आगाखान : इस्लाम धर्माच्या शिया पंथातील निझारी इस्माइली हा एक उपपंथ असून त्याच्या प्रमुखास ‘आगाखान’ (‘अगा खान’, ‘अधा खान’, ‘आकाखान’ असेही पर्याय आहेत) ही पदवी लावण्यात येते. ⇨खोजा नावाने ओळखली जाणारी जातही आगाखानांना गुरू मानते. पहिले आगाखान हसन अली शाह (१८००–१८८१) हे मानले जातात ते आपली वंशपरंपरा मुहंमद पैगंबराचा जावई ⇨ अली (सु.६०० – ६६१) यांच्याशी जोडतात. हसन अली शाह हे इराणात केरमान प्रांताचे राज्यपाल होते. इराणच्या दरबारात त्यांना ‘आगाखान’ ही सरदारांना दिली जाणारी पदवी मिळाली. त्यांचा विवाह इराणी राजकन्येशी झाला तथापि तेथील राजाशी वितुष्ट आल्याने ते इराणातून भारतात इंग्रजांच्या आश्रयास आले. त्यांनी इंग्रजांना भरीव मदत केली . इंग्रजांनी त्यांना ⇨इस्माइली पंथाचे शेहेचाळीसावे ⇨इमाम म्हणून मान्यता, वार्षिक तनखा आणि ‘हिज हायनेस’ असा किताब बहाल केला. ते मुंबईस स्थानिक झाले होते. मुंबईसच ते निधन पावले.

दुसरे आगाखान अली शाह (१–१७ एप्रिल १८८५) हे पहिल्या आगाखानचे जेष्ठ पुत्र असून ते १८८१ मध्ये गादीवर आले. त्यांनी इस्माइलींच्या सुधारणेसाठी प्रयत्‍न केले. इस्माइली त्यांना सत्तेचाळीसावे इमाम मानतात. अल्पवधीतच ते पुणे येथे वारले.

तिसरे आगाखान सुलतान सर मुहंमद शाह (२ नोव्हेंबर १८७७ – ११जुलै १९५७) हे अठ्ठेचाळीसावे इमाम. ते अली शाहनंतर १८८५ मध्ये गादीवर आले. ते मुस्लीम लीगचे पुढारी व अध्यक्ष होते. मुसलमानांच्या राजकीय मागण्यांचेही ते समर्थक होते. गोलमेज परिषदेचे प्रतिनिधी व जागतिक नि:शस्त्रीकरण परिषदेचे सभासद या नात्याने त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. अलीगड मुस्लीम विद्यापीठासाठी त्यांनी निधी जमविला व त्याच्या स्थापनेस मोठा हातभार लावला. पहिल्या महायुद्धात त्यांनी इंग्रजाना पुरेपुर मदत केली. त्यांच्या या कामगिरीबाबत इंग्रजांनी त्यांचा बहुमान केला. इस्माइली पंथाच्या लैकिक व अध्यात्मिक उन्नतीसाठी त्यांनी आटोकाट प्रयत्‍न केले व भक्कम स्वरूपाची संधटना उभारली. त्यांनी लिहिलेला इंडिया इन ट्रँझिशन (१९१८) हा ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे, स्विझरलँडमध्ये ते मरण पावले.

चौथे आगाखान प्रिंन्‍स करीम (१३डिसेंबर १९३६–  ) हे तिसऱ्या आगाखानचे नातू व एकोणपन्नासावे इमाम होत. त्यांचा जन्म यूरोपात झाला व ते हार्व्‍हर्ड विद्यापीठाचे पदवीधर आहेत. जगातील विविध देशांत पसरलेल्या इस्माइली पंथाच्या लोकांना त्या त्या देशाशी एकरूप होण्याचा व एकनिष्ठ राहाण्याचा आदेश त्यांनी दिलेला आहे.

संदर्भ : Dumasia N. M. Aga Khan, and His Ancestors, Bombay, 1939.

सुर्वे, भा. ग.