दख्मचा रचनाकल्प

दख्म : लोकवस्तीपासून दूर असणाऱ्या उंच जागी पारशी लोकांच्या प्रेतांची विल्हेवाट लावण्यासाठी जो दगडी बुरूज बांधण्यात येतो, त्यास दख्म म्हणतात. पृथ्वी, जल, वायू आणि अग्नि या जीवनास पोषक असणाऱ्या मूलतत्त्वांची शुद्धता मृत देहाच्या संसर्गाने नष्ट होऊ नये म्हणून धार्मिक आदेशानुसार पारशी लोक दक्ष असतात. त्यामुळे मृतदेह अंत्यसंस्कारपूर्वक गिधाडांसारख्या मृतमांसभक्षक पक्ष्यांकरवी नष्ट केला जातो.

दख्म वर्तुळाकार ५–६ मी. उंचीचा असतो. त्याच्या आतील बाजूस वर्तुळाकार तीन दगडी उतरत्या पायऱ्या असतात. ज्या दगडावर प्रेत ठेवतात, त्यास ‘पावी’ म्हणतात. पायऱ्यांच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या रांगेत अनुक्रमे पुरुष, स्त्रिया व बालके यांची प्रेते विधिपूर्वक ठेवतात. दख्माच्या मध्यभागी ‘भंडार’ नावाचा फरसबंदी खड्डा असतो. प्रेतातील मासांचा गिधाडांनी फन्ना उडविल्यावर अस्थी आणि अन्य स्राव या भंडारात पडतात. या भंडारास आतून चार दिशेस चार पाट काढून ते फरसबंद अशा भूमिगत विहिरीस जोडलेले असतात. भंडारात भरपूर कोळसे व वाळू असल्याने तळपत्या उन्हामुळे व वातावरणातील घटकांमुळे अस्थींचे विघटन होऊन सर्व मृण्मय होते. सर्वांची शरीरे शेवटी भेदभावातीत होत असल्याने परमेश्वरास सर्वजण सारखेच आहेत याचे स्मरण यावेळी होते, असे पारशी लोक मानतात.

तारापोर, जे. सी. (इं) सोनटक्के, ना. श्री. (म.)