देवबंद : उत्तर प्रदेशात सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद (देवीबन) गावचे इस्लामी महाविद्यालय. इस्लामी धार्मिक शिक्षणाचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून ते प्रसिद्ध आहे. याची स्थापना १८६७ मध्ये शिक्षण खात्यातील तीन तज्ञांच्या साहाय्याने हाजी मुहंमद आबिद हुसेन यांनी केली. १८६७ मध्ये मौलवी मुहंमद कासीम यांची तेथे आश्रयदाते–प्राचार्य म्हणून नेमणूक झाली. दिल्ली, लखनौ व खैराबाद येथील तीन भिन्न संस्थांच्या शिक्षणपद्धतींचे एकीकरण करण्यात या महाविद्यालयाने अपूर्व यश मिळविले आहे. तफ्सीर व हदीस (दिल्ली), फिक (लखनौ) व इल्म अल्–कलाम आणि तत्त्वज्ञान (खैराबाद) यांचा समन्वय शिक्षणक्रमात करून या महाविद्यालयाने शाह वली अल्लांच्या (दिल्ली) मुहद्दिसीन म्हणजे हदीसमध्ये पारंगत असलेल्या पंथावर विशेष भर दिला. जगाच्या विविध देशांतून येणाऱ्या मुसलमान विद्यार्थ्यांसाठी १,५०० जागांची सोय असलेले वसतिगृह, दार अल्-उल्‌मची मशीद, सु. ६७,००० ग्रंथांचे संपन्न ग्रंथालय व अनेक विद्याविभाग अशी प्रशंसनीय सोय तेथे आहे. ग्रंथालयात अरबी, फार्सी, उर्दू इ. भाषांतील अनेक दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखिते आहेत. परंपरानिष्ठ धार्मिकतेच्या आधारे व्यक्तिगत विकास साधण्याकडे येथे खास लक्ष पुरविले जाते. अनेक धार्मिक पुढारी देवबंदने इस्लामला दिले व त्यांनी भारतातील राजकारणावर आपला प्रभाव पाडला. जमियत उल उलेमा ए हिंद या कडव्या संघटनेचा पाया येथेच घातला गेला.

करंदीकर, म. अ.