हठयोग : एक कष्टसाध्य योगप्रकार. हठयोगात आसन, प्राणायाम, बंध, मुद्रा, त्राटके, नेती, धौती, बस्ती इ. कष्टसाध्य कृतींच्या आधारे समाधी प्राप्त करून घेतली जाते, म्हणून त्याला ‘हठयोग’ म्हणतात; पण हठयोगविषयक ग्रंथांमध्ये ‘हठयोग’ या शब्दाची वेगळी व्युत्पत्ती दिली जाते. त्यानुसार ‘ह’ म्हणजे सूर्यनाडी आणि ‘ठ’ म्हणजे चंद्रनाडी. सूर्यनाडीआणि चंद्रनाडी अनुक्रमे उजव्या व डाव्या नाकपुडीतून चालणाऱ्या श्वसनाला म्हटले जाते. यांनाच पिंगला व इडा असेही म्हणतात. या दोन्हींचा संयोग जेथे होतो तिला सुषुम्ना नाडी म्हटले जाते. या सुषुम्ना नाडीला हठयोगात विशेष महत्त्व आहे. म्हणून ह (पिंगला) आणि ठ ( इडा) एकरूप होण्यातून जो योग साधला जातो तो हठयोग. कुंडलिनी नावाची एक तेजोवलयरूपी नाडी शरीरात नाभीच्या खाली व मूलाधारचक्राच्यावर असते. तिला जागृत करून मस्तकातील ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचविणे, हे हठयोगाचे ध्येय असते. ही कुंडलिनी जागृती सुषुम्ना नाडीच्या माध्यमातूनच घडते. हे सुषुम्ना नाडीचे महत्त्व.

हठयोगातील काही संकल्पना उपनिषदे, पातंजल योगसूत्र, श्रीदत्त माहात्म्य व अन्य प्राचीन साहित्यात विखुरलेल्या आढळतात. नाथ संप्रदायाचे ⇨ मच्छिंद्रनाथ (मत्स्येंद्रनाथ सु. दहावे शतक) आणि ⇨ गोरखनाथ (गोरक्षनाथ सु. नववे–दहावे शतक) हे हठयोगाचे प्रमुख आचार्य मानले जातात; पण हठयोगाची स्वतंत्र शास्त्र म्हणून मांडणी करण्याचे श्रेय गोरखनाथाला द्यावे लागेल. त्याने हठयोगविषयक अनेक पुस्तके लिहिली. त्यांतील अमरौघशासनम्, गोरक्ष-पद्धति, गोरक्ष शतकसिद्धसिद्धांत पद्धति ही विशेष प्रसिद्ध आहेत. ह्यानंतरचा वसिष्ठसंहिता हा ग्रंथ बाराव्या शतकानंतर लिहिला गेला असावा. ह्या ग्रंथात पातंजल योगाप्रमाणेच हठयोगातील अनेक विषयांचे विवेचन येते. त्यानंतरचा हठयोगावरील महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे स्वात्माराम योगींद्र यांनी लिहिलेला चौदाव्या–पंधराव्या शतकातील हठप्रदीपिका उर्फ हठयोगप्रदीपिका. हा हठयोगावरील अभिजात ग्रंथ होय. त्यानंतरचा सतराव्या शतकातील घेरण्डसंहिता हा ग्रंथही हठयोगावरील एक उपयुक्त ग्रंथ आहे.

हठयोगाची साधना म्हणजे नाडीशुद्धीची साधना होय. नाडी म्हणजे अंतःशरीरात प्राणशक्तीचे अभिसरण करणारी वाहिनी होय. शरीरात अशा ७२,००० नाड्या असून त्यांचे एक जाळेच तयार झालेले आहे, असे हठयोगात मानलेले आहे. वर उल्लेखिलेल्या इडा, पिंगला व सुषुम्ना ह्या त्यांपैकी प्रमुख नाड्या असून ⇨ प्राणायाम साधनेत त्यांच्याद्वारा इतर नाड्यांची शुद्धी केली जाते.

हठयोग्याने योगसाधनेची पहिली पायरी म्हणून शरीरशुद्धीकडे लक्ष दिले पाहिजे. शरीरात वात-पित्त-कफ, मेदवृद्धी यांसारखे विकार असल्यास योग्याने ते दूर करणे आवश्यक आहे. त्यासाठी सहा शुद्धिक्रिया सांगितल्या आहेत. धौती, बस्ती, नेती, त्राटक, नौली आणि कपालभाती या त्या शुद्धिक्रिया होत. त्यामागोमाग जी हठयोगाची साधना करायची त्याची महत्त्वाची अंगे आसन, प्राणायाम, बंध, मुद्रा व नादानुसंधान ही होत. षट्कर्मांनी शरीर व नाड्या शुद्ध झाल्या, की मग आसन सिद्ध करावयाचे असते. शरीराच्या विशिष्ट स्थितीत स्थिर राहणे म्हणजे आसन. प्राण्यांच्या जितक्या योनी आहेत, तितकी म्हणजे चौऱ्याऐंशी लक्ष आसने असून भगवान शिवाने प्रातिनिधिक स्वरूपात ८४ आसने सांगितली आहेत, असे गोरखनाथाचे मत आढळते. स्वात्मारामाने १५ आसनांचे विस्तृत वर्णन केले असून सिद्धासन, सिंहासन, पद्मासन व भद्रासन या चार आसनांना विशेष महत्त्वाचे स्थान दिले आहे. या आसनांद्वारे पाठीच्या कण्याचे बळ व चपलता वाढण्यास मदत होते.

प्राणायाम हा हठयोगाचा गाभा आहे. प्राण (श्वासोच्छ्वास) आणि मन यांचा जवळचा संबंध आहे. प्राणनियंत्रणातून मनाचे नियंत्रण शक्य आहे. मनाची पूर्णपणे स्थिर आणि शांत स्थिती म्हणजे उन्मनी किंवा मनोन्मनी. ही स्थिती प्राणायामाच्या अभ्यासाने गाठता येते, असे हठयोगात मानले आहे. कुंभक (श्वास आत घेणे) व रेचक (श्वास बाहेर सोडणे) यांचे विविध प्रकार व त्यांचे फायदे यांचे विवेचन हठयोगप्रदीपिकेत आढळते. प्राणायाम करीत असताना शरीर विशिष्ट अवस्थेत बांधल्यासारखे ठेवणे ( बंध) किंवा त्याचा विशिष्ट प्रकारचा आविर्भाव (मुद्रा) यांचे विशेष फायदे आहेत. ह्या अनुषंगाने बंध व मुद्रा यांचे विवेचन येते. प्राणायाम,बंध, मुद्रा यांच्या अभ्यासातून उन्मनी अवस्था गाठता येते, कुंडलिनी जागृत होते, अनाहत नाद ऐकू येतात अशी वर्णने आढळतात. षट्कर्मे, आसने, मुद्रा, बंध व प्राणायाम या गोष्टी साध्य झाल्यानंतर प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी इत्यादींकडे साधक वळतो. हठयोगात प्रगती करताना योग्याला घंटानादासारखा सूक्ष्म नाद ऐकू येऊ लागतो. या नादावर सातत्याने लक्ष केंद्रित करणे म्हणजे नादानुसंधान. नादानुसंधान हा हठयोगातील ध्यानसाधनेचा महत्त्वाचा प्रकार आहे.

स्वात्मारामाने हठयोग आणि राजयोग यांत फरक केला आहे.राजयोग म्हणजे समाधी ज्यात मन जीवात्म्यात विलीन होते व जीवात्मा परमात्म्यात विलीन होतो. योगसाधनेचे हेच अंतिम ध्येय आहे. हठयोग हे राजयोगाचे साधन आहे, असे स्वात्माराम मानतो.

हठयोगाची साधना मुख्यत्वे शैव संप्रदायात प्रचलित आहे. नाथ-योग्यांव्यतिरिक्त बौद्धांनीही हठयोगाची पद्धती स्वीकारली होती. त्यांनी विज्ञानवादात चित्तालाच सत्य मानले आहे आणि त्याच्या एकाग्रतेसाठी जे ध्यान-विधान सांगितले आहे, ती हठयोगातीलच प्रक्रिया आहे.

हठयोगाचे तंत्र योग्य त्या गुरूच्या मार्गदर्शनाखाली साध्य करायचे असते. चुकीच्या पद्धतीने हठयोगसाधना करणे धोकादायक असते. हठयोगातील संभाव्य चुका व त्यांवरील उपाय यांचेही विवेचन स्वात्मारामाने हठयोगप्रदीपिकेच्या शेवटच्या प्रकरणात केले आहे.

पहा : प्राणायाम; योग; योगासने; समाधि.

संदर्भ : 1. Arya, Pandit Usharbudh, Philosophy of Hathayoga, Pennsylvania, 1985.

२. स्वामी दिगंबरजी कोकजे, आर्. जी. संपा. इंग्रजी अनु. हठप्रदीपिका, लोणावळा, १९७०.

३. स्वामी दिगंबरजी कोकजे, आर्. जी. संपा. इंग्रजी अनु. घेरण्डसंहिता, लोणावळा, १९७८.

गोखले, प्रदीप