विष्णुबोवा ब्रह्मचारीविष्णुबोवा ब्रह्मचारी : (१८२५-१८७१) स्वतंत्र विचाराचे पज्ञावंत, अध्यात्मप्रवण  आणि जनताभिमुख संन्यासी. मुळ नाव विष्णू भिकाजी गोखले. आईचे नाव उमाबाई. ‘माझी जन्मभूमी मुंबई इलाख्यात जो ठाणे जिल्हा आहे, त्या ठाणे जिल्हातील राजपुरी तालुक्यापैकी निजामपुर पेट्यात शिरवली (आता नव्याने नामकरण झालेल्या रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुका) ह्या नावाचा ग्राम देवघाटाचे पायथ्या जवळ मोठ्या अरण्यात……. आहे, तीच माझी जन्मभूमी आहे,’ असं आपल्या ‘स्वलिखित चरित्रा’त त विष्णुबोवांनी म्हटले आहे. शिरवली ह्या गावी एका गरीब कुटूंबात त्यांचा जन्म झाला. वयाच्या सातव्या वर्षी मुंज झाल्यानंतर एक वर्षपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले. प्रतिकुल अर्थिक परिस्थितीमुळे वयाच्या नवव्या वर्षापासूनच मिळतील ती कामे करून त्यांना घराला हातभार लावावा लागाला. इंग्रज सरकारच्या नोकरीतही ते होते. वयाच्या तेविसाव्या वर्षी त्यांनी आध्यात्मिक साधनेसाठी घर सोडले. सप्तशृंगीच्या डोंगरावर व आजूबाजूच्या अरण्यांत त्यांनी साधना केली. ‘पाखंड मतांचे’ खंडन करावे आणि वैदिक धर्माची पुनःस्थापना करावी असा ईश्वरी आदेश त्यांना सप्तशृंगीच्या   डोंगरावर मिळाल्यामुळे त्यांनी पंढरपूरक्षेत्री ह्या कार्यास प्रारंभ केला. ख्रिस्ती मिशनरी वेदोक्त धर्माला विरोध करीत आसल्यामुळे त्यांनी त्यांच्याशी वादविवाद सुरू केला. भाषणे, प्रवचणे देण्यासाठी महाराष्ट्रातल्या सांगली, मिरज, वाई, सातारा, पुणे, अहमदनगर इ. ठिकाणी ते गेले. मुंबईला त्यांनी सर्वधर्मीयांना खुले असलेले वादविवादसत्र घडवून आणले. ते दर गुरूवारी समुद्रकिनारी होत असे ख्रिस्ती मिशनरी विरूद्ध विष्णुबोवा असा हा वाद असे. परंतु महाराष्ट्राबाहेरील मद्रास काशी, कलकत्ता अशा शहरीही ते जाऊन आले होते. संस्कृत आणि इंग्रजी भाषांचे त्यांना फार ज्ञान नव्हते परंतू त्यांचे वक्तृत्व आणि वादकौशल्य  अत्यंत प्रभावी होते. त्यांनी रचिलेल्या ग्रंथात भावार्थसिंधु (१८५६), वेदोक्त धर्मप्रकाश (१८५९), सुखदायक राज्यप्रकरणी निबंध (१८६७), चतुःश्लोकी भागवत याचा अर्थ (१८६७) सहजस्थितीचा निबंध (१८६८), वेदोक्त धर्माचा विचार व ख्रिस्तीमत खंडन (शिकवणुकीचे सार, १८७४), सेतुबंधनी टीका (१८९०)ह्यांचा समावेश होतो. रेव्हरंड जॉर्ज बोएन ह्यांनी संपादिलेल्या समुद्रकिनारीचा वादविवाद (१८७२) ह्या ग्रंथात विष्णूबोवा आणि ख्रिस्तीउपदेशक ह्यांच्यात मुंबईमध्ये झालेल्या धर्मविषयक वादविवादांचे हकीकत आहे.

 

 विष्णूबोवांनी आपल्या ग्रंथातून मांडलेले विचार प्रागतिक आहेत. ख्रिस्ती मिशनऱ्यांना त्यांनी विरोध केला, तथापि ख्रिस्ताच्या हातचा पाव खाणे त्यांना निषिध्द वाटले नाही. तसेच खानू नावाच्या एका मुसलमान खानसाम्याच्या हातचे अन्नही ते खात. विष्णुबोवा ज्या काळात जन्मले, त्या काळात ह्या गोष्टी करणे सोपे नव्हते. विष्णुबोवांच्या प्रागतिक विचारांचा प्रत्यय त्यांच्या विदोक्त धर्मप्रकाश व सुखदायक राज्यप्रकरणी निबंध ह्या ग्रंथातून विशेषत्वाने  येतो. ‘राज्यकारभार  चालवणारे कामगार’ कधीही वंशपरंपरा नेमता कामा नयेत असा स्पष्ट इशारा त्यांनी वेदोक्त धर्मप्रकाश ह्या ग्रंथात दिला होता.माणसांच्या सुखासाठी, त्यांना मजुरी आणि अन्नवस्त्र मिळविण्यासाठी कारखाने काढणे जरूरीचे आहे, हे त्यांनी सांगितले. लहान मुलीबरोबर विवाह करणाऱ्या वृद्धाला शासन केले जावे, एखाद्या विधवा स्त्रीचा एखाद्या पुरूषाशी संबंध आहे असे दिसल्यास त्या स्त्रीच्या वा पुरुषाच्या जातीचा विचार न करता त्या दोघांचा विवाह लावून द्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे. न्यायाधीशाने अन्यायी ब्राम्हण आणि अन्यायी महार या दोघांस सारख्या मानाने उभे करून अथवा बसवून न्याय करवा. परंतु महार दरवाजाबाहेर आणि ब्राम्हण आत असा पक्षपात करू नये, असा विचार त्यांनी मांडला. प्रजेतल्या कोणत्याही माणसाला स्वकर्तुत्वाने राजा होता येईल अशी परिस्थिती असली पाहिजे, असेही त्यांचे मत होते. राज्याच्या सैन्यात, तसेच लेखनकामादी  अनेक कामे करणाऱ्यांत सर्व वर्णाच्या व जातीजमातींच्या लोकांचा समावेश असावा, सर्वानाच लेखनवाचनाचे ज्ञान मिळावे, राजा नेमण्याचा अधिकार प्रजेचा असावा, सूर्याच्या रश्मिरूपी अग्नीत  पृथ्वीवरील पाण्याचा होणारा होम हाच पाऊस पडण्याचा यश-होम होय इ. त्यांची मते वेदोक्त धर्मप्रकाशात व्यक्त झालेली असून ते काळाच्या किती पुढे होते, याची कल्पना त्यांवरून येते.

विष्णुबोवांचा सुखदायक राज्यप्रकरणी निबंध हा ग्रंध म्हणजे त्यांची एक आदर्श राज्यकल्पना आहे. सर्व प्रजा म्हणजे एक कुटूंब, अशी भूमिका घेऊन हा ग्रंथातील विचार त्यांनी मांडले आहेत. सर्व प्रजा म्हणजे एक कुटूंब अशी भूमिका घेऊन ह्या ग्रंथातील विचार त्यांनी मांडले आहेत. सर्व प्रजा एक कुटुंब आहे, तर सर्व भूमि ही एक बाग आहे. ह्या बागेत जे फुलेल, फळेल ते सर्वांचे. सर्व प्रजेने जमिनीची लागवड करावी, अन्नाची कोठारे भरावी आणि सर्वांनी पोटास लागेल तितके अन्न न्यावे. कपडेही  असेच तयार करून ठेवावेत व आवश्यकतेप्रमाणे ज्याने त्याने ते न्यावेत. राजा, शेतकरी आदींनी एकाच प्रकारचे ‘अहिंसक’ अन्न खावे. लग्ने करण्यासाठी राजाने खास खाते काढावे व त्या खात्यामार्फत लग्ने व्हावीत. ज्या दांपत्याचे जमणार नाही, त्यांनी परस्परांपासून वेगळे व्हावे व अन्य जोडीदार निवडावेत. स्वयंवराला मान्यता असावी. मुले पाच वर्षाची झाली, की आईवडिलांनी त्यांना राजाच्या ताब्यात द्यावे. राजाने त्यांची विद्या शिकवण्याची व्यवस्था करावी. नंतर ज्याच्या त्याच्या पात्रतेप्रमाणे त्याला काम द्यावे. वृद्धांना बसून खाण्याची सोय असावी इ. पुरोगामी विचार त्यांनी ह्या ग्रंथात मांडले आहेत. हे पाहता त्यांत समाजवादी मनोवृत्ती प्रकट झाल्यासारखे वाटते. अशा विचारांची सैद्धांतिक आणि तर्कशुद्ध मांडणी करण्याची क्षमता त्यांनी न दाखविल्यामुळे हे विचार स्वप्नरंजनात्मक आहेत असे म्हटले जात असले, तरी त्यांच्या काळाच्या पलीकडे जाऊन साम्यवादी विचारसरणीचा पुरोगामी विचार मांडण्याचा अग्रेसरत्वाचा मान त्यांच्याकडे जातो, असेही म्हटले गेले आहे. त्यांची सेतुबंधनी  टीका ही भगवद् गीतेवरील टीका होय. ‘अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा सेतू’ असे ह्या टीकालेखनाचे स्वरूप आहे. ही टीका त्यांनी वैज्ञानिक परिभाषेत केलेली असून शरीरविज्ञान, भौतिकी, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र ह्यंच्या त्याकाळी उपलब्घ असलेल्या ज्ञानाच्या आधारे गीतेतील प्रतिपादनाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ह्यातूनही त्यांच्या प्रतिमेचे वेगळेपण प्रत्ययास येते.

कुलकर्णी,  अ. र.