भविष्यकथन : विशिष्ट शास्त्र, पद्धती, सामर्थ्य, अडाखे, सूचना, वस्तू इत्यादींच्या आधारे भविष्यकालीन घटनेचे आगाऊ कथन करणे म्हणजे भविष्यकथन होय परंतु ज्यांची वैज्ञानिकता सर्वमान्य आहे अशा प्रकारच्या खगोलशास्त्र, वातावरणविज्ञान, गणित इ. विज्ञानांकडून केल्या जाणाऱ्या भविष्यकथनाचा विचार येथे करवयाचा नाही, तर ज्यांची वैज्ञानिकता वादग्रस्त आणि विज्ञानाच्या निकषावर अद्यापि असिद्ध आहे, अशा फलज्योतिष, हस्तसामुद्रिक, शकुनशास्त्र इ. तथाकथित शास्त्रांच्या वा पद्धतींच्या आधारे केल्या जाणाऱ्या भविष्यकथनाचे स्वरुप येथे पाहावयाचे आहे. उदा., विशिष्ट काळी खग्रास सूर्यग्रहण लागणार आहे, असे गणित वगैरेंच्या आधारे आधीच सांगणे, हे एक प्रकारचे भविष्यकथनच होय. तसेच त्या सूर्यग्रहणाचा परिणाम म्हणून एखाद्या राजाचा मृत्यू होणार आहे असे सांगणे, हेही भविष्यकथनच होय. प्रस्तुत नोंदीत या दोहोंपैकी दुसऱ्या प्रकारच्या भविष्यकथनाचा विचार करावयाचा आहे. किंबहुना, प्रामुख्याने या दुसऱ्या अर्थानेच ‘भविष्यकथन’ ही संज्ञा रुढ आहे. भविष्यकथनात इंद्रियातीत अशा भावी घटनेचे कथन केले जात असल्यामुळे इंद्रियातीत अशा वर्तमानकालीन वा भूतकालीन घटनांचे कथनही लक्षणेने भविष्यकथनामध्ये अंतर्भूत होते.

तात्त्विक अधिष्ठान : सृष्टीमध्ये घडणाऱ्या सर्व घटना पूर्वनिर्धारित असतात, असे प्रतिपादन करणारी ‘नियतिवाद’ नावाची एक संकल्पना तत्त्वज्ञानात प्रसिद्ध आहे. ईश्वरी इच्छा, पूर्वजन्मीचे कर्म, ब्रह्मदेवासारख्या देवतांनी जन्मल्याबरोबर व्यक्तीच्या कपाळ वगैरेंवर लिहून ठेवलेला जीवनक्रम, जन्मप्रसंगी असेलली ग्रह वगैरेंची अवस्था इत्यादींमुळे भावी घटनांचे स्वरुप पूर्वनिर्धारित झालेले असते, असे  ⇨ नियतिवादात मानले जाते. व्यक्ती वगैरेंच्या जीवनातील घटनांचे पूर्वनिर्धारण करणाऱ्या या घटकतत्वांना स्थूलमानाने नियती, दैव वा नशीब असे म्हटले जाते. तत्त्वज्ञानातील ‘मानवी’ ⇨ संकल्पस्वातंत्र्य ही संकल्पना मात्र या नियतिवादाहून वेगळी आहे. आपण आपल्या संकल्पांना अनुसरुन केलेल्या प्रयत्नांच्या द्वारे आपल्याला हव्या तशा घटना घडवून आणू शकतो, त्या पूर्वनिर्धारित असतात असे मानण्याचे कारण नाही, अशी ही संकल्पना आहे. भविष्यकथनाची संकल्पना प्रामुख्याने नियतिवादावर आधारलेली असून संकल्पस्वातंत्र्याला तिच्यामध्ये अगदी थोडासाच वाव आहे. सृष्टीमध्ये घडणाऱ्या सर्व घटना पूर्व निर्धारित असतात, पूर्वनिर्धारणानुसार भावी काळात घडणार असलेल्या घटनांच्या स्वरुपाविषयी विविध मार्गांनी आधीच सूचना देण्याची व्यवस्था सृष्टीमध्ये करण्यात आलेली असते, त्या सूचनांचा अर्थ सर्वसामान्य लोकांना कळत नसला, तरी त्या विषयाच्या समर्थ तज्ञांना तो निश्चितपणे कळत असतो इ. श्रद्धांवर भविष्यकथनाची संकल्पना आधारलेली आहे.

ही संकल्पना रुढ होण्याला धर्म, यातू, आभासात्मक विज्ञान इत्यादींचे पाठबळ मळते. उदा., ईश्वरेच्छेने घटनांचे पूर्वनिर्धारण होते व भावी घटनांच्या सूचना मिळतात, ही श्रद्धा धर्मांच्या क्षेत्रात मोडते. कुंकू सांडले म्हणजे वैधव्य येते, यासारखी श्रद्धा धर्माच्या अनुकरणात्मक यातूवर (इमिटेटिव मॅजिकवर) आधारलेली आहे, असे दिसते. योगायोगाने एकापाठोपाठ घडलेल्या दोन घटनांमध्ये कारणकार्यभाव असल्याचा चुकीचा निष्कर्ष काढावयाचा व त्यावरुन नेहमीसाठी काही नियम बनवावयाचे, अशी विज्ञानाच्या आभास निर्माण करणारी पद्धतही भविष्यकथनाला कारणीभूत होते. भविष्यकथानाची प्रथा ही जवळ जवळ सार्वत्रिक व सार्वकालिक अशी आहे. अर्थात प्रत्येक समाजाच्या धर्म, तत्त्वज्ञान, संस्कृती इ. मध्ये भेद असतो आणि त्यानुसार त्या समाजात रुढ असलेल्या भविष्यकथनाच्या पद्धतीही भिन्नभिन्न असतात.

उद्दिष्ट : अनिष्टाच्या व विशेषतः मृत्यूच्या भीतीमुळे अस्वस्थ बनणे, ह मानवी स्वभाव आहे. त्यामुळेच आपल्या भावी जीवनात इष्ट ते घडावे व अनिष्टाचा परिहार व्हावा, असे माणसाला मनोमन वाटत असते. असे घडेल की नाही, याविषयीचे एक जबरदस्त कुतूहल त्याच्या मनात असते. आपल्यावर आलेल्या संकटातून आपली सुटका होईल की नाही, आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील की नाही, आपण हाती घेतलेल काम यशस्वी होईल की नाही, एकूणच आपले जीवन कोणत्या दिशेने व कसे प्रवाहित होणार आहे, याचे आगाऊ ज्ञान मिळावे म्हणून मनुष्य उतावीळ झालेला असतो आणि त्यामुळेच तो भविष्यकथानाच्याद्वारे भविष्यात डोकावण्याचा प्रयत्न करतो. विवाह व विवाहोत्तर जीवनातील सुख, संतती व संपत्तीची प्राप्ती, हरवलेल्या वस्तूची प्राप्ती, रोगनिवारण, व्यवसायातील यश, युद्धातील विजय यांसारख्या उद्देशांनी माणसे भविष्यकथनाचा आधार घेतात. कृषिसंस्कृतीमधील लोक पर्जन्य, हवामान इत्यादींच्या आगाऊ ज्ञानांसाठी भविष्यकथनाची मदत घेतात. भविष्यकथन अनुकूल असेल, तर इष्ट ते घडणार म्हणून माणसाला दिलासा मिळतो, त्याचा उत्साह वृद्धिंगत होतो. याउलट भविष्यकथन प्रतिकूल असेल, तर परिस्थिती आपल्याला अनुकूल करुन घेण्यासाठी तो धार्मिक, यात्वात्मक इ. उपाय योजू लागतो. भविष्यकथनाच्या संकल्पनेत इतपतच संकल्पस्वातंत्र्य असते. एकंदरीत, चिंतातुर करणारी अशी भविष्याविषयीची अनिश्चीतता दूर करुन योग्य तयारीनिशी भविष्याला सामोरे जाण्याची कुवत माणसामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न भविष्यकथनाद्वारे केला जातो.

भविष्यकथानाचे अधिकारी : शामान, वैद्य, ज्योतिषी, पुरोहित, प्रेषित, राजा, धर्मगुरु, धर्मसंस्थापक, पायाळू, वगैरेंसारखा वैशिष्ट्यपूर्ण मनुष्य, अंगात आलेली व्यक्ती, वेडा, अजाण मूल इ. लोक भविष्यकथन करीत असल्याचे समाजात आढळते. या लोकांना भविष्यसूचक चिन्हांचा अर्थ कळत असतो, त्यांच्या जवळ भविष्यकथनाची गूढ शक्ती व अंतर्ज्ञान असते, भविष्यकालीन घटना आपल्यसमोर घडत असल्याचे त्यांना दिसते, त्यांचा आत्मा अन्य लोकांत जाऊन भविष्याचे ज्ञान मिळवितो, ईश्वर, चितशक्ती या देवता प्रसन्न होऊन त्यांना भविष्याचे ज्ञान देतात, जवळ बाळगलेल्या विशिष्ट वस्तूच्या प्रभावामुळे त्यांना भविष्य कळते इ. प्रकारच्या श्रद्धा आढळतात. पूर्वी भविष्यकथन करण्यासाठी अधिकारी नेमले जात. रोमन लोक राज्यसाठी अधिकृत ज्योतिष्यांची नेमणूक करीत असत. भारतात राजे लोक भविष्य सांगण्यासाठी दैवज्ञांची नेमणूक करीत असत.

सूचना मिळण्याचे मार्ग : माणसाला भावी घटनांच्या सूचना विविध मार्गांनी व असंख्या माध्यमांतून मिळतात, असे मानले जाते. सामान्तः आगळेपणाने नजरेत भरणाऱ्या घटना भविष्याच्या दृष्टिने सूचक मानण्याची पद्धत सर्वत्र आढळते. स्वप्न, दृष्टान्त, समाधी, अंगात आलेल्या व्यक्तीचे बोलणे इत्यादींच्या द्वारे ईश्वर अथवा देवता भविष्याच्या सूचना देतात. देवतांना कौल लावूनही [⟶ कौल लावणे ] भविष्य जाणले जाते. ⇨ फलज्योतिष, जन्मकुंडली [⟶ कुंडली] इत्यादींच्या साहाय्याने ग्रह, तारे, वीज, धुमकेतू, ग्रहणे यांसारख्या आकाशातील घडामोडींवरुन भविष्य जाणले जाते. ⇨ हस्तसामुद्रिक वा हस्तरेषा, कपाळावरील कपाळ व चेहरा वगैरेंची ठेवण, अंगावरील तीळ. जन्मखूण, नखांचे स्वरुप, पायांचे ठसे, केस, हातांची लांबी, बोटांची लांबी व त्यांच्या अग्रांवरील खुणा इ. सारख्या लक्षणांवरुनही भविष्य सांगितले जाते. पापणी लवणे, मांड्या व बाहू स्फुरणे, तळपाय व तळहात खाजणे, शिंके, उचकी इ. घटनांचाही त्यासाठी आधार घेतला जातो. घुबड, कावळा इ. पक्ष्यांचे दर्शन व आवाज, पालीचे चुकचुकणे, नंदीबैलाच्या हालचाली, पोपटासारख्या पक्ष्यांनी पाकीट वगैरे उचलणे इ. वरुन भविष्य सांगितले जाते. पक्ष्यांचे आवाज, त्यांच्या हालचाली यांवरुन भविष्यकथन करण्याची अशी पद्धत जगातील सर्व समाजांतून आढळते. भारतात पक्षी या अर्थांच्या शकुन या संस्कृत शब्दालाच पुढे भविष्यसूचक चिन्ह असा अर्थ प्राप्त झाला आणि सूचक चिन्हांवरुन भविष्यकथन करण्याच्या शास्त्राला शकुनशास्त्र असे नाव प्राप्त झाले, यावरुन या बाबतीती पक्ष्यांचे महत्त्व स्पष्ट होते. अग्नी, पाणी, वारा, माती, वाळूचे कण, संख्या, दिशा, नावे, आरसा, पीठ, दिवा, यष्टी, खेळण्याचे पत्ते, चहाची पाने, धूर, यज्ञातील बळींची आतडी व इतर अवयव, मृताची कवटी, सोंगट्या, हस्ताक्षर, स्वाक्षरी इत्यांदीची विशिष्ट पद्धतीने तपासणी करुन भविष्यविषयक निष्कर्ष काढले जातात. बायबलसारखा ग्रंथ उघडून जे पान व वाक्य निघेल त्याचाही उपयोग या दृष्टीने केला जातो. मोहिनीविद्या, मृतांत्म्यांच्या साहाय्याने भविष्य सांगणारे प्लँचेट इत्यादींचाही विशिष्ट पद्धतीने उपयोग केला जातो. नखाला काजळी लावून अथवा थाळीत पाणी टाकून भविष्य पाहण्याची प्रथाही आढळते. स्फटिक वा लोलक यांमध्ये पाहून भविष्य सांगण्याची पद्धत काही ठिकाणी बरीच लोकप्रिय झाली आहे. काळ व मुहूर्त कोणता आहे, विशिष्ट कामासाठी बाहेर पडल्यावर प्रथम कोण भेटते, फेकलेला बाण कोठे पडतो, झाडाची फांदी कोणत्या बाजूला हालते, लहान मुल कोणत्या हालचाली व उच्चार करते, मुलाच्या जन्मप्रसंगी लावलेले झाड कसे वाढते, हत्ती कोणाच्या गळ्यात माळ घालतो यांसारखे योगायोग भावी घटनांची दिशा सुचवितात. अशा रितीने विविध समाजांतून भविष्यकथनाचे अक्षरशः अनंत मार्ग वा पद्धती अनुसरल्या जात असल्याचे आढळते.


विविध समाजांतील भविष्यकथन : ॲसिरिया व बॅबिलन येथे भविष्यकथन हे राष्ट्रीय धर्माचे एक अत्यंत महत्त्वाचे अंग होते. फार प्राचीन काळापासूनच ज्योतिषशास्त्रात खाल्डियन लोकांनी प्रगती केली होती. ग्रहमान, पायाच्या पृष्ठभागावर तेल ओतल्यावर त्याला मिळणारा आकार. बळी दिलेल्या प्राण्याचे यकृत, स्वप्ने इ. वरुन तेथे भविष्य सांगितले जाई. ग्रीक ऐतिहासिक कालखंडाचे भविष्यकथनाच्या दृष्टिने दोन भाग पडतात. इ. स. पु. आठ ते चार या शतकांत भविष्यकथनावर राजकीय प्रभाव होता. या कालखंडाचे वैशिष्ट्य म्हणजे विशिष्ट मंदिरातुन होणारी ‘ओरॅकल’ म्हणजे दैववाणी वा भविष्यवाणी होय. ग्रीसमधील अशा अनेक मंदिरांपैकी ⇨डेल्फायमधील ⇨अपोलो या देवतेचे मंदिर अत्यंत विख्यात होते. तेथे स्त्रीपुरोहिताच्या मुखातून देवता बोलते, अशी समजूत होती. त्या काळात ग्रीसमधील काही कुटुंबे भविष्यकथनासाठी प्रसिद्ध होती. दुसऱ्या कालखंडात अलेक्झांडरच्या विजयानंतर ग्रीकांनी बॅबिलन येथील भविष्यकथनाच्या पद्धती उचलल्या. ज्योतिषी (ग्रहज्ञाता) या अर्थाने ग्रीक लोक ‘खाल्डियन’ हाच शब्द वापरीत असत. रोमन लोक विशिष्ट अक्षरे कोरलेल्या काठ्या वा पट्ट्या एकत्र ठेवत आणि त्यांतील कोणती तरी एक उचलून प्रश्नकर्त्याला उत्तर दिले जाई. पक्ष्यांची उड्डाणे व आवाज, विजेचे चमकणे इ. वरुनही भविष्य सांगितले जाई. यहुदी लोक प्रेषित, द्रष्टे, लहान मुले, ग्रंथ, बाण इत्यादींच्या साहाय्याने भविष्य जाणून घेत. ख्रिस्ती धर्मात भविष्यकथन ही ⇨जादूटोण्याची  शाखा मानत. या धर्मात भविष्यकथन निंद्य ठरविले असूनही भविष्यकथनाचे अनेक प्रकार चालत असत. युरोपमध्ये जत्रांमधून भविष्यकथन चाले. ⇨जिप्सी लोकांचा हा खास व्यवसाय होता. विशिष्ट प्याला, अग्नी, बंद पेटी इ. च्या आधारे भविष्य सांगण्याची पद्धत पर्शियन लोकांत होती. ⇨जरथुश्त्राला पडलेल्या स्वप्नांचा अर्थ लावण्यासाठी तज्ञांना बोलावले होते. विशिष्ट पर्वतावर पांढरा मेंढा ओरडला, तर ते वर्ष समृद्धीचे जाईल, सूर्योदयानंतर प्रथम ज्याचा घोडा खिंकाळेल त्याला राजा बनवावे इ. समजुती त्या लोकांत होत्या. चमकदार पदार्थ, बळीची आतडी, पक्षी, अंगात येणे, आकस्मिक उदगार, वाळूचे कण, नावातील अक्षरे इ. वरुन भविष्य सांगण्याची पद्धत मुस्लिम लोकांत आहे. जपानमध्ये सुर्यदेवतेच्या स्त्रीपुरोहिताची निवड भविष्यकथनाने केली जाई. तेथे देवतांनाही भविष्यकथनाची मदत घ्यावी लागे. हरणाच्या खांद्याचे हाड आगीवर धरुन त्याला पडणाऱ्या तड्यांवरुन भविष्य सांगण्याची पद्धत जपान, चीन, आग्नेय आशियातील देश आणि काही पाश्चात्य देशांतून आढळते. अमेरीकेच्या आदिम जमातींमध्ये ⇨शामान व वैद्य भविष्य सांगत. मेक्सिको, पेरुमध्ये प्राचीन काळी शकुनविद्येचे महाविद्यालय होते. अमेरिकेतील इंडियन लोक चकाकणाऱ्या दगडात पाहून भविष्य सांगतात. गॉलमध्ये म्हणजे सध्याचा फ्रान्स व त्याचा परिसर येथे तिसऱ्या शतकात भविष्य सांगणाऱ्या स्त्रिया होत्या. तेथे ⇨ड्रुइड नावाचा पुरोहितवर्ग भविष्य सांगे. ढगांच्या आधारे भविष्य सांगणारा एक वर्गही तेथे होता. भारतात भविष्यकथनाचे काम प्रामुख्याने अथर्ववेदी ब्राह्मणांकडे असे. राजाने सल्लागार म्हणून ज्योतिषी नेमला पाहिजे, असा संकेत होता. फलज्योतिष आणि हस्तसामुद्रिक यांना भारतामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. व्यक्तिगत भविष्यकथनाची प्रथा सुरु होण्यापूर्वी भारतात राज्याचे सामुदायिक भविष्य सांगितले जात असे व त्याला मेदिनीय ज्योतिष म्हणत असत. विचारलेल्या प्रश्नाचा काळ वगैरेंवरुन भविष्यकथन करावयाची प्रश्नज्योतिष नावाची पद्धत आहे. फलज्योतिषासाठी भृगुसंहिता हा प्राचीन ग्रंथ प्रसिद्ध आहे. हिंदूंनी ‘ताजिक’ नावाचे ज्योतिषशास्त्र मुस्लिमांकडुन घेतले आहे. फासे टाकून भविष्य जाणण्याची ‘रमल’ वा ‘पाशकविद्या’ प्रसिद्ध आहे. वराहमिहिर हा भारताचा विख्यात ज्योतिषी होता. जैन लोकांनी भविष्यकथनविद्येच्या दिव्य (वा स्वप्न), उत्पात, आंतरिक्ष, भौम, अंग, स्वर, लक्षण आणि व्यंजन अशा आठ शाखा मानल्या आहेत. बुद्धजन्माच्या वेळी त्याचे भविष्य सांगण्यासाठी ब्राह्यणांना बोलवण्यात आले होते. त्याच्या अंगावर महापुरुषाची ३२ लक्षणे होती, असे म्हणतात. त्याला भविष्यज्ञान असूनही त्याने भविष्य सांगण्यास विरोध केला होता. परंतु तरीही बौद्ध धर्मातून भविष्यकथन नष्ट होऊ शकले नाही.

भविष्यकथनाला विरोध : धर्म, कायदा, विज्ञान इ. अनेक पातळ्यावरुनही भविष्यकथनाला विरोध झाला आहे. उदा., ज्योतिषशास्त्रात मग्न झाल्यास मानसिक अशुद्धी निर्माण होते, असे बौद्ध धर्माने मानले आहे, म्हणूनच बौद्ध भिक्षूंना ज्योतिषशास्त्राचा अवलंब करण्यास मनाई करण्यात आली होती. भविष्यकथन म्हणजे ईश्वरी इच्छा उघड करण्याचा अधार्मिक प्रयत्न, असे मानून खिस्ती धर्माने भविष्यकथनाला प्रारंभापासूनच विरोध केला होता.

भविष्यकथनामध्ये अनेकदा फसवणुकीचे प्रकार होत असल्यामुळेही त्याला विरोध होतो. उदा., ग्रीसमध्ये पुरोहित असलेल्या स्त्रीच्या तोंडून भविष्य वदविले जाई. परंतु तिच्या अंगात येण्यापूर्वीच तिने कोणते भविष्य सांगावयाचे ते ठरलेले असे. अशा पद्धतीने तेथील प्रमुख कुटुंबे आपली राजकीय सत्ता, प्रतिष्ठा व संपत्ती वाढवीत असत. भविष्यकथन हे उपजीवीकेचे एक साधन म्हणूनहीन वपरले जाते. भविष्य विचारणाऱ्या माणसाचे अज्ञान, मनोदौर्बल्य, असहायता, संकटग्रस्तता इत्यादींचे धूर्तपणे अवलोकन करुन त्याच्याकडून पैसे उकळले जातात. भविष्यकथनात फसवणुकीचे असे प्रकार होत असल्यामुळे यूरोप-अमेरिकेती काही ठिकाणी व अन्यत्रही भविष्यकथनाच्या काही प्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे.

भविष्यकथनामध्ये निरीक्षण, प्रयोग, नव्या संशोधनाच्या प्रकाशात जुन्या चुकांची दुरूस्ती इत्यादीचा अवलंब करणाऱ्या वैज्ञानिक पद्धतीला फारसे स्थान नसते. त्यामुळे विज्ञाननिष्ठ लोकांचाही त्याला विरोध आहे. सामान्यतः भविष्यकथनाच्या प्रक्रियेमध्ये सृष्टीतील वास्तव अशा कारणकार्यभावाचा अव्हेर केलेला असतो. उदा., विशिष्ट रोग व मृत्यू यांचा संबंध जोडण्याऐवजी धूमकेतूचे दर्शन व मृत्यू असा संबंध तेथे जोडलेला असतो. त्यामुळेच भविष्यकथनामध्ये स्वैर अशी प्रतीकात्मकता वा सूचकता यांना महत्व प्रात्प झालेले आहे. अनुमानाच्या बाबतीतही असेच घडते. उदा., पर्वतावरील धुरावरुन त्याच पर्वतावरील अग्नीचे ज्ञान होणे, ही अनुमानाची प्रक्रिया सर्वमान्य आहे. धुर व अग्नी यांच्यामध्ये निरपवाद साहचार्य असल्यामुळे व ते तपासून पाहता येत असल्यामुळे त्या बाबतीत अनुमानाने मिळालेले ज्ञान याथार्थ ठरते. परंतु भविष्यकथनामध्ये मात्र विशिष्ट अशा हस्तरेषेवरुन विशिष्ट असा लाभ वा हानी यांविषयीचे अनुमान केले जाते. परंतु या दोन घटनांमध्ये निरपवाद साहचर्य आहे की नाही, हे तपासून पाहिले जात नसल्यामुळे तेथील अनुमाने हेत्वाभासांनी दूषित झालेली असतात. भविष्यकथनाच्या तथाकथित शास्त्रांचे वेगवेगळ्या समाजातील पुरस्कर्ते व अनुयायी एकाच घटनेवरुन वेगवेगळे व प्रसंगी परस्परविरुद्ध असेही निष्कर्ष काढताना आढळतात. उदा., कावळयाचे ओरडणे संकटा सूचक आहे, असे इंग्लिश खेडूत मानत असतो तर भारतात तेच ओरडणे पाहुण्याच्या आगमनाचे द्दोतक मानले जाते. वैज्ञानिक सत्याचे स्वरुप असे असत नाही. विधवाविवाह, कुटुंबनियोजन, आरोग्याच्या सोयी, समाजसुधारणेच्या चळवळी, वैज्ञानिक प्रगती इत्यादींमुळे आधुनिक मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत. परंतु भविष्यकथनाची तथाकथित शास्त्रे या बदलांची दखल घेऊन आपल्या प्राचीन सिद्धांतांत विज्ञाननिष्ठ असा फारसा बदल करताना आढळत नाहीत वा आपल्या सिद्धांतांचे नव्याने मूल्यमापनही करीत नीहीत. शिवाय, भविष्यकथनामुळे अंधश्रद्धा, बुवाबाजी इत्यादींचेही पोषण होते.

अशा रीतीने अनेक पातळ्यांवरुन भविष्यकथनाला जोरदार विरोध असूनही भविष्यकथनाचे आकर्षण सर्वसामान्य मानवी मनातून कमी झालेले नाही. जगातील असंख्य वृत्तपत्रे दररोज व्यत्त्कींची राशिभविष्ये प्रसिद्ध करीत असतात. या विषयावर असंख्य पुस्तके आणि नियतकालिकेही प्रसिद्ध केली जात आहेत. अनेक ज्योतिष्यांचा हरघडी सल्ला घेतला जात आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोप आणि अमेरिका येथेही भविष्यकथनाचे आकर्षण वाढल्याचे दिसत आहे.

पहा : शकुनविचार.

संदर्भ : 1. Dumezil, G. Trans.Archaic Roman Religion, 2 Vols., 1970.

            2. Evans-Pritchard, E. E. Witchcraft, Oracles and Magic Among the Azande, Oxford, 1937.

            3. Flace-Liere, R.,Trans. Greek Oracles, Lond ‘n, 1965.

            4. Lessa, W.A.Chinese Body Divination: its forms, Affinities and Functions, Los Angeles, 1968.

            5. Lessa, W. A. Vogt, E. Z.Ed. Reader in Comparative Religion, New York, 1965.

            ६. गोपाणी, अ. स. संपा. दुर्गदेवाचार्यकृत रिष्टसमुच्चय, मुंबई, १९४५.

साळुंखे, आ. इ.