थुश्त्र :  पारशी (जरथुश्त्री) धर्माचा संस्थापक. झरथुष्ट्र वा झोरोऑस्टर अशीही त्याची नावे रूढ आहेत. जरथुश्त्र नेमका कोणत्या कालखंडात होऊन गेला, याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही तथापि अवेस्ता साहित्याबाबत झालेल्या आधुनिक लिखाणावर विसंबून त्याचा काळ काही यूरोपीय विद्वान इ. स. पू. ६५० च्या सुमारास असावा असे मानतात. काही प्राचीन ग्रीक लेखक मात्र त्याचा काळ इ. स. पू. सु. ६२०० किंवा त्याच्याही आधीचा गृहीत धरतात. अवेस्ता  धर्मग्रंथातील ‘गाथा’ नावाचा अध्यात्म विद्या संपन्न जो मंत्रविभाग आहे, तो ऋग्वेदातील सूक्तांच्या समकालीन असल्याचा अभिप्राय अनेक विद्वानांनी व्यक्त केला आहे. ह्या गाथांचा जरथुश्त्र उद्‌गाता आहे. म्हणूनच ह्या गाथांचा आणि जरथुश्त्राचा काल ऋग्वेद  संहिते इतका प्राचीन असल्याचे गृहीत धरले जाते. विविध पुराव्यांचा व प्रमाणांचा साधक बाधक विचार करता, स्थुलमानाने जरथुश्त्र प्रणीत गाथांचा रचनाकाल इ. स. पू. सु. १५०० वर्षे मानावयास हरकत नाही.

अवेस्तामधील गाथांमध्ये वा अन्य प्रकरणांत जरथुश्त्राच्या जीवनाची समग्र माहिती उपलब्ध होत नाही तथापि जरथुश्त्र इराणच्या वायव्येस असणाऱ्या आझारबैजान प्रांतातील रे नावाच्या गावी फरवरदिन महिन्यातील खोर्दादच्या दिवशी (पारशी नूतन वर्षदिन) जन्मला.  त्याच्या पित्याचे नाव पोरुउषस्प, आईचे नाव दोग्धो किंवा दोग्धोवा आणि कुलनाम स्पितम होते, ही पारंपारिक माहिती सर्वमान्य आहे. जरथुश्त्राच्या 

जरथुश्त्र

वैवाहिक जीवनाबद्दल फारशी सर्वमान्य प्रमाणभूत माहिती मिळत नाही तथापि तो गृहस्थाश्रमी होता आणि त्याच्या पत्नीचे नाव ‘हवोवी’ होते, असे अवेस्ता ग्रंथावरून दिसून येते. ‘गाथा’–यस्न २९⋅१ मध्ये असे म्हटले आहे, की ‘भूमातेच्या आत्म्याने (गँऊश् उर्वा) आक्रंदन करून परमेश्वराकडे अशी तक्रार केली, की पृथ्वीवर खूप पाप व अनीती बोकाळली आहे. म्हणून ह्या पापापासून व विनाशापासून सृष्टीचे रक्षण करण्यासाठी कोणीतरी त्राता, मुक्तिदाता पाहिजे.  हे परमेश्वरा (अहुर मज्दा), तुझ्याशिवाय आता दुसरा कोणीच त्राता नाही’.  भगवद्‌गीता  (४·७, ८) व भागवत (१०·१·१७, १८) यांतील विचारांशी व भावनांशी प्रस्तुत वचन अगदी मिळतेजुळते आहे. जरथुश्त्राचा उदय होण्यापूर्वी इराणी प्रजेत धर्माच्या नावाखाली अज्ञान मूलक, विवेकहीन, भोळसट धार्मिक कल्पना तसेच दंभ, बाह्यावडंबर, अंधश्रद्धामूलक तामसी आचारविचारांना ऊत आला होता. मंत्रतंत्र, भूतपिशाच, जादूटोणा व क्षुद्र विचारांची आणि तदानुषंगिक आचाराची जबरदस्त पकड जनमानसावर होती. सत्य, अहिंसा व परोपकारमूलक विशुद्ध आणि निर्मल आचारविचारास इराणी प्रजा मुकली होती आणि दिवसेंदिवस दंभाचाराचे प्राबल्य माजत चालले होते. धर्माच्या शाश्वत, उच्च आणि उदात्त मुल्यांची पायमल्ली होऊन, धर्माच्या नावाखाली अधर्माचे प्राबल्य माजले होते. त्याकाळी पुरोहित वर्गाचा आम जनतेवर पगडा बसला असल्याने धर्माच्या नावाखाली क्षुद्र व हीन आचारविचाराच्या कर्दमात दिवसेंदिवस इराणी प्रजा रुतत चालली होती. राजेरजवाडे आणि धनाढ्य व मांडलिक वर्गांवरही पुरोहित वर्गाचा चवरचष्माहोता. आसुरी आणि क्षुद्रशक्ती यांवर प्रजेचा जबरदस्त विश्वास होता. क्षुद्रदेवतांची आपणावर अवकृपा होऊ नये म्हणून, त्यांची कृपा संपादन करण्यासाठी हीन धर्माचाराने, कोपलेल्या क्षुद्रशक्तींना सर्वतोपरी संतुष्ट ठेवण्यात धन्यता वकृतार्थता मानली जात असे. जीवनाची विशालता आणि भव्यता यांपासून आमजनता वंचित झाली होती. जरथुश्त्राचा उदय होण्यापूर्वी इराणी प्रजेचे अशा प्रकारे अधःपतन झाले होते.  पुरोहित वर्ग जरथुश्त्राच्या विरोधी होता. त्यामुळे आपल्या सद्धर्माचे बीजारोपण करताना जरथुश्त्रास सामाजिक रोषास तोंड द्यावे लागले व छळही सोसावा लागला. तरीही त्याने आपले व्रत सोडले नाही. इराणी जनतेस उदात्त एकेश्वरवादाची शिकवण दिली सदाचार, सुविचार आणि सत्कृतीयांचे दैनंदिन जीवनात परिपालन करण्याची प्रेरणा देऊन मन:शांती आणि शाश्वत स्थिरसुख प्राप्त होण्यासाठी सदाचार संपन्न विशुद्ध जीवन जगण्यास शिकविले.

जरथुश्त्राने आपल्या आयुष्यातील आरंभीची वर्षे आत्मचिंतनात व अहुरमज्दापासून ज्ञान व प्रेरणा घेण्यातवेचली.  ‘यस्न’ ३३⋅६मध्ये अहुरमज्दाचे दर्शन घेण्याची व त्याच्याशी संभाषण करण्याची जरथुश्त्राची तळमळ किती पराकाष्ठेस पोहोचली होती, हे स्पष्टपणे प्रतिबिंबित होते.

अहुर मज्दाची कृपा संपादन करण्सासाठी जरथुश्त्राने दहा वर्षे एकांतात घालविली, आत्मचिंतन केले, परमात्म्याशी संवादही केला. आपली दुःखे, व्यथा आणि मनीषा परमात्मचिंतनात असता वा प्रार्थनारूपे त्याने अहुर मज्दास सांगितल्या. अहुर मज्दाची कृपा संपादन करून त्याने आत्मोद्धार साधला व दैवी प्रेरणेनुसार लोकोद्धाराच्या कार्यास प्रारंभ केला. परमात्मचिंतनात असताना जी उदात्त तत्त्वे व गूढविचार जरथुश्त्रास स्फुरले ते ‘गाथा’ रूपाने अवेस्ता वाङ्‌मयात प्रसिद्ध आहेत. औपनिषदिक विचारांची गाढ छाया त्यावर पडली आहे.

जरथुश्त्राने प्रत्यक्ष अहुर मज्दाशी आत्मसंवाद प्रस्थापित करून ज्ञान प्राप्त करून घेतले आणि शाश्वत व त्रिकालाबाधित सैद्धांतिक मार्गदर्शन मिळविले, हे ‘गाथा’–यस्न ४४ वरून स्पष्ट होते. सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त झाल्यावर लोकांना आपल्या नव्या धर्माचा उपदेश करण्याची पात्रता अंगी आल्याचा आत्मविश्वास जरथुश्त्रास वाटू लागला. दैन्य, दुःख, उद्वेग, नैराश्य इत्यादींमुळे हतप्रभ झालेल्या तत्कालीन मानवी जीवनात नवीन आशा, विश्वास व प्रकाश आणण्याचा प्रयत्न जरथुश्त्राने केला. दैवीजीवनापासून वंचित न होता स्वतःच्या सुखासाठी आत्मविश्वास बाळगून मनुष्यमात्रास आत्मनिर्भर होण्यास त्याने शिकविले. लोकांना जागे करून सदाचरणाची महती पटविण्याचा तो प्रयत्न करतो तसेच पशुबली देणे, पशूंचा छळ करणे आणि सोमपान (होमपान) करणे यांचा उपदेश करणाऱ्या तत्कालीन खोट्या धर्मगुरूंपासून सावध राहण्याचाही इशारा तो लोकांना देतो. त्याच्या ह्या दिव्य उपदेशाकडे लोक सुरुवातीस लक्ष देत नाहीत तथापि ईश्वरावर अढळ श्रद्धा ठेवून तो आपले विहित कार्य, लोकांच्या उदासीनवृत्तीची आणि धर्ममार्तंडांच्या विरोधाची पर्वा न करता, अविरतपणे करत राहतो. त्याला अहुर मज्दाची सक्रिय मदत आणि मार्गदर्शन लाभते.


आत्मनिर्भर होण्याचा दैवी संदेश व उपदेश ऐकण्यासाठी जरथुश्त्राकडे जवळचे, लांबचे, इराणच्या कानाकोपऱ्यातील सारे लोक येत असत. जे जे मी सांगतो त्याचा विचार करा, त्यावर मनन करा, असे तो म्हणे. त्याच्या शिकवणीत विवेक आणि विचारस्वातंत्र्य अभिप्रेत आहे. सुरुवातीसुरुवातीस त्याच्या उपदेशास चांगला प्रतिसाद न मिळाल्याने त्याचे प्रयत्न निष्फळ झाले. आपल्याला निष्ठावंत अनुयायी मिळत नाहीत म्हणून तो कष्टी होई. ‘गाथा’–यस्न ४६ मध्ये त्याचीही कष्टी वृत्ती व तळमळ प्रतिबिंबित झाली आहे. ह्या कष्टीवृत्तीतूनच तो परमात्म्यास कळवळून ‘मी कोठे जाऊ ? कोठे पाऊल टाकू ?’ अशी प्रार्थनाही करी. पुढे त्याला पश्चिम इराणातून पूर्व इराणकडे जाण्याची ईश्वरी प्रेरणा मिळाली. आपल्या नव्या संदेशाचा, धर्माचा प्रचार व प्रसार करीत तो अखेरीस राजाविश्तास्पयाच्या दरबारी बॅक्ट्रियातील (सध्याच्या अफगाणिस्तानातील) बाल्ख येथे गेला. हळूहळू त्याला अनेक अनुयायी मिळाले. स्मितम कुळातील हएचत्-अस्पाच्या वंशजांनी जरथुश्त्राचे अनुयायित्व प्रथम स्वीकारले (‘गाथा’–यस्न ४६⋅१५). त्यानंतर लगेच व्होग्वा घराण्यातील फॅरषओश्त्राने जरथुश्त्रप्रणीत नव्या धर्माचा स्वीकार केला. पुढे लवकरच अनेक लोकांनी या धर्माचा स्वीकार केला. अखेरीस स्वतः राजाविश्तास्पयाने जरथुश्त्राचे अनुयायित्व स्वीकारून त्याच्या नव्या धर्माचा स्वीकार केला. त्यानंतर मात्र जरथुश्त्री किंवा पारशी धर्माचा खूपच झपाट्याने प्रसार होऊन तो सर्व इराणचा राष्ट्रीय धर्म बनला.

गाथोत्तर रचलेल्या अवेस्ता  धर्मग्रंथात जरथुश्त्राची मुक्त कंठाने स्तुती केलेली आहे. सद्विचार, सदुक्ती आणि सत्कृती यांचे अधिष्ठान असलेला हा आद्य मानव होय. त्याच्या जन्मकाली आणि वाढत्या वयात अखिल सृष्टिजात आनंद पावली आणि हर्षोद्रेकाने उद्‌गारली, की ‘आमचे कल्याण झाले कारण स्पितम घराण्यातील आथ्रव जरथुश्त्र जन्मास आला आहे’. थोर विभूतिमत्त्व लाभलेल्या जरथुश्त्राच्या निधनानंतरही अनेक शतके इराणी प्रजेच्या हृदयमंदिरात तो अत्यंत आदराचे स्थान प्राप्त करून होता. त्याने आपला दिव्य संदेश, पारशी धर्माची शिकवण, देशास देऊन देश ऊर्जितावस्थेस आणला व सर्व प्रजेस आत्मनिर्भर केले. जरथुश्त्राच्या उपदेशाने अंतर्बाह्य निर्मल व निरोगी जीवन जगण्याची प्रेरणा इराणी लोकांना मिळाली आणि त्यामुळे त्यांना उत्कर्ष व प्रगतीचा नवा मार्ग दिसला. अवेस्तानंतरच्या पारशी साहित्यात जरथुश्त्राच्या दिव्य जीवनाभोवती अनेक आख्यायिकांचे व अद्‌भुत चमत्कारांचे जाळे विणले गेले. देनकर्तच्या सातव्या भागात जरथुश्त्राच्या जन्माबाबतची व जीवनाबाबतची अद्‌भुत कथा आली आहे. प्रत्यक्ष अहुर मज्दाच्याच तेजाचा दिव्य अंश दोग्धोवाच्या उदरातील गर्भात प्रविष्ट झाला आणि त्या दिव्य तेजाने युक्त असा जरथुश्त्र जन्माला आला, असे त्या कथेचे सार आहे.

जरथुश्त्राच्या निधनासंबंधी अवेस्तात कसलाच उल्लेख नाही तथापि पेहलवी  ग्रंथात मात्र त्याचा मृत्यू एका अग्निमंदिरात (अग्यारीत) तुरबरातुर नावाच्या एकानराधमाच्या हातून झाला, असा उल्लेखआहे. निधनसमयी त्याचे वय ७८ वर्षांचे होते.

संदर्भ :

1. Henning, W. B. Zoroaster, New York, 1951.

2. Herzfeld, Ernst, Zoroaster and His World, 2 Vols., Oxford, 1947.

3. Jackson, A. V. Williams, Zoroaster : The Prophet of Ancient Iran, New york, 1899.

तारापोर, जे. सी. (इं.) सोनटक्के, ना. श्री. (म.)