आनंद : (६ वे – ५ वे शतक इ. स. पू.). गौतम बुद्धाचा एक प्रसिद्ध शिष्य. गौतम बुद्धाच्या बोधिप्राप्तीपासून वीस वर्षे होऊनगेल्यावर पुढे अनेक वर्ष तो ‘उपस्थायक’ (उपट्‍ठाक) म्हणजे त्याच्या तैनातीत राहणारा शिष्य होता. अंगुत्तरनिकायातील ‘एतदग्गवग्ग’ या भागात बहुश्रुत, स्मृतिमान, गतिमान, धृतिमान अशा भिक्षूंमध्ये श्रेष्ठ, असे त्याचे वर्णन केले आहे. म्हणूनच त्याला ‘धर्मभांडागारिक’ अशीही संज्ञा प्राप्त झाली होती. हा अनेक वर्षे बुद्धाच्या साहचर्यात असल्यामुळे बुद्धाच्या धर्मोपदेशाशी इतर सर्व भिक्षूंपेक्षा जास्त परिचित होता. त्याच्याच रदबदलीमुळे गौतम बुद्धाने, स्त्रियांनाही सांघिक-धार्मिक जीवन जगता येईल, अशा तऱ्हेचा भिक्षुणीसंघ स्थापन करण्याविषयीची  ð महाप्रजापती गौतमीची (बुद्धाची सावत्र माता) विनंती मान्य केली. त्याच्या ठिकाणी गौतम बुद्धाबद्दल वैयक्तिक निष्ठा, आदर, प्रेम असल्यामुळे निरासक्ती हे ज्याचे वैशिष्ट्य आहे, असे अर्हत्त्व गौतम बुद्धाच्या परिनिर्वाणापर्यंत त्याला प्राप्त होऊ शकले नाही. बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर जेव्हा त्याच्या शिकवणीचे संकलन करण्याकरिता पहिली धर्मसंगीती भरली, त्यावेळी धर्मसंकलानचे काम करणारे सर्व अर्हत् पाहिजेत अशी अपेक्षा असल्यामुळे, ज्या ५०० भिक्षूंची नियुक्ती करावयाची होती त्यांत त्याचा समावेश होऊ शकला नाही. पण पुढे त्याने अर्हत्‌पद प्राप्त केल्यानंतर त्याचा त्यांत समावेश झाला. त्या पहिल्या संगीतीत धर्माचे संगायन आनंदाने केले, असे सर्व भिक्षू मानतात. म्हणून बुद्धाच्या अनेक धर्मोपदेशांचे आरंभीच ‘मी असे ऐकले आहे’ असे शब्द असतात, ते आनंदाने पहिल्या संगीतीच्या वेळी उच्चारलेल्या शब्दांना अनुलक्षूनच आहेत असे सर्वत्र मानले जाते.

बापट, पु. वि.