्वही त्यांना लाभले होते. त्यांची हजारावर पत्रे व काही टिपणे रामतीर्थ प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाली आहेत. रामतीर्थ आध्यात्मिक आनंदात एवढे मत असत, की त्यांनी आपल्या लेखनात अनेक ठिकाणी स्वतःचा उल्लेख ‘राम बादशहा’ असा केला आहे. त्यांचे प्रकाशित इंग्रजी लेखन असे : (१) इन वुड्स ऑफ गॉड्स रीअलाइझेशन (८ खंड ), (२) रामाज नोटबुक्स (२ खंड ), () हार्ट ऑफ राम, () पॅरबल्स ऑफ राम इत्यादी. या पुस्ताकांची हिंदी, मराठी भाषांतरेही प्रसिद्ध आहेत. रामतीर्थांना हिमालयाची विलक्षण ओढ होती. तेथील भव्य निसर्गसौंदर्याच्या त्यांनी केलेल्या वर्णनांत सौंदर्यवृत्ती व आध्यात्मिकता यांचा उत्कृष्ट संगम आढळतो.

रामतीर्थ गंगास्नानाला गेले असता भोवऱ्यात सापडून अवघ्या ३३ व्या वर्षी त्यांचा अंत झाला योगायोगाने त्याच दिवशी त्यांनी लिहिलेला सुप्रसिद्ध मृत्युलेख त्यांच्या शिष्यांना त्यांच्या मेजावर मिळाला. उत्कृष्ट काव्याचा तो एक नमुनाच आहे. त्यात मृत्युला उद्देशून ‘माझे शरीर तू खुशाल घेऊन जा. चंद्रकिरणांच्या रूपाने, पहाडी नदी-निर्झरांच्या वेषाने, समुद्रलाटांच्या मिषाने मी जगात वावरू शकेन’ असे लिहिले आहे.

हृषिकेशजवळील ब्रह्मपुरी येथे रामतीर्थांच्या स्मरर्णार्थ एक उत्तम ग्रंथालय चालविण्यात येते.

कापडी, सुलभा.