ब्रह्मचर्य : सामान्यतः धार्मिक उद्देशांनी स्वीकारलेली लैंगिक सुख वर्ज्य करण्याची अवस्था म्हणजे ब्रह्मचर्य होय. प्राचीन काळापासूनच जगातील अनेक समाजांतून व धर्मांतून ब्रह्मचर्याचे पालन करण्याची प्रथा चालत आलेली आहे. कधीही विवाह न करता नैष्ठिक म्हणजेच जन्मबार ब्रह्मचर्य पाळणाऱ्यांची संख्या कोणत्याही समाजात एकूण समीच असते. परंतु धार्मिक वा यात्वात्मक कर्मकांडाचे प्रसंग, युद्धासारखे महत्त्वाचे असे काही प्रसंग, कौमार्य, वैध्वय वा विधुरपणा, ज्ञानार्जन, वैराग्य इ. कारणांनी विशिष्ट कालखंडापुरते ब्रह्मचर्य पाळण्याचा प्रसंग मात्र बहुतेक सर्व लोकांच्या जीवनात कधी ना कधी येत असतो.
कोणत्याही समाजातील सर्वसामान्य व्यक्तीच्या दृष्टीने ब्रह्मचर्य हे ऐच्छिक असते परंतु काही धर्मांतून व समाजांतून विशिष्ट धर्मगुरू, पुरोहित, शामान इत्यादींना नैष्ठिक ब्रह्मचर्याचे सक्तीने पालन करावे लागते. हिंदू संन्यासी व योगी, बौद्ध भिक्षू, जैन श्रमण आणि अनेक आदिम जमातींमधील शामान हे ब्रह्मचारी असतात. रोमन कॅथलिक पंथात प्रीस्ट हा ब्रह्मचारी असतो. ख्रिस्ती धर्माच्या इतिहासात ब्रह्मचर्याच्या बाबतीत बरीच मतभिन्नता दिसते. प्रॉटेस्टंट चर्चनी धर्मोपदेशकांच्या ब्रह्मचर्याला म्हणजे अविवाहित राहण्याच्या व्रताला विरोध केला आहे. मूळ यहुदी धर्मात ब्रह्मचर्याला स्थान नव्हते परंतु नंतरच्या इसेन्स वगैरे काही पंथांतून ते आढळते. सूफी साधू वगैंरेंचा अपवाद वगळता मुसलमानांमध्येही ते फारसे आढळत नाही. पारशी धर्मात ब्रह्मचर्याची निंदा व ब्रह्मचर्यापेक्षा गृहस्थजीवन श्रेष्ठ असल्याची वर्णने आढळतात. चीनमध्ये पितृपूजा प्रचलित असल्यामुळे व पितृपूजेसाठी पुत्रप्राप्ती आवश्यक असल्यामुळे नैष्ठिक ब्रह्मचर्याला विरोध झाला आहे. मात्र ताओ धर्मात काही ब्रह्मचारी असतात. हिंदूंमध्येही एकीकडे ब्रह्मचर्याला गौरव केलेला असला, तरी पुत्रप्राप्तीशिवाय स्वर्गप्राप्ती नाही व पितृऋण फिटत नाही, अशा समजुतीमुळे नैष्ठिक म्हणजे येशू ख्रिस्त, आद्य शंकराचार्य,विवकानंद इ. ब्रह्मचारी पुरूषांनी, आपल्या व्रतस्थ आचरणाने मानवी जीवन अधिक उदात्त बनविले हे खरे परंतु ब्रह्मचर्याच्या प्रथेत अनैतिकता व भ्रष्टाचार यांचा फैलाव,शारीरिक व मानसिक विकृतींचा प्रादुर्भाव, परोपजीवी लोकांच्या संख्येत वाढ इ. दोषही संभवतात. निसर्गप्राप्त कामवासना, अपत्यप्राप्तीची आकांक्षा इ. गोष्टी व्यक्तीला कायमच्या ब्रह्मचर्यापासून परावृत्त करतात. धार्मिक व आध्यात्मिक जीवनात अशा ब्रह्मचर्यांचे विशिष्ट स्थान आहे, हे खरे परंतु निरोगी समाजधारणेच्या दृष्टीने विवाहाचे महत्त्वही अनन्यसाधारण आहे.