ॲनाबॅप्टिस्ट : एक ख्रिस्ती धर्मपंथ. हा पंथ मुख्यत: ⇨मार्टिन ल्युथर याने सुरू केलेल्या धार्मिक सुधारणा-चळवळीनंतर जर्मनीमध्ये फोफावला. या पंथाचे अनुयायी बालकांना बाप्तिस्मा देण्याच्या विरुद्ध होते. सुधारणावादी म्हणून ॲनाबॅप्टिस्ट पंथाचे लोक अत्यंत कडवे होते त्यामुळे सुधारणावादी पंथातल्याच, परंतु मवाळ गटाच्या ते विरुद्ध होते. चर्चचे खरे कार्य, चर्च आणि राजसत्ता यांमधील परस्परसंबंध इ. प्रश्न त्यांनी धसास लावण्याचे प्रयत्‍न केले. १५२१ मध्ये ल्यूथरीअन पंथाचा धर्मगुरू टॉमस म्यूंटसर (१४८९–१५२५) याच्या आधिपत्याखाली जर्मनीतील त्स्विकाऊ येथे या पंथाचा उठाव झाला. म्यूंटसरच्या तत्त्वांचा प्रभाव कनिष्ठ वर्गातील धर्मगुरूंवर फार पडला. म्यूंटसरला पकडून तीन वर्षे हद्दपार करण्यात आले.

दक्षिण जर्मनीत १५२५ मध्ये पुन्हा म्यूंटसरच्या आधिपत्याखाली उठाव झाला. तो शेतकऱ्यांचा लढा म्हणून प्रसिद्ध आहे. हा लढा मुख्यत: चर्च-सत्ताधाऱ्यांविरुद्ध होता आणि त्यात समाजवादी तत्त्वांचा पुरस्कार तसेच समानतेची मागणी केली गेली. १५२५ मध्ये म्यूंटसरला फाशी दिल्यावर या चळवळीला थोडा पायबंद बसला.

नंतर स्वित्झर्लंड व नेदर्लंड्स या प्रदेशांत या विचारसरणीचा प्रसार झाला. वेस्टफेलियातील म्यून्स्टर येथे १५३२–१५३५ मध्ये याच प्रकारचा पण शेवटचा अयशस्वी उठाव झाला. नंतर मात्र या शब्दालाच बंदी घातली गेली व या पंथाचा पुरा बीमोड झाला.

पहा : प्रॉटेस्टंट.

संदर्भ : Bax, E. Belfort, Rise and Fall of the Anabaptists, London, 1903.

आयरन, जे. डब्ल्यू. (इँ.) साळवी, प्रमिला (म.)