अलौकिक सृष्टि : ज्याचा कार्यकारणभाव व स्वरूप यथार्थपणे, वस्तुनिष्ठ दृष्टीने, इंद्रियांद्वारा व बुद्धिवादाने नीट कळते व भाषेने प्रमाणपूर्वक व्यक्त करून समजावून सांगता येते, ते लौकिक होय. उदा., बी आणि झाड विस्तव व

मानवी देह आणि बहिरी ससाण्याचे मुख, ह्या स्वरूपातील प्राचीन ईजिप्तमधील ‘होरस’ या देवतेचे एक ब्राँझ शिल्प : ७ वे शतक, इ.स.पू.

जळणारे पदार्थ वारा व श्वासोच्छ्‍वास पाऊस, सूर्य व पिके नौका व तीमधून तरून जाणे अन्न व शरीरधारणा हत्यार व त्याने होणारी कारागिरी सुपीक जमीन व झाडे इत्यादिकांचे संबंध, हे इंद्रियांनी व बुद्धीने माणसांना निश्चितपणे कळतात. बी, झाड, विस्तव, सूर्य, पाऊस, वारा, नौका इ. सृष्टी ही लौकिक सृष्टी होय. परंतु ज्यांचे स्वरूप व कार्यकारणभाव इंद्रिय व बुद्धी यांच्या साहाय्याने निश्चित झालेले नसतात व केवळ स्वैर कल्पनांच्या योगानेच ज्यांचे स्वरूप व कार्यकारणभाव ठरविलेले असतात, अशा सृष्टीस ‘अलौकिक सृष्टी’म्हणतात. उदा., भुते, पिशाच इंद्र-वरुण, झ्यूस, अहुरमज्द ह्या देवदेवता राक्षस, दैत्य-दानव, अंग्रो-मइन्यू, सैतान गंधर्व, यक्ष, अप्सरा इत्यादी.

प्रसिद्ध यूनिकोर्न : चित्रजवनिकेवरील एक चित्र. (शरीर घोड्याचे, एक सरळ शिंग, बोकडासारखी दाढी आणि सिंहाचे पुच्छ अशा वर्णनासाठी यूनिकोर्न प्रसिद्ध आहे.)

शुद्ध व्यावहारिक, ऐहिक व वस्तुनिष्ठ अशा मानवी वर्तनाच्या बाहेरील जादूटोणा, विधिनिषेध, मंत्रतंत्र, यज्ञ, होमहवन, पूजाप्रकार अशा प्रकारच्या गोष्टींचा संबंध माणसाने स्वैरपणे कल्पिलेल्या, वस्तुनिष्ठ पुरावा नसलेल्या अशा सृष्टीशी जोडलेला असतो. मृतांचे आत्मे अथवा भुते वा पिशाचे ह्यांच्याशी मानवाच्या काही आचारसंस्थांचा संबंध असतो. हे आचार अंत्यसंस्कारापासून सुरू होतात.इंद्रियगोचर अशा पदार्थांच्या व वस्तूंच्या ठिकाणी किंवा त्यांच्या अंतरंगांत सचेतनवत अशाही शुभकारक अथवा अशुभकारक शक्ती असतात त्यांना जड, भौतिक पदार्थांचे नियम लागू नसतात, असेही माणसाने कल्पिले आहे. उदा., प्रेतांचे आत्मे, भुते, पिशाच अथवा वृक्ष, नदी, पर्वत इत्यादिकांमधील देवता किंवा शक्तिरूप अद्भुत सृष्टी यांना अंधार, भिंत इ. कसलेही अडथळे येत नसतात. त्यांना माणसाचे चांगले-वाईट करण्याची शक्ती असते परंतु माणसांत, प्राण्यांत, वनस्पतींत वा इतर जड पदार्थांत चांगले-वाईट करण्याची जी शक्ती असते, त्या शक्तीचे कार्यकारणभाव बुद्धिगम्य असतात तसे या अद्भुत देवता, भूत, पिशाच यांच्या शक्तीचे कार्यकारणभाव बुद्धीने निश्चित करता येत नाहीत. मनुष्यांना व प्राण्यांना रोगराई होते, त्यांच्यावर संकटे व दुःखे कोसळतात, त्यांच्या जीवनात हितकारक असेही अनपेक्षित प्रसंग घडून येतात याच्या पाठीमागे वरील कल्पित शक्ती किंवा सृष्टी कारणीभूत असते, असे माणसे कल्पितात. मानव, प्राणी, वनस्पती, किंवा अन्य भौतिक सृष्टी यांतील घडामोडींचा संबंध या कल्पित सृष्टीशी मनुष्य जोडतो.

ही कल्पित सृष्टी दोन प्रकारची मानलेली असते. एक प्रकार म्हणजे ह्या सृष्टीतील शक्ती साकार, सावयव, सुरूप, कुरूप किंवा विरूप असतात, अशी मानवाची धारणा असते.दुसरा प्रकार म्हणजे त्यांचा काय आकार आहे वा त्यांचे काय रूप आहे, यासंबंधाने मानवाने काहीच निश्चित कल्पना केलेली नसते. आदिम अवस्थेतील मानवसमाजांच्या ⇨जादूटोणा, मंत्रतंत्र, विधिनिषेध, ⇨पूजाप्रकार यांच्यामध्ये हे दोन्हीही प्रकार आढळतात. जादूच्या मंत्रामध्ये किंवा तंत्रामध्ये जी शक्ती कल्पिलेली असते, ती शक्ती मंत्र आणि तंत्र यांच्यापेक्षा निराळी म्हणून कल्पिलेली नसते. ती त्यांच्यातच असते. तिचे हितरूप किंवा अहितरूप कार्य तेवढे तिच्याशी निगडित असते, हेच तिचे रूप होय. विशिष्ट झाड, दगड, व्यक्ती वा प्राणी इत्यादिकांमध्ये ⇨माना ही अलौकिक शक्ती वसत असते ही शक्ती शुभकारक व अशुभकारक असते. ही शक्ती अंगी असलेल्या वस्तू वा व्यक्ती ‘ताबू’असतात, असे आदिम समाज मानतात म्हणजे त्यांना स्पर्श करण्यासंबंधी अथवा त्यांच्या संपर्कात येण्यासंबंधी निषेध असतात. विशिष्ट प्रसंगी पवित्र असलेल्या ताबूंना स्पर्श करणे वा त्यांच्याशी अन्य प्रकारे संसर्ग साधणे त्याबाबत विधीही असतात [→ निषिद्धे].

आदिम स्थितीतील समाजांच्या जादू, मंत्रतंत्र, विधिनिषेध, पूजा इ. प्रकारचे ⇨कर्मकांड अशा कल्पित, अद्‌भुत म्हणजेच अलौकिक सृष्टीच्या कल्पनेवर आधारलेले असते. ह्या अलौकिक सृष्टीच्या कल्पनांच्या मुळाशी जीवनात व सृष्टीत घडणार्या. हितरूप किंवा अहितरूप घटनांचे अज्ञान असते. केवळ अज्ञानामुळे ह्या कल्पना निर्माण होत नाहीत. अरिष्टाचे भय व इष्टाची तीव्र कामना कल्पनाशक्तीला चाळविते, उद्दीपित करते. ज्ञात

इस्लामी पुराणकथा : मंत्रित ताइतावरील राक्षसासारखा काळा देवदूत व दोन दुष्टात्मे : ताईतधारकाचे देवदूत संरक्षण करतो अशी समजूत आहे. (मुहुंमद अल्-सुदीच्या ग्रंथातील एक चित्र.)
स्लाव्होनिक पुराणकथा : जलदेवता ‘व्होड्यानोई’चे एक चित्र

वास्तव सृष्टीतील पदार्थ व त्यांचा कार्यकारणभाव अल्प प्रमाणात समजलेला असतो. कशाने काय घडते, याची जिज्ञासा माणसाला जन्मापासूनच असते. ज्ञात असलेल्या

गोष्टींमुळे मनुष्यास जेव्हा उलगडा होत नाही, तेव्हा तो स्वैर कल्पनाशक्तीचा आश्रय घेतो. या कल्पनाशक्तीला भय-निवारणाची व कामनातृप्तीची आत्यंतिक निकड उत्तेजित करते. मनुष्यप्राणी हा स्वप्नशील आहे. मन स्वप्नामध्ये नवीन नवीन घटनांची चित्रे निर्माण करीत असते. ही स्वप्नशीलताही कल्पनाशक्तीला उत्तेजन देते. या स्वप्नशीलतेबरोबरच कल्पनाशक्तीला अनिर्बंधपणे उत्तेजन देण्याचे कार्य भाषा करते. भाषेच्या साहाय्याने आलेल्या इंद्रियजन्य अनुभवांना व मनाच्या स्मरणशक्तीला जबरदस्त साहाय्य मिळते. वास्तवसृष्टीचे रूप-रस-गंध-स्पर्श, सुख-दुःख, द्वेष, भय इ. विविध रंगांनी भरलेले अनुभव शब्दांत व वाक्यांत साठवण्याची कला माणसाला प्राप्त झाल्यामुळे क्षणोक्षणी बदलणाऱ्या, जवळून दूर जाणाऱ्या व दुरून जवळ येणाऱ्या वैचित्र्यपूर्ण, अगणित व अनंत पदार्थांची सामान्य व विशेष रूपे स्मरणाच्या मानसिक भांडारात दाखल होऊन स्थिरावतात. ही सगळी कल्पनेला आकार देणारी घटक-सामग्री होय. तात्पर्य, (१) अज्ञान, (२) भयकामनादी भावना, (३) स्वप्नशीलता, (४)

तिबेटमधील सिंहमुखी डाकिनी : १८वे-१९वे शतक.

स्मरणशक्ती आणि (५) स्मरणशक्तीस संपुष्ट करणारी भाषा यांच्या योगाने माणसाने अलौकिक सृष्टी निर्माण केली आहे.

ही कल्पित अलौकिक सृष्टी स्पष्ट स्वरूपात मिथ्यकथेच्या (मिथ्) किंवा ⇨पुराणकथेच्या (मायथॉलॉजी) रूपाने प्रगट होते. मेलेल्या बाळंतिणीचे भूत जन्मलेल्या बालकाच्या भोवताली घोटाळत असते किंवा गणांचा मेलेला अधिपती गणसमाजाच्या स्वास्थ्याला किंवा अस्वास्थ्याला, जयाला किंवा पराजयाला कारण होतो जंगलात राहणाऱ्या जमातीची नौका नीट, न बुडता, इष्ट स्थळी सुखरूपपणे पोचविण्याचे कार्य जंगलाची देवता किंवा नदीदेवता करते इ. अलौकिक शक्तीच्या साध्या कथा आदिम समाजांमध्ये प्रचलित असतात. सुसंघटित रीतीने शेतीव्यवसाय करणाऱ्या संस्कृतीच्या म्हणजे स्थिर समाजाच्या अवस्थेत पदार्पण केलेल्या व राज्यसंस्था अस्तित्वात आलेल्या समाजांमध्ये पुराणकथा ह्या विश्वोत्पत्ती कशी झाली व विश्वव्यवस्था कशी चालते यांचे वर्णन करणाऱ्या पुराणकथा म्हणून प्रचलित असतात. ॲसिरिया, बॅबिलोनिया, ईजिप्त, इराण, प्राचीन इझ्राएल, स्कँडिनेव्हिया, क्रीट, भारत, ग्रीक, रोम, चीन इ. कृषिप्रधान प्राचीन समाजांच्या पुराणकथा या विश्वोत्पत्तीच्या व विश्वव्यवस्थेबाबतच्या कथा आहेत. या कथांमध्ये त्या समाजांच्या वन्य किंवा प्राथमिक अवस्थेतील लघुपुराणकथांचाही समावेश गर्भित किंवा स्पष्ट रूपाने झालेला असतो. विश्वोत्पत्तीच्या व विश्वव्यवस्थेच्या पुराणकथांना संस्कृत भाषेत ‘ब्रह्मांडपुराण’म्हणता येईल. या कथांमध्ये माणूस प्रथम कसा निर्माण झाला, ह्याचीही कथा प्रामुख्याने अंतर्भूत होत असते. ग्रह, नक्षत्रे किंवा तारे, आकाश, पृथ्वी, समुद्र, वायू इत्यादिकांच्या ठिकाणी विशिष्ट अलौकिक देवता असतात, अशा प्रकारच्याही कल्पना या पुराणकथांमध्ये समाविष्ट केलेल्या असतात.

हितकारक असणाऱ्या लहानथोर देवता व केवळ अहितकारक असे दुष्ट दैत्य-राक्षसादी गण, असे दोन मुख्य वर्ग या अलौकिक शक्तींचे पडतात. त्याबरोबरच यक्ष, गंधर्व, अप्सरा, किन्नर, अशांसारख्या देवशक्ती व दैत्यशक्ती या दोन प्रकारांमध्ये कोठेच समाविष्ट न होणाऱ्या शक्तीही अलौकिक सृष्टीत अंतर्भूत होतात. सत्‌शक्ती व असत्‌शक्ती यांचा विरोध वा संग्राम पुराणकथांमध्ये सांगितलेला असतो. दैवतशक्तींमध्ये कोणती तरी एक देवता प्रधान असते तसेच हीच गोष्ट दुष्ट दैत्यशक्तींनाही लागू आहे. देवगण व दैत्यगण असा विभाग सर्वच पुराणकथांच दिसतो. हिंदू व इराणी (पारशी) लोकांच्या पुराणकथांमध्ये दोन विरुद्ध शक्तींचा विभाग स्पष्ट दिसतो. कालांतराने जागतिक महत्त्वाच्या पुराणकथांनी कल्याणकारी देवशक्ती ही हिंसक, अकल्याणकारी, दैत्यशक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यशाली व अखेरीस दैत्य-शक्तीचा वा शक्तींचा पराभव करणारी मानलेली आहे. हिंदू धर्मातील विष्णूचे अवतार दैत्यांचा किंवा असुरांचा पराभव करतात. इराण्यांचा अहुर मज्द हा विध्वंसक व अंधकारकारक अंग्रो-महन्यूवर विजय मिळवितो. बायबलमधील अथवा कुराणातील परमेश्वर सैतानावर किंवा त्याच्या परिवारावर आपली अधिसत्ता गाजवितो.

जोशी, लक्ष्मणशास्त्री