जैन संघ : महावीरांनी आपल्या अनुयायांची पुढील चार संघांत विभागणी केलेली होती : साधुसंघ (श्रमणसंघ), साध्वीसंघ (श्रमणीसंघ), श्रावकसंघ व श्राविकासंघ. प्राचीन काळापासून जैन धर्माचे साधुधर्म व गृहस्थधर्म असे दोन प्रकार आहेत. साधू किंवा श्रमण गृहत्याग करून ‘उपाश्रया’त (एक प्रकारच्या मठात) राहतात. श्रावक व श्राविका या गृहस्थ पुरुष वा स्त्रिया होत. हे शेवटचे दोन एकत्र राहण्याच्या दृष्टीने संघ नसले, तरी संकलितपणे त्यांना संघ म्हटले आहे. दिगंबर जैनांच्या मताप्रमाणे स्त्रियांना तद्‌भवमोक्ष (स्त्रीजन्मात मोक्ष) मिळत नसला, तरी त्यांना साधुधर्माचे आचरण करावयास आडकाठी नाही. गृहस्थधर्माचे आचरण त्या करू शकतातच. विशेष म्हणजे महावीरांच्या आचरण करणाऱ्यांमध्ये स्त्रियांची संख्या अधिक होती. आचार्य साधुसंघाचे नियमन करतात व मुख्य आर्यिका साध्वीसंघाचे नियमन करते. साधू आणि साध्वी यांची राहण्याची ठिकाणे वेगवेगळी असतात, त्यांना उपाश्रय म्हणतात. उपाश्रय म्हणजे एक मोठे आवार असते. त्यात स्वयंपाकगृह व स्नानगृह नसते. कारण साधूंनी भिक्षान्नसेवन व नदीप्रवाहात स्नान करावयाचे असते. उपाश्रयात येणाऱ्या गृहस्थांना साधू उपदेश करतात. उपाश्रयात लाकडी शयने असतात. साधूचे मर्यादित कपडे, कंबल, भिक्षापात्र, झाडण्यासाठी कुंचा, एकदंड व तोंडात जीवजंतू जाऊ नयेत म्हणून तोंडाला बांधवयाची कापडी पट्टी एवढ्याच वस्तू बाळगावयाच्या असतात. दीक्षा घेण्याच्या वेळेला साधूला ‘केशलोच’ म्हणजे डोक्यावरचे केस एकेक याप्रमाणे उपटून काढण्याचा (लुचंन) विधी करावा लागतो. केस स्वतःच्या हातानेच उपटून काढावे लागतात. पुढेही दोन वा अधिकात अधिक चार महिन्यांनी साधू आपल्या हाताने सर्व केस उपटून काढतात. त्यांना एकट्याने विहार करावयास बंदी असते. साधूंनी इतर साधूंशी कसे वागावे, गुरूशी कसे वागावे, आपली दिनचर्या कशी ठेवावी, भिक्षेसाठी विहार कसा करावा, कोणते अन्न स्वीकारावे इ. बाबींसंबंधी सविस्तर नियम घालून दिलेले आहेत. गुरूची आज्ञा मोडणे किंवा त्याचा अपमान करणे हा फार मोठा अपराध मानला जातो. आजारी असलेल्या साधूची किंवा गुरूची सेवा करणे हे ‘वैयापृत्य’ नावाचे आभ्यंतर तप मानलेले आहे. संघातील साधूला आपल्या अपराधाबद्दल आचार्याजवळ कबुली देऊन (आलोचना) प्रायश्चित घ्यावे लागते.

साधूला पाच महाव्रते, पाच समिती, तीन गुप्ती, बारा प्रकारचे तप, ध्यान इ. गोष्टींचे आचरण काळजीपूर्वक करावे लागते. गृहस्थाश्रमी श्रावक व श्राविका यांना पाच अणुव्रते, तीन गुणव्रते व चार शिक्षाव्रते पाळावी लागतात तसेच कमीत कमी सम्यक्‌त्वसहित अष्टमूलगुणांचे पालन करावे लागते. देवपूजा, गुरुभक्ती, स्वाध्याय, संयम, तप व दान ही गृहस्थाची दैनिक षट्‍कर्मे सांगितलेली आहेत. साधूसारख्या सत्पात्राला आहारदान देणे, त्याची भक्ती करणे हे पुण्यकारक असल्याचे सांगितले आहे. साधूंनीही सतत विहार करून गरीब वा श्रीमंत असा भेद न करता गृहस्थी लोकांना धर्माचा उपदेश द्यावा, कशाचीही आशा बाळगू नये, सर्वांना समानतेने वागवावे, मिळेल तो सात्त्विक आहार घ्यावा, गृहस्थी लोकांशी सलगी ठेवू नये इ. नियम त्यांना घालून दिलेले आहेत.                                                

पाटील, भ. दे.