कापालिक: वाममार्गाने उपासना करणारा एक प्राचीन शैव पंथ. ‘कपाली ’ म्हणजे माणसांच्या मस्तकाची कवटी धारण करणारा शिव आणि त्याचे उपासक ते ‘कापालिक’. श्रीशैलम् पर्वत कापालिकांचे मुख्य केंद्र असल्याचा उल्लेख मालतीमाधवात आहे. ते माणसाची कवटी जवळ बाळगतात आणि त्यातूनच अन्न, मद्य-मांस इत्यादींचे सेवन करतात. या बाबतीत दहाव्या ते तेराव्या शतकांत दक्षिण भारतात प्रचलित असलेल्या ‘कालामुख ’ नावाच्या शैव पंथाशी त्याचे साम्य आहे. तथापि कालामुख पंथ कापालिक पंथाइतका अघोरी नव्हता. [→ अघोरी पंथ]. नरबली, स्मशानवास, मद्य-मांस सेवन हाच कापालिकांचा मुख्य आचार. महाभैरव, चामुंडा इ. उग्र देवतांचे ते उपासाक असल्यामुळे त्यांच्या देवतांना मद्य-मांसाचाच नैवेद्य लागतो. ⇨ हठ योगातही ते प्रवीण होते. ‘महाव्रतधर’ म्हणून त्यांचा शिव पुराणात उल्लेख आहे. दुसऱ्या पुलकेशीचा पुतण्या नागवर्धन् याच्या सातव्या शतकातील एका ताम्रपटात ह्या महाव्रतींच्या चरितार्थासाठी इगतपुरीजवळचे (जि. नाशिक) एक खेडे दान दिल्याची नोंद आहे. पुराणे, बृहत्संहिता, कथासरित्सागर आणि शांकर दिग्विजय ह्या ग्रंथांतून तसेच मालतीमाधव, प्रबोधचंद्रोदय इ. नाटकांतून कापालिकांबाबत विस्तृत वर्णने आढळतात.

पहा : तंत्रमार्ग व तांत्रिक धर्म.

सुर्वे, भा. ग.