नवजोत संस्कारविधीतील एक दृश्य

नवजोत: पारशी धर्मातील अत्यंत महत्त्वाचा उपनयन संस्कार. पारशी लोकांत मुलाप्रमाणे मुलीचेही उपनयन होते. या संस्कारानंतर  अवेस्ताप्रणीत सर्व धर्मविधी आचरण्याची पात्रता पारशी व्यक्तीस प्राप्त होते. सामान्यतः सातव्या वर्षी किंवा उशिरात उशिरा पंधराव्या वर्षापर्यंत हा संस्कार केला जातो. ‘नवजोत’ म्हणजे अहुर मज्दप्रभूचा नवा उपासक वा पारशी धर्माचा नवा अनुयायी.

नवजोत संस्कारात पवित्र अंगरखा व सूत्र-मेखला धारण करावयास देतात. अंगरख्यास ‘सुद्रेह’ किंवा ‘सद्रेह’ म्हणतात. सद् म्हणजे शुद्ध आणि राह म्हणजे मार्ग. सुद्रेह पांढऱ्या शुभ्र सुती कापडाचा असून गळ्याच्या मध्यभागी त्याला एक खिसा असतो. सदाचरणाने व सत्कृत्याने होणाऱ्या पुण्यसंचयासाठी त्याची प्रतीकात्मक योजना असावी. सुद्रेह हे पवित्र जीवनाचे बोधचिन्ह होय. सूत्रास ‘अइव्याओङ्हन्’ असे नाव अवेस्ता भाषेत असून पेहलवी भाषेत त्यास ‘कुस्ती’ असे म्हणतात. कुस्ती पारसिकांचे यज्ञोपवीत होय. हे सूत्र कोकराच्या लोकरीपासून बनवितात. सूत्रधारकाचे आचरण कोकरासारखे निरागस असावे, ही कल्पना यात अनुस्यूत आहे. अवेस्तात यस्न (यज्ञ) नावाचे एक प्रकरण असून त्यात ७२ अध्याय आहेत. मानवी जीवन यज्ञमय असावे म्हणून कुस्तीचेही या ७२ अध्यायांचे प्रतीक म्हणून ७२ धागे असतात. कुस्ती मुख्यत्वे पारशी-पुरोहितांच्या बायका तयार करतात. नवजोत संस्कार झाल्यानंतर कुस्ती नेहमी कमरेभोवती गुंडाळावयाची असते. परमात्म्याच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहण्याचे हे प्रतीक आहे.

नवजोत संस्काराच्या दिवशी शुद्ध होण्यासाठी मुलास वा मुलीस विधिपूर्वक स्नान घातले जाते. निमंत्रित, आप्तेष्ट व पुरोहितांच्या साक्षीने हा समारंभ होतो. समारंभस्थानी पवित्र अग्नी तसेच विविध तबकांत फुले, तांदूळ, कुंकू, विड्याची पाने, तुपाचे नीरांजन, खडीसाखर, पुष्पमाला इ. पूजासाहित्य असते. नंतर एकच फळी असलेल्या चौरंगावर संस्कार्य व्यक्तीस बसवले जाते. नंतर ‘पतेत्’ नामक पश्चाताप निदर्शक प्रार्थना म्हटली जाऊन नवजोत संस्कारास प्रारंभ होतो. संस्कार्य व्यक्तीस पुरोहिताने सुद्रेह घालावयास देताना अग्निसाक्षपूर्वक जरथुश्त्री धर्माशी निष्ठेने अव्यभिचारी राहण्याचे मंत्र म्हटले जातात. संस्कार्यास मंत्रोच्चारपूर्वक सुद्रेह घातला जातो व कुस्तीही समंत्रक तीन वेळा त्याच्या कमरेभोवती गुंडाळली जाते. नवजोत संस्कार झाल्यापासून अनुयायाने आमरण (स्नानाच्या वेळचा अपवाद सोडता) सुद्रेह व कुस्ती धारण करावयाची असते. तसेच गाथेतील ‘अहुन वइर्य’ मंत्राचे नित्यनेमाने पठन करावयाचे असते. शेवटी पुरोहिताने ‘तंदुरुस्ती’ म्हणजे आशीर्वादपर मंत्र म्हटल्यावर हा संस्कारविधी संपतो.

जरथुश्त्राने उपदेशलेल्या ‘हुमत’ (सद्विचार), ‘हूख्त’ (सदुक्ती) आणि ‘व्हर्श्त’ (सत्कृती) या त्रयीच्या आचारात्मक पायावर सत्य, अहिंसा, सद्‌भावना, प्रेम, सौमनस्य इ. गुणसंपदांचे आचरण करीत सद्धर्माची प्रतिष्ठापना करीन, अशी शपथच नवजोत संस्कारात घेतली जात असल्याने, हा संस्कार जीवनास उच्च वळण लावणारा आहे. वैदिक उपनयन संस्काराशी हा संस्कार बराच मिळताजुळता आहे.

तारोपार, जे. सी. (इं.) सोनटक्के, ना. श्री. (म.)