बायबल : ज्यू व ख्रिस्ती धर्माचा पवित्र धर्मग्रंथ.‘बायबल’ हा शब्द ‘बिब्लिया’या ग्रीक शब्दापासून आला असून त्याचा अर्थ ‘पुस्तके’ असा आहे. त्यानंतर हा शब्द लॅटिन भाषेत आणि पुढे इतर भाषांत आला. बायबलमध्ये ‘जुना करार’ (ओल्ड टेस्टामेंट) आणि ‘नवा करार’ (न्यू टेस्टामेंट) असे दोन भाग आहेत. जुना करार हा ज्यू लोकांचा पवित्र ग्रंथ आहे आणि जुना व नवा हे दोन्ही करार ख्रिस्ती लोकांनी त्यांचा पवित्र ग्रंथ म्हणून स्वीकारले आहेत. बायबल हे देव आणि त्याचे लोक यांच्यामध्ये झालेल्या कराराचे वृत्त आहे, असे समजले जाते. हा करार ईजिप्तमधील सिनाई पर्वतावर इ.स.पू. १२ व्या शकतात पूर्ण झाला. म्हणूनच ते पवित्र बायबल (होली बायबल) या नावाने संबोधिले जाते. नव्या कराराचा आरंभ येशू ख्रिस्ताने केला. 

लंडन येथे १६११ मध्ये छापलेल्या बायबलच्या किंग जेम्स आवृत्तीचे शीर्षक-पृष्ठ

बायबल हे एक पुस्तक नसून अनेक लेखकांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांचा तो संग्रह आहे. जुन्या करारात ३९ (किंवा ४६) पुस्तके आहेत आणि नव्या करारात २७ पुस्तके आहेत. इ.स. पू. १००० पर्यंत ज्यूंच्या धार्मिक परंपरा मौखिक परंपरेने चालत आल्या, त्यांना लिखित स्वरुप नव्हते तथापि सिरियातील एब्ला येथे झालेल्या अलीकडील उत्खननांतून असे दिसून येते, की जुना करार ज्या प्रदेशात तयार झाला त्याच्या आसपास इ.स.पू.सु. २५०० वर्षांपासून लिखित सांस्कृतिक स्वरुपाचे पुरावे आढळले आहेत.


जुन्या कराराचे लेखन इ.स.पू.सु. १००० वर्षांच्या कालावधीत म्हणजे इ.स. च्या आरंभापर्यंत पूर्ण झाले. नव्या कराराचा प्रथम लिहिलेला भाग संत पौलाचे (पॉल) थेस्सालनीकाकरांस पहिले पत्र हा असून तो ⇨येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर सु. २० वर्षांनी म्हणजे इ.स. ५१ किंवा ५२ मध्ये लिहिला गेला. पहिले शुभवर्तमान (गॉस्पेल) म्हणजे संत मार्कलिखित शुभवर्तमान असून ते इ.स. ६६ ते ७० च्या दरम्यान लिहिले गेले. नव्या कराराचे शेवटचे, प्रकटीकरणाचे, पुस्तक डोमिशन ह्या रोमन सम्राटाच्या कारकीर्दीत (इ.स. ८१ ते ९६) लिहिले गेले.

बायबलमध्ये ईश्वराचे प्रकटीकरण असल्याने ते पवित्र मानले जाते. प्रकटीकरणाविषयीची पुस्तके बायबलमध्ये समाविष्ट केलेले असून ती पुस्तके बायबलचा मूलस्त्रोत म्हणूनही मानली जातात. लेखकाचे व्यक्तिमत्त्व, पुस्तकातील आशयाची संपन्नता आणि त्याची धार्मिक संदेश स्पष्ट करण्याची पात्रता या गोष्टी महत्त्वाच्या असल्या, तरी शेवटी मूलस्त्रोतात कोणती पुस्तके समाविष्ट व्हावीत हे खिस्ती धर्माधिकाऱ्यांनीच ठरविले आहे. हिब्रू, काही प्रमाणात ॲरेमाइक व ग्रीक या बायबलच्या भाषा होत्या. या भाषा पवित्र मानल्या जात आणि त्याबरोबरच लॅटिन, सिरिॲक, कॉप्टिक, स्लाव्हिक इ. ख्रिस्ती उपासनेत वापरल्या गेलेल्या भाषाही पवित्र मानल्या जात. तरीही या भाषांव्यतिरिक्त ज्या इतर भाषांत  बायबल वाचले जाते व प्रार्थना केली जाते, त्या भाषांपेक्षा ह्या भाषा जास्त पवित्र आहेत, असे मात्र नाही. आरंभकाळापासूनच बायबलचे अनुवाद लोकांच्या बोलीभाषांतून करण्यात आलेले आहेत. खिस्ती लोकांच्या भाषा आणिवाक्‌प्रचारांवरही बायबलचा सखोल परिणाम झालेला आहे. बायबलाचा संदेश हा एक विशिष्ट काळात, काही विशिष्ट लोकांना, विशिष्ट संस्कृतीच्या संदर्भात दिलेला दैवी संदेश असून तो पुढेही खिस्ती धर्मीयांत ग्राह्य मानला जाईल. यामुळेच बायबलचे मूळ लेखन जतन करून ठेवण्यात आले. जेथे कळत नकळत फेरफार करण्यात आले, तेथेही हे फेरफार शोधून मूळ संहिता जतन करण्याचे अभ्यासपूर्ण प्रयत्न झाले. याशिवाय आजच्या बायबलवाचकांनी संस्कृती मूळ संस्कृतींपासून भिन्न स्वरुपाची असल्यामुळे प्रथम बायबलाच्या मूळ लेखनाचा मूळ अर्थ समजावून घेऊन तो आधुनिक संस्कृतीच्या संदर्भात यथार्थपणे अभिव्यक्त करणे महत्त्वाचे आहे. यातूनच बायबलसंशोधनाचा उगम झाला. बायबल समजून घेण्यासाठी त्याचे स्वरुप दीर्घकालीन ऐतिहासिक घटनांतून कसे घडत गेले, विविध रुढीपरंपरांनी ते वृद्धिंगत होण्यास कसा हातभार लावला, हे पाहणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे बायबलच्या विविध विभागांच्या लेखकांसंबंधी आणि त्या विभागांच्या जुन्या व नव्या करारांतील आशयासंबंधीमाहिती असणे आवश्यक आहे. विद्यमान समाजात बायबलचे स्थान लक्षात घेणेही इष्ट ठरेल. त्या दृष्टीने बायबलविषयीची माहिती पुढे दिली आहे :

ईश्वरी प्रकटीकरण :बायबलमध्ये देवाचे प्रकटीकरण आहे, असे मानले जाते. ते लिहिण्यामागची प्रेरक शक्ती म्हणून देवच पवित्र बायबलचा लेखक आहे, असे समजले जाते. याचा अर्थ असा की, देवाच्या स्फूर्तीने आणि प्रेरणेने लेखकांनी ते लिहलिले आहे आणि अशा प्रेरणेमुळे देवाचाच संदेश त्यातून बिनचूकपणे व्यक्त झालेला आहे. असे करताना त्या लेखकांना परमेश्वरी प्रेरणेच्या प्रत्यक्ष जाणिवेची आवश्यकता होती असे नव्हे शिवाय त्या लेखकांची मनुष्योचित स्वभाववैशिष्ये तसेच भाषा व शैली यांच्या चौकटीतच त्यांचे लिखाण झाले. अशा रीतीने बायबल हा जसा देवाचा शब्द आहे तसाच मानवी लेखकाचाही शब्द आहे. दैवी प्रकटीकरणामुळे त्यातील मूळ धार्मिक संदेश निर्दोष मानला जातो. वैज्ञानिक व ऐतिहासिक संदर्भात मात्र त्यात सदोषता अशक्य आहे, असे नव्हे.

निरनिराळ्या शतकांत अनेकविध नागरी संस्कृतींच्या अनेक पिढ्यांतील लोकांनी बायबलवर भाष्य केले आहे. त्यातूनच दैवी प्रेरणेची विविध स्पष्टीकरणे पुढे आली. उदा., सतराव्या शतकातील प्रॉटेस्टंट पंडितांची शिकवण अशी होती, की बायबलमधील शब्द, मग तो धार्मिक, वैज्ञानिक किंवा ऐतिहासिक संदर्भातील असो, बिनचूकपणे लिहिला गेला आहे तथापि बुद्धिवादी प्रभावाच्या कालखंडात ही मतप्रणाली कमी होऊ लागली.

साक्षात्काराने, स्वयंसिद्धपणे आणि आत्मशुद्धीने व जाणिवेच्या प्रखरतेने सिद्ध होणाऱ्या साक्षात्कारालाही ख्रिस्ती समजुतीप्रमाणे प्रकटीकरण मानले जात नाही. बायबलमध्ये समाविष्ट असलेली पुस्तके लिहिताना झालेल्या दैवी प्रेरणेतच ख्रिस्ती प्रकटीकरणाच्या बिनचूकपणाचे रहस्य आहे, हे पुढील वचनावरून येते : ‘संदेश (बायबलचा) मनुष्यांच्या इच्छेने कधी प्राप्त झालेला नाही तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेशच सांगितला आहे’ (पेत्राचे दुसरे पत्र, १.२१).

बायबलमध्ये ज्यू लोकांच्या श्रद्धेचे परिपूर्ण स्वरुप जुन्या करारात व ख्रिस्ती लोकांच्या श्रद्धेचे परिपूर्ण स्वरुप जुन्या व नव्या करारांत आविष्कृत झालेले आहे, असे मानले जाते. परंतु ही श्रद्धा बायबलच्या संदेशाप्रमाणेच आहे की नाही, हे पुन्हाःपुन्हा पाहिले पाहिजे. रोमन कॅथलिक आणि ईस्टर्न ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती धर्माधिकाऱ्यांनी बायबलचे मूलस्त्रोत जसे निश्चित केले तसेच त्यांनीच बायबलच्या यथार्थ स्पष्टीकरणाची अचूक जपणूकही करावयाची आहे, असे मानले जाते. प्रॉटेस्टंट पंथीय लोक बायबलमधील शब्दच केवळ प्रमाण मानतात व ख्रिस्ती धर्माधिकाऱ्यांचा बायबलविषयक अचूक स्पष्टीकरण करण्याचा अधिकार  अमान्य करतात.

मूलस्त्रोत (कॅनन) : देवाच्या विशेष प्रेरणेने लिहिलेली आणि मूळ धर्मतत्त्वे सांगणारी पुस्तके बायबलच्या मूलस्त्रोतात समाविष्ट केलेली आहेत. मूलस्त्रोतातील ही पुस्तकांची यादी टप्पाटप्याने वाढत गेली. ज्यू सुधारक एझ्राच्या काळात इ.स.पू ३९८ मध्ये उत्पत्ती (जेनिसिस), निर्गम (एक्सोडस), लेवीय (लेव्हिटिकस), गणना (नंबर्स) आणि अनुवाद वा दुसरा कायदा ड्यूटेरोनॉमी) ही पहिली पाच पुस्तके बायबलमध्ये समाविष्ट झाली होती. या पाच पुस्तकांना ‘तोरा’ व ‘पेंटाट्यूक’ वा ‘द लॉ’ असे म्हणतात. इ.स.पू. दुसऱ्या शतकात १८ संदेष्ट्यांचे वा प्रेषितांचे (द प्राँफेट्स) लिखाण त्यास जोडण्यात आले. मूलस्त्रोतात अंतर्भूत केलेल्या तिसऱ्या गटास ‘द राय्‌टिंग्ज  (इतर लेकन) असे म्हटले आहे. इ.स.१०० मध्ये जेरूसलेम शहराजवळच्या समुद्रकिनाऱ्यावरील जॅब्ने या शहरी काही ज्यू पंडित स्थायिक झाले. तेथे त्यांनी ज्यू मूलस्त्रोतात तोरा वा पेंटाट्यूक प्रेषितांची वा संदेष्ट्यांची पुस्तके आणि इतर लिखाणातील यहोशवा (जोशुआ), शास्ते (जजेस), रुथ, शमुवेल वा सॅम्युएल- पहिले पुस्तक, शमुवेल-दुसरे पुस्तक, राजे (किंग्ज)-पहिले पुस्तक, राजे-दुसरे पुस्तक, इतिहास (क्रॉनिकल्स) पहिले पुस्तक, इतिहास-दुसरे पुस्तक, एझ्रा, नहेम्या (नेमिआह), एस्तेर, स्तोत्रसंहिता (साम्य), नीतिसूत्रे (प्रॉव्हर्ब्‌ज), उपदेशक (इक्लिझिॲस्टिस) व गीतरत्न (साँग ऑफ साँग्ज) या पुस्तकांचा समावेश केला.


जॅब्ने येथील ज्यू पडितांना आणखी काही पुस्तके मौल्यवान वाटत होती परंतु त्यांचे ज्यू मूलस्त्रोतातील स्थान सिद्ध झालेले नाही. त्यांपैकी तोबी (तोबीत), युदीथ (जूडिथ), एस्तेर व दानिएल (डॅनिएल) या दोन पुस्तकास जोडलेले पुरवणी भाग, ज्ञानसूत्रे (विजडम), प्रवक्ता (इक्लिझिॲस्टिकस), बारुख, माखाबी (माखाबीज)-पहिले पुस्तक व माखाबी–दुसरे पुस्तक ही पुस्तके होत. यांपैकी युदीथ, प्रवक्ता व माखाबी-पहिले पुस्तक ही पुस्तके मूळ हिब्रू भाषेत, तोबी हे पुस्तक मूळ ॲरेमाइक भाषेत आणि इतर पुस्तके मूळ ग्रीक भाषेत आहेत. ख्रिस्तपूर्व सहाव्या ते चौथ्या शतकांतील इराणी साम्राज्याची अधिकृत भाषा ॲरेमाइक होती. सिएना येथील सिक्स्टस (मृ.इ.स.१५६९) या लेखकापासून, वरील दुसऱ्या गटातील पुस्तकांना दुसऱ्या मूलस्त्रोतातील (ड्यूटेरोकॅननिकल) पुस्तके असे म्हणतात.

ख्रिस्तपूर्व काळातील शेवटच्या काही शतकांत ईजिप्तमधील ॲलेक्झांड्रिया शहर ज्यू संस्कृतीचे मोठे केंद्र बनले होते. त्याच काळात हे शहर ग्रीक संस्कृतीचेही केंद्र असल्यामुळे त्यावेळी बायबलची काही पुस्तके ग्रीक भाषेत तयार झालेली आहेत. ग्रीक भाषेत उपरनिर्दिष्ट सर्व पुस्तकांसह ‘सेप्टुआजिंट’ नावाची एक आवृत्ती तयार करण्यात आली. ख्रिस्ती धर्माच्या प्रारंभकाळात ही ग्रीक आवृत्ती ख्रिस्ती लोक वापरीत. ज्यू लोकांमध्येही तिचा वापर मोठ्या प्रमाणात होता.⇨ रोमन कॅथलिक पंथीय आणि ऑर्थोडॉक्स ख्रिस्तीही सेप्टुआर्जिंट प्रतीप्रमाणे बायबलचे मूलस्त्रोत आजही मानतात. [⟶ ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च]. परंतु ⇨प्रॉटेस्टंट सुधारकांनी मात्र ज्यू मूलस्त्रोत स्वीकारलेला आहे. दुसऱ्या मूलस्त्रोतातील सात पुस्तकांचा या मूलस्त्रोतात समावेश नाही. याच पुस्तकांना प्रॉटेस्टंट लोक ‘ॲपॉक्रिफा’ म्हणजे ‘लपवलेली’ पुस्तके असे म्हणतात. याशिवाय एज्द्रस-पहिले पुस्तक, एज्द्रस-दुसरे पुस्तक आणि मनास्ससची प्रार्थना या पुस्तकांना सर्व ख्रिस्ती लोक ॲपॉक्रिफा समजतात. ॲपॉक्रिफा म्हणून संबोधली जाणारी सर्व पुस्तके अनेक प्रॉटेस्टंट बायबलमध्ये जुना व नवा करार यांच्या दरम्यान अंतर्भूत केलेली आढळतात.

नव्या कराराच्या मूलस्त्रोतात ४ शुभवर्तमाने, लूकलिखित धर्मदूतांची (अपॉसल्स-ख्रिस्ती लोक सर्व भारतीय भाषांतून ‘अपॉसल’ साठी ‘प्रेषित’ ही संज्ञा वापरतात.) कृत्ये, धर्मदूतांनी लिहिलेली २१ पत्रे आणि योहानकृत प्रकटीकरण अशी एकूण २७ पुस्तके असून ती सर्व मूळ ग्रीक भाषेत आहेत. नव्या कराराचे मूलस्त्रोतही काळाच्या ओघात पूर्ण झाले. इ.स.सु. १५० मध्ये लिहिल्या गेलेल्या ‘मूराटोरियन’ मूलस्त्रोतात हिब्रू लोकांस पत्र, याकोबाचे पत्र, पेत्राचे पहिले आणि दुसरे पत्र आणि योहानचे एक पत्र अशा पाच पत्रांशिवाय सर्व पुस्तकांचा समावेश आहे. ॲलेक्झांड्रियाच्या ॲथानेशिअसजवळ इ.स. ३६७ मध्ये पहिला व पूर्ण असा मूलस्त्रोत आढळला.ख्रिस्ती लोकांनी बायबल म्हणून कोणते लेखन स्वीकारावे यासंबंधीचा अंतिम निर्णय ख्रिस्ती महामंडळाच्या धर्माधिकाऱ्यांनी घेतला, असे नव्या कराराच्या मूलस्त्रोतरचनेवरून दिसते.

भाषांतरे : बायबल हे जगातील सर्वाधिक प्रमाणात भाषांतरित झालेले पुस्तक आहे. विशेषतः हिब्रू (अंशतः ॲरेमाइकही) आणि ग्रीक या बायबलच्या मूळ भाषा होत. इ.स.पू. २५० मध्ये ॲलेक्झांड्रिया येथे सेप्टुआजिंट नावाच्या बायबलाच्या जुन्या पुस्तकांचे ग्रीक भाषेत भाषांतर झाले होते. मूळ ग्रीक भाषेत असलेली पुस्तकेही यात समाविष्ट झाली आहेत. इ. स. १८० मध्ये जुन्या सिरियन भाषेत येशू ख्रिस्ताच्या जीवनकालक्रमानुसार शुभवर्तमानांचे ‘डायाटेस्सरोन’ नावाने भाषांतर तयार करण्यात आले. याचीच पुढे अरबी, फार्सी इ. भाषांत भाषांतरे झाली. पाचव्या शतकाच्या आरंभाकाळात ‘पेशित्ता’ नावाचे बायबलचे सिरियन भाषांतर दृढ झाले. याचा अनुवाद अल्पवधीतच ईजिप्तमधील कॉप्टिक भाषेत आणि इथिओपियातील इथिओपियन भाषेत करण्यात आला.

इ. स. चौथ्या शतकात ख्रिस्ती धर्म हा रोमन साम्राजाचा अधिकृत धर्म झाला. तेथील लॅटिन भाषिक ख्रिस्ती लोकांनी बायबलचा त्यांच्या भाषेत अनुवाद केला. शतकानुशतके मान्यता पावलेला बायबलचा लॅटिन अनुवाद म्हणजे ‘व्हल्गट’ (सर्वसामान्य) आवृत्ती होय. तो संत जेरोमने इ. स. ४०५ मध्ये पूर्ण केला. अनेक शतकांपर्यंत हा लॅटिन अनुवाद इतर भाषांतील अनुवादांचा मूलाधार होता. अनेक यूरोपीय भाषांतून त्याचे अनुवाद करण्यात आले. बाराव्या शतकात फ्रेंच भाषेत, तेराव्या शतकात इटालियन व स्पॅनिश भाषेत, चौदाव्या शतकात जर्मन आणि इंग्रजीत त्याचे अनुवाद करण्यात आले. १५३४ मध्ये ⇨ मार्टिन ल्यूथरने बायबलचा जर्मन भाषेत एक सुंदर अनुवाद तयार केला.

एम्. कव्हरडेल (१४८८-१५६८) यांनी १५३५ मध्ये केलेल्या पहिल्याच संपूर्ण इंग्रजी भाषांतराचा येथे आवर्जून उल्लेख केला पाहिजे. १६०९ मध्ये फ्रान्समधील डूए येथे बायबलची रोमन ‘डूए आवृत्ती’ पूर्ण झाली. नंतर दीर्घकाळपर्यंत हेच बायबल रोमन कॅथलिकांनी प्रमाण मानले. १६११ मध्ये प्रॉटेस्टंटांनी प्रमाण मानलेली ‘किंग जेम्स’ ची अतिशय सुंदर आवृत्ती तयार झाली. १९५२ मध्ये पुन्हा त्याचेही सुधारित प्रमाणात संस्करण करण्यात आले. अगदी अलीकडील काळात तर अनेक इंग्रजी आवृत्त्या तयार झाल्या. उदा., द बायबल : अमेरिकन ट्रान्सलेशन (१९६१), द न्यू इंग्लिश बायबल (१९६१), द जेरूसलेम बायबल (१९६८), द न्यू अमेरिकन बायबल (१९७०) इत्यादी. भारतीय भाषा व बोलींमधूनही बायबलचे अनेक अनुवाद झाले. १९७५ मध्ये भारतात भाषांतरित असलेले संपूर्ण बायबल ३२ भाषा व बोलींमधून तसेच इतर ४० भाषा व बोलींमधून नवा करार आणि ५४ इतर भाषा व बोलींमधून बायबलचे काही भाग उपलब्ध करून देण्यात आले. विशेषतः प्रॉटेस्टंट धर्मसेवकांनी त्यांच्या येथील आगमनापासून बायबलचा अनुवाद करण्याचे काम हाती घेतले. खाली मराठीव्यतिरिक्त इतर काही भारतीय भाषांस भाषांतरित झालेल्या बायबलच्या काही भागांची, नव्या कराराची तसेच संपूर्ण बायबलची यादी प्रकाशन वर्षांसह दिली आहे.

मराठी भाषेत बायबल तयार करण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. त्यांतील आद्यप्रयत्न १८०५ मधील आहे. मत्तयलिखित शुभवर्तमानाचे ⇨विल्यम कॅरी आणि पंडित वैजनाथ यांनी मराठी भाषांतर केले. यांनीच १८११ मध्ये नव्या कराराचेही भाषांतर केले. १८१९ मध्ये जुन्या कराराचे विल्यम कॅरींनी भाषांतर केले विल्यम मिचेल, ॲलन ग्रेव्ह्ज, टी. मॉलेन्सवर्थ, जॉन विल्सन यांनीही मराठी भाषांतरे केली. १८५१ मध्ये एच्. बॅलन्टाइन यांनी नव्या कराराचे (नगर आवृत्ती) सुंदर भाषांतर केले. १९०७ मध्ये नव्या कराराची ⇨बाबा पदमनजी, जे.ई. ॲबट, डी. मॅकीकन यांनी नवीन आवृत्ती तयार केली. १९२४ मध्ये जुन्या करारांचे ⇨पंडिता रमाबाई यांनी अप्रतिम भाषांतरे केले. १९६५ मध्ये पंडिता रमाबाईंच्या आवृत्तीचीच पुनरावृत्ती एफ्. डब्ल्यू. शेलेंदर आणि ल. ना. चौधरी यांनी तयार केली. भारतामध्ये प्रामुख्याने ‘बायबल सोसायटी ऑफ इंडिया’या संस्थेतर्फे बायबलचे भाषांतर, प्रकाशन व विक्री करण्यात येते. १९७३ पासून प्रॉटेस्टंटांच्या बायबल सोसायटी ऑफ इंडिया व ‘कॅथलिक मराठी बायबल समिती’ या दोन संस्थांतर्फे संयुक्तपणे सामान्य भाषेत बायबलची नवीन आवृत्ती तयार होत आहे. ए. बी. रॉड्रिग्ज यांनी पुणे विद्यापीठाकडे सादर केलेला ‘बायबलचे मराठी अवतार’ या विषयावरील डॉक्टरेटचा प्रबंध मान्य होऊन त्यांना डॉक्टरेटही दिली आहे (१९७४). त्यात मराठी बायबलचा विस्तृत आढावा आलेला आहे.


 

काही भाग 

नवा करार 

संपूर्ण बायबल 

तमिळ 

१५७८(काहीउतारे) 

१७१५ 

१७२६ किंवा १७२८ 

काश्मीरी 

– 

१८२० 

१८९९ 

तेलुगू 

– 

१७२७ 

१७३२ 

बंगाली 

– 

१८०१ 

१८०९ 

उर्दू 

– 

१७४५ 

१८४३ 

ओडिया 

– 

१८११ 

१८१५ (१) 

हिंदी 

१८०५(शुभवर्तमाने) 

१८११ 

१८१८१ 

असमिया 

– 

१८१९ 

१८३२ 

गुजराती 

१८०९(मत्तयकृतशुभवर्तमाने) 

१८२० 

१८२३ 

मलयाळम् 

१८११(शुभवर्तमाने) 

१८१३ 

१८४१ 

कन्नड 

१८१२(शुभवर्तमाने) 

१८२३ 

१८६५ 

संस्कृत 

– 

१८०८ 

१८१८ 

सिंधी 

१८२५(मत्तयकृत शुभवर्तमाने) 

१८९० 

१९५५ (१) 

पंजाबी 

– 

१८१५ 

१९५९ 

बायबल संशोधन :बायबलसंबंधीच्या अभ्यासाचे एक शास्त्रच निर्माण झाले आहे. पूर्वी पपायरसेवर बायबलचे लेखन करण्यात आले. साहजिकच ही हस्तलिखिते दीर्घकाल टिकाव धरू शकली नाहीत. म्हणून ती पुनःपुन्हा लिहावी लागली. मूळ संहितेत सदोषता निर्माण होण्याचे हे एक कारण असू शकते. हाती आलेले जुन्या कराराचे संपूर्ण व सर्वांत जुने हिब्रू हस्तलिखित इ.स.नवव्या शतकातील होते. एका हस्तलिखिताचा एक लहानसा भागच (जो एका व्यक्तीच्या नावावरून ‘नाश’ भाग असा संबोधला जातो.) तेवढा याला अपवाद आहे कारण तो इ.स.पू.दुसऱ्या शतकातील असावा. अगदी अलीकडे मृत समुद्राजवळील कुम्रान येथील काही गुहांत जुन्या कराराची ख्रिस्तपूर्व काळातील बरीच हस्तलिखिते सापडली आहेत. सनातनी ज्यू पंडित योग्य त्या उच्चारांसह असलेल्या बायबलच्या प्रमाणभूत  अशा शुद्ध पाठासाठी प्रयत्न करीत होते. परंपरा या शब्दास हिब्रू भाषेत ‘मासोरा’ असे म्हणतात. ‘मासोरेटिक’ प्रतीचा उपयोग मूळ बायबल समजून घेण्यासाठी विद्वानांना अत्यंत मार्गदर्शक ठरला. नव्या कराराचे पपायरसेवरील मूळ लिखाण दुसऱ्या शतकापेक्षा अधिक काळ टिकू शकले नाही. तिसऱ्या शतकात तयार झालेल्या हस्तलिखितांचा काही भाग मात्र आजही अस्तित्वात आहे. पुढील शतकांतील ३,८०० च्या वर हस्तलिखितांच्या मदतीने, अनेक जुन्या भाषांतरांशी तुलना करून आणि इतर लिखाणातून नव्या कराराच्या आलेल्या संदर्भांचा तुलनात्मक अभ्यास करून अधिकाधिक निर्दोष असे मूळ ग्रंथाचे लेखन सिद्ध करण्याचे प्रयत्न आजही चालू आहेत. या प्रयत्नांना बरेच यशही आले आहे. गेल्या २५० वर्षांपासून आधुनिक संशोधनपद्धतीचा अवलंब करून बायबलची पाठचिकित्सा चालू आहे. या पद्धतीमुळे त्या काळच्या संदर्भांचा अभ्यास करून आणि इतिहास, पुरातत्त्वविद्या आणि भाषाशास्त्र यांचा उपयोग करून मूळ लिखाण काय असावे व तत्कालीन लोकांनी ते कसे समजून घेतले, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. साहित्यप्रकारांतील कोणती अभिव्यक्तिपद्धती वापरली आहे, याचाही अभ्यास हे विद्वान करतात. उदा., ठराविक उतारा कथा आहे की ऐतिहासिक वृत्त, इत्यादी. याशिवाय, वापरलेल्या विशिष्ट संदर्भाचा अर्थ समजून घेण्याचाही प्रयत्न केला जातो. मूळ लिखाणाचा शब्दशः अर्थ आणि गर्भितार्थ समजावा, हा यामागील हेतू आहे.

मागील पिढ्यांत बायबलच्या संशोधनात बरीच प्रगती झाली आहे. बायबलच्या उगमस्थानाचा अभ्यास (सोअर्स क्रिटिसिझम) हे एकोणिसाव्या शतकातील अभ्यासकांचे मोठे श्रेय होय. लेखकांना या उगमस्थानांच्या अभ्यासाने बायबलमधील वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल जास्त माहिती मिळाली. विसाव्या शतकात बायबलमधील उताऱ्यांच्या संदर्भात सुरुवातीची मौखिक परंपरा व नंतरचे लिखित स्वरुप या दरम्यानच्या काळासंबंधी बराच अभ्यास झाला. बायबलमधील एखाद्या विशिष्ट लिखिताचे मूळ संदर्भवैशिष्ट्य, त्याचा समाजातील उपयोग व बायबलच्या पुस्तकात त्याला दिले गेलेले विशिष्ट स्थान याचा (फॉर्म क्रिटिसिझम) गाढे पंडित अभ्यास करीत तसेच ते एखाद्या विशिष्ट लिखिताच्या संपादन तत्त्वाचाही (रिडक्शन थिअरी) विशेष अभ्यास करीत कारण बायबलच्या पुस्तकाचे संपादन करण्याचे कार्य सर्जनशील होते. बायबलच्या लिखाणाचा जास्तीत जास्त संकलित अर्थ शोधून काढण्यास मदत व्हावी, हा त्या संशोधनाचा हेतू होता.


भारतात आधुनिक काळात बायबलमधील लेखनाचा अर्थ अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी काही पंडित ‘ध्वनि’ संकल्पनेकडे वळले आहेत. भारताच्या सौंदर्यवादी परंपरेतील या ध्वनिसंकल्पनेचा अर्थ काव्यगुण असा होतो. बायबलमधील शब्दांच्या वेगवेगळ्या पातळ्यांवरील अर्थाचा शोध घेण्यासाठी ही पद्धती वापरली जाते. बायबलवर पुष्कळ टीका करण्यात आली आणि संशोधनही करण्यात आले, तरीही आणि किंबहुना त्यामुळेच, आजही बायबल हे जगातील सर्वांत जास्त वाचले जाणारे पुस्तक आहे.

जुना करार :सध्याच्या इराकमधील युफ्रेटीस नदीच्या खालच्या भागातील सेमिटिक भटकी जमात तेथून पुढे पॅलेस्टाइनमध्ये सरकली. त्यांच्यातच अब्राहम, आयझाक (इस्साक), याकोब आणि मोझेस हे कुलपती होते. चारशे वर्षे (इ.स.पू. सतराव्या शतकापासून-इ.स.पू.तेराव्या शतकापर्यंत) ते ईजिप्तच्या गुलामगिरीत होते. मोझेसच्या नेतृत्वाखाली त्यांना स्वातंत्र्य मिळाले. हे देवास ‘याव्हे’ (येहोवा) या नावाने संबोधित असत. मोझेसला सिनाई पर्वतावर साक्षात्कार होऊन ⇨योहोवा (याव्हे) आणि सर्व लोक यांच्यात करार झाला. इ. स. पू. १२०० ते १००० या काळात या सेमिटिक हिब्रू जमाती पुन्हा कनान (पॅलेस्टाइन) मध्ये स्थायिक झाल्या. त्यांच्यापैकी यहोशवा ही एक थोर व्यक्ती होती. तसेच सम्सन गिडिअन (गिदोन) आणि इफ्ताह हे न्यायाधीश होते. इ.स.पू.मध्ये ⇨डेव्हिड राजाने जेरूसलेम शहर जिंकले. सॉलोमन तेथे मंदिर उभारले. राजा हा लोकांचा शासक असूनही त्यास केव्हाही दैवी स्वरुप देण्यात आले नाही. धर्मसंदेशाच्या रक्षणार्थ संदेष्टे वा प्रेषित निर्माण झाले. ज्यू राज्याची शकले झाली. इ.स.पू. ७२१ मध्ये उत्तर इझ्राएलमधील रहिवाशांना ॲसिरियाच्या बंदिवासात टाकण्यात आले आणि इ.स.पू. ५८७ मध्ये ज्यूडा (यहुदा) या दक्षिण राज्यातील लोक बॅबिनला पाठविण्यात आले. या संकटकाळात ज्यू लोकांनी येहोवाला संपूर्ण जगाचा शास्ता या नात्याने अधिक जाणीवपूर्वक ओळखले. इ. स. पू. ५३९ मध्ये जेव्हा इराणी लोकांनी बॅबिलन जिंकले, तेव्हा त्यांनी बदिवासातील लोकांना स्वदेशी परत जाऊ दिले. परतून आलेले बहुतेक लोक ज्यू होते. म्हणून पुढील पाचही शतकांना यहुदी वा ‘ज्यू काळ’ असे म्हणतात. इ.स.पू. ३३२ मध्ये इराणी सम्राटांनंतर झालेल्या राज्यकर्त्यापैंकी माखाबीच्या नेतृत्वाखाली ज्यू लोकांनी ग्रीक लोकांविरूद्ध बंड पुकारले. इ.स.पू. ६३ मध्ये तेथे रोमन राज्य प्रस्थापित झाले. ज्यू लोक संपूर्ण रोमन साम्राज्यात विखुरले गेले, तरीही जेरूसलेम हेच ज्यू लोकांचे धर्मिक केंद्र राहिले.

जुन्या करारातील महत्त्वपूर्ण साहित्यिक परंपरा : कार्ये, प्रतीके आणि कृती यांद्वारे अध्यात्मविषयक अनुभव व्यक्त होत होते. इतिहासातील देवाच्या कृतीवर ज्यू लोकांचा धार्मिअनुभव प्रामुख्याने केंद्रित झाला होता. डेव्हिड राजाच्या काळापासून त्यांचा हा अनुभव लिखाणातून व्यक्त होऊ लागला. त्याचे उगमस्थान बायबलच्या पुस्तकांत दिसून येते. इ.स.पू. १००० ते इ.स.पू. ७५० मध्ये देवाला ‘याव्हे वा येहोवा’ संबोधणाऱ्यांची ‘याव्हेइस्ट’ (येहोइस्ट) परंपरा आढळते आणि देवाला ‘एलोहीम’ संबोधणे हे ‘एलोहिस्ट’ परंपरेत दिसून येते. या परंपरेची शैली स्वतंत्र आणि नव्या दमाची आहे. या कालावधीत बायबलच्या पहिल्या चार पुस्तकांच्या महत्त्वाच्या भागांनी आकार घेतला. यानंतर इ. स .पू. ७५०-५०० हा संदेष्ट्यांचा वा प्रेषितांचा काळ सुरू होतो. या संदेष्ट्यांची वा प्रेषितांचीही पुस्तके रचण्यात आली. यापूर्वीच्या साहित्याचे एकत्रीकरण करण्यात येऊन त्याचे पुनर्लेखन झाले. विधिनियम व मोझेसचे धर्मकायदे एका पुस्तकामध्ये नव्याने लिहिले गेले. अनेक भाषांत या पुस्तकाला ‘ड्यूटेरोनॉमी’ म्हणजे ‘दुसरा कायदा’ असे म्हणतात. मराठी भाषेत यास ‘अनुवाद’ (जुने रीतिरिवाज प्रस्थापित करणे) असे म्हणतात. या काळातील साहित्यालाही ‘ड्यूटेरोनॉमीकल’ साहित्य असे म्हणतात. ते भावनापूर्ण आणि तीव्र व्यथा व्यक्त करणारे आहे. बॅबिलनचा बंदिवास संपल्यानंतरच्या काळात धर्मगुरूंनी धार्मिक लेखन सुरू केले. त्यांची शैली स्वच्छ आणि क्रमबद्ध होती. राष्ट्रीय इतिहास लिहिण्याचे काम चालूच होते. काही पुस्तकांना त्यांचे अंतिम स्वरुप या काळात प्राप्त झाले. उत्पत्ती या पुस्तकामध्ये देवाने केलेल्या उत्पत्तीविषयक कार्याचा अध्याय याच काळात लिहिला गेला तसेच अनेक विधिनियम व नीतिसूत्रेही लिहिण्यात आली. काळाच्या ओघात पुष्कळशा कल्पना अधिकाधिक स्पष्ट होत गेल्या. शून्यातून झालेल्या पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी आणि मृत्यूनंतरच्या मानवी जीवाच्या अमरत्वाविषयी स्पष्ट उल्लेख इ.स. पू. दुसऱ्या शतकातील दानिएल आणि माखाबी-दुसरे पुस्तक याच पुस्तकांत आला आहे.

जुन्या करारातील महत्त्वाची पुस्तके :जुन्या करारातील पुस्तके सर्वसाधारणपणे पुढील क्रमानुसार मांडली जातात : तोरा वा पेंटाट्यूक, ऐतिहासिक पुस्तके, काव्य व ज्ञानपर पुस्तके आणि शेवटी संदेष्ट्यांची वा प्रेषितांची पुस्तके. पुढील पुस्तके ‘सेप्टुआजिंट’ मूलस्त्रोताप्रमाणे आहेत : तोरा वा पेंटाट्यूकचा आरंभ उत्पत्ती या पुस्तकापासून झाला आहे. जगाच्या उत्पत्तीविषयक वर्णनाने या पुस्तकाची सुरुवात होते. देवाने सहा दिवस उत्पत्ती करून सातव्या दिवशी विश्रांती घेतली, असे धर्मगुरू असलेल्या लेखकाने सांगितले आहे. याच अभिव्यक्तीच्या शैलीत त्याने असे प्रतिपादन केले, की मानवानेही सहा दिवस काम केल्यावर सातव्या दिवशी विश्रांती घ्यावी. उत्पत्तीमध्ये कुलपतींविषयी माहिती येते. ईजिप्तमधील गुलामगिरीमधून सुटका आणि सिनाई पर्वतावरील प्रकटीकरणाचा उल्लेख निर्गम या पुस्तकात आला आहे. लेवीय या पुस्तकामध्ये लेवीय याजकांच्या विशिष्ट वर्गामुळे या पुस्तकात उपासनेविषयी अनेक नियम आले आहेत. ईजिप्तमधील गुलामगिरीतून झालेल्या सुटकेपासून मोझेसच्या मृत्यूपर्यंतच्या घटनांबाबत प्रेषितांचा दृष्टिकोन अनुवाद या पुस्तकात अंतर्भूत केला आहे.

ऐतिहासिक पुस्तके :यहोशवा, शास्ते, रुथ, शमुवेल-पहिले पुस्तक, शमुवेल-दुसरे पुस्तक, राजे-पहिले पुस्तक, राजे-दुसरे पुस्तक, इतिहास-पहिले पुस्तक, इतिहास-दुसरे पुस्तक, एझ्रा, नहेम्या, तोबी, युदीथ, एस्तेर, माखाबी-पहिले पुस्तक, माखाबी-दुसरे पुस्तक, या पुस्तकात ज्यूंनी कनान देशामध्ये प्रवेश केल्यापासून तो ग्रीक लोकांविरुद्ध केलेल्या बंडापर्यंतचा इतिहास समाविष्ट आहे. काव्य व ज्ञान व ज्ञानसाहित्य : हिब्रू जनतेत व आसपासच्या देशांत शतकानुशतके, ‘ज्ञानी किंवा शहाणा पुरुष’ हा समाजाचा आदर्श मानला जाई. यावरून बायबलमध्येही ज्ञान व शहाणपणविषयक अनेक पुस्तके तयार झाली आहेत. सॉलोमन राजा हा ज्ञानी शासकांचा उत्तम आदर्श मानलेला आहे. बायबलमध्ये धार्मिक भावना व्यक्त करण्यासाठी काव्य-साहित्यविषयक विविध अभिव्यक्तिप्रकारांचा अवलंब केलेला आहे. संदेष्ट्यांची वा प्रेषितांची पुस्तके : प्रेषितांच्या पुस्तकांतून याव्हेशी एकनिष्ठ राहण्यासंबंधीचा संघर्ष अतिशय जिवंतपणे चित्रित केला आहे. यशया (इसाया), यिर्मया (जर्मियाह-जेरीमाइआ), यहेज्केल (ईझीक्येल) आणि डानिएल हे महान संदेष्टे किंवा प्रेषित समजले जातात कारण त्यांची पुस्तके विस्तृत आहेत. यानंतर गौण समजल्या जाणाऱ्या संदेष्ट्यांची वा प्रेषितांची पुस्तके येतात कारण त्यांचे लेखन विस्ताराने लहान आहे.


जुन्या कराराचा विद्यमान संदर्भ : ज्यू आणि ख्रिस्ती लोक अधिकृत सामूहिक उपासनेसाठी तसेच खाजगी वाचन आणि ध्यान-मननासाठी जुना करार वापरतात. त्यातील ‘स्तोत्रसंहिता’ हा प्रार्थनासंग्रह दुसऱ्या कोणत्याही अशा संग्रहापेक्षा ह्या धर्मात अधिक वापरला जातो. जुन्या करारात उल्लेखिलेले प्रसंग आजही कवी, नाटककार आणि चित्रपटकथाकरांना स्फूर्ती देतात. दशाज्ञासारखी (टेन कमांडमेंट्स) नीतितत्त्वे जगप्रसिद्ध झालेली आहेत. जुना करार एकेश्वरवाद शिकवितो तसेच इतिहासातील घटनांद्वारे देव कसे कार्य करतो आणि या इतिहासामागे देवाच्या काही योजना कशा आहेत, हे तो सांगतो.

बायबल हे निरनिराळ्या लेखकांनी लिहिलेले असून त्याची विविध पुस्तके वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमीतूनच लिहिलेली आहेत. त्यांतील सर्वच पुस्तके सारख्या महत्त्वाची नाहीत. जुना करार वाचताना मार्गदर्शन व्हावे म्हणून प्रथम स्तोत्रसंहितेचा आधार घ्यावा, उत्पत्ती आणि निर्गम ही पुस्तके वाचावीत आणि त्यानंतर यशया व यिर्मया या संदेष्ट्यांची वा प्रेषितांची वाचावीत. बायबलची ऐतिहासिक पुसतके समजून घेण्यास शमुवेल-पहिले पुस्तक, शमुवेल-दुसरे पुस्तक आणि राजे-पहिले पुस्तक व दुसरे पुस्तक ही पुस्तके उपयुक्त ठरतात. यानंतरच इतर पुस्तके वाचावीत.

नवा करार :येशू खिस्त ज्यू लोकांमध्ये जन्माला आला. त्याने तारणाचा नवा मार्ग दाखविला आणि लोक त्याच्या मागे गेले. काही त्याचे अनुयायी झाले. त्यांच्यातून त्याने १२ ⇨अपॉसल (धर्मदूत) निवडले व आपले कार्य पुढे चालू ठेवण्याची त्यांना आज्ञा केली. त्याने स्वतः लिखित स्वरुपात काहीही संदेश दिला नाही. सर्वसाधारणपणे ज्यू लोक त्याचा मार्ग अनुसरीत नव्हते. तथापि काही ज्यू व इतर अनेक लोकांनी त्याचे अनुयायित्व स्वीकारले. काही ज्यू-ख्रिस्ती लोकांना असे वाटले, की ख्रिस्ती लोकांनी सुंता आणि जुन्या करारातील सर्व नियम स्वीकारले पाहिजेत. परंतु हे नाकारले गेले तरीही ख्रिस्ती लोकांनी जुन्या करारातील लिखाण पवित्र व प्रमाण मानून स्वीकारले आहे. कारण हे प्रभू येशूच्या आगमनाच्या तयारीचे पुस्तक आहे, असे ते मानतात. लवकरच येशू ख्रिस्ताचे कार्य व शिकवण जगास सांगण्याची गरज भासू लागली. त्यातूनच चार शुभवर्तमाने तयार झाली. त्यांच्या लेखकांची नावे मत्तय (मॅथ्यू), मार्क, लूक (ल्यूक) आणि योहान (जॉन) अशी आहेत. मत्तय हा जकातदार होता तो येशूचा धर्मदूत झाला. मार्क जेरूसलेममधील येशूचा एक अनुयायी होता. त्याने नंतर पेत्राचा (पीटरचा) उपदेश ग्रहण केला. लूक हा वैद्य होता संत पौलाचा काही काळ तो सोबतीही होता. पहिली तिन्ही शुभवर्तमाने परस्परसंबंधित होती. मार्क लिहित असताना त्याच्या पुढे मत्तयकृत शुभवर्तमानाची आद्य आवृत्ती आणि येशूच्या बोधवाक्यांचा एक संग्रह होता. जेव्हा मत्तयेनत्याचेशुभवर्तमान लिहिले तेव्हा त्याच्या समोर स्वतःची आद्य आवृत्ती आणि येशूच्या बोधवाक्यांचा संग्रह व मार्ककृत शुभवर्तमान होते. मत्तयकृत हे शुभवर्तमान बायबलच्या सर्व पुस्तकांमध्ये सर्वाधिक प्रमाणात वाचले जाते. लूकसमोरही हे तीन मूळ आधार होते. प्रत्येक लेखकाने स्वतःच्या स्वतंत्र शैलीने आपापले लेखन केले.

योहानचे शुभवर्तमान हे येशूच्या जीवनाच्या आणि बोधवाक्यांच्या प्रत्यक्ष साक्षीचे वृत्त आहे. परंतु येशूचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर सु. साठ वर्षांच्या चिंतनानंतर योहानने ते लिहिले. पहिल्या तीन शुभवर्तमानांनंतर पहिल्या शतकाच्या अखेरच्या काळातच हे शुभवर्तमान लिहिलेले आहे. ही शुभवर्तमाने चरित्रात्मक रुपाने मात्र लिहिलेली नाहीत. येशूला क्रूसावर दिल्यानंतर त्याचे ⇨पुनरुत्थान होऊन तो शिष्यांसमोर प्रत्यक्ष जेव्हा प्रकट झाला, तेव्हा त्याच्या शिष्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आणि त्याला त्यांनी आपला प्रभू वा देव म्हणून नव्याने ओळखले आणि त्यांनी येशूसंबंधीच्या घटना लिहिल्या. आता त्यांना अनेक गोष्टी पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट रीतीने आकलन झाल्या होत्या. या उद्धारकाच्या जीवनाची सुवार्ता वा शुभवर्तमान घोषित करणे हा त्यांचा हेतू होता. यावरूनच या शुभवर्तमानांनी येशूच्या बाल्यावस्थेची विशिष्ट प्रकारे केलेली वर्णने आपण समजू शकतो. शुभवर्तमानांचे लेखक त्यावेळच्या घटनांचे प्रत्यक्ष साक्षीदार नव्हते. या संदर्भात इतरांच्या आठवणींच्या साहाय्याने प्रभू येशूच्या पुनरुथत्थानाच्या प्रत्यक्ष अनुभवाच्या प्रकाशात त्याचा अर्थ लावला गेला. त्यांनी जुन्या करारातील तत्सम प्रसंगांची वर्णनशैली आणि वाक् प्रचार यांचे अनुकरण व उपयोग केला. बायबलच्या स्पष्टीकरणाची अशी पद्धती ‘मिड्राश’ म्हणजे ‘संशोधन’, तेव्हा ज्यू लोकांमध्ये मान्यता पावलेली होती.

लूकलिखित धर्मदूतांची कृत्ये (ॲक्ट्स) ख्रिस्ती धर्माच्या सुरुवातीच्या काळाचा, विशेषतः आपल्या जन्मस्थानाच्या सीमांपलीकडे जाऊन अधिक व्यापक आणि विस्तृत असलेल्या नवीन ख्रिस्ती समाजाचा इतिहास सांगतात. यानंतर नव्या काररात धर्मदूतांनी लिहिलेल्या २१ पत्रांचा समावेश आहे : पौलाची १४, याकोबचे १, पेत्राची २, योहानची ३ आणि यहुदाचे (जूडस) १ अशा पत्रांचा त्यांत समावेश होतो. काही विशिष्ट परिस्थतीच्या संदर्भात आणि नवीन धर्मसमाजांचा संघर्ष समोर ठेवून या पत्रांद्वारे धर्मबोध दिला गेला. संत पौलाने थेस्सालनीकाकरांस लिहिलेले पत्र इतके प्राचीन आहे, की ते इ.स.५१ किंवा ५२ मध्ये लिहिलेले आहे. बायबलच्या शेवटच्या प्रकटीकरणाच्या पुस्तकात ख्रिस्ताच्या अनुयायांना कोणते दिवस येतील याची, प्रतीके आणि दृष्टांतांद्वारे कल्पना दिली आहे.

नव्या कराराचा विद्यमान संदर्भ :नवा करार हा ख्रिस्ती लोकांच्या बायबलचा केंद्रबिंदू आहे आणि चार शुभवर्तमाने हा त्याचा गाभा आहे. मत्तयलिखित शुभवर्तमानाच्या अध्याय ५-७ मधील ‘गिरिगीता’ म. गांधींना फार प्रिय होती. राजा राममोहन रॉय आणि भारतातील इतर काही आधुनिक सुधारक येशूच्या नीतितत्वाने प्रभावित झाले होते. परमेश्वर हा पिता असून आपण सर्वच बंधू-भगिनी या नात्याने समान आहोत, असे नव्या कराराने अतिशय प्रभावीपणे सांगितले आहे. चित्तशुद्धीवर भर देऊन नवा करार सांगतो, की मानवप्रीतीशिवाय देवप्रीती शक्य नाही.


‘ख्रिस्तजनांना’ असे सांगण्यात येते, की स्थलकालातील येशू ख्रिस्ताशी एकरुपता साधणे हाच त्यांच्या धार्मिक जीवनाचा केंद्रबिंदू आहे. नवा करार, येशू ख्रिस्ताने नव्याने स्थापन केलेल्या धर्मसमाजाची मूलभूत स्वरुपाची कल्पना देतो आणि येशू ख्रिस्त आपला प्रभू व तारक आहे, असे प्रतिपादन करतो, ख्रिस्ती लोकांसाठी बायबलची गणना पूर्वेतिहासातील केवळ एका मौल्यवान ग्रंथात होत नसून, त्यानुसार आपले दैनंदिन धार्मिक व नैतिक जीवन जगण्यासाठी तो प्रमाणभूत पवित्र ग्रंथ मानला जातो.

नवा करार समजून घेण्याच्या संदर्भात कोणत्याही एका शुभवर्तमानाने सुरुवात करावी. शुभवर्तमान नव्या कराराचा केंद्रबिंदू आहे. यानंतर धर्मदूतांची कृत्ये, संत पौलाने एफिसकरांना लिहिलेले पत्र व संत योहानची पत्रे वाचावीत. हे सर्व वाचन सतत शुभवर्तमानाच्या आधारे व त्याच्या संदर्भात करावे. अशा रीतीने शुभवर्तमानाची चारही पुस्तके पूर्णपणे वाचावीत आणि त्यानंतर नव्या कराराच्या इतर पुस्तकांचेही वाचन पूर्ण करावे.

पहा : ख्रिस्ती धर्म ख्रिस्ती संत ज्यू तत्त्वज्ञान ज्यू धर्म ज्यू संस्कृति टॅलमुड.

संदर्भ :  1. Bruce, F. F. The English Bible, New York, 1961.

          2. Bultmann, Rudolf, The Theology of the New Testament, 2 Vols., New York, 1954

          3. Filson, F. V. A New Testament History, Philadelphia, 1964.

          4. Ginsburg, C. D. Introduction to the Massoretico, Critical Edition of the Hebrew Bible, New York, 1966.

          5. Grant, F. C. The Gospels, Their Origin and Their Growth, New York, 1957.

          6. Grant, R. M. A. Short History of  Interpretation of the Bible, New York, 1963.

          7. Greenslade, S. L. Ed, Cambridge History of the Bible : The West from the Reformation to the Present Day, New York, 1963.

          8. Hooper, J. S. M. Culshaw, W. J. Bible Translation in India, Pakistan and Ceylon, Oxford, 1962.

          9. Kenyon, F. G. Our Bible and the Ancient Manuscripts, London, 1958.

          10. Pfeiffer, R. H. The Books of the Old Testament, New York, 1965.

          11. Red, Gerhard Von, Old Testament, Theology, New York, 1965.

          12. Rowley, H. H. Ed. The Old Testament and Modern Study, New York, 1951. 

           13. रमाबाई, पंडिता, पवित्रशास्त्र म्हणजे जुना व नवा करार, केडगाव, १९२४. 

 

लेदर्ले, मॅथ्यू-रायनर.