मंगळसूत्रांचे विविध प्रकार

मंगळसूत्र : हिंदू सौभाग्यवती स्त्रियांकडून नित्य धारण केला जाणारा एक कंठालंकार. काळ्या पोतीचे दोन सर, मध्यभागी सोन्याच्या दोन वाट्या, वाट्यांच्या मध्यभागी दोन व दोन्ही बाजूंना एकेक असे चार सोन्याचे मणी असे या अलंकाराचे सर्वसामान्य स्वरूप आहे. सध्या सरामध्ये सोन्यांच्या पानड्या घालून गाठवून घेण्याची पद्धती आहे तसेच विविध प्रकारची कलाकुसरयुक्त मंगळसूत्रेही प्रचलित आहेत.

मंगळसूत्रातील एक वाटी व दोन मणी माहेरचे असतात. वेदकालीन विवाहविधीत मंगळसूत्र बांधण्याचा विधी नाही. तो नंतरच्या काळात दक्षिण भारतातून म्हणजे द्रविड संस्कृतीतून कर्नाटक-महाराष्ट्र आला असावा, असे अभ्यासक मानतात. केरळ व तमिळनाडूतील बहुतेक जातिजमातींत वधूच्या गळ्यात सुवर्णाचा ‘ताळी’ नावाचा सौभाग्यालंकार बांधण्याची जी प्रथा आहे, तीत मंगळसूत्र बांधण्याच्या ह्या प्रथेचा उगम असावा. उत्तर भारतात मंगळसूत्र प्रचलित नाही तेथे हातातील चुडा वा बांगड्या हा मुख्य सौभाग्यालंकार आहे. महाराष्ट्रात कुमारीही बांगड्या-कुंकू धारण करतात पण मंगळसूत्र मात्र फक्त सुवासिनीच धारण करतात. कन्यादानानंतर विवाहहोमापूर्वी पतीने पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र समंत्रक बांधावयाचे असते आणि ते पतीच्या मरणापर्यंत अखंड धारण करावयाचे असते. पुरूषाच्या जानव्याप्रमाणेच याच्या अभावी भोजन व धर्मकृत्य करण्याचा सौभाग्यवतीस अधिकार नसतो. पती आधी मृत झाल्यास पतीच्या शवाबरोबरच याचा दाह करावयाचा असतो. ⇨ सती जाण्याची भावना यात प्रतिकरूपाने अभिप्रेत असावी, असे दिसते. ‘लिंगाकारसुवर्ण’, ‘चक्रांकुरासंकृति’ असाही धर्मग्रंथांत याच्या बंधनाचा विधी सांगितला आहे.

पहा : विवाहविधि (हिंदू).

केळकर, गोविंदशास्त्री