गार्गी : उपनिषत्‌कालीन प्रसिद्ध ब्रह्मवादिनी विदुषी. गर्गगोत्रातील म्हणून गार्गी आणि ‘वचक्नु’ ऋषीची कन्या म्हणून गार्गी-वाचक्नवी अशा संयुक्त नावाने  बृहदारण्यकोपनिषदात तिचा उल्लेख आहे. मध्वभाष्यात तिचा याज्ञवल्क्याची भार्या म्हणून उल्लेख आहे. आश्वलायनाच्या ब्रह्मयज्ञांग-तर्पणात ‘गार्गी-वाचक्नवी तृप्यतु’ असा उल्लेख येतो. बृहदारण्यकोपनिषदात (३.६, ८) गार्गी-याज्ञवल्क्य संवाद आले आहेत. जनकाच्या यज्ञात जमलेल्या ब्रह्मवाद्यांच्या सभेत तिने याज्ञवल्क्यास अनेक तात्त्विक प्रश्न विचारले. ब्रह्मलोक कशात ओतप्रोत आहेत? या तिच्या प्रश्नाचे उत्तर देताना, ‘तू पलीकडील प्रश्न विचारू नकोस, तुझे शीर खाली पडू नये पलीकडील प्रश्नाचा विषय नसलेल्या देवतेबद्दल तू विचारतेस’, अशी भीती याज्ञवल्क्याने दाखविली. ती थांबली नंतर तिने पहिल्याच प्रश्नाची दोन प्रश्नांत निराळी मांडणी करून ते प्रश्न, पराक्रमी पुरुषाने सोडलेले दोन तीक्ष्ण बाणच, असे म्हणून विचारले. तिला याज्ञवल्क्याने समाधानकारक उत्तरे दिली. तेव्हा ती सभेत उपस्थित विद्वानांना म्हणाली, की याज्ञवल्क्य तत्त्वज्ञानाच्या विषयात अजिंक्य आहे, याला प्रणाम करूनच तुम्ही मोकळे व्हा यातच तुमचा मोठेपणा आहे, असे समजा.          

जोशी, रंगनाथशास्त्री