देवयान : देवांचा मार्ग. यज्ञातील हविर्भाग स्वीकारण्यासाठी देव ज्या मार्गाने पृथ्वीवर येतात किंवा मनुष्य मरणाेत्तर ज्या मार्गाने देवलोकास जाऊन पोचतो असा मार्ग. सत्कर्मे करणारा मनुष्य देवत्वास पोचतो म्हणजे देवलोकास पोहोचतो, ही कल्पना प्राचीन काळापासून रूढ आहे. यातूनच योग्य कर्म न करणारा मनुष्य निकृष्ट स्थितीस पोहोचतो असा विचार निघतो, या स्थितीकडे जाणाऱ्या मार्गास पितृयान असे म्हणण्यात येते.

देवयानाची कल्पना ॠग्वेदात (१·७२·७) आढळत असली, तरी या मार्गाचे स्वरूप उपनिषदांत सांगितले आहे. अग्नी हा देवांना हविर्द्रव्य नेऊन देतो, अर्थात अग्नीमध्ये दहन केलेल्या मनुष्यासही तो देवयान मार्गाने देवलोकास घेऊन जातो. मृत्यूनंतर मनुष्याचा आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो अथवा पुन्हा जन्म घेतो. म्हणजे त्याला कर्मानुरूप गती मिळते. छांदोग्य उपनिषदात (५·१०) म्हटले आहे, की जे श्रद्धापूर्वक तपाचरण करतात, त्यांचा आत्मा अग्नीच्या ज्वाळेतून दिवस, पूर्वपक्ष, उदगयन, संवत्सर, सूर्य, चंद्र, विद्युत् या क्रमाने ब्रह्मलोकास पोचतो या मार्गास देवयान असे म्हणतात. जे कर्मकांड आचरतात त्यांचा आत्मा धुराकडून रात्र, कृष्णपक्ष, दक्षिणायन, पितृलोक, आकाश, चंद्र या मार्गाने जाऊन पुन्हा जन्म घेतो. हा पितृयानमार्ग होय. इतर उपनिषदांतही देवयान व पितृयान मार्गांचे वर्णन आढळते.

उपनिषदांची ही कल्पना भगवद्‌गीतेने (८·२४–२६) अधिक स्पष्ट शब्दांत सांगितली पण तेथे ‘शुक्लकृष्ण गती’ या शब्दाने देवयान व पितृयान मार्गांचा उल्लेख केला आहे. शुक्लमार्गाने गेले असता पुनर्जन्म नाही, तर कृष्णमार्गाने गेले असता पुनर्जन्म असतो. जे अज्ञ आहेत, पतित आहेत, ज्यांना देवाचे ज्ञान नाही, अशा लोकांना देवयान किंवा पितृयान या कोणत्याच मार्गाने जाता येत नाही, तर त्यांना अत्यंत निकृष्ट अशा तिसऱ्या मार्गाचे अनुसरण करावे लागते, असे बृहदारण्यकोपनिषदात (६·२·१६) म्हटले आहे.

उपनिषदांना वर्णाश्रमधर्म, ब्रह्मज्ञान, तप, पराविद्या इ. तात्त्विक गोष्टींवर भर द्यावयाचा होता म्हणून देवयानमार्गाचे हे विवेचन त्यांनी केले. अरण्यामध्ये राहून श्रद्धा व तप यांचे आचरण करतात, ते देवयानमार्गाने जातात पण जे केवळ गृहस्थधर्माचे म्हणजे कर्मकांडाचे अनुसरण करतात, ते पितृयानमार्गाने जातात. शंकराचार्यांनी उपनिषद्‌‍भाष्यांत या मार्गांना ‘अर्चिरादिमार्ग’ आणि ‘धूमादिमार्ग’ असे म्हटले आहे, तर ब्रह्मसूत्रभाष्यात त्यांनी देवयानमार्गास ‘क्रममुक्ति’ असेही म्हटले आहे. लो. टिळकांनी देवयान–पितृयान मार्गांचा संबंध उत्तरायण व दक्षिणायनाशी जोडला आहे. पृथ्वीकडून स्वर्गाकडे जाण्याच्या मार्गाची कल्पना पूर्व आशियातील अनेक देशांत सापडते. बॅबिलोनिया व ईजिप्त येथील तत्त्वज्ञानातही मरणोत्तर जीवाच्या संदर्भात देवयानाची कल्पना आढळून येते.

भिडे, वि. वि.