राक्षस : दानव, असुर, दैत्य, पिशाच, यक्ष, राक्षस इ. सर्वांचा मिळून एक राक्षससंघ वैदिक व पौराणिक कालांत मानला जात होता. काही अभ्यासकांनी त्यांना आर्यांना विरोध करणारी एक आर्येतर जमात म्हटले आहे. देव आणि मनुष्य यांच्या मधली एक अनार्य जमात, असाही राक्षसांचा निर्देश केला जातो. हिंदू पुराणकथांत त्यांना देवांचे व मनुष्याचे शत्रू मानले आहे. राक्षस हे स्मशानवासी असून ते यज्ञाचा विध्वंस करतात, हवी पळवतात, बालकांना मारतात, तसेच भक्तांचा, तपस्व्यांचा व पुण्यशीलांचा छळ करतात, अशा आशयाच्या अनेक पुराणकथा आहेत. जगातील विविध धर्मांत तसेच पुराणकथांतही राक्षसांसारख्या दुष्ट शक्तींची संकल्पना असून तिचा निर्देश मार, ⇨सैतान, डेव्हिल, ⇨इब्लिस, टायटन्स, ⇨अंग्रो-मइन्यू इ. नावांनी केलेला आढळतो.

प्राचीन वैदिक साहित्यात ‘रक्षस्’ शब्द दानवांसाठी आलेला असून त्यापासून ‘राक्षस’ शब्द आला. ‘रक्ष’ (राखणे, सांभाळणे, हानी करणे) ह्या धातूपासून तो काही अभ्यासक व्युत्पादितात. ऋग्वेदात मृत्युदेवता निर्ऋती ही राक्षस मानली आहे. वैदिक आर्यांना राक्षसांचा उपद्रव होत होता, हे ‘राक्षोघ्न सूक्ता’ वरून दिसून येते. देवांचे शत्रू म्हणूनही त्यांचा वेदांत वारंवार उल्लेख येतो. ते मायावी, विचित्र, अद्भुत, दस्यू व दास यांच्यापेक्षाही दुष्ट, कपटी, कच्चे मांसभक्षक, खादाड, दुर्जय, जादूटोणा करणारे, किंकाळ्या फोडणारे, हवी पळवणारे, नखांनी ओरबाडणारे, ज्ञानद्वेष्टे, पापकृत्ये आवडणारे, प्राणिरूप धारण करणारे, गर्भाचा व नवजात बालकाचा घात करणारे असे वर्णन वेदांत आढळते. रामायणातही त्यांच्या भयावह रूपाचे वर्णन आले आहे.

ऋग्वेदाच्या राक्षोघ्न सूक्तात त्यांच्या नाशार्थ देवांनी केलेली प्रार्थना आहे. अग्नीदस राक्षसांचा कट्टर विध्वंसक (रक्षोहन्‍) मानले आहे. बृहदारण्यक उपनिषदात (१·३·१) म्हटले आहे, की देव आणि असुर प्रजापतीपासून उत्पन्न झाले असून देव वयाने लहान, तर असूर मोठे होते त्यांच्यात पृथ्वीवरील वर्चस्वासाठी सतत संघर्ष चाले. आधी पृथ्वीवर बलाढ्य दैत्यांचे साम्राज्य होते परंतु विष्णुच्या मार्गदर्शनाखाली देवांनी त्यांचा युध्दात पराजय करून त्रिलोकावर आपले साम्राज्य स्थापिले, असे रामायणात (७·२·१६−१७) म्हटले आहे. राक्षस हे दिवसा निष्क्रीय, तर रात्री क्रियाशील व बलवान असतात. पुलस्त्यापासून राक्षस उत्पन्न झाले, तसेच ब्रह्मदेवाने भूतलावरील जलांच्या रक्षणार्थ राक्षसांना निर्मिले, अशा कथा आढळतात. ते कश्यप व दक्ष कन्या खशा यांची संतती असल्याचे भागवत पुराणात म्हटले आहे. कश्यपापासून खशेला यज्ञ व रक्षस्‍ हे दोन भयंकर पुत्र झाले. रक्षसाचे रूप तीन मस्तके, तीन पाय, तीन हात, नाक व ओठ जाड, कानापर्यंत जबडा, आठ दाढा असे भयंकर होते. अज व शंड या पिशाचांनी आपल्या जंतुधना व ब्रह्मघना ह्या मुली रक्षस्ला, दिल्या. जंतुधनेपासून यातुधानवंश आणि ब्रह्मधनेपासून ब्रह्मराक्षसवंश प्रवर्तित झाला. या सर्वांनाच ‘राक्षस’ हे सामान्य नाव आहे इ. माहिती ब्रह्मपुराण, विष्णुपुराणादी पुराणांत आली आहे. राक्षसस्त्रियांना गर्भधारणा होताक्षणीच त्या अपत्यांना जन्म देतात, असे महाभारतात म्हटले आहे. सप्तपाताले हे अधोलोक असून त्यांत राक्षसांचा निवास असतो.

सर्वसामान्यतः राक्षसांचे तीन वर्ग पडतात : (१) देवसदृश उपकारक असा यक्ष-यक्षींचा वर्ग (२) टायटन्ससारखे देवांचे कट्टर शत्रू म्हणून आणि (३) निशाचर, स्मशानवासी, यज्ञविध्वंसक, नरभक्षक अशा भयानक राक्षसांचा वर्ग. तिसऱ्या वर्गातील राक्षसांचे वसतिस्थान लंकेत होते व रावण त्यांचा राजा होता असे म्हटले आहे.

रामायणातील आर्य आणि राक्षस यांच्यातील संघर्ष हा खरा प्राचीनतम व दारूण संघर्ष मानला जातो. नंतरच्या महाभारतात व पुराणांतील कालात राक्षसांची शक्ती क्षीण होत गेल्याचे व दोन संस्कृतींचा समन्वय होत गेल्याचे दिसते. रामायणकालात राक्षसांच्या प्रमुख तीन शाखा दिसतात : (१) विराधशाखा−ही दंडकारण्याच्या उत्तरेस होती व विराध हा तिचा नेता होता (२) दानवशाखा−ही दनूच्या संततीची शाखा होती व तिचा नेता नरमांसभक्षक कबंध होता आणि (३) राक्षस ह्याच नावची शाखा−ही अतिशय प्रख्यात व क्रूर होती. लंका हा तिचा प्रदेश असून पुलस्त्य व दिती यांच्यापासून तिची उत्पत्ती झाली. रावण तिचा नेता होता. रामाने रावणवध करून राक्षसांना कायमचे नमविले.

आर्य व राक्षस यांच्या चालीरीती व सामाजिक व्यवहार यांत काही प्रमाणात साम्य होते, तर काही बाबतींत भिन्नताही होती. राक्षसांचा वंश मातेवरून चालत असे, तर त्यांचे विवाह आर्यांप्रमाणे अग्नीच्या साक्षीनेच होत. जबरदस्तीने पळून आणलेल्या मुली व स्त्रिया यांच्याशी विवाह करण्याची प्रथा राक्षसांत होती. त्यावरूनच अशा विवाहास मनुस्मृतीत (३·३०) ‘राक्षसविवाह’ म्हटले गेले असावे.

निरनिराळ्या प्रचंड वास्तूंशीही राक्षसांचा संबंध जोडलेला दिसतो. हेमाडपंती देवालये राक्षसांनी बांधल्याची समजूत आहे. ह्या देवालयांसाठी ज्या प्रचंड शिलांचा वापर केला गेला त्यांवरून हे प्रचंड काम मानवी नसून राक्षसी असावे अशी समजूत असावी. कुठलीही गोष्ट अतिप्रचंड प्रमाणात असेल, तर तिला ‘राक्षसी’ असे सामान्यतः म्हटले जाते.

लोकसाहित्यात राक्षसांबाबतच्या अनेक कथा सर्वत्र आढळून येतात. त्यांचा वास स्मशानात, अरण्यात, ओसाड जागेत, प्रचंड वृक्षांवर असतो. ते माणसांना भ्रमात पाडतात छळतात. त्यांना प्रकाशाची भीती वाटते. नरमांस त्यांना विशेष प्रिय असून त्यांची भूक प्रचंड असते. ते पापी, क्रूर कामपीडित असतात इ. उल्लेख अशा कथांत आढळतात. त्यांना जादुटोणा येत असतो. त्यांचा जीव दूरस्थ व दुर्गम अशा ठिकाणच्या एखाद्या प्राण्यात वा पक्षाच्या देहात सुरक्षित असतो व त्याला मारताच राक्षसही मरतो, असा आकृतिबंध बऱ्याच कथांचा असतो. चित्रकला, शिल्पकला इ. कलांतूनही दुष्ट शक्ती म्हणून राक्षसांचा अविष्कार कलावंतांनी केलेला आहे.

अभ्यासकांत राक्षस हे नेमके कोण याबाबत मतभेद आहेत. रामायणकालात धर्मभ्रष्ट होऊन जातीतून बाहेर जे फेकले जात ते राक्षस श्रेणीत जात असावेत. राक्षसांमध्ये वैदिक कर्मकांड प्रचलित म्हणून राक्षस ही मूलतः आर्यांचीच एक शाखा असावी. ही शाखा द. भारतात एखाद्या प्रदेशात जाऊन स्थिरावली असावी व तिने आपले वैभवसंपन्न राज्य व संस्कृती निर्मिली असावी. स्वतः रावण हाही प्रजापतीच्या वंशातील विश्रवस् याचा पुत्र होता. अन्य मतांनुसार राक्षस द. भारत व लंकेचे मूलवासी असावेत. ते रानटी अवस्थेतून उत्क्रांत होत होत रामायणकालात अर्धवट रानटी व अर्धवट सम्य अवस्थेप्रत पोचले. ऋग्वेदातील दस्यूंशी त्यांचे वांशिक दृष्ट्या साम्य दिसते. काहींच्या मते द. भारतातील तिरंदाज कोळी आदिवासींचे ते वंशज होत. संख्या वाढल्यावर त्यांनी राज्य निर्मिले. आर्यसंपर्कात आल्यावर संस्कृतिसमन्वय होऊन काही ब्राह्ममधर्मी बनले. त्यांनी संस्कृत भाषाही आत्मसात केली. फ्रेझरच्या मते लंकेत आर्यवंशी राक्षसांच्याही पूर्वी एक काळ्या वर्णाची शक्तीमान मानवजात हीती. द. भारतातील द्रविड जाती लंकेतील या आदिम काळ्या वर्णापासूनच निघाल्या. आर्य दक्षिणेत स्थिरावल्यावर त्यांनी मूळ जातीला तेथून हुसकावून लावले. त्यामुळे ते मलेशियात गेले.

पहा : असुर दैत्य पुराणकथा भूतपिशाच यक्ष-यक्षी.

सुर्वे, भा. ग.