आपद्धर्म : सर्वसामान्य परिस्थितीत शास्त्रसंमत किंवा शास्त्रविहित आचरण करणे व शास्त्रनिषिद्ध आचरण टाळणे शक्य असते. परंतु जेव्हा शास्त्रविहित कर्म करण्यास व शास्त्रनिषिद्ध कर्म टाळण्यास परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असते, तेव्हा शास्त्रच विहितकर्माचे किंवा निषिद्धकर्माचे अपवाद सांगते. हे अपवाद म्हणजे आपद्धर्म. आपत्तीच्या काळी शास्त्राने अपवाद म्हणून अनुमती दिलेली आचरण किंवा कर्तव्य यास आपद्धर्म म्हणतात.

ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांना सांगितलेले जीवनोपाय प्रतिकूल परिस्थितीत उपयोगी पडत नाहीत. उदा., अधार्मिक मनुष्यास वेद शिकवू नयेत किंवा त्याच्याकडून यज्ञ करवू नये किंवा त्याच्यापासून दान घेऊ नये असे जरो शास्त्राने सांगितलेले असले, तरी संकटकाळी जीवनोपाय म्हणून हे निषेध पाळण्याची गरज नाही असे शास्त्र म्हणते. शुद्रापासून ब्राह्मणादी आर्यांनी विद्याग्रहण करू नये असे शास्त्र म्हणते परंतु विशिष्ट परिस्थितीत शूद्रापासूनही विद्याग्रहण करावे अशी संमती शास्त्र देते. ब्राह्मणाला क्षात्रकर्म, वैश्यकर्म किंवा कृषी इ. शुद्रकर्मे किंवा सेवाधर्म वर्ज्य सांगितला परंतु आपत्काली वरील निषिद्धकर्मे जीवनार्थ करण्यास शास्त्राने संमती दिली आहे. दुष्काळात कोणत्याही हीन मानलेल्या जातीने दिलेले अन्न उच्च जातीने सेवन करण्यास प्रत्यवाय नाही. उषस्तिचाक्रायण या ब्राह्मणाने माहुताच्या ताटातील उच्छिष्ट भक्षण केले किंवा विश्वामित्राने कुत्र्याचे मांस दुष्काळात खाल्ले यांत शास्त्राप्रमाणे दोष नाही. प्राणरक्षणार्थ चोरी केली, तरी ती क्षम्य मानली आहे. आपत्काल संपल्यावार मात्र निषिद्धाचरण सोडावे, नाहीतर दोष लागतो.

संदर्भ :  १. भांडारकर प्राच्याविद्या संशोधन संस्था, संपा. महाभारत, पुणे, १९३३ ते १९६७.

             २. पणशीकर, वासुदेवशास्त्री, संपा. मनुस्मृति, निर्णयसागर प्रेस, मुंबई, १९०२.

             ३. शंकराचार्यविरचित ब्रह्मसूत्रभाष्यम्, आनंदाश्रम, पुणे, १८९०.

जोशी, लक्ष्मणशास्त्री