जमियत उल उलेमा ए हिंद : भारतातील एक इस्लामी संघटना. खिलाफत चळवळीचे नेतृत्व भारतात मुस्लिम धर्मपंडितांनी (उलमा) केले होते. या चळवळीतून ‘खिलाफत कॉन्फरन्स’ ही संघटना पुढे आली पण त्याचबरोबर सर्व मुस्लिम धर्मगुरूंना एका राजकीय व्यासपीठावर आणण्यासाठी ‘जमियत उल उलेमा…’ ही दुसरी एक संघटना १९१९ मध्ये स्थापन करण्यात आली. इस्लामी कायदा (शरीयत) अबाधित राखणे, मुस्लिम जनतेला धार्मिक मार्गदर्शन करणे, मुस्लिम व मुस्लिमेतर यांच्यात धर्मप्रसार करणे, भारताबाहेरील मुस्लिमांशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करणे, मुस्लिम धर्मस्थानांचे संरक्षण करणे, भारतातील मुस्लिमांची संघटना करणे इ. ध्येये या नवीन संघटनेने आपल्यासमोर ठेवली होती. १९३९ मध्ये जमियत उल उलेमाने पूर्ण स्वातंत्र्य हेही आपले ध्येय असल्याचे जाहीर केले. तिच्या स्थापनेच्या वेळी ही संघटना जेवढी व्यापक होती, तेवढी नंतर ती राहिली नाही. अरबस्तानात वहाबी राज्य आल्यानंतर सूफी पंथाला आणि परंपरांना विरोध झाला. जमियतने त्या विरोधाचे समर्थन केले. त्यामुळे सूफी उलमा जमियतमधून बाहेर पडले. मौलाना महंमद अली व खिलाफत कॉन्फरन्सचे काही नेते काँग्रेसमधून बाहरे पडले, तेव्हाही एक गट जमियतमधून बाहेर पडला. मौलाना मौदुदी यांनी ‘मुस्लिम ब्रदरहुड’च्या पावलावर पाऊल टाकून ‘जमात ए इस्लामी’ ही संघटना उभारली, तेव्हाही जमियतला गळती लागली. १९४५ मध्ये स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीस अनुकूल असलेल्या उलमांनी ‘जमियत उल उलेमा ए इस्लाम’ हा नवा फुटीर पक्ष स्थापन केला.

मूळ संघटना मात्र सुरुवातीपासून आजतागायत काँग्रेसबरोबर राहिली आहे. जमियतचे नेते फार सनातनी आहेत. शारदा कायदा मुस्लिमांना लागू करण्यास आणि मुस्लिम कायद्यांत प्रागतिक व आधुनिक सुधारणा करण्यास त्यांनी प्रखर विरोध केला. जमियत उल उलेमाने पाकिस्तानच्या कल्पनेला सुरुवातीपासूनच विरोध केला होता परंतु त्यासाठी एक विशिष्ट कारण सांगितले. ते कारण असे, की हिंदुस्थानची फाळणी केली, तर त्यामुळे इस्लामी धर्मप्रसाराचे क्षेत्र कमी होईल. पाकिस्तानची निर्मिती सोडून मुस्लिम लीगच्या जवळजवळ सर्वच राजकीय मागण्यांना जमियतने पाठिंबा दिला होता. पाकिस्तानला विकल्प म्हणून जमियतने मध्यवर्ती कायदेमंडळात मुस्लिमांना ४५% प्रतिनिधित्व, मध्यवर्ती सरकारात आणि सर्वोच्च न्यायालयात ५०% प्रतिनिधित्व इ. मागण्या केल्या.

स्वातंत्र्योत्तर काळात काही वर्षे जमियत उल उलेमाने आपले राजकीय कार्य स्थगित केले होते परंतु नंतर मात्र तिने ते पुन्हा चालू केले आहे. ‘जमात ए इस्लामी’ ही दुसरी सनातन्यांची संघटना स्वातंत्र्योत्तर काळात खूपच विस्तार पावली. त्यामुळे जमियतचा प्रभाव फारच कमी झाला. तसेच ह्या संघटनेत दोन स्पष्ट गटही पडले आहेत. एक गट काँग्रेसबरोबर आहे, तर दुसरा गट जमात ए इस्लामीच्या निकट आहे.

करंदीकर, म. अ.