दधीचि : एक वैदिक ऋषी. दध्यंच, दधीच, दध्यंग, दध्यच अशीही त्याची नामांतरे आढळतात. तो अथर्वा व चित्ती यांचा पुत्र असल्याचे भागवत पुराणात (४·१) म्हटले आहे. अथर्वकुलोत्पन्न म्हणून ‘दध्यञ्‌च आथर्वण’ ह्या नावानेही तो ओळखला जातो. ऋग्वेदात  त्याचे अनेक उल्लेख (१·११६·१२ १·११७·२२ ६·१६·१४ १·८·१६ १·१३९·९ १·११९·९ १·११६·१३ इत्यादी) आलेले आहेत. दध्यंच हा मुळात अग्नीच्या विद्युत्‌रूपाचा प्रतिनिधी असावा असे मत मॅक्‌डॉनल (१८५४–१९३०) याने व्यक्त केले आहे, तर बेर्गेनी (१८३८–८८) याने त्याचा संबंध सोमाशी असावा, असे म्हटले आहे. दध्यंच याचा अर्थ ‘मधुमिश्रित सोमरस’ असा असल्याचे काही अभ्यासक मानतात.

इंद्राने दधीचीस प्रवर्ग्यविद्या व मधुविद्या (सृष्टीच्या मूलतत्त्वाचा शोध घेणारी विद्या) शिकविली आणि ती दुसऱ्यास शिकविल्यास तुझा शिरच्छेद करीन असे बजावले. अश्विनीकुमार याच विद्या शिकण्यासाठी दधीचीकडे आले असता, त्याच्या संमतीने त्यांनी दधीचीचे शिर तोडून तेथे अश्वाचे शिर जोडले आणि नंतर दधीचीपासून विद्या ग्रहण केली. संकेतानुसार इंद्राने दधीचीचे शिर तोडले असता अश्विनीकुमारांनी पूर्वीचे शिर पुन्हा जोडून दधीचीस जिवंत केले.(शतपथब्राह्मण  ४·१·५·१८ ६·४·२·३ १४·१·१·१८–२६ तैतीरीय संहिता ५·१·४·४).

देवासुर युद्धांत वृत्रासुराच्या वधाकरिता दधीचीने आपली हाडे इंद्रास दिली आणि त्या हाडांची शस्त्रे बनवून इंद्राने वृत्रासुराचा वध केला (महाभारत ३·९८-९९). दधीचीच्या अस्थिदानाची कथा पुराणांतही थोड्याफार फरकाने आलेली आहे. याचा आश्रम सरस्वतीच्या किनारी होता असे महाभारतात, तर तो गंगाकिनारी होता असा निर्देश ब्रह्मपुराणात आलेला आहे.

जोशी, रंगनाथशास्त्री