दुर्योधन : महाभारतातील कौरवप्रमुख व हस्तिनापूरचा सम्राट पुरुष. कौरव कुळातील धृतराष्ट्राला गांधारीपासून शंभर पुत्र झाले. दुर्योधन त्यांपैकी सर्वांत ज्येष्ठ. तो जन्मल्याबरोबर अनेक अपशकुन झाले. धृतराष्ट्राने यासंबंधी ब्राह्मणांना विचारले. त्यांनी अपशकुनाचा अर्थ ‘हा मुलगा कुलक्षय करील, याला टाकून देणे उचित होईल’, असा सांगितला (आदिपर्व ११५). धृतराष्ट्राने मात्र त्याचा त्याग केला नाही. पंडुपुत्र धर्मराज हा दुर्योधनापेक्षा मोठा होता. भीम हा त्याच्या बरोबरीचा. सर्व कौरव आणि पांडव एकत्र लहानाचे मोठे झाले. प्रथमपासूनच दुर्योधनाच्या मनात भीमाबद्दल मत्सर होता.

कौरव व पांडव यांना द्रोणाचार्याने शस्त्रास्त्रविद्या शिकविली. त्यात अर्जुन हा सर्वश्रेष्ठ ठरल्यामुळे दुर्योधनाच्या मनात अर्जुनाबद्दल द्वेष भावना निर्माण झाली. दुर्योधनास बलरामापासून गदायुद्वाचे शिक्षण मिळाले होते. धृतराष्ट्राने धर्मराजास युवराज म्हणून अभिषेक केल्यामुळे दुर्योधनाचा द्वेष अधिक तीव्र झाला. कौरव–पांडवांमधील संघर्षाला खऱ्या अर्थाने येथून सुरुवात झाली. कर्ण व शकुनी यांच्या मदतीने पांडवांचा नाश करण्याचा दुर्योधनाने आटोकाट प्रयत्न केला. लाक्षागृह निर्माण करून पांडवांना जिवंत जाळण्याचाही त्याने प्रयत्न केला, पण तो फसला. द्रौपदीस्वयंवरास दुर्योधन उपस्थित होता. द्रौपदीने अर्जुनाला वरलेले पाहून त्याचा राग अधिक भडकला.

धृतराष्ट्राने पांडवांना आपले अर्धे राज्य देऊन इंद्रप्रस्थ नगरीत राहण्यास सांगितले. युधिष्ठिराने यावेळी राजसूय यज्ञ केला. दुर्योधनाकडेच कोशागाराचे काम सोपविले होते. याप्रसंगीही एक-दोन वेळा दुर्योधनाचा अपमान झाला. त्यामुळे त्याची सूडभावना प्रफुल्लित झाली. पांडवांचे वाढते वर्चस्व त्याला सहन होत नव्हते. पांडवांचे सर्वस्व त्याने कपटद्यूतात जिंकून घेतले. द्रोपदीची विटंबना केली. पांडवांना वनवासात पाठविले. वनवासातही त्याने पांडवांना नानाप्रकारे त्रास दिला, पण पांडव त्या सर्वांतून निभावून गेले. त्यांचा वनवास व अज्ञातवास संपला. त्यांनी आपल्या पुरोहिताकरवी दुर्योधनाकडे अर्ध्या राज्याची मागणी केली दुर्योधनाने सुईच्या अग्रावएढीही भूमी देण्यास नकार दिला (उद्योगपर्व १२७·२६). याचे पर्यवसान युद्धात झाले.

दुर्योधनास कृष्णाचे सर्व सैन्य मिळाले. कृष्ण पांडवांच्या पक्षास मिळाला. दोन्ही बाजूंनी युद्धाची तयारी झाली. कृष्णाने समझोता करण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला. यानंतर अठरा दिवस भारतीय युद्ध झाले. भीमाने गदायुद्धात दुर्योधनाच्या मांडीवर प्रहार करून त्याला जखमी केले (शल्यपर्व ५८·४७) व त्यातच दुर्योधनाचा शेवट झाला.

धर्मराजाच्या मनात दुर्योधनाबद्दल कधीच द्वेष नव्हता. तो दुर्योधनास नेहमी सुयोधन असे म्हणत असे. तो पराक्रमी, राजनीतिकुशल होता. पांडव वनवासात असताना त्याने अत्यंत न्यायाने राज्य केले व लोकप्रियता संपादन केली. अनेक मित्र त्याने जोडले. भीष्म, द्रोण, कृप यांसारख्या वडीलधाऱ्या मंडळींचा आदर केला. म्हणूनच दुर्योधनाचा युद्धाचा निर्णय कुरुक्षयास कारण होणार आहे, हे समजूनही भीष्म–द्रोण यांनी दुर्योधनाचा पक्ष सोडला नाही. दुर्योधन हा आसुरी प्रवृत्तीचा नव्हता, तर पांडवांचा द्वेष्टा होतात. त्याला न्याय, सद्‌गुण, आदर इ. गुणांची कदर होती पण तो मत्सराने आंधळा झालेला होता. द्वेष, मत्सर, सूडबुद्धी इ. दुर्गुणांमुळे सर्वनाश होतो, हेच दुर्योधनाच्या व्यक्तिरेखेतून महाभारतकारांनी दाखविले आहे.

भिडे, वि. वि.