शिवदेवता : हिंदू धर्मातील एक प्रमुख प्राचीन देवता. हिंदू धर्माचे महत्त्वाचे अंग असलेल्या शिवदेवतेचे आणि शैव संप्रदायाचे मूळ आर्येतर सिंधू संस्कृतीत आहे. तसेच वैदिक आर्य संस्कृतीचा या संप्रदायावरील प्रभाव अगदी नगण्य स्वरुपाचा आहे, असे एक मत प्रचलित आहे. हे मत प्रामुख्याने मोहें-जो-दडो येथील उत्खननांत सापडलेल्या तीन मुखे आणि शिंगे असलेल्या ऊर्ध्वलिंगी नग्न पुरुषाच्या मूर्तीवर आधारलेले दिसते. या मूर्तीवरील पाचसहा अक्षरांच्या लिपीतील लेखाचा समाधानकारक अर्थ लागला नसला, तरी या मूर्तीचा संबंध काही विद्वानांनी तत्कालीन आर्येतरांच्या शिवपूजेशी जोडलेला दिसतो. त्यांनी शिवदेवता वेदपूर्वकालीन लिंगपूजक आर्येतरांची असल्याचा निष्कर्ष काढलेला दिसतो.

हिंदू धर्मातील शिवदेवतेचा संबंध रुद्र देवतेशी असल्याचे दिसून येते. शिवदेवता रुद्र-शिव या जोडनावानेही ओळखली जाते.

विषापहरण शिव : पूर्व चालुक्यकालीन ब्राँझशिल्प, १० वे शतक.

ऋग्वेदात रुद्रसूक्ते किंवा रुद्राचे संदर्भ कमी प्रमाणात असले, तरी यजुर्वेदात रुद्राचे संदर्भ यज्ञप्रक्रियेतील अग्निचयन प्रयोगांत विस्ताराने दिसून येतात. कृष्णयजुर्वेदीय-तैत्तिरीय संहितेच्या सात कांडांपैकी चौथे आणि पाचवे अशी दोन कांडे अग्निचयन मंत्र आणि ब्राह्मणासाठी खर्ची पडलेली आहेत. किंबहुना यजुर्वेदाच्या सर्वच संहिता व ब्राह्मणभाग यांत अग्निचयनाचा विषय विस्ताराने मांडलेला दिसतो. रुद्रावर वैदिक धर्माचा असा व्यापक प्रभाव असलेला दिसून येतो. [⟶ यजुर्वेद]. ‘रुद्रो वा एष अग्नी: तस्यै ते तनुवौ घोराSन्या शिवाSन्या’ (तैत्तिरीय संहिता ५.७.३.९) म्हणजे रुद्र खरोखरीच अग्नी असून त्याची दोन स्वरूपे आहेत. एक, घोर म्हणजे भयंकर व दुसरे, शिव म्हणजे सौम्य, कल्याणकारक. अग्नी किंवा सूर्य हे रुद्राचे रूप आणि शांत तेज असलेला चंद्र हे शिवाचे रूप, असे वेदाने प्रतिपादिले आहे.

अग्नी म्हणजे ⇨ पंचमहाभूतापैकी तेजोरूपी महाभूत. इतर महाभूतांप्रमाणेच या भौतिक अग्नीचे दैवतीकरण झाले असून अग्नी ही वेदांतील पहिल्या क्रमांकाची देवता आहे परंतु दैवतीकरणाची ही आधिदैविक पातळी ओलांडून अग्नी विश्वाचे चैतन्य बनून आध्यात्मिक पातळीवर स्थिरावला. रुद्र-शिव त्या वैश्विक चैतन्याचीच म्हणजे परब्रह्माचीच रूपे आहेत. म्हणूनच तैत्तिरीय आरण्यकात (१०.४७) ‘ब्रह्म शिवो मे अस्तु सदाशिवोम्’ असा उल्लेख आला आहे.

सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी फक्त ‘काम’ (ऋग्वेद १०.१२९.४) होता. हा कामच विश्वाच्या उत्पत्तीचे कारण ठरला. स्त्री-पुरुषाच्या कामरूप युग्मातून सृष्टीचा आविर्भाव झाला. ब्रह्मस्वरूपी शिव कान्तासंमिश्रदेह (अर्धनारीश्वर) होऊन सृष्टीचा उत्पत्तिकर्ता झाला. म्हणूनच योनिस्थित लिंगाच्या रूपातील शिवाची पूजा विश्वोत्पादक परब्रह्माचीच पूजा ठरते. [⟶ अर्धनारीनटेश्वर लिंगपूजा].

शैव संप्रदायानुसार सृष्ट्यादिक्रियाकारित्व हा शिवदेवतेचा विशेष स्वभाव आहे. सृष्टी, स्थिती, संहार, विलय आणि अनुग्रह या शिवाच्या पाच क्रिया आहेत. माया ही शिवाचीच सृष्टी उत्पन्न करणारी शक्ती आहे म्हणून श्वेताश्वतर उपनिषदाने (४.१०) मायेस प्रकृती असे म्हटले आहे.

सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान अशी शिवदेवतेची पाच मुखे प्रसिध्द आहेत. सांख्यांच्या महाभूते, सूक्ष्मभूते, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये आणि तन्मात्र यांच्याशी या पाच मुखांचा संबंध असल्याचा सिध्दांत मांडला गेला आहे. हा सिध्दांत म्हणजे शिव हे सर्वात्मक चैतन्यतत्त्व असून हे विश्वसुद्धा शिवापासूनच आविष्कृत झाले आहे, हे स्पष्ट करण्याचाच प्रयत्न आहे.

शतपथ ब्राह्मणाने (६.१.३.८-१६) रुद्र-शिवाची आठ नावे उल्लेखिली आहेत. ती अशी- रुद्र, शर्व, पशुपती, उग्र, अशनी, भव, महादेव आणि ईशान. यांपैकी रुद्र, शर्व, उग्र आणि अशनी ही नावे घोर रुद्राची असून भव, पशुपती, महादेव आणि ईशान ही शांत, कल्याणकारी शिवाची नावे आहेत.

कालिदासाने शिवाच्या पंचमहाभूते, सूर्य, चंद्र व यज्ञासाठी दीक्षित यजमान अशा आठ मूर्तींच्या उल्लेख केला आहे.

बृहज्जाबालोपनिषदाने (२.१-९) हे सर्व विश्व अग्नी आणि सोम या दोन तत्त्वांपासून बनले आहे (अग्नीषोमात्मकं विश्वम्) असे म्हटले आहे. त्यांपैकी अग्नी किंवा सूर्य हे रौद्र स्वरूप असून, सोम म्हणजे चंद्र हे शिवस्वरूप आहे. शिवाच्या मस्तकावर यासाठीच चंद्रकला कल्पिलेली दिसते.

तैत्तिरीय संहितेने (१.५.९) ‘प्रजननं हि वा अग्निः’ म्हणजे स्त्रीचे गर्भाशय (योनी) हा अग्नी असे म्हटले आहे. तसेच ‘रेतो वा इन्दुः’ (तैत्तिरीय संहिता ६.५.८.३) म्हणजे पुरुषबीज हा इंदू असल्याचा निर्देश केला आहे. चंद्राला इंदू असे म्हणतात. हे सर्व शिवाच्या सृष्टिप्रक्रियेशी संबंधित आहे.

समाधीच्या अवस्थेत योग्याच्या भ्रूमध्यातून स्रवणारा अमृतमय पाझर म्हणजेच सोमरस होय. त्यासच ज्ञानदेवांनी ‘सतरावियेचे स्तन्य’, ‘सतराव्या प्रजापतिरूप कलेचे दूध’ असे म्हटले आहे. सोमयज्ञात वापरल्या जाणाऱ्या सोम वनस्पतीचा रस हा समाधि-अवस्थेतील सोमाचेच बाह्य प्रतीक आहे. सोम म्हणजे चंद्र हा वनस्पतींचा राजा आहे आणि सोम ही वनस्पती आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

समाधीच्या अवस्थेत भ्रूमध्यातील तिसरा डोळा जणू उघडतो. तो ज्ञानरुपी चक्षू योग्याच्या कामभावनांना आणि कर्मांना जाळून टाकतो. शंकराने मदनास जाळून टाकण्याचे संदर्भ तो योगी असल्याचे निर्देश करतात. श्रीकृष्णाने ‘ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात कुरुतेSर्जुन’ म्हणजे ज्ञानरुपी अग्नी सर्व कर्मांना भस्मसात करतो, हे याच अर्थाने म्हटलेले आहे. शिवाची सोम आणि विरुपाक्ष ही नावेही त्याच्या योगी-अवस्थेची द्योतक आहेत. शिवाची ऊर्ध्वलिंग असलेली नग्नमूर्ती आणि तैत्तिरीय आरण्यकातील (१०–१२) ‘ऊर्ध्वरेतं विरुपाक्षं विश्वरुपाय वै नमः’ हे उल्लेख शिव हा योगी आहे हेच सांगतात म्हणून कालिदासाने त्यास ‘कान्तासंमिश्रदेहोSप्यविषयमनसां यः परस्तात यतिनाम्’ म्हणजे शिव योनिस्थ लिंगाच्या स्वरूपात अर्धनारीश्वर असूनही तो योग्यांनाही अगम्य आहे असे म्हटले आहे. योगीश्वर शिव विरक्त असल्याने गिरिगव्हरी राहतो म्हणून त्यास गिरिशत, गिरित्र, गिरिश अशी नावे मिळाली आहेत. पुराणातील त्याच्या स्मशाननिवासाचे, भस्मलेपनाचे, नरमुंडमालाधारणेचे संदर्भ वेदांतील मुनिसूक्ते आणि व्रात्यसूक्ते यांची आठवण करून देतात. व्रात्य शब्दाचा अर्थ संस्कारहीन असा असला, तरी अथर्ववेदीय व्रात्यसूक्तांच्या (१५.५) प्रस्तावनेत सायणाचार्यांनी व्रात्यांना देवाधिदेव, पुण्यशील, विद्वत्तम अशा योग्याच्या रांगेत स्थान दिले आहे. शंकराच्या योगीश्वरत्वाच्या संदर्भात चूलिकोपनिषद आणि श्वेताश्वतर उपनिषद यांना विशेष स्थान आहे.

वेद आणि उपनिषदांनंतर हिंदु-पुराणांतही शिवाचे अनेक संदर्भ आहेत. शिवदेवतेची भलावण करणारी स्वतंत्र पुराणेही आहेत. कूर्मपुराणाने (१.१३.२२) श्वेताश्वतर महामुनींचा संदर्भ देऊन महादेवास ‘निष्कल शिव’ असे संबोधले आहे.

पुराणांत शिवदेवता ही शंकर, महादेव, महेश, ईश्वर, सदाशिव इ. अनेक नावांनी प्रसिध्द आहे. ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिमूर्तींकडे पुराणांनी अनुक्रमे सृष्टी, स्थिती आणि लय अशी कामे सोपविलेली दिसतात.उमा ही हिमालयाची कन्या. पर्वताची कन्या म्हणून पार्वती. [⟶ पार्वती]. तीच शिवाची पत्नी. तिला शिवाने ‘स्वरोदेय’ नामक शास्त्र सांगितले. गजानन आणि षडानन (कार्तिकेय वा स्कन्द) हे त्यांचे पुत्र. नंदी हे वाहन. शिव जटाधारी असून, भगीरथाच्या प्रयत्नातून त्याचे मस्तकी गंगा अवतरली. समुद्रमंथनाचे वेळी उत्पन्न झालेले हलाहल (विष) त्याने कंठातच धारण केले, म्हणून तो नीलकंठ झाला.

पुराणांनुसार शिवाचे दहा अवतार मानले जातात. त्याच्या प्रत्येक अवतारात त्याच्या पत्नीचाही अंतर्भाव होतो. त्या त्या अवतारातील त्या त्या युगुलाची नावे अशी आहेत- (१) महाकाल- महाकाली, (२) तारण- तारा, (३) बाल- बालभुवनेश्वरी, (४) षोडश- षोडशी, (५) भैरव- भैरवी, (६) छिन्नमस्त- छिन्नमस्ता, (७) धूमवान- धूमवती, (८) बगलामुख-बगलामुखी, (९) मातंग- मातंगी, (१०) कमल-कमला. शिवाच्या आगमिक किंवा तांत्रिक पूजेत यांचा अंतर्भाव होतो. शैव संप्रदायाचे अनेक आगम आणि तंत्रग्रंथ उपलब्ध आहेत.

शिवाचे उत्तर चोलकालीन ब्राँझशिल्प, १२ वे शतक.

भारतात शिवाची बारा ज्योतिर्लिंगे प्रसिद्ध आहेत ती अशी : (१) सोमनाथ, (२) मल्लिकार्जुन, (३) महाकाल, (४) ओंकारेश्वर, (५) केदार, (६) भीमाशंकर, (७) विश्वेश्वर, (८) त्र्यंबकेश्वर, (९) वैजनाथ, (१०) नागनाथ, (११) रामेश्वर, (१२) घृष्णेश्वर. [⟶ ज्योतिर्लिंग].पुराणांत देवांप्रमाणे दानव किंवा असुर हेही शिवाचे भक्त असल्याचे संदर्भ मिळतात. यावरून आर्येतर लोक शिवपूजक असल्याचे स्पष्ट होते. आजही अनेक वनवासी जमाती शिवभक्त आहेत.

⇨दक्ष प्रजापतीने आरंभिलेल्या यज्ञांत शिवाला (शंकराला) निमंत्रण नव्हते. शिवाची पत्नी सती ही दक्ष प्रजापतीची कन्या. ती निमंत्रणाशिवायच पित्याच्या यज्ञांत उपस्थित झाली. त्यावेळी दक्ष प्रजापतीने शिवाचा अवमान केला. शंकराचा अवमान सहन न झाल्याने सतीने यज्ञकुंडात उडी घेऊन देहत्याग केला. त्यामुळे संतप्त झालेल्या शंकराने दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला. ही कथासुद्धा शिवदेवता आर्येतरांचीही असावी, असे सूचित करते.

ऐतरेय ब्राह्मण (५.१४), तैत्तिरीय संहिता (३.१.९.४) व ऋग्वेदातील नाभानेदिष्ठ ऋषीची सूक्ते (ऋग्वेद १०.६१, ६२) यांतील उल्लेखांवरून पूर्वी यज्ञांत रुद्र-शिवासाठी आहुतिभाग नव्हता असे समजते तथापि यज्ञ संपल्यावर शिल्लक राहिलेल्या सामग्रीवर रुद्राचीच मालकी होती, असेही स्पष्ट होते.

रुद्राच्या क्रोधामुळे पशूंचा नाश होतो, अशी कल्पना वेदकाळी होती. पशूंचा नाश झाल्यास, रुद्रास शांत करण्यासाठी शिजवलेल्या भाताची (चरूची) आहुती द्यावी तसेच हा यज्ञ निषाद जमातीतील स्थपतीकडून (अधिपतीकडून) करवून घ्यावा, असे विधान मैत्रायणी संहितेत (२.२.४) सांगितले आहे.

तैत्तिरीय आरण्यकाने (१०.१२) शिवाला उद्देशून ‘क़ृष्णपिंगल’ हा शब्द वापरला आहे. ऋग्वेदाच्या (१०.६१) या सूक्ताच्या भूमिकेत सायणाचार्यांनी रुद्राचा उल्लेख कृष्णशवासी असा केला आहे. यावरूनही रुद्र-शिव हे दैवत कृष्णवर्णीयांचे मूलतः असावे, असे म्हटले जाते.

शैव संप्रदायात ⇨ काश्मीर शैव संप्रदाय, ⇨ नाथ संप्रदाय, पाशुपत मत, द्वैती शैवमत, वीरशैव, कापालिक, मार्तंड भैरव इ. संप्रदायभेदांचा अंतर्भाव होतो. [⟶ शैव संप्रदाय].

भारतात शिवाची संख्यात्मक दृष्टया अधिक मंदिरे आहेत. शिवाच्या मूर्तींमध्ये, अर्धनारीश्वर, दक्षिणामूर्ती, कल्याणसुंदरमूर्ती, नटराजमूर्ती इत्यादींचा उल्लेख करावा लागेल मात्र शिवलिंगाच्या स्वरुपात त्याची पूजा सार्वत्रिकपणे प्रचारात आहे.

शिवपूजा भारताबाहेरही प्रचलित आहे. तिबेटातही काही शिवमंदिरे आहेत. मलेशिया, प्राचीन कंबोडियातसुद्धा शिवपूजा प्रचारात होती.

रुद्र-शिवाच्या संदर्भात अवैदिक आणि वैदिक असे उभयविध संदर्भ सापडतात. आर्य आणि आर्येतर यांच्या संपर्कातून रुद्र-शिव या देवतेचा विकास घडून आला असावा. रुद्र-शिव ही देवता मूलतः आर्येतरांची असल्यास, त्या संस्कृतीने आपले अवशेष वैदिक संस्कृतीच्या आधिपत्याखाली आणून ठेवले व ते वैदिक संस्कृतीचे अंगभूतच होऊन गेले, असेच म्हणावे लागेल.

पहा : रुद्र शैव संप्रदाय.

संदर्भ : 1. Bhandarkar, R.G. Vaishnavism, Saivism and Minor Religious Systems, Varanasi, 1965.              

            2. जोशी, लक्ष्मणशास्त्री, वैदिक संस्कृतीचा विकास, वाई, १९९२.

धर्माधिकारी, त्रि.ना.