मेहेरबाबामेहेरबाबा : (२५ फेब्रुवारी १८९४–३१ जानेवारी १९६९). आधुनिक काळातील एक भारतीय संत. त्यांचे शिष्य त्यांना ईश्वरी अवतार मानत असत. आपण सनातन पुरुष असून जगाच्या उद्धारासाठी अवतरलो आहोत तसेच उपदेश करण्यासाठी आलो नसून आत्मजागृती करण्यासाठी आलो आहोत, अशी त्यांची स्वतःबद्दलची धारणा होती.

त्यांचा जन्म पुण्यामध्ये एका पारशी कुटुंबात झाला. मेरवान शेरिआर इराणी हे त्यांचे मूळचे संपूर्ण नाव होय. ‘दयाळू पिता’ या अर्थाचे ‘मेहेरबाबा’ हे नाव त्यांना नंतरच्या काळात प्राप्त झाले. शिरिनबानू हे त्यांना आईचे नाव. त्यांना जमशेद हा एक थोरला भाऊ होता तसेच जाल, बेहराम व आदि असे तीन धाकटे भाऊ व मनीजा ही एक बहिण होती.

पुण्याच्या सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १९११ मध्ये त्यांनी  डेक्कन महाविद्यालयात प्रवेश घेतला. ते हॉकी, क्रिकेट, आट्यापाट्या इ. खेळांमध्ये जसे तरबेज होते तसेच अभ्यासातही हुशार होते. त्यांना काव्याची व संगीताची आवड होती. इंग्रजी, गुजराती, फार्सी, मराठी, हिंदी व उर्दू या भाषा त्यांना अवगत होत्या आणि त्यांपैकी बहुतेक भाषांतून त्यांनी कविताही लिहिल्या. महाविद्यालयात असताना त्यांनी ‘विश्वबंधु’ संघस्थापन केला. जात, धर्म वगैरेंचे भेदभाव न करता या संघात प्रवेश दिला जात होता.

अभ्यास, खेळ, हास्य-विनोद इ मार्गांनी सर्वसामान्य युवकासारखा त्यांचा जीवनक्रम चालू होता. अशा स्थितीत, १९९३ साली इंटरमध्ये असताना हजरत बाबाजान यांच्याशी झालेल्या भेटीनंतर त्यांचे शिक्षण संपले व अलौकि क जीवनास प्रारंभ झाला. पुरुषी नाव घेतलेल्या हजरत बाबाजान या मुसलमान संत-स्त्रीने ‘ हा मानवजातीचे कल्याण करील’ अशी त्यांच्याविषयी भविष्यवाणी केली. या भेटीनंतर मेहेरबाबांचे नऊ महिने गूढ अशा मानसिक अवस्थेत गेले. डिसेंबर १९१५ मध्ये मेहेरबाबांची उपासनी महाराजांशी भेट झाली. त्यांनीही वरीलप्रमाणेच भविष्यवाणी करून मेहेरबाबांना ‘अवतार’ म्हणून संबोधिले. हजरत बाबाजान, उपासनी महाराज, ताजुद्दीन बाबा, साईबाबा आणि नारायण महाराज हे त्यांचे पाच सद्‌गुरू मानले जातात.

विविध प्रकारचे उपवास, एकांतवास, मौन, देववेड्या लोकांची सेवा इ. प्रकारे त्यांनी आयुष्यभर अनेक गूढ प्रयोग केले. ते १९२२ साली काही महिने छोट्या झोपडीत राहिले. त्याच वर्षी मुंबईला येऊन तेथे सु. वर्षभर त्यांनी विशिष्ट पद्धतीने आश्रम चालविला. त्यानंतर देशभर प्रवास केला. १९२४ साली अहमदनगरजवळील अरणगाव येथे नवीन आश्रम सुरू केला. या स्थानालाच पुढे ‘मेहेरा बाद’ हे नाव प्राप्त झाले. तेथे मुलांना शिक्षण, गरिबांना मदत, रुग्णांची सेवा इ. कार्ये चालत. तेथे अस्पृश्यता पाळली जात नसे आणि स्वतः मेहेरबाबांसह सर्वजण विविध प्रकारचे शारीरिक श्रम करीत असत. त्यांनी १० जुलै १९२५ पासून पुढे आयुष्यभर मौन पाळले. प्रारंभी काही काळ ते लिहून विचार व्यक्त करीत परंतु जानेवारी १९२७ पासून लेखनही बंद केले आणि मुळाक्षरे छापलेल्या फळीवर बोटे ठेवून विचार व्यक्त करू लागले. ऑक्टोंबर १९५४ पासून तेही बंद करून फक्त हाताच्या खुणांचा वापर करू लागले. त्यांनी अमेरिका, यूरोपमधील विविध देश, ऑस्ट्रेलिया इ. देशांचा अनेकदा प्रवास केला. या विविध देशांतून त्यांची केंद्रे व शिष्यमंडळी होती. अजूनही काही केंद्रे तेथे चालू आहेत. मेहेरा बाद येथे त्यांचे निधन झाले.

त्यांच्या साधी राहणी, बढाईखोरपणाचा अभाव, व्यक्ति मत्त्वातील गूढ आकर्षणशक्ती इ. गुणांचा उपस्थितांवर मोठा प्रभाव पडत असे. जगातून स्पर्धा, भय, लोभ, शोषण इत्यादींचा नाश व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. आधीच्या अवतारांतील उपदेशानुसार लोकांनी आचरण करण्याची गरज असल्यामुळे या अवतारात नव्याने उपदेश करण्याची गरज नाही नवीन धर्म स्थापन करण्यापेक्षा विद्यमान धर्म एकत्र आणणे महत्त्वाचे आहे इ. प्रकारचे महत्त्वपूर्ण विचार त्यांनी मांडले आहेत. त्यांचे विचार व्यक्त करणारी विविध भाषांतील मासिके व पुस्तके भारतात व भारताबाहेरही प्रकाशित झाली आहेत.

संदर्भ : Hopkinson, Tom and Dorothy, Much Silence, Bombay, 1981.

साळुखे, आ. ह.