वटवृक्ष-पूजाविधी, वटपौर्णिमा.वृक्षपूजा : वृक्ष हे सचेतन असून त्यांत देवता किंवा विविध प्रकारच्या चांगल्या-वाईट शक्ती असतात, अशी समजूत असते. त्यामुळे अशुभ-निवारणासाठी किंवा शुभफलासाठी वृक्षपूजा अनेक देशांत प्रचलित आहे. आफ्रिका खंडातील सूदानमध्ये झाडांना उद्देशून कोंबड्यांचे बळी दिले जातात. तेथील वृक्षपूजेमागे पीक भरपूर येणे, आरोग्यप्राप्ती, संततीची प्राप्ती, शिकार मिळणे ह्यांसारखे उद्देश असतात. वृक्ष हे मानवाला अन्न, सावली, फळे, फुले इ. अनेक कारणांसाठी उपयुक्त असल्यामुळे त्यांच्याबद्दलची कृतज्ञता ही वृक्षपूजेमागील मानसिकतेचा एक भाग असली पाहिजे. [→ जडप्राणवाद वृक्ष].

प्राचीन भारतात वृक्षपूजा मोठ्या प्रमाणात होती, असे संस्कृत धार्मिक ग्रंथांवरुन लक्षात येते. वड, पिंपळ इ. वृक्ष हे गंधर्व, अप्सरा, यक्ष, किन्नर इत्यादींची निवासस्थाने म्हणून मानली गेली आहेत. काही वृक्षांशी काही देवांचे संबंध असतात, अशी श्रद्धा आहे. उदा., औदुंबर व दत्त. त्याचप्रमाणे काही महापुरुषांचा संबंध असल्यामुळे काही वृक्ष पवित्र ठरले. ज्या वृक्षाखाली भगवान बुद्धाला बोधी प्राप्त झाली, तो अश्वत्थ वृक्ष बोधिवृक्ष म्हणून पूजनीय ठरला आहे. स्नातकाने रस्त्याने जाताना अश्वत्थासारखे वृक्ष दिल्यास त्यांना प्रदक्षिणा घालावी, असा संकेत होता. मत्स्यपुराणात वृक्षोत्सवाचा उल्लेख आहे. त्यामध्ये वृक्षांना फुले, फळे, वस्त्रे अर्पण करणे, होम करणे, ब्राह्मणभोजन घालणे ह्यांसारख्या विधींचा समावेश आहे. ⇨वटसावित्री हे व्रतही प्रसिद्ध आहे. ह्याचप्रमाणे पिंपळाला प्रदक्षिणा घालणे, त्याला पाळणे बांधणे ह्यांसारखे विधी प्रचलित आहेत. वृक्षारोपण हे एक धार्मिक पुण्यकारक कर्म मानले जाई. तुळशीचे लग्न करणे, हा वृक्षपूजेचाच एक प्रकार होय [→ तुलसीपूजन]. बंगालमध्ये पिंपळाच्या झाडात देवांची वस्ती असते, अशी समजूत आहे. त्याच्या बुंध्यात ब्रह्मा, फांद्यात शिव व पानांत इतर देव राहतात, असे मानले जाते. दक्षिण भारतातील काही शिवमंदिरांतील वृक्ष हे स्थलवृक्ष म्हणून ओळखले जातात. उदा., मीनाक्षी मंदिरातील मीनाक्षी-सुंदरेश्वराचा कदंब वृक्ष, तसेच त्रिचनापल्लीजवळच्या जंबुकेश्वराचा जंबुवृक्ष. भारतीय लोकसाहित्यातही वृक्षांबद्दलचा पूज्यभाव व्यक्त करणाऱ्या अनेक कथा आढळतात.

  वैदिक यज्ञात पशू ज्या खांबाला बांधला जातो, त्याला ‘यूप’ म्हणतात. यूपासाठी झाडाची फांदी तोडण्यापूर्वी ‘वृक्षाची हिंसा होऊ नये, त्याचे संरक्षण व्हावे’ अशी प्रार्थना करीत. फांदी तोडल्यानंतर तोडलेल्या जागी तुपाची आहुती देऊन ‘ही वनस्पती पुन्हा शंभरपट वाढावी’ अशीही प्रार्थना करीत.

छांदोग्य-उपनिषदामध्ये (६.११) वृक्षात जीवचैतन्य असेपर्यंत तो टवटवीत राहतो, असा निर्देश आहे. वृक्षातील जीवचैतन्याचा मानवास झालेला साक्षात्कार वृक्षपूजेचे कारण असू शकेल.

वृक्षपूजा ही केवळ भारतातच नव्हे, तर जगभर आहे. सर्व वृक्ष पवित्र होत, असे ⇨जरथुश्त्राने  म्हटले आहे. ग्रीसमधील ऑलिंपिक क्रिडास्पर्धांत विजयी झालेला वीर हा वृक्षदेवाचा मानवी प्रतिनिधी मानला जात असे. त्याच्या मुकुटाची सजावट पवित्र वृक्षाच्या कोवळ्या पानांनी आणि डहाळ्यांनी केली जात असे. नाताळच्या सणात ख्रिसमसचे झाड उभे करतात, हाही वृक्षांबद्दलचा आदरभाव दाखविण्याचाच प्रकार आहे. इजीअन कलाकृतींत झाडे पवित्र वेदीजवळ किंवा त्या वेदीतूनच विस्तार पावलेली दाखवितात. पश्चिमी संस्कृतीत ओक वृक्षाचे महत्त्व मोठे आहे. ग्रीक देवताविश्वातल्या देवांचा राजा ⇨झ्यूस ह्याची पर्जन्यदेव म्हणून पूजा करताना जो विधी केला जाई, त्यात ओक वृक्षाला महत्त्वाचे स्थान होते. इट्रुस्कन राजे हे ज्यूपिटरचे प्रतिनिधी समजले जात. त्यांच्या मुकुटांवर ओक वृक्षाच्या पानांच्या सुवर्णाकृतींची सजावट असे. ईजिप्तमध्ये सिकॅमूर नावाच्या वृक्षाची पूजा प्रचलित होती.                                                       

थिटे, ग. उ.

महाराष्ट्रातील वृक्षपूजा : भारतातील सर्वच प्रांतात या ना त्या निमित्ताने वृक्षपूजा होते. महाराष्ट्रातही वृक्ष सर्वकाल वंदनीय आहेत. चैत्रात महती कडुनिंबाची. लोककथांतून याचा अमृतवृक्ष असा उल्लेख आहे. वैशाखात बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने अश्वत्थाची म्हणजे पिंपळाची पूजा. ज्येष्ठातला पूजनीय वृक्ष म्हणजे वड. वटवृक्षाला संसारवृक्षाचे प्रतीक मानतात. केळ हीही एक वृक्षदेवता. महाराष्ट्रात तिला पतिव्रता व आदरणीय मानली आहे. शुभकार्यात केळीला महत्वाचे स्थान आहे. श्रावणात तर सर्वच वृक्षांची ओळख – पर्यायाने मानसपूजा – पत्रीरुपाने करुन घेतली जाते. श्रावणातला पूजनीय वृक्ष पारिजात.⇨समुद्रमंथनातील  चौदा रत्नांपैकी एक. भाद्रपदात येतो गणपतीचा सण. गणपतीला प्रिय शमी वृक्षाची पूजा मात्र आश्विनात दसऱ्याला केली जाते. गणपतीला प्रिय असा आणखी एक पूजनीय वृक्ष म्हणजे मंदार. आश्विन शुद्ध नवमीला आपट्याच्या झाडाची विधिवत्‌ पूजा करुन विजयादशमीला म्हणजे दसऱ्याला त्याची पाने सोने म्हणून वाटण्याचा महाराष्ट्रात प्रघात आहे. कार्तिक मासात दीपावलीचा सण. लक्ष्मीचे पूजन. श्री म्हणजे लक्ष्मी. तिचे फळ म्हणजे श्रीफळ, नारळ. शुभसूचक नारळ सृजनशक्तीचे प्रतीक होय. कार्तिकातच आवळीभोजनाच्या निमित्ताने आवळीची पूजा केली जाते. आवळ्याचे झाड देवप्रिय मानले जाते. कार्तिक पौर्णिमेला या वृक्षाची शास्त्रोक्त पूजा करावी असे सांगितले आहे. औदुंबर हाही एक देवत्व प्राप्त झालेला वृक्ष. त्याच्या तळाशी दत्तात्रेयाचा निवास असतो अशी कल्पना. हाही एक ‘यज्ञीय’ वृक्ष आहे. पौषात पळस फुलल्यावर पळसाची पूजा ही महाराष्ट्रातील काही आदिम जमाती करतात. पळसाच्या समिधांनी यज्ञीय अग्नी प्रज्वलित करतात. त्याचप्रमाणे हिंदूंच्या अंत्यविधींमध्ये चिता पेटविण्यासाठी पळसाच्या फांद्या लागतात. बेल हाही एक यज्ञीय व पूजनीय वृक्ष. शिवपूजेत बेलपत्रे हवीतच. ज्येष्ठा नक्षत्र व मंगळवार असा योग असला, की बेलवृक्षाची पंचोपचार पूजा करावी असे मानतात. महाराष्ट्रात फाल्गुनातल्या हुताशनीच्या (होळीच्या) पूजेला आंबुली हवीच. आंबुली म्हणजे आंब्याची सरळसोट उंचशी शिडशिडीत फांदी. कोकणातील होळीचा सण हिचा पूजेशिवाय संपन्न होत नाही. कोणताही धार्मिक पूजाविधी व मंगलकार्य आम्रपर्णाविना होत नाही. महाराष्ट्रात काही ठिकाणी ‘आंबा शिंपणे’ हा प्रघात आहे. हा विधी लग्नविधीनंतर केला जातो. त्याचा उद्देश म्हणजे संततिदायी आंब्याचे स्मरण आणि कृतज्ञता व्यक्त करणे.   

            

डहाणूकर, शरदिनी

संदर्भ : 1. Frazer, James George, Aftermath : A Supplement to the Golden Bough, London, 1934.

            2. Kane, P. V. History of Dharmashastra, Vol. 5, Poona, 1958.