गुढी पाडवा : चैत्र शुद्ध प्रतिपदेस गुढी पाडवा असे नाव असून हिंदूंच्या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी तो एक शुभ मुहूर्त मानला जातो. शालिवाहन शकारंभही (इ. स. सु. ७८ वर्षांनंतर) याच दिवशी असून दक्षिण भारतात तसेच महाराष्ट्रातही नूतन वर्षारंभ याच दिवशी मानतात. ‘शालिवाहन’ ‘सातवाहन’ चा अपभ्रंश असावा. सातवाहनांपैकी कोणी व कोणत्या प्रसंगी हा शक सुरू केला, हे निश्चितपणे सांगता येत नाही. शक हे परकीय असून त्यांच्यावर सातवाहनांनी मिळविलेल्या एखाद्या महत्त्वाच्या विजयदिनापासून ह्या शकाची सुरुवात झाली असावी, असे काही विद्वान मानतात. 

गुढी

वसंत ऋतूचा आरंभ याच दिवशी होतो. कोणत्याही नवीन कार्यारंभास हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. चौदा वर्षांच्या वनवासानंतर आणि लंकाविजयानंतर रामाने याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला, अशी एक कथा रूढ आहे. या दिवशी घरोघर गुढ्या-तोरणे उभारतात. या दिवशी मंगलस्नान करून कडुलिंबाची पाने, मिरे, हिंग, लवण, जिरे व ओवा यांसह खाल्ली असता आरोग्य, बल, बुद्धी व तेजस्विता प्राप्त होते, अशी समजूत आहे. या दिवशी ब्रह्मदेवाने जग निर्माण केले, म्हणून ब्रह्मपूजा हा या दिवशी महत्त्वाचा विधी मानतात. बांबूच्या टोकास रेशमी वस्त्र गुंडाळून त्यावर चांदीचे वा पितळेचे भांडे पालथे घालून त्याला कडुलिंबाची डहाळी व फुलांची माळ बांधतात आणि पूजापूर्वक ती सजवलेली गुढी दारात उभारतात. गुढी उभारण्यावरूनच या दिवसास ‘गुढी पाडवा’ म्हटले जाते. पुराणांत या दिवशी बरेच विधी सांगितले आहेत.       

करंदीकर, ना. स.