पास्काल, ब्लेझ : (१९ जून १६२३ – १९ ऑगस्ट १६६२). फ्रेंच गणितज्ञ, भौतिकीविज्ञ व धार्मिक तत्त्ववेत्ते. त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेमुळे आधुनिक विचारवंतांमधील त्यांचे स्थान अनन्यसाधारण गणले जाते. त्यांचा जन्म क्लेरमाँ-फेरँ येथे झाला. १६२६ मध्ये त्यांची आई मृत्यू पावली व १६३१ मध्ये पास्काल कुटुंबाने पॅरिसला प्रयाण केले.

ब्लेझ पास्काल

 त्यांचे वडील उत्तम गणितज्ञ होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच पास्कार अभ्यास न करता प्रथम लॅटिन व ग्रीक भाषांवर प्रभुत्व मिळवावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. तथापि वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांनी भूमितीच्या अभ्यासास सुरुवात केली व चौदाव्या वर्षापासून ते वडिलांसह रोबेर्व्हाल, मेर्सेन इ. भूमितिविज्ञांच्या साप्ताहिक बैठकींना हजर राहू लागले. १६३९ मध्येच त्यांनी ‘शांकवामध्ये [⇨ शंकुच्छेद] अंतर्लिखित केलेल्या षट्कोनाच्या विरुद्ध बाजूंच्या जोड्यांचे छेदबिंदू एकरेषीय असतात’ हे आता त्यांच्याच नावाने ओळखण्यात येणारे व प्रक्षेपय भूमितीत [⇨ भूमिति] महत्त्वाचे म्हणून मानण्यात येणारे प्रमेय मांडले. १६४० साली पास्काल कुटुंब रूआन येथे गेले. त्याच वर्षी त्यांनी झेरार देझार्ग (१५९१ – १६६१) या भूमितिविज्ञांच्या Brouillon project या ग्रंथाच्या आधारे शांकवांवरील निबंधांचा एक ग्रंथ (Essai pour les coniques) लिहून पूर्ण केला. या असामान्य ग्रंथामुळे त्यांना लहान वयातच पुष्कळ प्रसिद्धी लाभली व देकार्तसारख्या गणितज्ञांना सुद्धा त्यांचा हेवा वाटला.

वडिलांच्या हिशेबाच्या कामात मदत करण्याच्या उद्देशाने पास्काल यांनी बेरीज व वजाबकी करणारे एक यंत्र तयार करण्याची योजना १६४२ मध्ये आखली हे यंत्र तयार करण्याचा व त्याचे वितरण करण्याचा एकाधिकार त्यांना १६४९ मध्ये प्राप्त झाला, तथापि ते महाग व क्लिष्ट असल्याने त्याचा फारसा प्रसार होऊ शकला नाही.

एव्हांजेलिस्ता टोरिचेल्ली (१६०८-४७) यांनी पाऱ्याच्या वायुदाबमापकांसंबंधी केलेल्या प्रयोगांची माहिती १६४६ मध्ये मिळाल्यावर पास्काल यांनी निरनिराळ्या उंचीवर वायुदाबमापकातील पाऱ्याच्या उंचीचे निरीक्षण केले व वाढत्या उंचीबरोबर वातावरणीय दाब कमी होत जातो, असा निष्कर्ष काढला. तसेच ‘स्थिर द्रायूमधील (द्रव वा वायूमधील) एखाद्या बिंदूपाशी बाह्य दाब लावला असता तो सर्व दिशांना सारखाच प्रेषित होतो’, हा ⇨ द्रायुयामिकीतील त्यांच्या नावाने ओळखण्यात येणारा महत्त्वाचा नियम मांडला. वायुदाबमापकातील पाऱ्याच्या वर निर्वात (पोकळी) असतो असे त्यांनी प्रतिपादन केले व त्यासंबंधी त्यांचा ई. नोएल यांच्याबरोबर वादविवादही झाला. या संदर्भात पास्काल यांनी एखाद्या गृहीतकाची परीक्षा पाहण्यासंबंधीच्या अटींविषयी केलेले विवेचन वैज्ञानिक पद्धतीच्या इतिहासात उद्‍बोधक ठरले आहे. एखादाच विरोधी आविष्कारसुद्धा गृहीतकाच्या असत्याचा पुरावा म्हणून पुरेसा आहे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी द्रायुस्थितिकीचे (स्थिर द्रायूंच्या गुणधर्मांच्या शास्त्राचे) नियम व हवेच्या वजनामुळे होणारे विविध परिणाम यांसंबंधीचा एक ग्रंथ १६५४ च्या सुरुवातीस लिहून पूर्ण केला परंतु तो त्यांच्या मृत्यूनंतर १६६३ मध्ये प्रसिद्ध झाला.

त्यांनी १६५४ मध्ये अंकगणितीय त्रिकोणाचा [(क+ख)न याच्या विस्तारातील सहगुणकांनी बनलेल्या संख्यांच्या त्रिकोणाकार मांडणीचा न=०,१,२,…] अंकगणित व ⇨ समचयात्मक विश्लेषण यांतील प्रश्नांच्या संदर्भात सखोल अभ्यास केला. हा त्रिकोण ‘पास्काल त्रिकोण’ याच नावाने ओळखण्यात येतो. याविषयी त्यांनी लिहिलेला Trait du triangle arithmetique हा ग्रंथ व त्यांनी प्येअर द फेर्मा (१६०१-६५) या गणितज्ञांबरोबर केलेला पत्रव्यवहार यांच्याद्वारे त्यांनी संभाव्यता कलनशास्त्राचा [⇨ संभाव्यता सिद्धांत] पाया घातला.

कॉर्नेलिस यानसेन (१५८५-१६३८) या धर्मशास्त्रवेत्त्यांच्या अनुयायांबरोबर १६४६ साली त्यांचा निकटचा संबंध आला व त्यामुळे यानसेन यांच्या शिकवणुकीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. त्यांची बहीण १६५१ मध्ये त्यांच्या इच्छेविरुद्ध पोर्ट रॉयल येथे मठवासिनी (नन) झाली. १६५२-५४ या काळात पास्काल यांचे धार्मिक गोष्टींवरील लक्ष उडाले आणि त्यांनी हा काळ जुगारी व बदफैली लोकांच्या संगतीत घालविला. तथापि या आयुष्याला व पराकाष्ठेच्या वैज्ञानिक कार्याला कंटाळून पुन्हा त्यांना धार्मिक बाबींमध्ये रस उत्पन्न झाला. २३ नोव्हेंबर १६५४ रोजी त्यांना आलेल्या गूढ धार्मिक अनुभवामुळे (nauit de feu) वैज्ञानिक कार्य सोडून देऊन चिंतन व धार्मिक कार्य यांनाच वाहून घेऊन यानसेन पंथाच्या अनुयायांना लेखाद्वारे व अन्य प्रकारे मदत करण्याचा त्यांनी निश्चय केला. तथापि १६५८ मध्ये त्यांनी चक्रजासंबंधीचा (एका सरळ रेषेवरून फिरत जाणाऱ्या वर्तुळाच्या परिघावरील एका बिंदूद्वारे रेखाटल्या जाणाऱ्या वक्रासंबंधीचा) आपला प्रबंध लिहिला. त्यामध्ये त्यांनी चक्रजाचे अनेक गुणधर्म आणि चक्रज अक्षाभोवती, पायाभोवती व शिरोबिंदूजवळील स्पर्शरेषेभोवती फिरविला असता तयार होणाऱ्या भ्रमण प्रस्थांचे (घनाकृतींचे) गुणधर्म चर्चिले होते. त्यामध्ये पास्काल यांनी वापरलेली पद्धत बरीचशी सध्या वापरात असलेल्या समाकलन पद्धतीशी [⇨ अवकलन आणि समाकलन] जुळणारी आहे. १६५४ नंतर ते पोर्ट रॉयल येथेच स्थायिक झाले.


तात्त्विक व धार्मिक विचार : २३ नोव्हेंबर १६५४ च्या रात्री त्यांना गूढानुभव येऊन जो ईश्वरी साक्षात्कार झाला त्यामुळे पास्काल यांच्या विचारात आमूलाग्र परिवर्तन घडून आले. वैज्ञानिक आणि गणितीय संशोधनाकडे पाठ फिरवून ते धर्मशास्त्राकडे वळले. बुद्धीऐवजी आता त्यांच्या विचारांचा आधार श्रद्धा बनली व ते ख्रिस्ती धर्माचे कट्टर अनुयायी बनले. रोमन कॅथलिक चर्चच्या परंपरेतील यानसेन पंथाचे ते पुरस्कर्ते होते. यानसेन पंथाचे कट्टर पुरस्कर्ते आंत्वान आर्नो (१६१२-९४) ह्यांच्याविरुद्ध जेझुइटांनी पाखंडी म्हणून जे आरोप केले होते, त्यांचा आंत्वान आर्नो यांची बाजू घेऊन पास्काल यांनी जाहीर समाचार घेतला. त्यांनी एकूण १८ पत्रे (पँफ्लिट्स) ओळीने प्रसिद्ध केली. ती Lettres provincials (१६५६-५७) नावाने प्रसिद्ध झाली. यांतील पहिली चार पत्रे व शेवटची दोन पत्रे यांत आर्नोची म्हणजे यानसेन पंथाची बाजू मांडलेली असून धर्मशास्त्राच्या दृष्टीने ती फारशी महत्त्वाची नाहीत. उर्वरित बारा पत्रांमध्ये मात्र जेझुइटांच्या नीतिविरोधी कृत्यांना व विचारांना वाचा फोडली असून ती धर्मशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. पास्काल यांची ही पत्रे त्या वेळी अतिशय गाजली व एक उत्कृष्ट गद्यशैलीकार म्हणून त्यांची कीर्तीही झाली. पास्काल यांनी ह्या पत्रांतून जेझुइटांवर केलेला हल्ला इतका जबरदस्त होता की, त्यातून ते सावरू शकले नाहीत.

यानंतर पास्काल यांनी केलेले तात्त्विक-धार्मिक स्वरूपाचे विपुल लेखन त्यांच्या मरणोत्तर प्रसिद्ध झालेल्या Pensees de M. Pascal sur la religion et sur quelques autres sujets (१६७०) ह्या नावाच्या ग्रंथात संकलित आहे.

पास्काल यांच्या तात्त्विक-धार्मिक विचारांचे सार असे :पास्काल यांचे तत्त्वज्ञान धार्मिक होते. मानवी विवेकशक्तीचे कार्य अंतिम तत्त्वांपासून प्राप्त होणारे सिद्धांत निगमनाने निष्पन्न करून घेणे हे असते पण ही अंतिम तत्त्वे विवेकशक्ती प्रस्थापित करू शकत नाही. ती हृदयालाच प्रतीत होतात आणि त्यांचा श्रद्धेनेच स्वीकार करावा लागतो, पण विवेकाची ही मर्यादा माणूस ओळखतो आणि विवेकापलीकडे, निसर्गापलीकडे जाऊन श्रद्धेची, ईश्वराची कास धरण्याची आकांक्षा त्याला असते, ह्यात माणसाची थोरवी आहे. जे श्रद्धेचा स्वीकार करतात, ते तो ईश्वरी अनुग्रहामुळे करतात आणि जे श्रद्धेकडे पाठ फिरवितात तेही विवेकनिष्ठतेमुळे तसे करीत नाहीत, तर केवळ वासनांच्या ओढीमुळे तसे करतात. धार्मिकतेचा आणि श्रद्धेचा स्वीकार विवेकातीत निर्णयावर आधारलेला असतो, ह्या पास्काल यांच्या मतामुळे अस्तित्ववादाच्या जनकांमध्ये त्यांची गणना करणे योग्य ठरते.

पास्काल यांना १६५८ पासून मस्तकातील वेदनांचा वाढता त्रास होऊ लागला तथापि त्यानंतरही त्यांनी काही धार्मिक लेखन केले व १६६१ मध्ये पॅरिस येथे सार्वजनिक वाहतुकीची योजना कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने त्या योजनेत सक्रिय भाग घेतला, ते पॅरिस येथे मृत्यू पावले.

संदर्भ : 1. Broome, J.H. Pascal, New York, 1966 2. Mesnard, J. Trans. Fraser, G.S. Pascal : His Life and Works, New York, 1952. 3. Webb, Celment C.J. Pascal’s Philosophy of Religion, London, 1929.

ओक, स.ज. रेगे, मे.पुं.