रोमन कॅथलिक पंथ : रोमन कॅथलिक हे जगातील सर्वांत मोठे ख्रिस्ती चर्च आणि सर्वांत मोठा धार्मिक समाज आहे. १९८०  मध्ये ४३७.४ कोटी लोकसंख्येपैकी १४३.३ कोटी (३२.८%) ख्रिस्ती होते. यांपैकी ८०.९ कोटी (५६.४५%) रोमन कॅथलिक व बाकीचे प्रॉटेस्टंट पंथीय व ईस्टर्न ऑर्थोडॉक्स आहेत (डी. बी. बॅरेट, वर्ल्ड ख्रिश्चन एन्‌साय्‌क्लोपीडिया, ऑक्सफर्ड, १९८२). भारतातील ख्रिस्ती लोकांपैकी बहुसंख्य रोमन कॅथलिक असून संपूर्ण भारतात रोमन कॅथलिकांचे १.०३ कोटी सभासद आहेत आणि त्यांपैकी महाराष्ट्रात ८ लक्ष सभासद आहेत.

जगात १९८२ मध्ये रोमन कॅथलिक चर्चमध्ये ३,८४४ बिशप ४,११,०७४ धर्मगुरु ९,५२,०४३ सेवाभगिनी (सिस्टर्स) आणि ७०,६२१ सेवाबंधू (ब्रदर्स) होते. त्यांपैकी भारतात १९८२ मध्ये रोमन कॅथलिक चर्चचे १२५ बिशप ११,९९१ धर्मगुरू ४९,९५६ सेवाभगिनी आणि २,८०१ सेवाबंधू होते (सी. बी. सी. आय्. प्रकाशित, दी कॅथलिक डिरेक्टरी ऑफ इंडिया, १९८४). ख्रिस्ताच्या सेवाधर्माने प्रेरित होऊन रोमन कॅथलिक चर्चच्या अनेकविध सेवासंस्था सर्व जगभर निर्माण झाल्या. रोमन कॅथलिक धर्मगुरू, सेवाभगिनी व सेवाबंधू हे सर्व ब्रह्मचर्याचे आमरण व्रत स्वीकारतात व अनेक शैक्षणिक संस्था, रुग्णालये, दवाखाने, वृद्धाश्रम, अनाथालये, महारोगनिवारण केंद्रे गृहप्रशिक्षण केंद्रे इ. चालवीत असतात.

‘कॅथलिक’ हा शब्द ग्रीक शब्द ‘काता’ (सर्व भाग व्यापून सर्व समाविष्ट करून) आणि ‘होलोन’ (म्हणजे पूर्ण) यांपासून आला आहे. म्हणून ‘कॅथलिक’ या शब्दाचा अर्थ ‘सार्वजनिक’ किंवा ‘जागतिक’ असा होतो. ‘रोमन’ शब्द असे दर्शवितो, की येशू ख्रिस्ताने आपल्या बारा धर्मदूतांचा म्हणजे ⇨ अपॉसल्सचा नेता म्हणून नेमणूक केलेल्या सेंट पीटरचा वारस ⇨ पोप हाच रोमचा ⇨ बिशप असून रोमन कॅथलिकांचा प्रमुख धर्मगुरू असतो.

कॅथलिक चर्चचा इतिहास : येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि ⇨ पुनरुस्थान जेथे झाले, त्या जेरूसलेममधील ज्यू लोकांमध्ये ख्रिस्ती चर्चची सुरुवात झाली. पहिल्या शतकातच येशूने निवडलेल्या शिष्यांनी पश्चिम आशियात, भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील देशांत व दक्षिण भारतातही या चर्चचा प्रसार केला. पहिली तीन शतके ख्रिस्ती समाजाचा खूचच छळ झाला कारण ख्रिस्ती लोक रोमन साम्राज्याचे दैवीपण मानीत नव्हते. कॉन्स्टंटीन सम्राटाने (कार. ३०६-३७) चर्चला ३१३ मध्ये स्वातंत्र्य बहाल केले. या सम्राटामुळे चर्च व राज्य यांत जवळीक निर्माण झाली. वेगवेगळ्या देशांत कमीअधिक फरकाने हेच घडले. या काळाचा शेवट ⇨ फ्रेंच राज्यक्रांतीने (१७८९) झाला. कॉन्स्टंटीनच्या नंतरच्या काळात कॉन्स्टँटिनोपलला (सध्याचे इस्तंबूल) वाढत्या राजकीय महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. हळूहळू काही अंतर्गत समस्यांमुळे अकराव्या शतकात ख्रिस्ती चर्चमध्ये बहुतेक पश्चिम लॅटिन (रोम) आणि बहुतेक पूर्व ग्रीक (कॉन्स्टँटिनोपल) अशी दुफळी झाली. ऐक्याचे अनेक प्रयत्न करूनही ही दुफळी आजपर्यंत कायम राहिली आहे. अशीच एक दुफळी १३७७ ते १४१७ पर्यंतच्या काळात रोमच्या कॅथलिक चर्चमध्ये झाली होती मात्र ही महान दुफळी (ग्रेट सीझम) सुदैवाने लवकरच नाहीशी झाली.

कॅथलिक चर्चने मठांद्वारे पाश्चिमात्य ख्रिस्ती संस्कृतीचा पाया घातला परंतु कालांतराने चर्च श्रीमंत झाले आणि बरेच धार्मिक पुढारी धार्मिक बाबींपेक्षा भौतिक संपत्तीची आणि कलेचीच काळजी वाहू लागले. परिणामतः प्रॉटेस्टंट चळवळ उदयास आली. बहुतेक उत्तर यूरोप कॅथलिक चर्चपासून विभक्त झाला. शिकवणुकीच्या बाबतीत प्रॉटेस्टंट लोकांनी केवळ विश्चास, केवळ बायबल व केवळ कृपा (ग्रेस) यांवरच भर दिला आणि दुसऱ्या बाजूस कॅथलिकांनी विश्वास आणि कार्ये. बायबल आणि परंपरा, कृपा आणि मानवी सहकार्य यांवर भर दिला. पहिली भूमिका भावातीत परमेश्वराकडे लक्ष देते, तर दुसरी भूमिका देव व मानवाचा देवास प्रतिसाद यांकडे लक्ष केंद्रित करते. मध्ययुगीन काळात राज्य व चर्च एकत्र येऊन धर्माबाबत वेगवेगळा विश्वास व्यक्त करणाऱ्यांचा विरोध करू लागले व कधीकधी शक्तीचा शोचनीय वापरही करु लागले. त्यासाठी अमलात आणले गेलेले ⇨ इन्क्विझिशन जर्मनीमध्ये सोळाव्या शतकात, तर स्पेन व पोर्तुगालमध्ये थेट एकोणिसाव्या शतकात संपुष्टात आले.


प्रॉटेस्टंट क्रांती उदयास यायच्या अगोदरसुद्धा धर्मसंघांच्या (रीलिजस ऑर्डर्स) साहाय्याने कॅथलिकांचे नूतनीकरण सुरू झाले होते. प्रॉटेस्टंट क्रांतीच्या आधी बेनेडिक्टिन संघ (सहाव्या शतकात), फ्रान्सिस्कन व  डॉमिनिकन (बाराव्या शतकात) असे मोठे धार्मिक संघ होते. प्रॉटेस्टंट क्रांतीच्या काळात ⇨ जेझुइट संघ (सोळाव्या शतकात) स्थापन झाला. धर्मप्रसाराच्या कार्याद्वारे सोळाव्या शतकापासून मध्य व दक्षिण अमेरिका कॅथलिक झाले आणि जगातील इतर काही भागांत कॅथलिक धर्मसमाज प्रस्थापित करण्यात आले. यानंतरच्या शतकात रोमन कॅथलिक चर्चला कॅथलिक राजे व सम्राटांविरुद्ध लढा द्यावा लागला. नव्या प्रबोधनाचे आगमन, बुद्धिवाद वा ⇨ विवेकवा (रॅशनॅलिझम), ⇨ प्रत्यक्षार्थवाद (पॉझिटिव्हिझम) आणि आधुनिक विज्ञान यांनी प्राचीन धर्मांना व रोमन कॅथलिक चर्चलाही आव्हानच दिले होते. निरीश्वरवादी असलेला साम्यवाद सर्व धर्मांच्या आणि म्हणूनच कॅथलिक चर्चच्याही विरोधात आहे [⟶ प्रबोधनकाल, मार्क्सवाद].

आपल्या अधिकाराची अंमलबजावणी करण्याच्या पोपच्या पद्धतीत अनेक शतकांच्या कालावधीत हळूहळू वाढ झाली बदल झाला. पहिल्या व्हॅटिकन परिषदेने (१८६९-७०) जाहीर केले, की काही विशिष्ट संदर्भात पोपच्या अधिकारात दिलेली शिकवण बिनचूक आहे, याचा अर्थ मात्र असा होत नाही, की ते स्वतः जीवनात चुकू शकत नाहीत किंवा त्यांच्याकडून पाप घडू शकत नाही. दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेने (१९६२-६५) पहिल्या व्हॅटिकन परिषदेतील ह्या ठरावास दुजोरा दिला आणि पुढे असेही सांगितले, की पोपसह सर्व बिशपांनाही ह्या अधिकारात वाटा आहे.

वेगवेगळ्या काळांत पोपवर वेगवेगळा राजकीय परिणाम होत होता. अनेक वेळा राजेसम्राटांच्या आज्ञांमुळे व राज्य आणि चर्चचे निकटचे संबंध असल्यामुळे राजकीय सत्तेपासून चर्चला स्वतंत्र राहता आले नाही. चर्चला दिलेल्या जमिनीच्या देणग्यांतून-विशेषतः मध्य इटलीमध्ये-पोपची राज्ये (पेपल स्टेट्स) प्रस्थापित होऊन वाढत गेली. राज्याचे प्रमुख म्हणून पोप हे प्रादेशिक राज्यकर्तेही होते. १८७० मध्ये पोपची राज्ये इटली राज्यात विलीन करण्यात आली. १९२९ च्या ‘लॅटरन करारा’ द्वारे व्हॅटिकन राज्य ⇨ व्हॅटिकन सिटी प्रस्थापित झाले आणि पोप व इटली यांतील वाद मिटविण्यात आला. पोपचे स्वतंत्र राज्यही असल्याने त्यांचे प्रतिनिधी (पेपल नुन्शियो) वेगवेगळ्या राजधान्यांत आढळतात.

अनेकदा रोमन कॅथलिक चर्चने नवीन काळाच्या आवाहनांना तोंड देताना बचावात्मक भूमिका स्वीकारलेली होती परंतु दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेने जागतिक मूल्यांची उघडपणे चर्चा करण्याची चळवळ पुढे आणली. चर्चच्या इतिहासात प्रथमच बिशपांच्या या परिषदेमध्ये वैविध्यपूर्ण असलेल्या संपूर्ण जगाचे प्रतिनिधित्व होते. मध्य यूरोप व आफ्रिकेतील बिशपांकडून या परिषदेत प्रामुख्याने पुरोगामित्वाचा जोरदार पुरस्कार झाला.

सध्या कॅथलिक लोकांमध्ये रोमन कॅथलिकांशिवाय ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च, अँग्लिकन, जुने कॅथलिक (पहिल्या व्हॅटिकन परिषदेनंतर रोमन कॅथलिकांपासून विभक्त झालेला लहानसा गट) आणि इतर काही प्रॉटेस्टंट चर्च यांचा समावेश करतात. रोमन कॅथलिकांमध्ये उपासनापद्धती व विधींच्या फरकाप्रमाणे वेगवेगळे गट आहेत. पूर्वी लॅटिन भाषा व उपासनापद्धत अवलंबिणाऱ्यांचा सर्वांत मोठा गट होता मात्र आता या लॅटिन गटातल्या लोकांना प्रादेशिक भाषांतून उपासना करता येते. भारतात लॅटिन उपासनापद्धतीशिवाय कॅथलिक सिरो-मलबार आणि सिरो-मलंकार उपासनापद्धती केरळ भागात आढळतात [⟶ मार्थोमाइट पंथ (चर्च)].

रोमन कॅथलिक शिकवण आणि जीवन: रोमन कॅथलिक स्वतःस येशू ख्रिस्ताने आणि त्याच्या धर्मदात्यांनी बायबलमधून दिलेल्या शिकवणुकीचे जतन करणारे आहोत असे समजतात व या अर्थाने ते स्वतःस ‘सनातनी’ मानतात. याच संदर्भात बायबलचे नियमसिद्ध मूळ ग्रंथ (कॅनॉनिकल बुक्स) कोणते, हे कॅथलिक चर्चने ठरविले आहे. ते ⇨ख्रिस्ती संतांच्या ठायी, तसेच येशूची आई ⇨ मेरी हिच्या ठायी आदर दाखवितात. ते धार्मिक पुतळे व चित्रे यांचाही वापर करतात परंतु संतांची व पुतळ्यांची पूजा मात्र करीत नाहीत. चर्चही अधिकृतपणे कुटुंबनियोजनाच्या नैसर्गिक पद्धतीस उत्तेजन देते, तर कृत्रिम साधनांच्या वापराबद्दल मात्र विरोध दर्शविते. बाप्तिस्मा, दृढीकरण, प्रायश्चित्त, ख्रिस्तप्रसाद अथवा प्रभुभोजन, विवाह, गुरुदीक्षा व अंत्यविधी असे एकूण सात संस्कार कॅथलिक चर्चमध्ये मानले जातात. त्यांपैकी ख्रिस्तप्रसाद ⇨ युखरिस्ट ही कॅथलिकांची प्रमुख उपासना आहे. ही उपासना फक्त कॅथलिक धर्मगुरूच करू शकतात व इतर सभासद तीत सहभागी होतात.


दलित, उपेक्षित व गरीब बांधवांच्या मुक्तीसाठी चर्च प्रोत्साहन देते. ही गोष्ट विशेषतः दक्षिण अमेरिकेत दिसून येते. त्याचप्रमाणे ख्रिस्तेतर धर्मियांबरोबर घडून आणलेल्या सुसंवादाद्वारे प्रत्येक संस्कृतीतील सत्यम्, शिवम्, सुंदरमची जपणूक करण्यास चर्च प्रोत्साहन देते. आजच्या काळातील कॅथलिकांची ही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. सर्व ख्रिस्ती चर्चमध्ये ख्रिस्ती ऐक्याची चळवळ दृढ होत आहे.

अकराव्या शतकातील रोमन कॅथलिक आणि ईस्टर्न-ऑर्थोडॉक्स चर्च यांमधील बहिष्कार उठविण्यात आला आहे आणि हे ऐक्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. रोमन कॅथलिक व अँग्लिकन, तसेच रोमन कॅथलिक आणि ल्यूथरन यांच्या  एकत्रित होणाऱ्या अधिकृत सभांमधून असे दिसून येते, की या मंडळांमध्ये सोळाव्या शतकात असलेले मूलभूत मतभेद आता जवळजवळ राहिलेले नाहीत. उर्वरित काही मतभेदांवर सध्या त्यांच्यात विचार चालू आहे. यामुळे सर्व ख्रिस्ती मंडळांमध्ये अधिकाधिक ऐक्य घडून येण्याची आशा निर्माण झाली आहे.

पहा : ख्रिस्ती धर्म ख्रिस्ती धर्मपंथ धर्मसुधारणा आंदोलन प्रॉटेस्टंट.  

संदर्भ : 1. Adam, Karl, The Spirit of Catholicism, New York, 1962.

           2. Daniel-Rops, Henri, History of the Church of Christ, Vols. 1-15, New York, 1962-67.

           3. Rahner, Karl and others, Ed. Sacramentum Mundi, An Encyclopaedia of Theology, Vols. 1- 16. Bangalore, 1975.

           ४. लेदर्ले, मॅथ्यू रा. ख्रिस्तमंडळाचा संक्षिप्त इतिहास, पुणे, १९६३.

लेदर्ले मॅथ्यू आयरन, जे. डब्ल्यू.  (इं) साळवी, प्रमिला (म).