काबा : मक्केच्या सर्वश्रेष्ठ मशिदीच्या मध्यभागी असलेली, भुरकट दगडी व संगमरवरात बांधलेली, १२⋅२० मी. लांब, १०⋅६५ मी. रुंद व १५⋅२४ मी. उंचीची ही एकमजली इमारत सर्व इस्लाम जगताचा केंद्रबिंदू म्हणून प्रसिद्ध आहे. या इमारतीला फक्त एकच दार असून विशेष प्रसंगीच ते उघडण्यात येते. इतर वेळी ही संपूर्ण इमारत, जरीकामाने ⇨कुराणातील आयते (वचने) भरलेल्या काळ्या कापडाने (किस्व) आच्छादलेली असते. हे आच्छादनाचे कापड दरवर्षी तयार करून, काबाभोवती घालण्याचा मान ईजिप्तकडे आहे. आयुष्यातून एकदातरी प्रत्येकाने मक्केची (काबाची) यात्रा करावी, अशी इस्लाम धर्मीयांकडून अपेक्षा असते व ती करण्याची त्यांची उत्कट इच्छाही असते. प्रत्येक यात्रेकरू काबाला सात वेळा प्रदक्षिणा घालतो. सर्व मुसलमान काबाच्या दिशेला तोंड करून ⇨ नमाज  पढतात तसेच प्रेतेही काबाच्या दिशेला तोंड करून पुरतात.

मुहंमद पैगंबरांच्या काळी व त्याअगोदर काबामध्ये निरनिराळ्या अरब जमातींच्या व टोळ्यांच्या देवतामूर्ती होत्या. दरवर्षी सर्व अरब काबाची यात्रा करून आपापल्या देवतेच्या मूर्तीची पूजा करीत. मुहंमदांनी मक्का जिंकल्यावर ह्या मूर्ती नष्ट केल्या गेल्या. सध्या काबाच्या इमारतीत फक्त एक प्रचंड काळी शिला (अल्‌-हजर-अल्‌-अस्वद) आहे. छताला आधार म्हणून तीन लाकडी खांब आहेत. छताला सोन्याचे व चांदीचे अनेक दिवे टांगलेले असून दारे, खांब, चौकटी यांवर चांदीचा मुलामा केलेला आहे. भिंती चांदीच्या पत्र्याने मढविलेल्या आहेत.

आदिमानव आदमने प्रथम काबाची इमारत बांधली व ती पडल्यानंतर ⇨अब्राहम  व त्याचा पुत्र इस्माइल यांनी काबाचा जीर्णोद्धार केला त्यावेळी ईश्वराने ही शिला पाठविली अशी मुसलमानांची श्रद्धा  आहे. ही शिला प्रथम शुभ्र होती. परंतु अनंत कालापासुन प्रत्येक यात्रेकरू शिलेला हाताने स्पर्श करतो आणि तिचे चुंबन घेऊन आपले पाप तिला देतो त्यामुळे ती काळी ठिक्कर पडली, अशी समजूत आहे. काबाच्या इमारतीचा अनेकवेळा जीर्णोद्धार झाला असून, इ. स. ९३०मध्ये कार्मेथियन पंथाच्या आक्रमकांनी ही शिला पळविली होती ती वीस वर्षांनी परत मिळाली. सध्या ही शिला भग्नावस्थेत असून चांदीच्या पट्‌ट्याने एकत्र बांधलेली आहे. या शिलेसमोर झमझम नावाची एक विहीर आहे. काबाचा जीर्णोद्धार करीत असताना इस्माइल व त्याची आई हाजर यांची तृष्णा भगविण्यासाठी देवदूत गॅब्रिएलने ही विहीर उघडली, अशी आख्यायिका आहे. यात्रेकरू शिलेला स्पर्श करून झमझमचे पाणी पितात. काहीजण हे पवित्र जल आपल्याबरोबर नेतात.

जगप्रसिद्ध मक्का-मशिदीतील पवित्र काबा-स्थान

करंदीकर, म. अ.